श्रीमद् भगवद् गीता भाग ६७ –
अध्याय ६ – आत्मसंयमयोग – श्लोक क्र. ६.२९ ते ६.३२ | श्रीमद् भगवद् गीता भाग ६७.
मूळ श्लोक –
सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥ ६-२९ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
योगयुक्तात्मा = सर्वव्यापी अनंत चैतन्यात एकीभावाने स्थितिरूप अशा योगाने युक्त असा आत्मवान् (तसेच), सर्वत्र = सर्व ठिकाणी, समदर्शनः = समभावाने पाहणारा योगी, आत्मानम् = आत्म्याला, सर्वभूतस्थम् = सर्व सजीवांमध्ये स्थित, च = आणि, सर्वभूतानि = सर्व सजीवांना, आत्मनि = आत्म्यामध्ये (कल्पित असे), ईक्षते = पाहातो ॥ ६-२९ ॥
अर्थ –
ज्याचे चित्त योगयुक्त झाले आहे व जो सर्वत्र समदृष्टीने-समभावाने पाहतो असा योगी स्वत:ला सर्व प्राणिमात्रांमध्ये पाहतो व सर्व प्राणिमात्रांना स्वत:च्या ठिकाणी पाहतो. असे समदृष्टीने पाहण्याने योग्याला काय लाभ मिळतो ?
मूळ श्लोक –
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥ ६-३० ॥
संदर्भित अन्वयार्थ –
यः = जो पुरुष, सर्वत्र = सर्व सजीवांमध्ये, माम् = सर्वांचा आत्मा अशा मज परमात्म्यालाच व्यापक असे, पश्यति = पाहतो, च = आणि, सर्वम् = सर्व सजीवांना, मयि = मज वासुदेवाचे अंतर्गत, पश्यति = पाहतो, तस्य = त्याच्या बाबतीत, अहम् = मी, न प्रणश्यामि = अदृश्य होत नाही, च = तसेच, सः = तो, मे = माझ्यासाठी, न प्रणश्यति = अदृश्य होत नाही ॥ ६-३० ॥
अर्थ –
जो पुरुष सर्व प्राणिमात्रांमध्ये मला पाहतो, आणि सर्व प्राणिमात्रांना माझ्या ठिकाणी पाहतो त्याच्यासाठी मी अदूश्य नसतो व माझ्यासाठीही तो अदृश्य नसतो. हे योगयुक्त साधकाचे व माझे प्रत्यक्ष मीलन आहे. सख्यभाव आहे. सामीप्य आहे, मुक्ती आहे.
मूळ श्लोक –
सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥ ६-३१ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
एकत्वम् आस्थितः = एकीभावात स्थित होऊन, यः = जो पुरुष, सर्वभूतस्थितम् = सर्व सजीवात आत्मस्वरूपाने स्थित असणाऱ्या, माम् = मज सच्चिदानंदघन वासुदेवाला, भजति = भजतो, सः = तो, योगी = योगी, सर्वथा = सर्व प्रकारांनी, वर्तमानः = व्यवहार करीत असताना, अपि = सुद्धा, (सः) = तो, मयि = माझ्यामध्येच, वर्तते = व्यवहार करतो ॥ ६-३१ ॥
अर्थ –
अनेकतेच्या पलीकडे असणाऱ्या एकत्व भावाला जाणून जो मला भजतो, तो योगी सर्व प्रकारचे काम करीत असला तरी तो माझ्याच ठिकाणी राहतो. कारण माझ्याशिवाय त्याच्याजवळ दुसरे काहीही शिल्लक राहिलेले नसते. त्याने सर्व काही मला अर्पण केलेले असल्याने उठता-बसता तो प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी करतो.
मूळ श्लोक –
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥ ६-३२ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
अर्जुन = हे अर्जुना, यः = जो योगी, आत्मौपम्येन = आपल्याप्रमाणेच, सर्वत्र = सर्व सजीवांमध्ये, समम् = सम, पश्यति = पाहतो, वा = तसेच, सुखम् = सर्वांचे सुख, यदि वा = अथवा, दुःखम् = दुःखसुद्धा आपल्याप्रमाणे सम पाहतो, सः = तो, योगी = योगी, परमः = परम श्रेष्ठ, मतः = मानला गेला आहे ॥ ६-३२ ॥
अर्थ –
हे अर्जुना, जो योगी सर्व भूतमात्रांमध्ये आपल्या प्रमाणे समत्व पाहतो, आपल्याप्रमाणेच त्यांना पाहतो, त्यांचे सुख अथवा दुःख हे ही जो आपल्यासारखे पाहतो तो योगी ( ज्याचा भेदभाव संपला आहे ) परमश्रेष्ठ समजला जातो. श्रीकृष्णांच्या बोलण्यावर अर्जुन म्हणाला –
क्रमशः
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.