श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६८

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६८

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६८ –

अध्याय ६ – आत्मसंयमयोग – श्लोक क्र. ६.३३ ते ६.३६ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६८.

मूळ श्लोक –

अर्जुन उवाच
योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।
एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात्स्थितिं स्थिराम्‌ ॥ ६-३३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, मधुसूदन = हे मधुसूदना (श्रीकृष्णा), अयम्‌ = हा, यः = जो, साम्येन = समभावाच्या बाबतीत, योगः = योग, त्वया = तुम्ही, प्रोक्तः = सांगितला, (मनसः) = मनाच्या, चञ्चलत्वात्‌ = चंचलपणामुळे, एतस्य = याची, स्थिराम्‌ = नित्य स्थिर, स्थितिम्‌ = स्थिती, अहम्‌ न पश्यामि = मला दिसत नाही ॥ ६-३३ ॥

अर्थ –

अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, तू जो हा समत्वभाव दृष्टीचा योग सांगितलास, तो मनाच्या चांचल्यामुळे माझ्या ठिकाणी बराच वेळ स्थिर राहील असे मला वाटत नाही.

मूळ श्लोक –

चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्‍दृढम्‌ ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्‌ ॥ ६-३४ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

हि = कारण, कृष्ण = हे श्रीकृष्णा, मनः = मन, चञ्चलम्‌ = फार चंचल, प्रमाथि = घुसळून काढण्याचा स्वभाव असणारे, दृढम्‌ = अत्यंत बळकट, (च) = आणि, बलवत्‌ = बलवान आहे, (अतः) = म्हणून, तस्य = त्याचा, निग्रहम्‌ = निग्रह करणे हे, वायोः इव = वायूला रोखण्याप्रमाणे, सुदुष्करम्‌ = अत्यंत दुष्कर आहे असे, अहम्‌ = मला, मन्ये = वाटते ॥ ६-३४ ॥

अर्थ –

हे कृष्णा, हे मन मोठे चंचल आहे, ते क्षोभक, बलयुक्त तसेच वळवण्यास कठीण आहे. त्याचा निग्रह करणे वायूच्या निग्रहाप्रमाणेच अत्यंत दुष्कर आहे. सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे त्याचा निग्रह करण्यास अत्यंत कठीण आहे. यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात –

मूळ श्लोक –

श्रीभगवानुवाच
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्‌ ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥ ६-३५ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, महाबाहो = हे महाबाहो अर्जुना, असंशयम्‌ = निःसंशयपणे, मनः = मन हे, चलम्‌ = चंचल, (च) = आणि, दुर्निग्रहम्‌ = वश करून घेण्यास कठीण आहे, तु = परंतु, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, (इदम्‌ मनः) = हे मन, अभ्यासेन = अभ्यासाने, च = आणि, वैराग्येण = वैराग्याने, गृह्यते = वश करून घेता येते ॥ ६-३५ ॥

अर्थ –

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, महान कार्य करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या महाबाहो अर्जुना, मन खरोखर फार चंचल आहे. त्याचा निग्रह करणे, त्याला वश करणे कठीण आहे; परंतु हे कौन्तेया, अभ्यासाने व वैराग्याने त्याला वश करता येते. ज्याठिकाणी त्याला केंद्रित करावयाचे आहे त्या ठिकाणी स्थिर करण्याचा सतत प्रयत्न करणे म्हणजेच अभ्यास होय आणि जे पाहिले जाते, ऐकले जाते ( म्हणजेच संसारातील किंवा स्वर्गातील सुखभोगांच्या ) त्यांच्या आसक्तीचा त्याग करणे म्हणजे वैराग्य होय. श्रीकृष्ण म्हणतात की मनाचा निग्रह करणे कठीण आहे, परंतु अभ्यास आणि वैराग्याच्या सहाय्याने त्याला स्वाधीन ठेवता येते – त्याला वश करता येते.

मूळ श्लोक –

असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः ।
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥ ६-३६ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

असंयतात्मना = ज्याने मन वश करून घेतले नाही अशा पुरुषाला, योगः = योग, दुष्प्रापः = प्राप्त होण्यास कठीण आहे, तु = परंतु, (सः योगः) = तो योग, वश्यात्मना = ज्याने मन वश करून घेतले आहे अशा, यतता = प्रयत्‍न करणाऱ्या पुरुषाला, उपायतः = साधनाच्या द्वारे, अवाप्तुम्‌ = प्राप्त करून घेणे, शक्यः = सहज शक्य आहे, इति = असे, मे = माझे, मतिः = मत आहे ॥ ६-३६ ॥

अर्थ –

हे अर्जुना, मनाचा निग्रह न करू शकणाऱ्या पुरुषाला योग प्राप्त होणे कठीण आहे; परंतु ज्याने मनाला वश केले आहे अशा पुरुषाला तो प्रयत्नाने साधणे सहज शक्य आहे असे माझे मत आहे. तुला हा योग जितका कठीण वाटतो तितका कठीण तो नाही. तो आचरण्यास फार कठीण आहे असे समजून तू तो सोडून देऊ नकोस. प्रयत्नपूर्वक अभ्यास करून तू तो योग प्राप्त करून घे कारण मनाला स्वाधीन ठेवल्यानंतरच योग प्राप्त होत असतो. यावर अर्जुनाने प्रश्‍न विचारला –

क्रमशः

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment