श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५९

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५९

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५९ –

अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ५.२४ ते ५.२९ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५९.

मूळ श्लोक –

योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ ५-२४ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

यः = जो पुरुष, एव = ब्रह्माच्या शिवाय काहीही नाही असा निश्चय करून, अन्तः सुखः = अंतरात्म्यातच आनंदानुभव करणारा आहे, अन्तरारामः = आत्म्यामध्येच रममाण होणारा आहे, तथा = त्याचप्रमाणे, यः = जो, अन्तर्ज्योतिः = आत्म्याच्या ज्योतीमध्ये ज्याचे ज्ञान प्रकाशित होते, सः = तो, ब्रह्मभूतः = सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्याबरोबर एकीभाव प्राप्त करून घेतलेला, योगी = सांख्ययोगी, ब्रह्मनिर्वाणम्‌ = शांत ब्रह्माला, अधिगच्छति = प्राप्त करून घेतो ॥ ५-२४ ॥

अर्थ –

जो पुरुष अंत:सुखी म्हणजे आत्मस्वरूप बनल्यामुळे अंतरआत्म्यात सुख मानतो. म्हणजे आत्मसंतोष हेच ज्याचे सुख असते, ‘ अन्तरारामः’ अंतरात्म्यात जो आराम करतो, म्हणजे आत्मानंद हे ज्याचे विश्रामस्थान आहे आणि ज्याच्या आत आत्मप्रकाश पडला आहे म्हणजे तो साक्षात्कारी आहे, असा योगी” ब्रह्म निर्वाणम्‌’ वाणीहून श्रेष्ट असणार्‍या, शाश्वत असणाऱ्या ब्रह्माची प्राप्ती करुन घेतो. तो ब्रह्मस्वरूप योगी ब्रह्मनिर्वारण मोक्ष प्राप्त करुन घेतो. म्हणजे प्रथम विकारांचा अंत ( काम क्रोधांचा ) नंतर दर्शन प्राप्त होतो. आता पुढे पाहू-

मूळ श्लोक –

लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः ।
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥ ५-२५ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

क्षीणकल्मषाः = ज्यांची सर्व पापे नष्ट होऊन गेली आहेत, छिन्नद्वैधाः = ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे निवृत्त झालेले आहेत, सर्वभूतहिते = जे सर्व सजीवांच्या हितामध्ये, रताः = रत आहेत, (च) = आणि, यतात्मानः = ज्यांचे जिंकलेले मन हे निश्चलभावाने परमात्म्यात स्थित आहे (असे ते), ऋषयः = ब्रह्मवेत्ते पुरुष, ब्रह्मनिर्वाणम्‌ = शांत ब्रह्म, लभन्ते = प्राप्त करून घेतात ॥ ५-२५ ॥

अर्थ –

परमब्रह्माचा साक्षात्कार झाल्यामुळे ज्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत, ज्याचे सर्व संशय फिटले आहेत, जो सर्व प्राणिमात्रांच्या हितामध्ये रत आहे, ( ज्याला ब्रह्मनिर्वारणरूप मोक्ष प्राप्त झाला आहे, तोच असे आचरण करु शकतो. जो स्वत: खड्ड्यामध्ये पडला आहे तो दुसर्‍याला काय बाहेर काढणार? त्यामुळेच करुणा हा महापुरुषाचा स्वभाविक गुण बनून जातो. ) तसेच यतात्मान:- जो जितेंद्रिय व ब्रह्मवेत्ता आहे, अशा परुषालाब्रह्मनिर्वबाणरूप मोक्ष प्राप्त होत असतो. अशा महापरुषाविषयी सांगताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात-

मूळ श्लोक –

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्‌ ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्‌ ॥ ५-२६ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

कामक्रोधवियुक्तानाम्‌ = जे काम व क्रोध यांनी रहित आहेत, यतचेतसाम्‌ = ज्यांनी चित्त जिंकले आहे, विदितात्मनाम्‌ = ज्यांना परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार झाला आहे अशा, यतीनाम्‌ = ज्ञानी पुरुषांच्या बाबतीत, अभितः = सर्व बाजूंनी, ब्रह्मनिर्वाणम्‌ = शांत परब्रह्म परमात्माच, वर्तते = परिपूर्ण भरलेला असतो ॥ ५-२६ ॥

अर्थ –

जे कामक्रोधरहित आहेत, ज्यांचे चित्त त्यांच्या स्वाधीन आहे, ज्यांना परमात्म्याचा साक्षात्कार झाला आहे अशा आत्मज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषांना शांत पर ब्रह्माची ( मोक्षाची ) प्राप्ती होत असते. योगेश्वर श्रीकृष्ण साक्षात्कारी पुरुषाच्या आचरणावर सारखे भार देत आहेत कारण अशा महापुरुषांकडून सर्वाना काही प्रेरणा मिळावी म्हणून येथे प्रश्न जवळजवळ पूर्ण झाला आहे. आता ते पुन्हा सांगत आहेत की, अशी ब्रह्मरूप स्थिती प्राप्त करण्यासाठी ‘ श्वास-प्रश्नासाचे’ चिंतन आवश्यक आहे. यज्ञाच्या प्रक्रियेमध्ये प्राणाचे अपानामध्ये हवन आणि अपानाचे प्राणामध्ये हवन, प्राण-अपान या दोहोंच्या गतीचा विरोध यावर त्यांनी भर दिला होता. तीच गोष्ट ते पुन्हा समजावताना म्हणतात.

मूळ श्लोक –

स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥ ५-२७ ॥
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥ ५-२८ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

बाह्यान्‌ = बाह्य, स्पर्शान्‌ = विषयभोगांना (त्यांचे चिंतन न करता), बहिः एव = बाहेरच, कृत्वा = सोडून देऊन, च = आणि, चक्षुः = नेत्रांची दृष्टी, भ्रुवोः = (दोन) भुवयांच्या, अन्तरे = मध्ये (स्थिर करून), (तथा) = तसेच, नासाभ्यन्तरचारिणौ = नासिकेमध्ये संचार करणाऱ्या, प्राणापानौ = प्राण व अपान या वायूंना, समौ = सम, कृत्वा = करून, यतेन्द्रियमनोबुद्धिः = ज्याने इंद्रिये, मन आणि बुद्धी जिंकलेली आहेत असा, यः = जो, मोक्षपरायणः = मोक्षपरायण, मुनिः = मुनी, विगतेच्छाभयक्रोधः = इच्छा, भय व क्रोध यांनी रहित झाला आहे, सः = तो, सदा = नेहमी, मुक्तः एव = मुक्तच असतो ॥ ५-२७, ५-२८ ॥

अर्थ –

हे अर्जुना, बाह्य विषयांना दूश्याच्या चिंतनाला दूर ठेवून, दोन भुवयांमध्ये दृष्टी स्थिर करुन- ‘ भ्रुवोः अन्तरे’- याचा अर्थ डोळयांच्यामध्ये किंवा भुवयांमध्ये काही पाहण्याच्या हेतूने दृष्टी स्थिर करणे असा नाही. दोन भुवयांमध्ये दृष्टी स्थिर करणे याचा अर्थ एवढाच आहे की सरळ बसून दृष्टी भुवयांमधून सरळ पुढे स्थिर करणे, डाव्या-उजव्या बाजूला किंबा इकडे तिकडे दृष्टी न फिरवणे- नाकाच्या शेंडयावर नजर ठेवून, नाकाच्या आत विचरण करणाऱ्या प्राण व अपान वायूंचा वेग सम करुन अर्थात दृष्टी नाकाच्या शेंडयावर स्थिर करून तुमचे लक्ष श्वासावर केंद्रित करा व पाहा की श्वास केव्हा आत गेला? तेथे किती वेळ राहिला? यावर लक्ष केंद्रित करा.

मग श्वासामध्ये निर्माण होत असणारा नामध्वनी तुम्हाल ऐकू येईल. अशा प्रकारे श्वास-प्रश्नासावर लक्ष-ध्यान स्थिर झाले की, हळूहळू श्वास अचल, स्थिर व सम होईल, अशा स्थितीत ना आत काही विचार बिकल्प निर्माण होतील ना बाहेरचे विचार-संस्कार आत येतील, बाहा विषयांचे चिंतन तर बाहेरच सोडून दिले होते, आता आत सुद्धा कसले विकल्प कसले विकल्प जागृत होणार नाही. मग ध्यान तैलधारेप्रमाणे सातत्याने होत राहील. तेलाची धार पाण्याप्रमाणे टपटप गळत नाही.

जेव्हा ती तुटते तेव्हा संपूर्ण धारच खाली कोसळते- तुटून जाते. या प्रकारे प्राण ब अपान वायूंची गती सम ठेवून, इंद्रिये मन व बुद्धी यांचे नियमन करुन, इच्छा, भय व क्रोध यांच्यापासून अलिप्त होऊन जो मननशीलतेच्या परम सीमेवर पोहचला आहे, असा मुनी सदा ‘मुक्त’ च असतो. मुक्त झाल्यावर तो कोठे जातो? त्याला काय प्राप्त होते? यावर श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक –

भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्‌ ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ ५-२९ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

यज्ञतपसाम्‌ = सर्व यज्ञ आणि तप यांचा, भोक्तारम्‌ = भोक्ता मी आहे, सर्वलोकमहेश्वरम्‌ = सर्व लोकांतील ईश्वरांचासुद्धा ईश्वर म्हणजे सर्वलोकमहेश्वर मी आहे, (तथा) = तसेच, सर्वभूतानाम्‌ = सर्व सजीवांचा, सुहृदम्‌ = सुहृद म्हणजे स्वार्थरहित दयाळू व प्रेम करणारा असा, माम्‌ = मी आहे हे, ज्ञात्वा = तत्त्वतः जाणून (माझा भक्त), शान्तिम्‌ = परम शांती, ऋच्छति = प्राप्त करून घेतो ॥ ५-२९ ॥

अर्थ –

यज्ञ व तप यांचा भोक्ता, सर्व लोकांचा महेश्वर व प्राणिमात्रांचा स्वार्थरहित मित्र-हितेषी मी आहे, अशा प्रकारे मला जो जाणतो त्याला शांती प्राप्त होते. श्रीकृष्ण म्हणतात की, अशा पुरुषाच्या श्वास-प्रश्नासाचा, यज्ञ आणि तपाचा भोक्ता मी आहे. यज्ञ ब तप ज्यात विलीन होतात, तो मी आहे. ते सर्व मलाच प्राप्त होत असते. यज्ञाच्या शेवटी जी प्राप्त होते व जिचे नाव शांती आहे ते माझेच स्वरूप आहे. तो मुक्त पुरुष मला अशा प्रकारे जाणत असतो व तो मला अशा प्रकारे जाणतो, तेव्हा तो माझ्याप्रत येतो. मला प्राप्त करतो. हीचेच नाव शांती आहे. ज्या प्रकारे मी ईश्वराचा ईश्वर म्हणजे महेश्वर आहे त्या प्रकारे तो मुक्त असणारा मुनीही आहे असे समज.

निष्कर्ष –

या अध्यायाच्या सुरूवातीला अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रश्‍न केला होता की, भगवन, तुम्ही कधी निष्काम कर्मयोगाची प्रशंसा करता,तर कधी संन्यास मार्गाने कर्म करण्याची म्हणजे कर्मसंन्यासमार्गाची प्रशंसा करता. तेव्हा दोन्हीपैकी कोणता मार्ग श्रेयस्कर आहे ते सांगा. तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितले की अर्जुना, अरे परमकल्याण तर दोन्ही मार्गात आहे. दोन्ही मार्गात निर्धारित यज्ञाची प्रक्रिया केली जाते. तरीही निष्काम कर्मयोग विशेष श्रेष्ठ आहे. कारण निष्काम कर्म केल्याशिवाय कर्म संन्यास ( शुभाशुभ कर्माचा अंत ) होत नाही. संन्यास हा मार्ग नाही, ध्येयाचे नाव आहे. योगमुक्त पुरुषच संन्यासी असतो. मग योगयुक्ताचे लक्षण सांगताना ते म्हणाले की, हा योगमुक्त महापुरुषही ईश्वर असतो. तो काही करत नाही किंवा करवून घेत नाही. परंतु स्वभावस्थित प्रकृतीच्या प्रभावाप्रमाणे सर्वजण आचरण करीत असतात.

जो मला जाणतो तोच ज्ञाता असतो, तोच पंडित असतो. यज्ञाच्या शेवटी लोक मला जाणतात. श्वास-प्रश्नासाचा जप आणि यज्ञ-तप ज्यामध्ये विलीन होते, तो मी आहे. यज्ञाचा परिणामस्वरूप असणाऱ्या मला जाणून जी शांती ते मिळवतात, ती शांती म्हणजे मी आहे. अर्थात श्रीकृष्णासारखे, महापुरुषासारखे, स्वरूप त्यालाही प्राप्त होते ब तो योगयुक्त परुष ईश्वरांचा ईश्वर, आत्म्याचे आत्मस्वरुप तो बनतो. त्या परमात्म्याशी तो तद्रूप होतो. ( असे बहोक्य होण्याला वाटेल तेवढे जन्म घ्यायला लागो. ) या अध्यायात योगेश्वरांनी हे स्पष्ट केले आहे की यज्ञतापाचा भोक्ता म्हणजे महापुरुषांच्या आत वसत असणारी महाशक्ती महेश्वर आहे.

मूळ पाचव्या अध्यायाची समाप्ती

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः ॥ ५ ॥

अर्थ –

याप्रमाणे श्रीमद्‌्भगवद्गीतारुपी उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘ यज्ञभोक्ता महापुरुषस्थ महेश्वर’ नावाचा पाचवा अध्याय समाप्त झाला.

इति श्रीमत्‌ परमहंसपरमानन्दस्य शिष्य स्वामीअडगड़ानन्दकृते श्रीमद्धगवद्वीताया: ‘ यथार्थगीता ‘ भाष्ये ‘ यज्ञमोक्तामहापुरुषस्थमहेश्वर: ‘ नाम पन्चमो$ध्याय:।।५॥।

अशा प्रकारे श्रीमत्परमहंस परमानंन्दर्जीचे शिष्य स्वामी अडुगड़ानन्दकूत श्रीमदभगवदगीतेवरील भाष्य ‘ यर्थाथ गीता ‘ यामधील ‘ यज्ञभोक्ता महापुरुषस्थ महेश्वरः’ नावाचा अध्याय समाप्त झाला.

॥॥हरिः 🕉 तत्‌ सत्‌॥।

क्रमशः

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment