श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६५

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६५

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६५ –

अध्याय ६ – आत्मसंयमयोग – श्लोक क्र. ६.२१ ते ६.२४ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६५ –

मूळ श्लोक –

सुखमात्यन्तिकं यत्तद्‍बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम्‌ ।
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ ६-२१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अतीन्द्रियम्‌ = इंद्रियांच्या अतीत, बुद्धिग्राह्यम्‌ = फक्त शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीच्या द्वारे ग्रहण करण्यास योग्य असा, यत्‌ = जो, आत्यन्तिकम्‌ = अनन्त, सुखम्‌ = आनंद आहे, तत्‌ = त्याचा, यत्र = ज्या अवस्थेमध्ये, वेत्ति = अनुभव येतो, च = आणि, (यत्र) = ज्या अवस्थेत, स्थितः = राहिला असता, अयम्‌ = हा योगी, तत्त्वतः = परमात्म्याच्या स्वरूपापासून, न एव चलति = मुळीच विचलित होत नाही ॥ ६-२१ ॥

अर्थ –

जे इंद्रियांना अगोचर आहे, अत्यंत शुद्ध झालेल्या बुद्धीनेच ग्रहण करण्यास जे योग्य आहे असे निरातिशय, सर्वोत्कृष्ट ( असा आनंद ) असे सुख ज्या स्थितीत हा योगी अनुभवतो, ज्या स्थितीत स्थित असणारा तो आपल्या स्वरूपाला जाणतो; तो त्या तत्त्वापासून कधीच ढळत नाही. नेहमी त्याच अवस्थेत तो राहतो.

मूळ श्लोक –

यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।
यस्मिन्‌ स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥ ६-२२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

यम्‌ = जो, लाभम्‌ = लाभ, लब्ध्वा = प्राप्त झाल्यावर, ततः = त्याच्यापेक्षा, अधिकम्‌ = अधिक, अपरम्‌ = दुसरा (कोणताही लाभ), न मन्यते = (तो योगी) मानीत नाही, च = आणि (परमात्म-प्राप्ति-रूप), यस्मिन्‌ = ज्या अवस्थेमध्ये, स्थितः = स्थित असणारा योगी, गुरुणा = फार मोठ्या, दुःखेन = दुःखाने, अपि = सुद्धा, न विचाल्यते = विचलित होत नाही ॥ ६-२२ ॥

अर्थ –

परमे श्वरप्राप्तीरूप लाभ म्हणजेच परमोच्च शांती प्राप्त झाल्यानंतर तिच्याहून दुसरा कोणताही लाभ त्याला अधिक वाटत नाही व या भगवततप्राप्तीच्या सुखामध्ये तो स्थिरावला म्हणजे कितीही मोठे दुःख सामोरे आले तरी तो डगमगत नाही. त्या दुःखाचे त्याला भानच नसते. कारण सुखदुःखादि भावनांचे भान असणारे चित्तच तेथे नसते ते परमात्म्यात विलीन झालेले असते.

मूळ श्लोक –

तं विद्याद्‌ दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम्‌ ।
स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥ ६-२३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

(यः) = जो, दुःखसंयोगवियोगम्‌ = दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे म्हणजे जन्म-मरणरूप संसारातून कायम मुक्त करणारा आहे, योगसंज्ञितम्‌ = ज्याला योग हे नाव आहे, तम्‌ = त्या योगाला, विद्यात्‌ = जाणले पाहिजे, सः = तो, योगः = योग, अनिर्विण्णचेतसा = उबग न आलेल्या म्हणजे धैर्य व उत्साह यांनी युक्त अशा चित्ताने, निश्चयेन = निश्चयपूर्वक, योक्तव्यः = करणे हे कर्तव्य आहे ॥ ६-२३ ॥

अर्थ –

संसारातील दुःखाच्या संयोग-वियोगापासून अलिप्त असणाऱ्या सुखाला योग असे म्हणतात. आत्यंतिक-परमोच्च सुखाशी मीलन म्हणजे योग होय. ज्याला परमतत्त्व परमात्मा म्हणतात त्याच्याशी होणाऱ्या मीलनाचे नाव योग असे आहे. हा योग मन कंटाळू न देता निश्चयपूर्वक आचरणे हे योग्याचे कर्तव्य आहे. धैर्यपूर्वक योगाचे अनुष्ठान करणाराच या योगामध्ये सफल होतो

मूळ श्लोक –

सङ्कल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः ।
मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥ ६-२४ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

सङ्कल्पप्रभवान्‌ = संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या, सर्वान्‌ = सर्व, कामान्‌ = कामनांचा, अशेषतः = निःशेषरूपाने, त्यक्त्वा = त्याग करून, मनसा = मनानेच, इन्द्रियग्रामम्‌ = सर्व इंद्रियांना, समन्ततः एव = सर्व बाजूंनीच, विनियम्य = चांगल्याप्रकारे संयमित करून ॥ ६-२४ ॥

अर्थ –

म्हणून साधकाने विषयचिंतनापासून संकल्पापासून उत्पन्न होणाऱसर् सर्व कामनांचा वासना व आसक्तीसहित त्याग करून, सर्व इंद्रियांचे सर्व बाजूंनी मनाने नियमन करावे.

क्रमशः

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment