श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६२

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६२

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६२ –

अध्याय ६ – आत्मसंयमयोग – श्लोक क्र. ६.०९ ते ६.१२ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६२.

मूळ श्लोक

सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।

साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥ ६-९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु = सुहृद, मित्र, वैरी, उदासीन, मध्यस्थ, द्वेष्य आणि बंधु गणांच्या ठिकाणी, साधुषु = धर्मात्मा पुरुषांच्या ठिकाणी, च = आणि, पापेषु = पापी पुरुषांच्या ठिकाणी, अपि = सुद्धा, समबुद्धिः = समान भाव ठेवणारा पुरुष, विशिष्यते = अत्यंत श्रेष्ठ आहे ॥ ६-९ ॥

अर्थ

परमात्म्याची प्राप्ती झालेला महापुरूष समदर्शी व समवती असतो. पाचव्या अध्यायातील अठराव्या श्लोकात जसे श्रीकृष्णांनी सांगितले की, आत्मज्ञानी विद्या-विनयसंपन्न ब्राह्मण, चांडाळ, गाय, कुत्रा, हत्ती या सर्वांकडे समदृष्टीने पाहत असतो. त्याच अर्थाचा हा श्लोक आहे. हितचिंतक, मित्र, शत्रू, तटस्थ, अप्रिय, नातलग, तसेच सज्जन आणि दुर्जन या सर्वांच्या ठिकाणी समदृष्टी ठेवणारा योगयुक्त पुरुष अत्यंत श्रेष्ठ होय. तो या सर्वाच्या वागण्याकडे – त्यांच्या कृतीकडे लक्ष देत नाही, तर त्यांच्या आत संचार करणाऱ्या आत्म्यावर त्यांची दृष्टी असते. त्या सर्वामध्ये त्याला फक्त एवढाच फरक दिसतो की, कोणी खालच्या शिडीवर उभा आहे तर कोणी निर्मलतेच्या समीप; परंतु ती क्षमता मात्र सर्वांमध्ये आहे. याठिकाणी श्रीकृष्णाने योगयुक्त पुरुषाचे लक्षण पुन्हा सांगितलेले आहे.

मनुष्य योगयुक्त कसा बनतो? तो यज्ञ कसा करतो? यज्ञस्थळ कसे असावे? बसण्याची जागा कशी असावी? त्या वेळी कसे बसावे? यज्ञकर्त्याने कोणत्या नियमांचे पालन करावे? त्याचा आहार-विहार, त्याच्या झोपण्यावर ब जागण्यावर ठेवायचे नियंत्रण किंवा त्याचे कर्म कसे असावे? या सर्व गोष्टींचे पुढील पाच श्लोकांत श्रीकृष्णांनी विवेचन केले आहे. ते विवेचन इतके स्पष्ट आहे की तुम्हीसुद्धा तशा प्रकारचा यज्ञ करू शकाल.

तिसऱ्या अध्यायात त्यांनी यज्ञाचा उच्चार केला आणि सांगितले की यज्ञाची प्रक्रिया म्हणजेच नियत कर्म होय. चौथ्या अध्यायात यज्ञाचे स्वरूप त्यांनी विस्तारपूर्वक सांगितले की, यात प्राणाचे अपानामध्ये हवन, अपानाचे प्राणामध्ये हवन, प्राण-अपानाच्या गतीचे नियंत्रण करून मनाचा निरोध इत्यादी क्रिया केल्या जातात. या सर्व क्रियांसह केल्या जाणाऱ्या यज्ञाचा अर्थ आराधना असा आहे. आराध्य देवापर्यंतचे अंतर नाहीसे करणारी प्रक्रिया म्हणजेच यज्ञ, म्हणजेच आराधना ! पाचव्या अध्यायातही हेच सांगितले व आता या अध्यायात यज्ञासाठी लागणारे आसन, भूमी, यज्ञाचा विधी हे सांगण्याचे बाकी राहिले होते, ते आता येथे सांगितले आहे.

मूळ श्लोक

योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।

एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥ ६-१० ॥

संदर्भित अन्वयार्थ

यतचित्तात्मा = मन, इंद्रिये यांसहित शरीराला वश करून घेणाऱ्या, निराशीः = आशारहित, (च) = आणि, अपरिग्रहः = संग्रहरहित, योगी = (अशा) ध्यानयोग्याने, एकाकी = एकटेच, रहसि = एकान्त स्थानी, स्थितः = स्थित होऊन, आत्मानम्‌ = आत्म्याला, सततम्‌ = निरंतर, युञ्जीत = परमात्म्यामध्ये लावावे ॥ ६-१० ॥

अर्थ

योग्याने मन, इंद्रिये ब शरीर यांचे संयमन करून – त्यांना वश करून, निरिच्छ एकाकी व अपरिग्रहशून्य होऊन एकांतात आपल्या चित्ताला योगाभ्यासात लावावे. म्हणजेच आत्मानुभवात तल्लीन व्हावे. त्यासाठी स्थान कसे असावे? आसन कसे असावे?

मूळ श्लोक

शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।

नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्‌ ॥ ६-११ ॥

संदर्भित अन्वयार्थ

शुचौ देशे = शुद्ध भूमीवर, चैलाजिनकुशोत्तरम्‌ = कुश, मृगचर्म व वस्त्र पसरलेले, न अत्युच्छ्रितम्‌ = जे फार उंच नाही, (तथा) = तसेच, न अतिनीचम्‌ = जे फार खाली नाही असे, आत्मनः = स्वतःचे, आसनम्‌ = आसन, स्थिरम्‌ = स्थिरपणे, प्रतिष्ठाप्य = स्थापन करून ॥ ६-११ ॥

अर्थ

पवित्र व शुद्ध अशा भूमीवर प्रथम दर्भ, त्यावर मृगाजिन, त्यावर वस्त्र ( रेशमी बा लोकरीचे ) अंथरूण फार खाली नव्हे व फार उंच नव्हे असे आपले आसन योग्याने स्थापन करावे. शुद्ध भूमी याचा अर्थ झाडून पुसून ती जागा स्वच्छ करावी असा याचा अर्थ आहे. जमिनीवर काही अंथरावे याचा अर्थ मृगाजिन, चटई, कोणतेही वस्त्र किंवा पाटासारखे आसन याची तेथे व्यवस्था करावी. आसन हलणारे नसावे, म्हणजे स्थिर असावे. ते जमिनीपासून फार उंच नसावे व अगदी जमिनीलगतही असू नये. ‘

पूज्य महाराजश्री ‘ साधारणत: पाच इंच उंचीच्या आसनावर बसत होते. एकदा एका भक्ताने त्यांच्यासाठी पाच फूट उंची संगमरवराचे सुंदर आसन आणले. महाराजश्री एक दिवस त्यावर बसले. नंतर म्हणाले – ‘ हे आसन मला नाही चालायचे; ते फार उंच झाले आहे. साधून इतक्या उंच आसनावर बसता कामा नये. यामुळे मनात अहंकार निर्माण होतो. अगदी जमिनीवर बसल्याने मनात हीनता निर्माण होते, स्वतःबद्दल मनात घृणा पैदा होते.” त्यांनी ते आसन तेथून हालवायला सांगितले आणि जंगलात एक बाग होती तेथे ठेवण्यास सांगितले, जेथे महाराजश्री कधीच जात नव्हते. आजही तेथे कोणी जात नाही. हेच त्या महापुरुषाचे आचरणपूर्ण शिक्षण! तेव्हा अशा प्रकारे साधकाने उंच आसनावर कधीही बसू नये; नाहीतर भजनपूजन बाजूला राहील व प्रथम अहंकार मनात ठाण मांडून बसेल.

मूळ श्लोक

तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः ।

उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ॥ ६-१२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तत्र = त्या, आसने = आसनावर, उपविश्य = बसून, यतचित्तेन्द्रियक्रियः = इंद्रिये व चित्त यांच्या क्रियांना वश करून, मनः = मनाला, एकाग्रम्‌ = एकाग्र, कृत्वा = करून, आत्मविशुद्धये = अंतःकरणाच्या शुद्धीसाठी, योगम्‌ = योगाचा, युञ्ज्यात्‌ = अभ्यास करावा ॥ ६-१२ ॥

अर्थ

त्या आसनावर बसून, ( बसूनच ध्यान करावयाचे असते ) मनाला एकाग्र करून, चित्त व इंद्रिये यांच्या क्रियांचे नियमन करून, चित्तशुऱ्धीसाठी योगाभ्यास करावा. आता कशा प्रकारे बसावे ते पुढील ए्लोकात सांगितले आहे.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६२.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment