श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५१

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५१

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५१ –

अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ४.३७ ते ४.४० | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५१.

मूळ श्लोक –

यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥ ४-३७ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अर्जुन = हे अर्जुना, यथा = ज्याप्रमाणे, समिद्धः = प्रज्वलित, अग्निः = अग्नी, एधांसि = सर्पणाला, भस्मसात्‌ = भस्ममय, कुरुते = करतो, तथा = त्याप्रमाणे, ज्ञानाग्निः = ज्ञानरूपी अग्नी, सर्वकर्माणि = संपूर्ण कर्मांना, भस्मसात्‌ = भस्ममय, कुरुते = करून टाकतो ॥ ४-३७ ॥

अर्थ –

हे अर्जुना, ज्या प्रकारे प्रज्ज्वलित झालेला अग्नी जसा काष्ठांचे भस्म करून टाकतो तशाच प्रकारे ज्ञानरूप अग्नी सर्व भौतिक-प्राकृत कर्मे जाळून भस्मसात करून टाकतो. आत्मदर्शी महापुरुषांकडून मिळालेले यज्ञाचे ज्ञान म्हणजे ज्ञानाचे प्रवेशद्वार नव्हे. हे ज्ञान म्हणजे साक्षात्काराच्या पराकाष्ठेचे चित्रण आहे की ज्यात प्रथम भौतिक कर्मे भस्म होतात आणि मग परमात्म्याच्या प्राप्तीबरोबर चिंतन कर्मांचाही त्यातच विलय होतो. ज्याला प्राप्त करावयाचे होते त्या परमतत्त्वाला प्राप्त केल्यानंतर आता कोणाचे चिंतन करायचे व कोणाला शोधत भटकायचे? असा साक्षात्कारी ज्ञानयोगी आपल्या सर्व शुभाशुभ कर्माचा अंत आणीत असतो, ती समाप्त करीत असतो. परंतु हा साक्षात्कार कोठे होईल? बाहेर होईल की आत? यावर श्रीकृष्ण म्हणतात

मूळ श्लोक –

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ ४-३८ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

इह = या संसारात, ज्ञानेन = ज्ञानाशी, सदृशम्‌ = समान, पवित्रम्‌ = पवित्र करणारे, हि = निःसंदेहपणे, न विद्यते = काहीही नाही, तत्‌ = ते ज्ञान, कालेन = दीर्घ काळाने, योगसंसिद्धः = कर्मयोगाच्या द्वारे अंतःकरण शुद्ध झालेला मनुष्य, स्वयम्‌ = आपण स्वतःच, आत्मनि = आत्म्यामध्ये, विन्दति = प्राप्त करून घेतो ॥ ४-३८ ॥

अर्थ –

या जगात ज्ञानासारखी पवित्र करणारी दुसरी कोणतीही वस्तू नाही. योगाच्या परिपक्व अवस्थेत ( प्रारंभी नाही ) तू स्वत:या ज्ञानाचा साक्षात्कार स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी, तुझ्या हृदय देशी अनुभवू शकशील, प्राप्त करू शकशील. हा अनुभव तुला तुझ्या अंतरंगातच घेता येईल. बाहेर घेता येणार नाही. परंतु या ज्ञानप्राप्तीसाठी कोणती योग्यता आवश्यक असते? योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक –

श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ४-३९ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

संयतेन्द्रियः = जितेंद्रिय, तत्परः = साधन-तत्पर, (च) = आणि, श्रद्धावान्‌ = श्रद्धावान असा मनुष्य, ज्ञानम्‌ = ज्ञान, लभते = प्राप्त करून घेतो, ज्ञानम्‌ = ज्ञानाची, लब्ध्वा = प्राप्ती झाल्यावर, (सः) = तो मनुष्य, अचिरेण = विनाविलंब तत्काळ, पराम्‌ शान्तिम्‌ = भगवत्‌-प्राप्तिरूप परम शांती, अधिगच्छति = प्राप्त करून घेतो ॥ ४-३९ ॥

अर्थ –

जो श्रद्धावान आहे, तत्पर आहे व जितेंद्रिय आहे अशा पुरुषाला ज्ञान प्राप्त होत असते. जर भावपूर्व, श्रद्धापूर्व जिज्ञासा नसेल तर ज्ञानयोग्यापाशी जाऊनही साधकाला ज्ञान प्राप्त होत नाही. अर्थात केवळ श्रद्धा असून भागत नाही. कारण श्रद्धावान नेहमीच कठीण परिश्रम करणारा, दृढ प्रयत्नशील असतोच असे नाही, तेव्हा श्रद्धेबरोबरच तो ज्ञान प्राप्त करण्याबाबत अत्यंत तत्पर असला पाहिजे. म्हणजेच महापुरुषाने निर्दिष्ट केलेल्या ज्ञानपथावर तत्परतेने त्याने चालले पाहिजे, तशी जिद्द त्याच्याजवळ असली पाहिजे. जो कामवासनांपासून विरक्त झालेला नाही त्याला साक्षात्कार ( ज्ञान प्राप्ती ) प्रात करून घेणे कठीण आहे. जो अत्यंत श्रद्धावान आहे, आचरणात तत्पर आहे व जो आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवू शकतो असा मुमुक्षूच ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. असे आत्मज्ञान प्राप्त झाल्याबरोबर त्याला परम शांतीही लगेच प्राप्त होते. यानंतर प्राप्त करण्याजोगे दुसरे काहीही त्याच्यासाठी शिल्लक रहात नाही हीच परम आध्यात्मिक अन्तिम शांती आहे. तो यानंतर मात्र कधीही अशांत किंवा अस्वस्थ बनत नाही आणि जेथे ही श्रद्धा असत नाही तेथे-

मूळ श्लोक –

अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥ ४-४० ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अज्ञः = जो विवेकहीन, च = आणि, अश्रद्दधानः = श्रद्धारहित असतो, संशयात्मा = असा संशययुक्त मनुष्य, विनश्यति = परमार्थापासून निश्चितपणे भ्रष्ट होऊन जातो, संशयात्मनः = अशा संशययुक्त माणसाला, अयम्‌ लोकः = हा लोक, न अस्ति = नसतो, न परः = परलोक नसतो, च = आणि, न सुखम्‌ = सुखही नसते ॥ ४-४० ॥

अर्थ –

जो ज्ञानहीन आहे म्हणजे यज्ञाच्या विधीविशेषतेबद्दल जो अनभिज्ञ आहे, जो अश्रद्ध आहे तसेच जो अत्यंत संशयखोर आहे असा पुरुष परमार्थपथापासून च्यूत होतो, त्याचे अधःपतन होते, तो अधोगतीला जातो. त्यातूनही जो संशयखोर आहे त्याला ना इहलोक मिळतो, ना परलोक, ना कसले सुख! तेव्हा साधकाने ज्ञानयोगी महापुरुषाजवळ जाऊन या मार्गावरील सर्व संशयाचे निराकरण करून घेतले पाहिजे. नाहीतर त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती कधीही होणार नाही. मग हे आत्म-ज्ञान कोण प्राप्त करू शकतो?

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५१.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment