श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५८

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५८

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५८ –

अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ५.२० ते ५.२३ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५८.

मूळ श्लोक –

न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्‌ ।
स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद्‌ ब्रह्मणि स्थितः ॥ ५-२० ॥

संदर्भित अन्वयार्थ –

(यः) = जो पुरुष, प्रियम्‌ = प्रिय गोष्ट, प्राप्य = प्राप्त झाल्यावर, न प्रहृष्येत्‌ = आनंदित होत नाही, च = तसेच, अप्रियम्‌ = अप्रिय गोष्ट, प्राप्य = प्राप्त झाल्यावर, न उद्विजेत्‌ = उद्विग्न होत नाही, (सः) = तो, स्थिरबुद्धिः = स्थिरबुद्धी, असम्मूढः = संशयरहित, ब्रह्मवित्‌ = ब्रह्मवेत्ता, ब्रह्मणि = सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्यामध्ये, स्थितः = एकीभावाने नित्य स्थित असतो ॥ ५-२० ॥

अर्थ –

त्याच्याजवळ प्रिय-अप्रिय असे काही असतच नाही. त्यामुळे लोक ज्याला प्रिय वस्तू म्हणतात, ती प्राप्त झाल्यानंतर जो हर्षित होत नाही आणि लोक ज्याला अप्रिय समजतात ते प्राप्त झाल्यानंतरही जो उद्विग्न होत नाही, असा ‘ असंमूढ’- संशयरहित ब्रह्मविद’ ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर बुद्धी असणारा बह्यवेत्ता ब्रह्मस्थित: ‘ ब्रह्माच्या ठायी सदैव स्थिर असतो.

मूळ श्लोक –

बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम्‌ ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥ ५-२१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

बाह्यस्पर्शेषु = बाहेरच्या विषयांमध्ये, असक्तात्मा = आसक्तिरहित अंतःकरण असणारा साधक, आत्मनि = आत्म्यामध्ये (स्थित), यत्‌ = जो (ध्यान-जनित) सात्त्विक, सुखम्‌ = आनंद आहे, (तत्‌) = तो, विन्दति = प्राप्त करून घेतो, (तदनंतरम्‌) = त्यानंतर, सः = तो, ब्रह्मयोगयुक्तात्मा = सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगामध्ये अभिन्न भावाने स्थित असलेला पुरुष, अक्षयम्‌ = अक्षय, सुखम्‌ = आनंदाचा, अश्नुते = अनुभव घेतो ॥ ५-२१ ॥

अर्थ –

संसारातील बाह्य सुखोपभोगाविषयींची ज्याची आसक्ती नष्ट झाली आहे, अशा परुषाला अन्तरात्म्यामध्ये जे सुख आहे ते प्राप्त होते. तो पुरुष ‘ब्रह्मयोगयुक्तात्मा’ परत्रहा परमात्म्याशी समस्त झालेला असतो व म्हणून असा योगी अक्षय सुखाचा अनुभव घेतो. या आनंदाचा-सुखाचा कधी होत नाही. या आनंदाचा उपयोग कोण घेऊ शकतो? जो बाह्य विषयभोगांविषयी अनासक्त झालेला असतो असा पुरुष अशा अक्षय सुखाचा उपयोग घेऊ शकतो. भोग बाधक असतात का? यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात.

मूळ श्लोक –

ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ ५-२२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

संस्पर्शजा = इंद्रिये आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे, ये = जितके, भोगाः = भोग आहेत, ते = ते सर्व (जरी विषयलोलुप पुरुषांना सुखरूप वाटत असतात तरीसुद्धा), हि = निःसंदेहपणे, दुःखयोनयः एव = फक्त दुःखालाच कारण आहेत, (च) = आणि, आद्यन्तवन्तः = आदि-अन्त असणारे म्हणजे अनित्य आहेत, (अतः) = म्हणून, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, बुधः = बुद्धिमान विवेकी पुरुष, तेषु = त्यांच्या ठिकाणी, न रमते = रमत नाहीत ॥ ५-२२ ॥

अर्थ –

केवळ त्त्वचाच नव्हे तर सर्व इंद्रिये स्पर्श करीत असतात. पाहणे-हा डोळयाचा स्पर्श आहे, ऐकणे-हा कानाचा स्पर्श आहे. याप्रकारे इंद्रिये ब विषयांच्या संयोगाने उत्पन्न झालेले सर्व सुखपभोग जरी अत्यंत सुखावह वाटले, तरी ते निःसंदेह दुःखयोनय’ दुःखालाच कारण होतात एवढेच नव्हे तर त्यांना उत्पत्ती व नाश असतो. त्यामुळे हे कौन्तेय, विवेकी पुरुष म्हणजे ज्ञानी परुष त्यात रमत नाहीत. इंद्रियांच्या या स्पर्शामध्ये काय असते? तर काम आणि क्रोध. यावर श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक –

शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात्‌ ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥ ५-२३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

इह = या मनुष्यशरीरामध्ये, यः = जो साधक, शरीरविमोक्षणात्‌ प्राक्‌ एव = शरीराचा नाश होण्यापूर्वीच, कामक्रोधोद्भवम्‌ = काम व क्रोध यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या, वेगम्‌ = वेगाला, सोढुम्‌ = सहन करण्यास, शक्नोति = समर्थ होतो, सः = तोच, नरः = पुरुष, युक्तः = योगी आहे, (च) = आणि, सः = तोच, सुखी = सुखी आहे ॥ ५-२३ ॥

अर्थ –

जो मनुष्य देहत्यागापूर्वी कामक्रोधापासून उत्पन्न होणारा वेग सहन करण्यास( म्हणजेच त्यांना नष्ट करण्यास ) सक्षम असतो तोच मनुष्य त्यात न रमणारा असतो. तोच या लोकात खरा योगी आहे, तोच खरा सुखी आहे. ज्यामध्ये दुःखाचा लवलेशही नाही, असे सुख प्राप्त करणारा परमात्म्यात स्थिर झालेला असतो. जिवंतपणीच अशा सुखाची प्राप्ती होत असते, मरणानंतर नव्हे, संत कबीरांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे-‘ अवधू! जीवत में कर आशा’ तर मग मरणानंतर मुक्ती असत नाही का? ते म्हणतात – ‘मुए मुक्ति गुरु कहे स्वार्थी, झूठा दे, विश्वासा । ‘ येथे योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, शरीर असतानाच म्हणजे मरण्यापूर्वी जो काम- क्रोधांचा वेग नष्ट करण्यास सक्षम बनला आहे, ज्याने कामक्रोधांना आपल्या वश करुन ठेवले आहे, असाच पुरुष खरा योगी आहे, खरा सुखी आहे, काम-क्रोध, बाह्यस्पर्श हेच खरे शत्रू आहेत. त्यांना तुम्ही जिंकायला शिका. अशा योगी पुरुषाची लक्षणे सांगताना श्रीकृष्ण पुन्हा पुढे सांगतात,

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५८.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment