श्रीमद् भगवद् गीता भाग ५७ –
अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ५.१६ ते ५.१९ | श्रीमद् भगवद् गीता भाग ५७ –
मूळ श्लोक
ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।
तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ॥ ५-१६ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
तु = परंतु, येषाम् = ज्यांचे, तत् = ते, अज्ञानम् = अज्ञान, आत्मनः = परमात्म्याच्या, ज्ञानेन = तत्त्वज्ञानाद्वारे, नाशितम् = नष्ट केले गेले आहे, तेषाम् = त्यांचे, (तत्) = ते, ज्ञानम् = ज्ञान, आदित्यवत् = सूर्याप्रमाणे, तत्परम् = त्या सच्चिदानंदघन परमात्म्याला, प्रकाशयति = प्रकाशित करते ॥ ५-१६ ॥
अर्थ –
ज्याच्या अंत:करणातील असले अज्ञानं ( की ज्याने ज्ञान झाकून टाकले आहे ) आत्मज्ञानाने नष्ट झाले आहे, म्हणजेच ज्यांना ज्ञान प्राप्त झाले आहे, त्यांचे ज्ञान सूर्याप्रमाणे परमतत्त्व परमात्म्याला प्रकाशित करते. मग परमेश्वर म्हणजे अंधाराचे नाव आहे का? नाही तो तर ‘ स्वयं प्रकाश रूप दिन राती’ स्वयं प्रकाशरूप आहे. परंतु तो कधी दिसत तर नाही किंवा तो आमच्या काही उपयोगी पडत नाही; हे कसे? जेव्हा ज्ञानाच्या द्वारे अज्ञानाचे आवरण नष्ट होते, तेव्हा ते ज्ञान सूर्य जसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो तसे परमार्थतत्त्व प्रकाशित करते, म्हणजे स्वत:मध्ये ते ज्ञान प्रवाहित करते. मग त्या पुरूषाला कोठेही अंध:कार दिसत नाही. सर्वत्र प्रकाशच प्रकाश दिसतो. त्या ज्ञानाचे स्वरूप काय आहे?
मूळ श्लोक –
तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः ।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥ ५-१७ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
तद्बुद्धयः = ज्यांची बुद्धी तद्रूप होत असते, तदात्मानः = ज्यांचे मन तद्रूप होत असते, (च) = आणि, तन्निष्ठाः = सच्चिदानंदघन परमात्म्यामध्येच ज्यांची सतत एकीभावाने स्थिती आहे असे, तत्परायणाः = तत्परायण पुरुष, ज्ञाननिर्धूतकल्मषाः = ज्ञानाच्या द्वारे पापरहित होऊन, अपुनरावृत्तिम् = अपुनरावृत्ति म्हणजेच परमगति, गच्छन्ति = प्राप्त करून घेतात ॥ ५-१७ ॥
अर्थ –
परमतत्त्व परब्रह्माच्या ठिकाणी ज्यांची बुद्धी रंगली आहे, मन त्यात प्रवाहित झाले आहे, परमात्मस्वरूपी जे निरंतर स्थित झाले आहेत व जे तदाकार म्हणजेच ईश्वरपरायण झाले आहेत, त्यालाच ज्ञान म्हणतात. ज्ञान म्हणजे पोकळ बडबड नाही किंवा ज्ञान म्हणजे रुक्ष वादविवाद नाही. हे ज्ञान प्राप्त झालेला पुरुष पापरहित होऊन जन्ममरणरहित परमगती त्याला प्राप्त होते. ज्याला परमगती प्राप्त झालेली आहे व ज्यांना त्याविषयीचे पूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे, अशा पुरुषालाच पंडित म्हणतात. पुढे पहा-
मूळ श्लोक –
विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥ ५-१८ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
विद्याविनयसम्पन्ने = विद्या व विनय यांनी युक्त अशा, ब्राह्मणे = ब्राह्मणाच्या ठिकाणी, च = तसेच, गवि = गाईच्या ठायी, हस्तिनि = हत्तीच्या ठायी, शुनि = कुत्र्याच्या ठिकाणी, च = तसेच, श्वपाके = चांडाळाच्या ठिकाणी (सुद्धा), पण्डिताः = ज्ञानी लोक, समदर्शिनः एव = समदर्शीच (होतात) ॥ ५-१८ ॥
अर्थ –
ज्ञान प्राप्त झाल्यामुळे ज्यांच्या पापाचे पूर्ण शमन झाले आहे, ज्यांना ‘ अपुनरावर्ती परमगती ‘ प्राप्त झाली आहे, असे ज्ञानीजन विद्या व विनय संपन्न असलेला ब्राह्माण, चांडाळ तसेच गाय, कुत्रा आणि हत्ती या सर्वाकडे समदृष्टीने पाहतात. विद्याविनय संपन्न ब्राह्माणामध्ये कोणती विशेष गोष्ट त्यांना दिसत नाही किंवा चांडाळामध्ये त्यांना कसली हीनता दिसत नाही. त्यांच्या दृष्टीने दोघेही सारखेच असतात. तसेच गाय धर्मशील आहे किंवा कुत्रा धर्मभ्रष्ट आहे किंवा हत्ती विशालकाय आहे, असे त्यांना वाटत नाही. त्यांच्याकडेही ते समदृष्टीनेच पाहतात. असे ज्ञाते पंडित समदर्शी व समवर्ती असतात. त्यांची दृष्टी बाह्य स्वरूपाकडे नसते; परंतु आत्म्याकडे असते.
फरक एवढाच असतो की विद्याविनयसंपन्न पुरुष परमेश्वराच्या समीप असतात ब बाकीचे थोडे दूर असतात. शरीर म्हणजे ज्ञानीजनांच्या मते आत्म्याचे बाह्य वस्त्र आहे. त्यांची दृष्टी, बाह्य वस्त्राला महत्त्व देत नाही; तर हृदयामध्ये वसत असणाऱ्या आत्म्याला ते पाहत असतात. त्यामुळे ते कोणताही भेद ठेवत नाहित.
वास्तविक श्रीकृष्णांनी गो-सेवा पुष्कळ केली होती. त्यामुळे त्यांना वास्तविक गाई बद्दल चांगले बोलायला हवे होते; परंतु त्यांनी तसे केले नाही. श्रीकृष्णांनी धर्मामध्ये गाईला कोणतेही स्थान दिलेले नाही. इतर जिवात्म्यांप्रमाणे गाय हा एक जिवात्मा आहे एवढेच त्यांनी गाईमध्ये पाहिले. गाईचा उपयोग, आर्थिक महत्त्व ही गोष्ट अलग आहे. परंतु धार्मिक दृष्टया गाईला जे महत्त्व देण्यात आले आहे ते अविवेकी लोकांचे कृत्य आहे. श्रीकृष्णांनी मागे सांगितले आहे की अविवेकी लोकांची बुद्धी अनंत शाखांनी युक्त असते व म्हणून ते अनेक विधीचा विस्तार करत असतात व आपल्या मधुर वाणीने लोकांवर त्यांची अशी छाप पाडतात की लोकांची बुद्धी भ्रष्ट होते व त्यांना शेवटी कशाचीही प्राप्ती होत नाही उलट ते नष्ट होतात. परंतु निष्काम कर्मयोगामध्ये निर्धारित असे एकच कर्म असते व ते म्हणजे यज्ञप्रक्रिया म्हणजे भगवंताची आराधना!
गाय, हत्ती, कुत्रा, पिंपळ, नदी यांना जे धार्मिक दृष्ट्या महत्त्व देण्यात आले आहे ते अविवेकी लोकांचे कृत्य आहे. जर त्यांचे काही धार्मिक महत्त्व असते तर श्रीकृष्णांनी अबश्य सांगितले असते. मात्र मंदिर, मशीद इत्यादी धार्मिक स्थळांचे आरंभ काळात महत्त्व अवश्य असते. कारण तेथे प्रेरणादायक सामूहिक उपदेश होत असेल तर त्यांची उपयुक्तता अधिक असते. ही धर्मोपदेशक केंद्र असतात.
प्रस्तुत एलोकात दोन पंडितांची चर्चा आहे. यात एक पंडित आहे जो पूर्ण ज्ञाता आहे व दुसरा पंडित आहे जो विद्या-विनयसंपन्न आहे. ते दोन कसे? वस्तुत: प्रत्येक श्रेणीमध्ये दोन सीमारेखा असतात- एक तर अधिकतर सीमा- परमोच्च सीमा व दुसरी प्रवेशिका- सर्वांत खालची सीमा. उदाहरणार्थ भक्तीची सर्वात खालची म्हणजे सुरूवातीची सीमा म्हणजे जेथून भक्तीला सुरुवात केली जाते. विवेक, वैराग्य आणि सातत्याने भगवंताची आराधना केली जाते आणि भक्तीची परमोच्च सीमा म्हणजे भक्ती जेव्हा परिणामदायक स्थितीत येते. बरोबर अशाच प्रकारची ब्राह्मण श्रेणी असते. जेव्हा ब्राह्ममध्ये प्रवेश देण्याची क्षमता प्राप्त होते तेव्हा विद्या असते, विनय असतो, मनाचे शमन, इंद्रियांचे दमन, अनुभवी सुत्रपाताचा संचार, चिंतन, सातत्य, ध्यान आणि समाधी अंतरंगात कार्यरत असते. ह ब्राह्मणत्वाची प्रारंभिक सीमा होय. जेव्हा ती स्वतःचा विकास करीत करीत बह्मचा साक्षात्कार प्राप्त करुन त्याच्यातच विलीन होतो तेव्ही ती ब्राह्मणत्वाची उच्चतम सीमा आहे. ज्याला जाणून घ्यायचे होते त्याला जाणल्यानंतर तो पूर्णज्ञानी बनतो. ज्याचे जन्ममरण संपले आहे अशा महापुरुषाच्या दृष्टीने विद्या-विनयसंपन्न ब्राह्मण, चांडाळ, कुत्रा, हत्ती व गाय हे सर्व समानच असतात. कारण त्यांची वृत्ती हृदयस्थित आत्मस्वरूपावरच असते. अशा महापुरुषाला ‘परमगतीस काय मिळाले आणि कसे? यावर प्रकाश टाकताना योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात-
मूळ श्लोक –
इहैव तैर्जितः सर्गो एषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थिताः ॥ ५-१९ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
येषाम् = ज्यांचे, मनः = मन, साम्ये = समभावामध्ये, स्थितम् = स्थित आहे, तैः = त्यांच्याकडून, इह एव = या जीवित अवस्थेमध्येच, सर्गः = संपूर्ण संसार, जितः = जिंकला गेला आहे, हि = कारण, ब्रह्म = सच्चिदानंदघन परमात्मा, निर्दोषम् = दोषरहित, (च) = आणि, समम् = सम आहे, तस्मात् = त्या कारणाने, ते = ते, ब्रह्मणि = सच्चिदानंदघन परमात्म्यामध्येच, स्थिताः = स्थित असतात ॥ ५-१९ ॥
अर्थ –
अशा समदृष्टीमध्ये ज्याचे मन स्थिर झाले आहे त्यांनी या लोकीच संसाराला जिंकले. मनाच्या समत्चाचा संसार जिंकण्यासाठी काय संबंध? संसार जर नष्ट झाला तर तो महापुरूष कसा राहणार? श्रीकृष्ण म्हणतात, निर्दोषं हि समं ब्रह्म’ हे सर्व भूतांच्या ठिकाणी सम व निर्दोष असते.
त्याप्रमाणे समदृष्टी असणाऱ्या कर्मयोग्याचे मन दोषरहित व समस्थितीचे बनते. “तस्माद ब्रह्मणि ते स्थिताः’ व म्हणून तो ब्रह्मामध्ये स्थिर होतो. यालाच जन्ममरणरहित परमगती म्हणतात. ही परमगती होय. ही केव्हा प्राप्त होते? जेव्हा संसाररूपी शत्रूवर विजय मिळवला जातो तेव्हा ती परमगती प्राप्त होते. या संसारावर कसा विजय प्राप्त करता येतो? जेव्हा मनाचा निरोध केला जातो व समदृष्टी प्राप्त होते तेव्हा ( कारण मनाचा विस्तार म्हणजेच हे जगत आहे ). जेव्हा तो महापुरुष ब्रह्मामध्ये स्थिर होतो, तेव्हा त्या ब्रह्मविद महापुरुषाचे लक्षण काय असते? यापुढे श्रीकृष्ण आता त्याची राहणी कशी असते, ती सांगताना म्हणतात-
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग ५७.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.