श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६४

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६४

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६४ –

अध्याय ६ – आत्मसंयमयोग – श्लोक क्र. ६.१७ ते ६.२० | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६४.

मूळ श्लोक –

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।

युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ ६-१७ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

युक्ताहारविहारस्य = यथायोग्य आहार व विहार करणाऱ्याला, कर्मसु = कर्मांमध्ये, युक्तचेष्टस्य = यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला, (च) = तसेच, युक्तस्वप्नावबोधस्य = यथायोग्य निद्रा व जागरण करणाऱ्याला, (अयम्‌) = हा, दुःखहा = दुःखांचा नाश करणारा, योगः = योग, भवति = सिद्ध होतो ॥ ६-१७ ॥

अर्थ –

दुःखाचा नाश करणारा हा योग ज्याचे खाणे व हिंडणे परिमित आहे, जो सर्व कामे अत्यंत मापून व नियमितपणे करतो, ज्याची निद्रा व जागर परिमित आहे, त्यालाच साध्य होतो. अति खाण्याने आळस, निद्रा आणि प्रमादाने माणूस घेरला जाईल. तेव्हा त्याच्या हातून साधना होणार नाही.

भोजन घेण्याचे सोडून देण्याने सर्व इंद्रिये क्षीण होतील आणि निश्चल, स्थिर बसण्याची क्षमता शरीरात राहणार नाही. पूज्य महाराजश्री म्हणत असत की, तुम्ही जो आहार घेता त्यापेक्षा दीड दोन पोळया कमी खा. जसे साधन असेल तसा विहार करावा. मात्र रोज थोडे श्रम तर करायलाच हवेत. काही ना काही कार्य करत रहायला हवेत. अन्यथा शरीरातील रक्ताचे वहन शिथिल पडेल. शरीर रोगग्रस्त बनेल. वयाप्रमाणे, आहार व अभ्यासाप्रमाणे झोपणे ब जागणे कमी जास्त होऊ शकते. ‘ महाराजश्री ‘ म्हणत – ” योग्याने चार तास झोपले पाहिजे आणि उरलेला वेळ सतत चिंतन करीत राहिले पाहिजे.

हठाग्रहाने अति जागरण केले तर तो वेडा बनतो. कर्मे करतानाही अनुरूप निरंतर कर्मरत राहावे. बाह्य विषयांचे स्मरण न करता सदैव परमतत्त्व ‘परमात्म्याच्या ठिकाणी ध्यानमग्न होणाऱ्या योग्याचाच योग साध्य होतो.”

मूळ श्लोक –

यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।

निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥ ६-१८ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

विनियतम्‌ = अत्यंत वश केले गेलेले, चित्तम्‌ = चित्त, यदा = ज्यावेळी, आत्मनि एव = परमात्म्यामध्येच, अवतिष्ठते = चांगल्याप्रकारे स्थित होऊन राहाते, तदा = त्यावेळी, सर्वकामेभ्यः = संपूर्ण भोगांची, निःस्पृहः = इच्छा नसणारा पुरुष, युक्तः = योगयुक्त आहे, इति = असे, उच्यते = म्हटले जाते ॥ ६-१८ ॥

अर्थ –

या प्रकारे विशेष अभ्यास करून वश केलेले चित्त जेव्हा आत्म्याच्या ठिकाणी स्थित होते, तेव्हा ते आत्म्यात विलीन होऊन जाते. आणि जेव्हा सर्व प्रकारच्या इच्छांविषयी साधक निरिच्छ बनतो तेव्हा तो योगमुक्त झाला किंवा त्याला योगसिद्ध झाला असे म्हणतात. आता विशेष रूपाने ज्याने चित्ताला वश केले आहे अशा योग्याचे लक्षण काय आहे ?

मूळ श्लोक –

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।

योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥ ६-१९ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

यथा = ज्याप्रमाणे, निवातस्थः = वायुरहित स्थानात असणारा, दीपः = दिवा, न इङ्गते = चंचल होत नाही, सा = तीच, उपमा = उपमा, आत्मनः = परमात्म्याच्या, योगम्‌ = ध्यानात, युञ्जतः = लागलेल्या, योगिनः = योग्याच्या, यतचित्तस्य = जिंकलेल्या चित्ताला, स्मृता = सांगितली गेली आहे ॥ ६-१९ ॥

अर्थ –

वायुरहित ठिकाणी म्हणजेच निवार्‍्याच्या जागी ठेवलेला दिवा ज्याप्रमाणे अगदी निश्चल राहतो, ज्योत अगदी सरळ तेवत राहते, ती हलत नाही, तीच उपमा परमात्म्याचे निरंतर अनुष्ठान करणार्‍या योग्याच्या नियमन केलेल्या चित्ताला दिली आहे. येथे दिव्याचे तर फक्त उदाहरण आहे.

आजकाल दिव्याचा वापर शिथिल झाला आहे. जर वारा फार नसेल तर प्रज्वलित केलेल्या अगरबत्तीचा धूर सरळ वर जातो. ज्याने आपले चित्त ताब्यात ठेवले आहे त्या योग्याच्या चित्ताचे हे एक उदाहरण आहे. त्या अवस्थेत चित्ताला जिंकलेले असेल, चित्ताचा विरोध केलेला असला तरी अद्याप चित्त आहे ते विलीन झालेले नाही. जेव्हा निरोध केलेल्या चित्ताचा विलय होतो तेव्हा कोणती विभूती प्राप्त होते ते पाहू –

मूळ श्लोक –

यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।

यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ ६-२० ॥

संदर्भित अन्वयार्थ –

योगसेवया = योगाच्या अभ्यासाने, निरुद्धम्‌ = निरुद्ध झालेले, चित्तम्‌ = चित्त, यत्र = ज्या अवस्थेमध्ये, उपरमते = उपरत होऊन जाते, च = आणि, यत्र = ज्या अवस्थेमध्ये, आत्मना = परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्मबुद्धीच्या द्वारे, आत्मानम्‌ = परमात्म्याचा, पश्यन्‌ = साक्षात्कार करून घेत, आत्मनि एव = सच्चिदानंदघन परमात्म्यामध्येच, तुष्यति = संतुष्ट होऊन राहाते ॥ ६-२० ॥

अर्थ –

ज्या स्थितीत योगाभ्यासाने ( अभ्यास-सराव केल्याशिवाय चित्ताचा निरोध होणार नाही; म्हणून योगाभ्यासाने ) नियमन केलेले चित्त शांत होते, आत्मस्वरूपी विलीन होते, तद्रूप होते तेव्हा आत्मना – आपल्या आत्म्याद्वारे ‘ आत्मानम्‌’ परमात्म्याला पाहून ‘ आत्मनि एव’ आपल्या आत्म्यातच योगी संतुष्ट होतो. कारण प्राप्तिकाळामध्ये तर परमात्म्याचा साक्षात्कार होतो; परंतु दुसऱ्याच क्षणी तो आपल्या आत्म्याला त्या शाश्वत ईश्वरीय विभूतीमध्ये ओतप्रोत झालेला पाहतो. ब्रह्म अजर, अमर, शाश्वत, अव्यक्त आणि अमृतस्वरूप आहे तर आत्माही अजर, अमर, शाश्वत, अव्यक्त आणि अमृतस्वरूपच आहे. परंतु तो अचिन्त्यही आहे.

जोपर्यंत चित्त व चित्तातले विचारतरंग आहेत, तोपर्यंत तो आपल्याला उपभोग्य नसतो. चित्ताचे नियमन व नियमन केलेल्या चित्ताचा परमात्म्यात विलय होतो, तेव्हा परमात्म्याचा साक्षात्कार होतो आणि साक्षात्कारानंतर लगेच त्यास स्वस्वरूपाची ओळख पटते व ते चित्त चैतन्याच्या भेटीस जाते व म्हणून तो योगी आपल्या आत्म्यातच संतुष्ट होतो. हे त्याचे स्वरूप आहे. हीच पराकाष्ठा आहे. यालाच पूरक असणारा पुढचा शलोक पाहा.

क्रमशः

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment