श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६३

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६३

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६३ –

अध्याय ६ – आत्मसंयमयोग – श्लोक क्र. ६.१३ ते ६.१६ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६३.

मूळ श्लोक –

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।
सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्‌ ॥ ६-१३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

कायशिरोग्रीवम्‌ = काया, मस्तक आणि मान, समम्‌ = समान, (च) = तसेच, अचलम्‌ = अचल, धारयन्‌ = धारण करून, च = आणि, स्थिरः = स्थिर होऊन, स्वम्‌ = आपल्या, नासिकाग्रम्‌ = नासिकेच्या अग्रभागावर, सम्प्रेक्ष्य = दृष्टी ठेवून (व), दिशः = अन्य दिशांकडे, अनवलोकयन्‌ = न पाहता ॥ ६-१३ ॥

अर्थ –

शरीर म्हणजे येथे पाठ, मान व डोके समान रेषेत, निश्चल व स्थिर करून सरळ व दृढ होऊन बसावे आणि स्वतःच्या नाकाच्या अग्रभागाकडे दृष्टि लावून नाकाच्या शेंडयाकडे पाहणे याचा अर्थ सरळ व ताठ बसून नाकाच्या समोर जेथे नजर जाईल, तेथे ती स्थिर करणे. इकडे तिकडे पाहू नये. इतरत्र न बघता शरीर व दृष्टी अत्यंत स्थिर करून बसावे.

मूळ श्लोक –

प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः ।
मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥ ६-१४ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

ब्रह्मचारिव्रते = ब्रह्मचाऱ्याच्या व्रतामध्ये, स्थितः = स्थित, विगतभीः = भयरहित, (तथा) = तसेच, प्रशान्तात्मा = चांगल्याप्रकारे अंतःकरण शांत असणाऱ्या, युक्तः = सावधान ध्यानयोग्याने, मनः = मनाचा, संयम्य = संयम करून, मच्चित्तः = माझ्या ठिकाणी मन लावून, (च) = आणि, मत्परः = मत्परायण होऊन, आसीत = स्थित असावे ॥ ६-१४ ॥

अर्थ –

ब्रह्मचर्यत्रतामध्ये स्थिर रहावे. साधारणत: लोकांना वाटते की, जननेन्द्रियाचा संयम म्हणजे ब्रह्मचर्य होय; परंतु मनात विषयांचे स्मरण करून, डोळयांनी कामोत्तेजक दृश्ये पाहून, स्पर्शसुखाचा अनुभव घेऊन, कामोत्तेजक शब्द ऐकून जननेंद्रियाचा संयम कधीच होणार नाही. ब्रह्मचारी याचा खरा अर्थ आहे “ब्रह्म आचरति स ब्रह्मचारी’ – ब्रह्माचे आचरण आहे नियत कर्म, यज्ञाची प्रक्रिया जे जे करतात ते “यान्ति ब्रह्म सनातनम्‌’ सनातन ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवतात. ही प्रक्रिया करीत असताना ‘स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यान्‌’ बाह्य स्पर्श, मनाचे व सर्व इंद्रियांचे स्पर्श यांचा बाहेरच त्याग करून चित्त ब्रह्मचिंतनात, श्वास-प्रश्नासामध्ये व ध्यानात लावायचे असते.

मन जर ब्रह्मामध्ये तल्लीन असेल तर बाह्य गोष्टींचे स्मरण ते का करेल? आणि जर बाह्य स्मरण सुरू असेल तर मन ब्रह्मामध्ये कसे तल्लीन होईल? विकार हे शरीरात नाही पण मनातील विचारांत-भावनांत असतात. जर मन ब्रह्मचरणाशी तद्रूप होईल तर केवळ जननेन्द्रियाचा संयमच नव्हे तर सकल इंद्रियांचा संयम करणे शक्‍य असते. भीतीरहित आणि अंतःकरण शांत ठेवून, मनाचे संयमन करून, माझ्या ठिकाणी चित्त ठेवून, मत्परायण होऊन आसनावर बसावे.

मूळ श्लोक –

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः ।
शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥ ६-१५ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

नियतमानसः = ज्याचे मन स्वाधीन आहे असा, योगी = योगी, एवम्‌ = अशाप्रकारे, आत्मानम्‌ = आत्म्याला, सदा = निरंतर, युञ्जन्‌ = मज परमेश्वराच्या स्वरूपामध्ये लावून, मत्संस्थाम्‌ = माझ्यामध्ये असणारी, निर्वाणपरमाम्‌ = परमानंदाची पराकाष्ठारूप, शान्तिम्‌ = शांती, अधिगच्छति = प्राप्त करून घेतो ॥ ६-१५ ॥

अर्थ –

या प्रकारे मनाला परब्रह्माच्या चिंतनात सतत युक्त ठेवणारा, मनाचे नियमन केलेला योगी माझ्या ठायी असणारी मोक्षरूप परमशांती प्राप्त करून घेतो. यासाठी स्वत:ला निरंतर त्याच्या ध्यानात तल्लीन ठेवावे. येथे हा प्रश्‍न पूर्ण झाला. आता पुढील दोन एलोकांमध्ये त्यांनी सांगितले आहे की, परमानन्द शांती प्राप्त करण्यासाठी शारीरिक संयम, युक्ताहार, विहार हे सुद्धा आवश्यक आहे.

मूळ श्लोक –

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।
न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥ ६-१६ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अर्जुन = हे अर्जुना, योगः = हा ध्यानयोग, अति अश्नतः = पुष्कळ खाणाऱ्याला, तु न = सिद्ध होत नाही, च = तसेच, एकान्तम्‌ = संपूर्णपणे, अनश्नतः = न खाणाऱ्यालाही, न = सिद्ध होत नाही, च = आणि, अतिस्वप्नशीलस्य = अतिशय निद्रा करण्याचा स्वभाव असणाऱ्यालाही, न = सिद्ध होत नाही, च = तसेच, जाग्रतः एवः = सदा जाग्रण करणाऱ्यालाही, (योगः) = हा योग, न अस्ति = सिद्ध होत नाही ॥ ६-१६ ॥

अर्थ –

हे अर्जुना, अतिशय खाणाऱ्याला किंवा मुळीच न खाणाऱ्याला, अति झोपणाऱ्याला किंबा अति जागरण करणाऱ्याला हा योग साधत नाही. मग हा योग कोणाला साध्य होतो ?

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६३.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment