श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६०

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६०

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६० –

अध्याय ६ – आत्मसंयमयोग – श्लोक क्र. ६.०१ ते ६.०४ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६०.

श्री परमात्मने नमः
॥ अथ वषष्ठोध्यायः ॥

या जगात जेव्हा धर्माच्या नावावर खोटे रीती-रिवाज, विविध प्रकारचे पूजाविधी व विविध संप्रदायांचे बाहुल्य वाढते, तेव्हा दुष्ट रूढींचे दमन करुन ईश्वराची स्थापना व त्याची प्राप्ती करून घेण्याची पद्धती-मार्ग व्यवस्थित करण्यासाठी महापुरुषाचा अवतार होत असतो. कृष्णकालामध्ये अशाच प्रकारे कर्तव्यकर्म न करता निष्क्रिय बसून राहणे व स्वतःला ज्ञानी म्हणवून घेण्याची रूढी फार वाढली होती व म्हणून या अध्यायाच्या प्रारंभी श्रीकृष्णांनी चौथ्यांदा ज्ञानयोग व निष्काम कर्मयोग या दोन्ही मार्गात कर्म करावेच लागते हे सांगितले आहे.

दुसर्‍या अध्यायात त्यांनी सांगितले होते की, अर्जुना, क्षत्रियासाठी युद्धाशिवाय दुसरा कोणताही कल्याणकारी व श्रेयस्कर मार्ग नाही. या युद्धात हरलास तरी देवत्वाची प्राप्ती आणि जिंकलास तर महामहीम पदाची प्राप्ती तुला होणार आहे; तेव्हा हे जाणून तू युद्ध कर. ज्ञानयोगाचे विवेचन करताना तू युद्ध कर ही गोष्ट तुला मी सांगितली. हातावर हात ठेवून स्वस्थ बसणे म्हणजे ज्ञानयोग नव्हे. ज्ञानयोगात आपल्या लाभहानीचा विचार करून, आपल्या क्षमतेला ओळखून कर्म करण्यास प्रवृत्त व्हायचे असते. ज्ञानयोगात युद्ध हे अनिवार्य असते. अर्थात याची प्रेरणा देणारा महापुरुष असतो.

तिसऱया अध्यायात अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारले की, भगवन, निष्काम कर्मयोगापेक्षा आपल्याला जर ज्ञानयोग श्रेष्ठ वाटतो तर तुम्ही मला ही घोर कर्मे करायला का सांगत आहात ? अर्जुनाला निष्काम कर्मयोग फार कठीण वाटला. यावर श्रीकृष्णांनी सांगितले की, दोन्ही मार्ग मीच सांगितले आहेत;

परंतु दोन्ही मार्गात कर्म हे अनिवार्य आहे. कर्मत्याग करण्यास मी कोठेच सांगितले नाही. मुळीच कर्म न करता कोणीही नेष्कर्म्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. तसेच प्रारंभ केलेली कर्मप्रक्रिया मध्येच सोडून तिचा त्याग करून कोणीही परमसिद्धी प्राप्त करू शकत नाही. दोन्ही मार्गात यज्ञ प्रक्रिया म्हणजेच नियत्‌ कर्म करावेच लागते.

यानंतर अर्जुनाला स्पष्टपणे कळले की, ज्ञानमार्ग किंवा कर्ममार्ग यापैकी कोणताही मार्ग निवडला तरी कर्म हे दोन्ही मार्गात अनिवार्यच आहे. तरीही पाचव्या अध्यायात त्याने पुन्हा विचारले की, भगवन, फलप्राप्तीच्या दृष्टीने या दोन्ही मार्गांपैकी कोणता मार्ग श्रेष्ठ व सुकर आहे ? अर्जुना, दोन्ही मार्ग परमश्रेयाची प्राप्ती करून देणारे आहेत. दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी पोहचवत असतात. तरीही सांख्याच्यामते निष्काम कर्मयोग हा श्रेष्ठ आहे. कारण निष्काम कर्म केल्याशिवाय कोणताही साधक संन्यासी होऊ शकत नाही. शिवाय दोन्ही मार्गात कर्म एकच आहे. तेव्हा निर्धारित कर्म केल्याशिवाय ना कोणी संन्यासी होऊ शकत, ना कोणी योगी बनू शकत. या दोन मार्गाचे अनुसरण करणाऱ्या साधकांचा दृष्टिकोन फक्त वेगवेगळा असतो.

मूळ सहावा अध्यायाचा प्रारंभ:
मूळ श्लोक

श्रीभगवानुवाच:
अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।
स संन्यासी च योगी च निरग्निर्न चाक्रियः ॥ ६-१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, यः = जो पुरुष, कर्मफलम्‌ = कर्मफळाचा, अनाश्रितः = आश्रय न घेता, कार्यम्‌ = कर्तव्य, कर्म = कर्म, करोति = करतो, सः = तो, संन्यासी = संन्यासी, च = आणि, योगी = योगी आहे, च = परंतु, निरग्निः न = फक्त अग्नीचा त्याग करतो तो संन्यासी नव्हे, च = तसेच, अक्रियः न = फक्त क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे ॥ ६-१ ॥

अर्थ

श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, कर्मफलाचा आश्रय न करता म्हणजेच कर्म करताना कोणताही हेतू न ठेवता जो ‘कार्यम्‌ कर्म ‘ कर्तव्य कर्म करतो तोच खरा संन्यासी व तोच खरा योगी होय. कर्मे अनेक प्रकारची आहेत. त्यामध्ये ‘कार्यम्‌ कर्म ‘ करण्यास योग्य असे कर्म म्हणजेच ‘नियत कर्म ‘,

निर्धारित कर्म करावयाचे असते. ते कर्म म्हणजेच ‘ यज्ञाची प्रक्रिया’, ज्याचा अर्थ आहे ती आराधना ! म्हणजेच आराध्य देवाची प्राप्ती करून देणारे बिधी-विशेष-त्यांना कार्यरूप देणे म्हणजे कर्म होय. ते कर्तव्यकर्म जो करतो तोच खरा संन्यासी असतो, तोच खरा योगी असतो. केवळ अग्निहोत्राचा त्याग करणारा ‘ आम्ही अग्नीला स्पर्श करीत नाही’ असे म्हणणारा किंवा कर्म न करणारा “माझ्यासाठी काही कर्म करायला राहिलेले नाही, मी तर आत्मज्ञानी आहे’ असे म्हणून कार्याला प्रारंभ न करणारा, कर्तव्य कर्म न करणारा संन्यासीही नव्हे व योगीही नव्हे.

मूळ श्लोक

न संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव ।
न ह्यसंन्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन ॥ ६-२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

पाण्डव = हे पांडवा (अर्थात पांडुपुत्र अर्जुना), यम्‌ = ज्याला, संन्यासम्‌ = संन्यास, इति = असे, प्राहुः = म्हणतात, तम्‌ = त्यालाच, योगम्‌ = योग (असे), विद्धि = तू जाण, हि = कारण, असंन्यस्तसङ्कल्पः = संकल्पांचा त्याग न करणारा, कश्चन = कोणताही पुरुष, योगी = योगी, न भवति = होऊ शकत नाही ॥ ६-२ ॥

अर्थ

अर्जुना ज्याला ‘संन्यास’ म्हणतात, तोच कर्मयोग आहे असे तू जाण. कारण कर्मफलाविषयींच्या संकल्पाचा त्याग केल्याशिवाय कोणीही पुरुष योगी होत नाही. अर्थात फलाशेचा त्याग दोन्ही मार्गात आवश्यक आहे. मग तर सरळ आहे की, आम्ही कसला संकल्प-हेतू ठेवीतच नाही असे म्हंटले की बनला योगी किंवा संन्यासी! श्रीकृष्ण म्हणतात हे मात्र कदापि शक्‍य नाही.

मूळ श्लोक

आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ ६-३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

योगम्‌ = कर्मयोगावर, आरुरुक्षोः = आरुढ होण्याची इच्छा असणाऱ्या, मुनेः = मननशील पुरुषाला, कर्म = (योगाच्या प्राप्तीसाठी) निष्काम भावनेने कर्म करणे हाच, कारणम्‌ = हेतू, उच्यते = सांगितला आहे (नंतर योगारुढ झाल्यावर), तस्य = त्या, योगारूढस्य = योगारूढ पुरुषाचा, (यः) = जो, शमः एव = सर्व संकल्पांचा अभाव हाच, कारणम्‌ = कारण, उच्यते = म्हटला जातो ॥ ६-३ ॥

अर्थ

योगसिद्धी प्राप्त व्हावी अशी इच्छा करणाऱ्या साधकाला निष्काम कर्म हे साधन सांगितले आहे. आणि योगाचे अनुष्ठान करता करता जेव्हा योगप्राप्ती होते तेव्हा ‘“शमःकारणम्‌ उच्चते’, शम हे कारण सांगितले आहे. म्हणजेच सर्व संकल्पांचा त्याग हे कारण सांगितले आहे. त्यापूर्वी संकल्प पिंड सोडत नाहीत.

मूळ श्लोक

यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते ।
सर्वसङ्कल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥ ६-४ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

यदा = ज्या वेळी (साधक), इन्द्रियार्थेषु = इंद्रियांच्या भोगांमध्ये, (तथा) = तसेच, कर्मसु हि = कर्मांमध्येही, न अनुषज्जते = आसक्त होत नाही, तदा = त्यावेळी, सर्वसङ्कल्पसंन्यासी = सर्व संकल्पांचा त्याग करणारा तो पुरुष, योगारूढः = योगारूढ, उच्यते = म्हटला जातो ॥ ६-४ ॥

अर्थ –

इंद्रियांच्या विषयांच्या ठिकाणी आणि कर्माच्या ठिकाणी जेव्हा तो आसक्त होत नाही ( योगाच्या परिपक्व अवस्थेत पोहचल्यानंतर कर्म करून पुढे शोधायचे कोणाला? तेव्हा या अवस्थेत नियत कर्म, जी आराधना, तिचीही आवश्यकता राहत नाही व म्हणून तो आता कर्मातही आसक्त होत नाही ) तेव्हा सर्व संकल्प संन्यासी ‘ त्याचे सर्व संकल्प सुटलेले असतात. हाच खरा संन्यास होय. हीच खरी योगारूढता आहे. संन्यास नावाची कोणती वस्तू नाही की जी रस्त्यात सापडेल. ती कर्मफलाची आसक्ती नसलेल्या, सर्व संकल्पांचा त्याग केलेल्या योग्यालाच प्राप्त होत असते. अशी ही योगारूढता प्राप्त होण्यापासून काय लाभ होतो ?

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६०.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment