श्रीमद् भगवद् गीता भाग ६६ –
अध्याय ६ – आत्मसंयमयोग – श्लोक क्र. ६.२५ ते ६.२८ | श्रीमद् भगवद् गीता भाग ६६.
मूळ श्लोक –
शनैः शनैरुपरमेद्बुद्ध्या धृतिगृहीतया ।
आत्मसंस्थं मनःकृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् ॥ ६-२५ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
शनैः शनैः = क्रमाक्रमाने (अभ्यास करीत असताना), उपरमेत् = उपरती प्राप्त करून घ्यावी, (च) = तसेच, धृतिगृहीतया = धैर्याने युक्त अशा, बुद्ध्या = बुद्धीच्या मार्फत, मनः = मनाला, आत्मसंस्थम् = परमात्म्यामध्ये स्थित, कृत्वा = करून, किञ्चित् अपि = परमात्म्याशिवाय अन्य कशाचा, न चिन्तयेत् = विचारही करू नये ॥ ६-२५ ॥
अर्थ –
क्रमाक्रमाने अभ्यास केल्याने वैराग्य प्राप्त होईल. तदनंतर चित्ताचे नियमन व नंतर परमतत्त्वाशी ते तद्रूप होईल. यानंतर धैर्ययुक्त बुद्धीने हळूहळू मनाला आत्म्याच्या ठिकाणी स्थित करून दुसर्या कशाचेही चिंतन करू नये. निरंतर चिंतनात राहिल्याने परमात्मप्राप्ती होते. परंतु आरंभी मन चिंतनात स्थिर होत नाही. यावर श्रीकृष्ण म्हणतात –
मूळ श्लोक –
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥ ६-२६ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
एतद् = हे, अस्थिरम् = स्थिर न राहाणारे, (च) = आणि, चञ्चलम् = चंचल असणारे, मनः = मन, यतः यतः = ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने, निश्चरति = संसारात संचार करीत असते, ततः ततः = त्या त्या विषयातून, नियम्य = रोखून म्हणजे बाजूला नेऊन, आत्मनि एव = पुन्हा पुन्हा परमात्म्यामध्येच, वशम् = निरुद्ध, नयेत् = करावे ॥ ६-२६ ॥
अर्थ –
हे चंचल व अस्थिर असणारे मन ज्या ज्या कारणांमुळे सांसारिक गोष्टीमध्ये मग्न असते, त्या त्या कारणांपासून त्याचे नियमन करून त्याला वारंवार आत्म्याच्याच ताब्यात आणावे. साधारणत: लोक म्हणतात की मन कोठेही भरकटले तरी त्याला भटकू द्या. ते जाऊन जाऊन प्रकृतीमध्येच जाणार ना? आणि प्रकृती तर ब्रह्माच्या अंतर्गत आहे. प्रकृतीमध्ये भटकणे म्हणजे ब्रह्माच्या बाहेर जाणे नव्हे. परंतु श्रीकृष्णांच्या मते असे समजणे चुकीचे आहे. गीतेमध्ये या प्रकारच्या विचारसरणीला किंचितही स्थान नाही. श्रीकृष्णाच्या मते, मन जेथे जेथे जाईल, ज्या ज्या माध्यमातून जाईल त्या त्या माध्यमाला रोकून त्याला परमात्म्याच्या ठिकाणी लावावे. मनाचा निरोध करणे शक्य आहे. मनाचा असा निरोध केल्याने काय घडेल ?
मूळ श्लोक –
प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥ ६-२७ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
हि = कारण, प्रशान्तमनसम् = ज्याचे मन चांगल्याप्रकारे शांत झाले आहे, अकल्मषम् = जो पापाने रहित आहे, (च) = आणि, शान्तरजसम् = ज्याचा रजोगुण शांत होऊन गेलेला आहे अशा, ब्रह्मभूतम् = सच्चिदानंदघन ब्रह्माशी एकीभाव प्राप्त झालेल्या, एनम् = या, योगिनम् = योग्याला, उत्तमम् = उत्तम, सुखम् = आनंद, उपैति = प्राप्त होतो ॥ ६-२७ ॥
अर्थ –
अशा प्रकारच्या अभ्यासाने ज्याच्या मनाला उत्तम शांती मिळाली आहे, जो पापरहित झाला आहे, ज्याचा रजोगुण शांत झाला आहे व जो ब्रह्मस्वरूप झाला आहे अशा योग्याला सर्वोत्तम सुख प्राप्त होते. याच्यापेक्षा उत्तम दुसरे काहीही नसते. यावरच पुन्हा भर देऊन ते पुढे म्हणतात –
मूळ श्लोक –
युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः ।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥ ६-२८ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
विगतकल्मषः = पापरहित, योगी = योगी हा, एवम् = अशाप्रकारे, सदा = निरंतर, आत्मानम् = आत्म्याला (परमात्म्यामध्ये), युञ्जन् = लावीत, सुखेन = सुखाने, ब्रह्मसंस्पर्शम् = परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती हे स्वरूप असणारा, अत्यंतम् = अनंत, सुखम् = आनंद, अश्नुते = अनुभवतो ॥ ६-२८ ॥
अर्थ –
अशा प्रकारे पापरहित झालेला योगी आत्म्याला निरंतर परमात्म्याच्या ठिकाणी ठेवून अनायासे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीचा आनंद उपभोगत असतो. तो ‘म्रह्म संस्पर्श’ अर्थात ब्रह्माशी संयोग आणि त्यात प्रवेशाचा म्हणजेच साक्षात्काराचा आत्यंतिक आनंद अनुभवतो. त्यासाठी भजन अत्यंत आवश्यक आहे. याच-बाबत ते पुढे म्हणतात –
क्रमशः
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.