श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५५

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५५

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५५ –

अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ५.०८ ते ५.११ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५५ –

मूळ श्लोक –

नैव किञ्चित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्‌ ।पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन्‌ ॥ ५-८ ॥
प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्‌ ॥ ५-९ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

पश्यन्‌ = पाहाताना, शृण्वन्‌ = ऐकताना, स्पृशन्‌ = स्पर्श करताना, जिघ्रन्‌ = वास घेताना, अश्नन्‌ = भोजन करताना, गच्छन्‌ = गमन करताना, स्वपन्‌ = झोपताना, श्वसन्‌ = श्वास घेताना, प्रलपन्‌ = बोलताना, विसृजन्‌ = त्याग करताना, गृह्णन्‌ = घेताना, (तथा) = तसेच, उन्मिषन्‌ = डोळे उघडताना, (च) = आणि, निमिषन्‌ = डोळे मिटताना, अपि = सुद्धा, इन्द्रियाणि = सर्व इंद्रिये, इन्द्रियार्थेषु = आपापल्या विषयांत, वर्तन्ते = व्यवहार करीत आहेत, इति = असे, धारयन्‌ = समजून, तत्त्ववित्‌ = तत्त्व जाणणाऱ्या, युक्तः = सांख्यायोगी मनुष्याने, एव = निःसंदेहपणे, इति = असा, मन्येत = विचार करावा की, किञ्चित्‌ = काही सुद्धा, न करोमि = मी करीत नाही ॥ ५-८, ५-९ ॥

अर्थ –

परमतत्त्व परमात्म्याचा ज्याला साक्षात्कार झालेला आहे, जो त्याच्या ठिकाणी चिद्रूप झालेला आहे, ‘ मी देह’ आहे ही आठवणसुध्दा ज्याला राहिलेली नसते, अशा योगयुक्त पुरुषाला आपण काही कर्म करीत आहोत, असे वाटत नाही. अर्थात, ही काही नुसती कल्पना नाही, परंतु कर्म करुन त्याने प्राप्त केलेली स्थिती आहे. असा दिव्य योगयुक्त पुरुष सर्व काही ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, बोलत असता, देत असता, घेत असता, डोळयांची उघडझाप करीत असता, प्राकृत इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहेत असे तो समजतो.

परमात्म्याहून श्रेष्ठ असे दुसरे या जगात काहीही नाही,आणि मग त्या दिव्यत्वात जो स्थित झाला, तद्रूप झाला आहे, तो दुसऱया कोणत्याही सुखाची कामना कशाला करेल? जर परमात्म्याहून अधिक श्रेष्ठ वस्तू कोणती असती तर तिच्याविषयी त्याला आसक्ती वाटली असती पण इथे प्राप्त करण्यासारखे काहीही राहिले नाही व म्हणूनच ज्याला परम परमात्म्याचा साक्षात्कार झालेला असतो, तो आता जाणार कुठे? आणि त्यागेल तरी काय? व म्हणूनच योगयुक्त पुरुष त्याच्या कर्मात लिप्त होत नाही. ही गोष्ट श्रीकृष्ण पुढे उदाहरणाने स्पष्ट करीत आहेत.

मूळ श्लोक –

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥ ५-१० ॥

संदर्भित अन्वयार्थ –

ब्रह्मणि = परमात्म्यामध्ये, कर्माणि = सर्व कर्मे, आधाय = अर्पण करून, (च) = आणि, सङ्गम्‌ = आसक्तीचा, त्यक्त्वा = त्याग करून, यः = जो मनुष्य, (कर्म) = कर्म, करोति = करतो, सः = तो मनुष्य, अम्भसा = पाण्याने, पद्मपत्रम्‌ इव = कमळाच्या पानाप्रमाणे, पापेन = पापाने, न लिप्यते = लिप्त होत नाही ॥ ५-१० ॥

अर्थ –

कमल चिखलात उगवत असते. रात्रंदिवस ते पाण्यातच असते; परंतु तरीही त्याच्या पाकळया पाहाल, तर त्या तुम्हाला कोरडयाच दिसतील. पाण्याचा एक थेंबही त्याच्यावर टिकत नाही. म्हणजे दलदलीत व पाण्यात राहूनही ते त्यांच्यापासून अलिप्त असते. तसेच जो ब्रह्माच्या ठिकाणी आपली सर्व कर्मे अर्पण करुन ( साक्षात्कार झाल्याबरोबर त्या योगयुक्त पुरुषाची कर्मेही परमात्म्यात विलीन होत असतात. ) फलाची आसक्ती सोडून ( परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर ज्याची आसक्ती करावी असे काही शिल्लक राहत नाही ) कर्मे करतो, तो कमलपत्र जसे पाण्यापासून अलिप्त असते तसा पापापासून अलिप्त असतो.

मूळ श्लोक –

कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥ ५-११ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

योगिनः = कर्मयोगी (ममत्व बुद्धीने रहित होऊन), केवलैः = केवळ, आत्मशुद्धये = अंतःकरणाच्या शुद्धीसाठी, इन्द्रियैः = इंद्रियांनी, मनसा = मनाने, बुद्ध्या = बुद्धीने, (च) = तसेच, कायेन अपि = शरीरानेही होणारी, कर्म = सर्व कर्मे, सङ्गम्‌ = आसक्तीचा, त्यक्त्वा = त्याग करून, कुर्वन्ति = करतात ॥ ५-११ ॥

अर्थ –

कर्मयोगी केवळ इंद्रिये मन, बुद्धी आणि शरीरद्वारा फलासक्ती टाकून आत्मशद्धीसाठी कर्म करीत असतात. जेव्हा सर्व कर्मे ब्रह्मामध्ये विलीन होतात, तेव्हाही आत्मा अशुद्ध असतो का? नाही. ते “सर्वभूतात्मभूतात्मा ‘ झालेले असतात. सर्व प्राणिमात्रांमध्ये आपल्या आत्माचा विस्तार झालेला ते पाहतात. त्या सर्व आत्म्यांच्या शुद्धीसाठी, आपल्या सर्वाच्या मार्गदर्शनासाठी ते कर्मयोगी कर्म करीत असतात. वास्तविक ते बाहेरुन सक्रीय दिसले; परंतु अंतर्यामी मात्र ते स्थिर असतात- शांत असतात. दोरी जळून गेल्यावर तिची राख शिल्लक असली, तरी ती बद्ध करु शकत नाही.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५५.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment