श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६१

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६१

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६१ –

अध्याय ६ – आत्मसंयमयोग – श्लोक क्र. ६.०५ ते ६.०८  | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६१ –

मूळ श्लोक

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्‌ ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ६-५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

आत्मना = आपणच (संसारसागरातून), आत्मानम्‌ = आपला, उद्धरेत्‌ = उद्धार करावा, (च) = आणि, आत्मानम्‌ = आपणाला, न अवसादयेत्‌ = अधोगतीला नेऊ नये, हि = कारण (हा मनुष्यच), आत्मा एव = आपण स्वतःच, आत्मनः = आपला, बन्धुः = मित्र आहे (तसेच), आत्मा एव = आपण स्वतःच, आत्मनः = आपला, रिपुः = शत्रू आहे ॥ ६-५ ॥

अर्थ

अर्जुना, मनुष्याने स्वतःच स्वतःचा उद्धार करावा. आपणच आपला नाश करून घेऊ नये. कारण हा जिवात्मा स्वत:च आपला मित्र आहे व तोच आपला शत्रूही आहे. परंतु तो आपला कधी शत्रू होतो व कधी मित्र बनतो? यावर श्रीकृष्ण म्हणतात –

मूळ श्लोक

बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्‌ ॥ ६-६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

येन = ज्या, आत्मना = जीवात्म्याच्या द्वारे, आत्मा = मन व इंद्रिये यांच्यासहित शरीर, जितः = जिंकले गेले आहे, तस्य आत्मनः = त्या जीवात्म्याचा (तर तो), आत्मा एव = आपण स्वतःच, बन्धुः = मित्र आहे, तु = आणि, अनात्मनः = ज्याने मन व इंद्रिये यांसह शरीर जिंकलेले नाही, त्याच्यासाठी तो, आत्मा एव = आपण स्वतःच, शत्रुवत्‌ = शत्रूसमान, शत्रुत्वे वर्तेत = शत्रुतेचा व्यवहार करतो ॥ ६-६ ॥

अर्थ

ज्या जिवात्म्याने मन व इंद्रियांसहित शरीराला बश केले आहे त्याला ताब्यात ठेवले आहे, त्याचा जिवात्मा मित्र आहे आणि ज्या जिवात्म्याने मन व इंद्रियांसहित शरीराला ताब्यात ठेवले नाही, वश केले नाही, त्याचा जिवात्मा

शत्रू आहे. त्याच्याशी तो शत्रूप्रमाणे वैर करतो. वरील दोन शलोकांत श्रीकृष्णांनी एकच गोष्ट सांगितली आहे की, आपणच आपल्या आत्म्याचा उद्धार करावा. आपणच त्याला अधोगतीकडे नेऊ नये; कारण आत्माच आपला मित्र आहे. या जगात त्याच्याशिवाय आपलाना दुसरा कोणी मित्र आहे, ना कोणी शत्रू ज्याने मनासहित इंद्रियांना जिंकले आहे, त्याच्यासाठी आत्मा मित्र बनून मित्रासारखे आचरण करतो. तो त्याचे परमकल्याण करतो. जो मनासहित इंद्रियांना जिंकू शकत नाही, त्याच्याशी आत्मा शत्रूसारखा वागतो आणि तो त्याला नीच योनीकडे व यातनांकडे घेऊन जातो- अधोगतीच्या मार्गाकडे नेतो. पढीक पंडित मोठ्या अभिमानाने म्हणतात “मी तर आत्मा आहे !’

गीतेमध्ये आत्म्याचे स्वरूप सांगताना म्हंटले आहे – ‘ या आत्म्याला शस्त्राने कापता येत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, वायू त्याला सुकवू शकत नाही. तो नित्य आहे, अमृतस्वरूप आहे, न बदलणारा आहे, शाश्वत आहे आणि असा आत्मा माझ्यात आहे. ” असे पंडित गीतेमधील ‘ आत्मा अधोगतीकडेही जाऊ शकतो’ या ओळींकडे लक्षच देत नाहीत. जो ‘ कार्यम्‌ कर्म’ करण्यास योग्य असे कर्म, म्हणजेच नियत कर्म करतो, त्याच्या आत्म्याचा उद्धार होतो. अशा योग्याचे ठिकाणी आत्म्याचे स्वरूप कसे असते ते पहा.

मूळ श्लोक

जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ ६-७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

शीतोष्णसुखदुःखेषु = शीत-उष्ण, सुख-दुःख इत्यादींमध्ये, तथा = तसेच, मानापमानयोः = मान आणि अपमान यांमध्ये, प्रशान्तस्य = ज्याच्या अंतःकरणाच्या वृत्ती चांगल्याप्रकारे शांत असतात, जितात्मनः = मन, बुद्धी, शरीर व इंद्रिये ही ज्याच्या ताब्यात असतात अशा पुरुषाच्या ज्ञानामध्ये, परमात्मा = सच्चिदानंदघन परमात्मा, समाहितः = योग्य प्रकाराने स्थित असतो म्हणजे त्याच्या ज्ञानामध्ये परमात्म्याशिवाय इतर काहीच असत नाही ॥ ६-७ ॥

अर्थ

ज्याने आपले मन जिंकले आहे, असा योगी शीत-उष्ण, सुख-दुःख आणि मान-अपमान इत्यादी द्वंद्रामध्ये अत्यंत शांत व स्थिर असतो. तो परमात्म्याच्या ठिकाणी स्थित असतो. त्याच्याशी तद्रूप झालेला असतो. ‘ जितात्मा ‘ म्हणजेच ज्याने आपले मन इंद्रियांसहित जिंकले ब जो अत्यंत शांत आहे, ज्याची वृत्ती परमशांतीत प्रवाहित झालेली आहे. ( ही आत्म्याच्या उद्धाराची अवस्था आहे ) पुढे ते म्हणतात –

मूळ श्लोक

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः ॥ ६-८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा = ज्याचे अंतःकरण ज्ञान व विज्ञान यांनी तृप्त झाले आहे, कूटस्थः = ज्याची स्थिती विकाररहित आहे, विजितेंद्रियः = ज्याने चांगल्याप्रकारे इंद्रियांना जिंकले आहे, (च) = आणि, समलोष्टाश्मकाञ्चनः = ज्याच्या बाबतीत माती, दगड व सोने हे समान आहेत, असा, (सः) = तो, योगी = योगी, युक्तः = युक्त म्हणजे भगवंताप्रत पोहोंचलेला आहे, इति = असे, उच्यते = म्हटले जाते ॥ ६-८ ॥

अर्थ –

ज्याचे चित्त ज्ञान व विज्ञान यांच्या योगाने तृप्त आहे, जो निश्चल, स्थिर आणि विकाररहित आहे, जो जितेंद्रिय आहे, मातीचे ढेकूळ, दगड आणि सोने जो समान लेखतो – अशा गुणांनी ‘ युक्त’ असणार्‍्यालाच योगी म्हणतात. ‘ युक्त ‘ म्हणजे योगसहित. हीच योगाची पराकाष्ठा होय.

ज्याची चर्चा योगेश्वर कृष्णांनी पाचव्या अध्यायात पाचव्या शलोकापासून बाराव्या शलोकापर्यंत केली आहे. परमतत्त्व परमात्म्याचा साक्षात्कार आणि त्याबरोबरच त्याचे होणारे ज्ञान यालाच ज्ञान म्हणतात. किंचित जरी परमतत्त्वापासून साधक दूर असेल, अजून ते तत्त्व त्याने पूर्णपणे जाणले नसेल, तर तो अज्ञानीच आहे असे समजावे आणि परमतत्त्वप्राप्तीची प्रेरणा देणारा प्रेरक कसा सर्वव्यापी आहे? तो कशी प्रेरणा देतो? तो अनेक आत्म्यांना एकाच वेळी कसे मार्गदर्शन करतो? तो भूत भविष्य व वर्तमानाचा कसा ज्ञाता आहे? प्रेरकाची ही सर्व कार्यप्रणाली जाणून घेणे म्हणजेच ‘ विज्ञान ‘ होय. हृदयात ईश्वराचा प्रवेश झाला की, त्या क्षणापासून तो योग्याला निर्देश करत असतो;

सुरूवातीला साधकाच्या ती गोष्ट लक्षात येत नाही. पण अंतिम टप्प्यात ईश्वराची आंतरिक कार्य-प्रणाली तो पूर्णपणे समजून घेऊ शकतो. हे समजणे म्हणजेच विज्ञान होय. योगारूढ किंवा योगयुक्त पुरुषाचे चित्त-ज्ञान विज्ञानाने सदैव तृप्त असते. अशा प्रकारे योगयुक्त पुरुषाच्या अवस्थेचे निरूपण करताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६१.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment