श्रीमद् भगवद् गीता भाग ५४ –
अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ५.०५ ते ५.०७ | श्रीमद् भगवद् गीता भाग ५४ –
मूळ श्लोक –
यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥ ५-५ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
यत् = जे, स्थानम् = परमधाम, सांख्यैः = ज्ञानयोग्यांकडून, प्राप्यते = प्राप्त करून घेतले जाते, तत् = तेच, (स्थानम्) = परमधाम, योगैः = कर्मयोग्यांकडून, अपि = सुद्धा, गम्यते = प्राप्त करून घेतले जाते, सांख्यम् = ज्ञानयोग, च = आणि, योगम् = कर्मयोग (हे फलरूपाने), एकम् = एक आहेत असे, यः = जो मनुष्य, पश्यति = पाहतो, सः च = तोच, पश्यति = यथार्थ पाहतो ॥ ५-५ ॥
अर्थ –
सांख्यमार्गाने जाणाऱ्यांना जे मोक्षरुपी स्थान प्राप्त होते तेच निष्काम कर्ममार्गाचे अनुष्ठान करणाऱ्यांनाही प्राप्त होते. तेव्हा सांख्यमार्ग व कर्मयोग फलदृष्ट्या एकच आहेत असे जो सांगतो तोच खरा ज्ञानी होय. जर दोहोंचे ‘फळ एकच म्हणजे मोक्षप्राप्ती हे आहे, तर निष्काम कर्मयोग श्रेयस्कर आहे हे कसे? यावर श्रीकृष्ण म्हणतात-
मूळ श्लोक –
संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः ।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति ॥ ५-६ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
तु = परंतु, महाबाहो = हे महाबाहो अर्जुना, अयोगतः = कर्मयोगाशिवाय, संन्यासः = संन्यास म्हणजे मन, इंद्रिये व शरीर यांच्या द्वारे होणाऱ्या सर्व कर्मांच्या कर्तेपणाचा त्याग, आप्तुम् = प्राप्त होणे, दुःखम् = कठीण आहे, मुनिः = भगवत्स्वरूपाचे चिंतन करणारा, योगयुक्तः = कर्मयोगी, ब्रह्म = परब्रह्म परमात्म्याला, नचिरेण = लवकरच, अधिगच्छति = प्राप्त करून घेतो ॥ ५-६ ॥
अर्थ –
हे माहाबाहो अर्जुना, निष्काम कर्मयोगाचे आचरण केल्याशिवाय संन्यास’ कर्मसंन्यासाची प्राप्ती होणे दुर्घट आहे. जो कर्मयोगाच्या आचरणाला प्रारंभच करीत नाही त्याला कर्मसंन्यास कोठून प्राप्त होणार? पण जो भगवत्स्वरूपाचे चिंतन करतो, ज्याची मनासहित इंद्रिये ज्याच्या ताब्यात आहेत, अशा कर्मयोगयुक्त मुनीला ब्रह्मप्राप्ती अल्पकालात होते.
म्हणजे ज्ञानयोगात निष्काम कर्मयोगाचे आचरण करावेच लागते; कारण दोन्ही मार्गात यज्ञ प्रक्रिया म्हणजेच ईश्वराची आराधना हा मूळ हेतू एकच आहे. फक्त करणाऱ्याच्या दृष्टिकोनात फरक आहे. एक आपल्या क्षमतेला जाणून व लाभहानीचा विचार करून कर्म करण्यास प्रवृत्त हेतो; तर दुसरा निष्काम कर्मयोगी ईश्वरावर प्रगाढ श्रद्धा ठेवून त्याच्याच आराधनेत मग्न होतो. आधुनिक भाषेत सांगावयाचये असेल तर एक प्रायव्हेटमध्ये शिक्षण घेतो व दुसरा नॉमिनेटमध्ये. दोघांचा अभ्यासक्रम एकच आहे, परीक्षाही एकच आहे. परीक्षक व निरीक्षकही एकच आहेत. तसेच दोघांचेही सदगुरू तत्त्वदर्शी आहेत व दोघांची प्राप्त करावयाची पदवीही एकच आहे. फक्त दोघांच्या अभ्यासाची पद्धत- त्यांचा दृष्टीकोन भिन्न आहे.
मागे श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, काम व क्रोध हे साधकाचे भयंकर शत्रू आहेत. तेव्हा अर्जुना त्यांना प्रथम तू ठार कर. अर्जुनाला वाटले की ही गोष्ट तर फारच कठीण आहे. परंतु श्रीकृष्ण म्हणाले अरे, शरीरापेक्षा इंद्रिये श्रेष्ठ आहेत, इंद्रियापेक्षा तुझे मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ व बुद्धीपेक्षा तुझे स्वरुप श्रेष्ठ आहे व तुला त्या स्वरुपात जावयाचे आहे. तेव्हा या प्रकारे आपल्या क्षमतेला ओळखून, आपले सामर्थ्य ओळखून, स्वावलंबी बनून कर्ममार्गाचे आचरण करणे म्हणजेच ‘ ज्ञानयोग ‘ आहे. यापूर्वी श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले होते की चित्त माझ्या ठिकाणी ठेवून, सर्व कर्मे मला अर्पण करुन, आशा, ममता व सत्ता यांचा मोह सोडून, तू युद्ध कर. समर्पणा बरोबर ईश्वरावर प्रगाढ श्रद्धा ठेवून कर्म करणे म्हणजेच निष्काम कर्मयोग आहे. म्हणजेच दोन्ही मार्गात कृती एकच आहे व परिणामही एक आहे.
यावर भार देऊन योगेश्वर श्रीकृष्ण येथे म्हणत आहेत की कर्मयोगाचे आचरण केल्याशिवाय कर्मसंन्यास म्हणजेच शुभाशुभ कर्मत्याग प्राप्त होणे असंभव आहे. श्रीकृष्णांच्या मते असा कोणताच योगी नाही की जो स्वस्थ बसून सांगतो की- “ मी परमात्मा आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे माझ्यापाशी ना कसले कर्म आहे, ना कसले बंधन! माझ्या हातून ज्या बऱ्यावाईट क्रिया घडत आहेत त्या मी करीत नसून माझी इंद्रिये करीत असतात”. अशा प्रकारचे पाखंडी विचार श्रीकृष्णांनी कधीच सांगितले नाहीत.
साक्षात योगेश्वर श्रीकृष्ण सुध्दा आपल्या परममित्र अर्जुनाला कर्म न करता ही स्थिती प्राप्त करून देऊ शकले नाहीत. जर ते असे करु शकले असते, तर गीता सांगण्याची आवश्यकताच काय होती? कोणत्याही योगमार्गात कर्म तर करावेच लागते. कर्म करीतच संन्यास अवस्था प्राप्त केली जाते व मग अशा योगयुक्त पुरुषाला परमात्म्याची प्राप्ती सुगमतेने व शीत्रतेने होते. आता अशा योगयुक्त पुरुषाची लक्षणे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात-
मूळ श्लोक –
योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः ।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ५-७ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
विशुद्धात्मा = ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे, विजितात्मा = ज्याचे मन त्याच्या स्वाधीन आहे, जितेन्द्रियः = जो जितेंद्रिय आहे, (च) = आणि, सर्वभूतात्मभूतात्मा = सर्व सजीवांचा आत्मरूप परमात्मा हाच ज्याचा आत्मा आहे असा, योगयुक्तः = कर्मयोगी, कुर्वन् अपि = कर्म करीत असताना सुद्धा, न लिप्यते = लिप्त होत नाही ॥ ५-७ ॥
अर्थ –
‘ विजितात्मा ‘- ज्याने आपल्या शरीरावर विजय मिळवला आहे, ‘ जितेन्द्रिय’ ज्याने आपली इंद्रिये जिंकली आहेत. व ‘विशुद्धात्मा’ – ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे, ‘सर्वभूतात्मभूतात्मा ‘ सर्वभूतांच्या ठिकाणी असणारा जो आत्मा, त्याच्याशी एकरुप झाला आहे असा पुरुष कर्म करीत असला तरी-कर्मापासून अलिप्त असतो. मग तो कर्म का करतो? पाठीमागून येणार्यांमध्ये परमकल्याणकारी बीजाचा संग्रह करण्यासाठी तो कर्म करतो. पण मग त्यापासून तो अलिप्त कसा राहतो? त्यात तो अडकून का राहत नाही? कारण सर्व प्राणिमात्रांचा मूल उद्गम असणारा जो परमात्मा, त्यात तो स्थित झालेला असतो, तद्रूप झालेला असतो, म्हणून यापुढे ज्याचा शोध घ्यावा अशी कोणतीच वस्तू बाकी राहिलेली नसते. मागील सर्व गोष्टी त्याला आता इतक्या क्षुद्र वाटतात की त्यांच्याविषयी त्याच्या मनात आसक्ती निर्माण होत नाही. त्यामुळे त्या कर्मामध्ये तो लिप्त होत नाही. हे योगयुक्त पुरुषाच्या परमसीमेचे चित्रण आहे. योगमुक्त पुरुष कर्मामध्ये लिप्त का होत नाही याचे, अधिक स्पष्टीकरण पुढील श्लोकात केले आहे.
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग ५४.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.