श्रीमद् भगवद् गीता भाग ५० –
अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ४.३३ ते ४.३६ | श्रीमद् भगवद् गीता भाग ५०.
मूळ श्लोक –
श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञः परन्तप ।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥ ४-३३ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
परन्तप पार्थ = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), द्रव्यमयात् = द्रव्यमय, यज्ञात् = यज्ञापेक्षा, ज्ञानयज्ञः = ज्ञानयज्ञ, श्रेयान् = अत्यंत श्रेष्ठ आहे, (तथा) = तसेच, अखिलम् = जितकी म्हणून, सर्वम् = सर्व, कर्म = कर्मे (आहेत ती), ज्ञाने = ज्ञानामध्ये, परिसमाप्यते = समाप्त होऊन जातात ॥ ४-३३ ॥
अर्थ –
हे अर्जुना, द्रव्यांनी सिद्ध होणार्या यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ ( ज्याचा परिणाम ज्ञान ( साक्षात्कार ) आहे, यज्ञ ज्याची सृष्टी आहे, त्या अमृततत्त्वाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय. असा यज्ञ ) श्रेयस्कर आहे. परम कल्याणकारी आहे.
संपूर्ण कर्म ज्ञानात विलीन होऊन जाते. परिसमाप्यते ज्ञानात समाहित होऊन जाते. ज्ञान ही यज्ञाची पराकाष्ठा आहे. तत् पश्चात् कर्म केल्याने ना काही लाभ होतो किंवा न केल्याने ना काही नुकसान होत असते. या प्रकारे भौतिक द्रव्यांनी होणारे यज्ञ हे यज्ञच असतात; परंतु त्या ज्ञान यज्ञाच्या तुलनेत की ज्या यज्ञाचा परिणाम हा साक्षात्कार असतो, अत्यंत कमी प्रतीचे असतात. अशा भौतिक द्रव्यांनी सिद्ध अशा शेकडो यज्ञवेदी तुम्ही बनवल्यात, त्यात रुपयांचे हवन केलेत, चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च केलेत, साधू, संत व महापुरुषांच्या सेवेसाठी मुक्त हस्ताने पैसे खर्च केलेत तरी त्या ज्ञानयज्ञाच्या तुलनेत हे यज्ञ कमी प्रतीचे आहेत. वास्तविक यज्ञ हा श्वास-प्रश्नासाचा असतो, इंद्रियांच्या संयमाचा असतो, मनाचा निरोधाचा- नियमनाचा असतो, श्रीकृष्णांनी सांगितलेला हा यज्ञ कसा प्राप्त केला जाईल? तो मंदिरात, मशीदित, चर्चमध्ये की पुस्तकात मिळेल? श्रीकृष्ण म्हणतात- नाही तो अशा प्रकारे प्राप्त होणार नाही. त्याचा तर एकच स्त्रोत आहे. आणि तो म्हणजे परमतत्त्वाच्या ठिकाणी स्थित असणारा तत्त्वस्थित महापुरुष! व म्हणून-
मूळ श्लोक –
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४-३४ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
तत् = ते ज्ञान (तत्त्वदर्शी ज्ञानी माणसांच्या जवळ जाऊन), विद्धि = तू जाणून घे, प्रणिपातेन = (त्यांना) यथायोग्यपणे दंडवत प्रणाम करण्याने, सेवया = त्यांची सेवा करण्याने (आणि त्यांना), परिप्रश्नेन = कपट सोडून सरळपणे प्रश्न करण्याने, तत्त्वदर्शिनः = परमात्म-तत्त्व व्यवस्थितपणे जाणणारे, ते = ते, ज्ञानिनः = ज्ञानी महात्मे (तुला त्या), ज्ञानम् = तत्त्वज्ञानाचा, उपदेक्ष्यन्ति = उपदेश करतील ॥ ४-३४ ॥
अर्थ –
यासाठी हे अर्जुना, तू तत्त्वदर्शी महापुरुषाच्या जवळ जाऊन त्याला अत्यंत विनम्रपणे नमस्कार करून, ( अहंकाराचा त्याग करून, त्याला शरण जाऊन, दंडवत घालून ) त्याची चांगल्या प्रकारे सेवा करून, त्याला निष्कपट भावाने प्रश्न करून, त्याच्या ज्ञानाला जाणून घेण्याचा प्रयत्न कर. ते तत्त्वदर्शी ज्ञानयोगी तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील, तुला साधनेचा योग्य मार्ग दाखवतील, योगीजनांची समर्पित भावांनी सेवा केल्यानंतरच हे ज्ञान शिकण्याची-ग्रहण करण्याची क्षमता प्राप्त होत असते. तत्त्वदर्शी महापुरुष ‘परमतत्त्व परमात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन घडवून आणणारे आहेत. ते यज्ञाचे सर्व विधी विशेष जाणणारे असते, तर ज्ञानयोग्यांची, तत्त्वदर्शी महापुरुषांची , आवश्यकताच कशाला भासली असती?
वास्तविक अर्जुन प्रत्यक्ष भगवंतांच्या समोर तर उभा होता. मग भगवंत त्याला तत्त्वदर्शी योग्याकडे तू जा, असे का सांगत आहेत? श्रीकृष्ण स्वत: एक योगी होते. मग त्यांनी अर्जुनाला असे का सांगितले? कारणा आज अर्जुन माझ्यापुढे उभा आहे परंतु भविष्यात जर अर्जुनासारखाच कोण अनुरागी भक्ताला संभ्रम निर्माण झाला तर त्याला असे वाटता कामा नये की, श्रीकृष्ण तर निघून गेले, आता मी कोणाकडे जाऊ? कोणाला शरण जाऊ? म्हणून श्रीकृष्णांनी येथे स्पष्ट केले की तू परमतत्त्व जाणणाऱ्या योग्याकडे म्हणजेच तत्त्ववेत्त्याकडे तू जा. तो ज्ञानयोगी तुला उपदेश करेल आणि मग-
मूळ श्लोक –
यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥ ४-३५ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
यत् = जे, ज्ञात्वा = जाणल्यावर, पुनः = पुन्हा, एवम् = अशाप्रकारे, मोहम् = मोहाप्रत, न यास्यसि = तू जाणार नाहीस, पाण्डव = हे पांडवा (अर्थात पांडुपुत्र अर्जुना), येन = ज्या ज्ञानाच्या द्वारे, भूतानि = सर्व सजीवांना, अशेषेण = संपूर्णपणे, आत्मनि = आपल्यामध्ये, अथो = नंतर, मयि = सच्चिदानंदघन मज परमात्म्यामध्ये, द्रक्ष्यसि = तू पाहशील ॥ ४-३५ ॥
अर्थ –
आत्मज्ञानी अशा महापुरुषाकडून तुला हे आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तू असा परत कधीही मोहात पडणार नाहीस. त्या ज्ञानप्राप्तीनंतर संपूर्ण प्राणिमात्रांना तू स्वतःच्या ठायी पाहशील. म्हणजेच सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी एकच आत्मा आहे किंवा आपल्याच आत्म्याचा अंश सर्व प्राणिमात्रांमध्ये आहे हे तू पाहशील व जाणशील. जेव्हा सर्वत्र एकच आत्मस्वरूप पाहण्याची क्षमता-सामर्थ्य तुला प्राप्त होईल, तेव्हाच तू माझ्यामध्ये प्रवेश करशील व मग तुला कळेल की सर्व जीव माझेच अंश आहेत, ते माझ्यात आहेत आणि ते माझेच आहेत.
या प्रकारे परमात्म्याला जर प्राप्त करावयाचे असेल तर तत्त्वस्थित महापुरुषांनाच शरण गेले पाहिजे. त्यांच्याद्वाराच ईश्वर स्वरूपाची प्राप्ती होते व म्हणून श्रीकृष्ण सांगत आहेत की, ज्ञानासंबंधी धर्म व शाश्वत सत्यासंबंधी काही शंका असतील तर साधकाने तत्त्वदर्शी ज्ञानयोग्यांनाच विचारावे, त्यांचेच मार्गदर्शन घ्यावे, त्यांनाच शरण जावे.
मूळ श्लोक –
अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि ॥ ४-३६ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
चेत् = जरी, सर्वेभ्यः = सर्व, पापेभ्यः = पापी माणसापेक्षा, अपि = सुद्धा, पापकृत्तमः = अधिक पाप करणारा असा, असि = तू असलास (तरी सुद्धा), ज्ञानप्लवेन = ज्ञानरूपी नौकेने, एव = निःसंशयपणे, सर्वम् = संपूर्ण, वृजिनम् = पापसमुद्र, सन्तरिष्यसि = तू चांगल्याप्रकारे तरून जाशील ॥ ४-३६ ॥
अर्थ –
हे अर्जुना, सर्व पातक्यांहून अधिक पातकी असलास, अत्यंत पापी असलास तरी ज्ञानाच्या अंगी इतके सामर्थ्य आहे की त्या ज्ञाननौकेने तू सर्व ‘पातके तरून जाशील. याचा अर्थ असा नव्हे की, आपण कितीही भयंकर
पातके केली तरी कधीही तरून जाऊ शकू. श्रीकृष्णांच्या सांगण्याचे तात्पर्य ‘एवढेच आहे की कोणत्याही साधकाने असा गैरसमज करून घेऊ नये की, मी अत्यंत पापी आहे’, ‘ मी हा सागर पार करू शकणार नाही ‘ म्हणून श्रीकृष्ण साधकांना प्रोत्साहन व आश्वासन देत आहेत की तुम्ही जरी पापांचे आगर असलात, पापाचा महासागर असलात तरी देखील परमतत्त्वस्थित महापुरुषाने दिलेल्या ज्ञानरूपी नौकेने तुम्ही निश्चितपणे सर्व पातके पार ‘करून जाऊ शकाल. पण कशा प्रकारे?
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग ५०.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.