श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५३

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५३

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५३ –

अध्याय पाचवा कर्मसंन्यासयोग –

अध्याय ५ – ज्ञानकर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ५.०१ ते ५.०४ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५३.

श्री परमात्मने नमः

॥ अथ वश्चमोडध्यायः ॥

तिसऱ्या अध्यायात अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रश्‍न विचारला होता की भगवान, जर ज्ञानयोग आपल्याला श्रेष्ठ वाटतो तर मग मला हा महा कठीण कर्मयोग आचरण्यास का सांगत आहात? अर्जुनाला कर्मयोगापेक्षा ज्ञानयोग सोपा व आचरण्यास सरळ आहे असे वाटले, कारण ज्ञानयोगात पराजय झाला तर देवत्व व विजय प्राप्त झाला तर “परमपद प्राप्ती’ – म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये लाभच आहे असे त्याला वाटले. परंतु नंतर त्याला समजले की दोन्ही मार्गात कर्म तर करावेच लागते. ( आणि योगेश्वर श्रीकृष्णांनी त्याला संशयरहित होऊन साक्षात्कारी महापुरषाला शरण जायला सांगितले आहे, कारण संशयनिराकरणाचे व समजून घेण्याचे तेच एक योग्य स्थान आहे ) परंतु दोन्ही मार्गापैकी एक मार्ग निवडण्यापूर्वी अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला-

मूळ पाचव्या अध्यायाचा प्रारंभ

मूळ श्लोक –

अर्जुन उवाच
संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्‌ ॥ ५-१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, कृष्ण = हे कृष्णा, कर्मणाम्‌ = कर्मांच्या, संन्यासम्‌ = संन्यासाची, च = तसेच, पुनः = त्यानंतर, योगम्‌ = कर्मयोगाची, शंससि = प्रशंसा करीत आहात, (अतः) = म्हणून, एतयोः = या दोहोंतील, यत्‌ = जे, एकम्‌ = एक, मे = माझ्यासाठी, सुनिश्चितम्‌ = चांगल्याप्रकारे निश्चित, श्रेयः = कल्याणकारक साधन (होईल), तत्‌ = ते, ब्रूहि = तुम्ही (मला) सांगा ॥ ५-१ ॥

अर्थ –

अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही एकदा कर्मसंन्यासाची व पुन्हा एकदा निष्काम वृत्तीने केल्या जाणार्‍या कर्मयोगाची प्रशंसा करता. पण या दोन्हींपैकी तुमच्या मते जो श्रेयस्कर व परम कल्याणकारी मार्ग असेल तो मला सांगा. एखाद्या विवक्षित ठिकाणी जायला दोन मार्ग असतील, तर कोणता मार्ग सुखकारक व सुलभ आहे असे नक्कीच आपण विचारू. जर विचारले नाही तर मग आपल्याला जायचेच नाही असा त्याचा अर्थ होईल. यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणाले-

मूळ श्लोक –

श्रीभगवानुवाच
संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥ ५-२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, संन्यासः = कर्मसंन्यास, च = आणि, कर्मयोगः = कर्मयोग, उभौ = हे दोन्हीही, निःश्रेयसकरौ = परम कल्याण करणारे आहेत, तु = परंतु, तयोः = त्या दोन्हींमध्येही, कर्मसंन्यासात्‌ = कर्मसंन्यासापेक्षा, कर्मयोगः = कर्मयोग (हा साधण्यास सुगम असल्यामुळे), विशिष्यते = श्रेष्ठ आहे ॥ ५-२ ॥

अर्थ –

हे अर्जुना, संन्यास माध्यमातून केलेले कर्म म्हणजेच कर्मसंन्यास किंवा ज्ञानमार्ग! आणि निष्काम भावनेने केले जाणारे कर्म म्हणजे कर्ममार्ग! हे दोन्ही मार्ग मोक्षदायक आहेत. परंतु या दोन्हीं मार्गामध्ये ज्ञानमार्गापेक्षा निष्काम कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की कर्मयोग श्रेष्ठ का?

मूळ श्लोक –

ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति ।
निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥ ५-३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

महाबाहो = हे महाबाहो अर्जुना, यः = जो मनुष्य, न द्वेष्टि = (कोणाचाही) द्वेष करीत नाही, न काङ्क्षति = कशाचीही आकांक्षा करीत नाही, सः = तो कर्मयोगी, नित्यसंन्यासी = सदा संन्यासीच, ज्ञेयः = समजण्यास योग्य आहे, हि = कारण, निर्द्वन्द्वः = राग-द्वेषादि द्वंद्वांनी रहित असा तो, बन्धात्‌ = संसारबंधनातून, सुखम्‌ = सुखाने, प्रमुच्यते = मुक्त होऊन जातो ॥ ५-३ ॥

अर्थ –

हे महाबाहो अर्जुना, जो मनुष्य कोणाचा द्वेष करीत नाही किंवा जो कशाचीही इच्छा करीत नाही असा कर्मयोगी नित्य संन्यासीच समजावा. मग तो योगी ज्ञानयोगाचे आचरण करणारा असा की कर्मयोगाचे आचरण करणारा असो. जो रागद्वेषादि द्रंद्ररहित बनतो तो पुरूष भवबंधनातून अनायास मुक्त होतो.

मूळ श्लोक –

सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः ।
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम्‌ ॥ ५-४ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

बालाः = मूर्ख लोकच, सांख्ययोगौ = संन्यास व कर्मयोग हे, पृथक्‌ = वेगवेगळी फळे देणारी आहेत असे, प्रवदन्ति = म्हणतात (परंतु), न पण्डिताः = पंडितजन तसे म्हणत नाहीत, (हि) = कारण दोन्हीतील, एकम्‌ अपि = एकामध्येही, सम्यक्‌ = योग्य प्रकाराने, आस्थितः = स्थित असणारा मनुष्य, उभयोः = दोन्हींचे, फलम्‌ = फळरूप (परमात्मा), विन्दते = प्राप्त करून घेतो ॥ ५-४ ॥

अर्थ –

निष्काम कर्मयोग किंवा ज्ञानयोग हे भिन्न भिन्न आहेत असे अज्ञानी- मूर्ख लोक म्हणतात; परंतु ज्ञानी लोक, पंडित लोक असे समजत नाहीत. कारण या दोन मार्गापैकी कुठल्या एका मार्गाचे जरी योग्य अनुष्ठान केले, तरी ते करणाऱ्याला त्याचे फलरुप परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणजे दोन्ही मार्गाचे फल एक सारखेच असते-समान असते. म्हणून दोन्ही मार्ग सारखेच श्रेयस्कर आहेत.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५३.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment