श्रीमद् भगवद् गीता भाग ५६ –
अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ५.१२ ते ५.१५ | श्रीमद् भगवद् गीता भाग ५६ –
मूळ श्लोक –
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥ ५-१२ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
कर्मफलम् = कर्माच्या फळाचा, त्यक्त्वा = त्याग करून, युक्तः = कर्मयोगी, नैष्ठिकीम् = भगवत्प्राप्तीरूप, शान्तिम् = शांती, आप्नोति = प्राप्त करून घेतो, (च) = आणि, अयुक्तः = सकाम पुरुष, कामकारेण = कामनेच्या प्रेरणेने, फले = फळामध्ये, सक्तः = आसक्त होऊन, निबध्यते = बंधनात पडतो ॥ ५-१२ ॥
अर्थ –
“योगयुक्त ‘ म्हणजेच योगमार्गाचे फल-जे परमात्माप्राप्ती ती ज्याने प्राप्त करुन घेतली आहे असा पुरुष, सर्व प्राणिमात्रांच्या आत्म्यामध्ये स्थित असणाऱ्या परमात्म्यामध्ये निरंतर स्थित असतो. असा कर्मयोगी कर्मफलाचा त्याग करुन ( कर्माचे फल जो परमात्मा, जाम आता भिन्न राहिलेला नाही. तेव्हा आता कर्मफलाचा त्याग करुन ) ‘ नैष्ठिकीम् शान्तिम आपोति’ अत्यंत श्रेष्ठ अशी शांती मिळवतो की, जिच्यापुढे आता कोणतीच दुसरी शांती प्राप्त करण्याचे शिल्लक राहिले नाही. अशी श्रेष्ठ शांती प्राप्त झाल्यानंतर तो योगी पुन्हा कधीही अस्वस्थ किंवा अशांत बनत नाही. परंतु जो अजून योगरहित आहे, तो पुरुष कामनेच्या योगाने फळाच्या ठायी आसक्त होणे आवश्यकच आहे. परंतु त्यात आसक्त होऊनही ( कामनेमुळे ) “कामकारेण निबध्यते’ पापपुण्यामुळे बद्ध होतो, कारण परमेश्वरप्राप्तीपर्यंत कामना जागृत असतात व म्हणून साधकाला मोक्षप्राप्ती होईपर्यंत सावधान राहिले पाहिजे. दक्ष राहिले पाहिजे.
महाराजश्री म्हणत असत ” जर एक क्षणभर जरी आम्ही भगवंतापासून वेगळे झालो, तर माया आपले जाळे टाकण्यात सफल होत असते. भले उद्या त्याला मोक्ष प्राप्त होणार असेल, पण आज तर साधक अजून अज्ञानीच आहे व म्हणून साधनापूर्तीपर्यंत, मोक्षप्राप्तीपर्यंत साधकाने किंचितही असावध राहू नये ” यापुढे ते म्हणतात-
मूळ श्लोक –
सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ॥ ५-१३ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
वशी = ज्याला अंतःकरण वश आहे असा सांख्ययोगाचे आचरण करणारा, देही = पुरुष, न कुर्वन् = काही न करता, (च) = तसेच, न कारयन् एव = काहीही न करविताच, नवद्वारे = नऊ द्वारे असणाऱ्या शरीररूपी, पुरे = घरात, सर्वकर्माणि = सर्व कर्मांचा, मनसा = मनाने, संन्यस्य = त्याग करून, सुखम् = आनंदपूर्वक (सच्चिदानंदघन परमात्म्याच्या स्वरूपात), आस्ते = राहातो ॥ ५-१३ ॥
अर्थ –
जो जितेंद्रिय आहे, म्हणजे ज्याने शरीरस्थित इंद्रिये, बुद्धी व मन यांना आपल्या ताब्यात ठेवले आहे व जो दिव्यस्वरूप अशा परमात्म्यामध्ये स्थित आहे, असा पुरुष कोणतेही कर्म करीत नसतो किंवा करवून घेत नसतो. मागाहून येणाऱ्यांकडून कर्म करुन घेण्यानेही त्याची आंतरिक शांती भंग होत नाही. असा स्वरूपस्थितपुरूष शब्दादि विषय निर्माण करणाऱ्या नऊ द्वार ( दोन कान, दोन नेत्र, दोन नाकपुडया, एक मुख व गुदद्वारे ) असणाऱ्या शरीररुपी घरामध्ये सर्व कर्मांचा मनाने त्याग करून स्वरूपानन्दामध्ये राहत असतो. तात्पर्य तो काहीही करत नसतो, ना कोणाकडून काही करवून घेत असतो.
हीच गोष्ट श्रीकृष्ण दुसऱया शब्दात सांगताना म्हणतात की, तो प्रभू ना काही करत, ना कोणाकडून काही करवून घेत. सदगुरू, भगवान, प्रभू स्वरूपस्थ महापुरूष, योगयुक्त पुरुष हे एक दुसऱ्यांचे पर्याय आहेत. प्रत्यक्ष परमेश्वर काहीही करण्यासाठी येत नसतो. तो जेव्हा काही करतो तेव्हा या स्वरूपस्थ योग्यांच्याकडून, महापुरुषांकडूनच, करीत असतो. अशा महापुरूषांसाठी शरीर म्हणजे राहण्यासाठी असणारे घर मात्र आहे व म्हणून परमात्म्याची सेवा करणे किंवा महापुरूषांची सेवा करणे दोन्ही एकच आहे. कारण ईश्वर त्यांच्यात स्थित असतो. त्यांच्या द्वारे प्रकट होत असतो व म्हणून असा योगी ( प्रभू ) सर्व करुनही कर्ता नसतो.
मूळ श्लोक –
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥ ५-१४ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
लोकस्य = मनुष्यांचे, न कर्तृत्वम् = न कर्तेपण, न कर्माणि = न कर्मे, न कर्मफलसंयोगम् = न कर्मफळाशी संयोग, प्रभुः = परमेश्वर, सृजति = निर्माण करतो, तु = परंतु, स्वभावः = प्रकृतीच, प्रवर्तते = सर्व काही करते ॥ ५-१४ ॥
अर्थ –
प्राणिमात्रांची कतृत्वशक्ती, त्यांची कर्मे व कर्माशी होणारी फळाची जोड ह्या गोष्टी सर्वेश्वर प्रभू स्वत: करीत नाही, तर त्या त्या मनुष्याच्या स्वभावात स्थित असणारी जी प्रकृती तिच्या प्रेरणेने तो मनुष्य सर्व काही करत असतो. जशी ज्याची प्रकृती- सात्त्विक, राजसी, तामसी तिच्या प्रभावाप्रमाणे तो वर्तन करीत असतो. प्रकृती लांबलचक असते; परंतु आपला स्वभाव जेवढा विकृत किंवा प्रगल्भ असेल, तेवढाच तिचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. साधारणत: लोक असे म्हणतात की, करणारा व करवणारा परमेश्वर असतो आम्ही त्याच्या हातातले फक्त बाहुले असतो, एक यंत्र असतो.
आमच्याकडून जी बरी-वाईट कृती होते ती करविणारा ईश्वरच असतो. परंतु योगश्वर श्रीकृष्ण म्हणतात की, स्वत: परमेश्वर ना काही करीत असतो, ना काही करवीत असतो. आपल्या स्वभावास्थित प्रकृतीच्या प्रभावानुसार लोक वागत असतात. मग परमेश्वर कर्ता-करविणार आहे असे लोक का म्हणतात? यावर योगेश्वर सांगतात-
मूळ श्लोक –
नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥ ५-१५ ॥
संदर्भित अन्वयार्थ
विभुः = सर्वव्यापी परमेश्वरसुद्धा, न कस्यचित् पापम् = ना कोणाचे पापकर्म, च = तसेच, न सुकृतम् = ना (कोणाचे) शुभकर्म, एव = सुद्धा, आदत्ते = ग्रहण करतो, (किंतु) = परंतु, अज्ञानेन = अज्ञानाच्या द्वारे, ज्ञानम् = ज्ञान, आवृतम् = झाकले गेले आहे, तेन = त्यामुळे, जन्तवः = सर्व अज्ञानी माणसे, मुह्यन्ति = मोहित होतात ॥ ५-१५ ॥
अर्थ –
ज्याला आता प्रभू म्हंटले आहे, त्यालाच येथे विभूत म्हंटले आहे, कारण तो संपूर्ण वैभवाने युक्त आहे. प्रभुत्व व वैभवाने युक्त असणारा परमात्मा प्राणिमात्रांचे पाप किंवा पुण्य ग्रहण करीत नाही. मग लोक ईश्वराला कर्ता-करविणारा का म्हणतात? कारण त्याचे ज्ञान अज्ञानाने आच्छादिलेले आहे. म्हणून त्यांना साक्षात्कारयुक्त ज्ञान अद्याप झालेले नाही. ते जीव अजून अज्ञानी आहेत. मोह पावल्यामुळे ते काहीही बोलत असतात. ज्ञान प्राप्त झाल्याने काय होते? हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात-
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग ५६.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.