श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६९

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६९

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६९ –

अध्याय ६ – आत्मसंयमयोग – श्लोक क्र. ६.३७ ते ६.४० | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६९.

मूळ श्लोक –

अर्जुन उवाच
अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥ ६-३७ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, कृष्ण = हे श्रीकृष्णा, श्रद्धया उपेतः = जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे, (किंतु यः) = परंतु जो, अयतिः = संयमी नाही (या कारणाने), योगात्‌ = योगापासून, चलितमानसः = ज्याचे मन अंतकाळी विचलित झाले आहे (अशा साधक योग्याला), योगसंसिद्धिम्‌ = योगाची सिद्धी म्हणजे भगवत्साक्षात्कार, अप्राप्य = प्राप्त होणार नाही, (सः) = तो, काम्‌ = कोणती, गतिम्‌ = गती, गच्छति = प्राप्त करून घेतो ॥ ६-३७ ॥

अर्थ –

अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, मनुष्य श्रद्धेने युक्त असला व त्या श्रद्धेने तो योगाचे आचरण करीत असताना, त्याचे मन योगापासून विचलित झाल्याने त्याचा प्रयत्न सुटला व त्या कारणाने त्याला योगसिद्धी प्राप्त झाली नाही तर तो कोणत्या गतीला जातो?

मूळ श्लोक –

कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥ ६-३८ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

महाबाहो = हे महाबाहो श्रीकृष्णा, (सः) = तो, ब्रह्मणः = भगवत्प्राप्तीच्या, पथि = मार्गावर, विमूढः = मोहित, (च) = व, अप्रतिष्ठः = आश्रयरहित असा पुरुष, छिन्नाभ्रम्‌ इव = छिन्न भिन्न झालेल्या ढगाप्रमाणे, उभयविभ्रष्टः = दोन्हींकडून भ्रष्ट होऊन, कच्चित्‌ न नश्यति = नष्ट तर होऊन जात नाही ना ॥ ६-३८ ॥

अर्थ –

हे महाबाहो श्रीकृष्णा, भगवतसिद्धीच्या मार्गापासून विचलित झालेला मोहित पुरुष इतर ढगांपासून वेगळया झालेल्या ढगाप्रमाणे नाश पावत नाही ना? इतर ढगांपासून तुटून वेगळा झालेला ढग ना वर्षाव करीत, ना पुन्हा त्या ढगाला जाऊन मिळत. उलट वाऱ्यामुळे तो इकडे तिकडे फिरत फिरत नष्ट होतो. तशा प्रकारे ज्याचा प्रयत्न शिथिल पडला व ज्याने योगसाधना काही दिवस करून मध्येच सोडून दिली तर तो नष्ट तर पावत नाही ना? तो ना आपल्यामध्ये प्रवेश करू शकत, ना सुखपभोगांचा भोग घेऊ शकत. अशा पुरुषाला कोणती गती प्राप्त होते?

मूळ श्लोक –

एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः ।
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥ ६-३९ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

कृष्ण = हे श्रीकृष्णा, मे = माझा, एतत्‌ = हा, संशयम्‌ = संशय, अशेषतः = संपूर्णरूपाने, छेत्तुम्‌ = नष्ट करण्यासाठी, अर्हसि = तुम्ही समर्थ आहात, हि = कारण, अस्य = या, संशयस्य = संशयाला, छेत्ता = तोडून टाकणारा, त्वदन्यः = तुमच्याशिवाय दुसरा कोणी, न उपपद्यते = मिळणे संभवत नाही ॥ ६-३९ ॥

अर्थ –

हे कृष्णा, माझी ही शंका पूर्णतेने दूर करण्यास तुम्हीच समर्थ आहात. आपल्याशिवाय दुसरा कोणीही माझी ही शंका दूर करू शकणार नाही. यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणाले –

मूळ श्लोक –

श्रीभगवानुवाच
पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।
न हि कल्याणकृत्कश्चिद्‍दुर्गतिं तात गच्छति ॥ ६-४० ॥

संदर्भित अन्वयार्थ –

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), तस्य = त्या पुरुषाला, इह = या लोकात, विनाशः न विद्यते = विनाश होत नाही, अमुत्र एव न = (तसेच) परलोकातही (त्याचा विनाश) होत नाही, हि = कारण, तात = अरे बाबा, कल्याणकृत्‌ = आत्मोद्धारासाठी म्हणजे भगवत्प्राप्तीसाठी कर्म करणारा, कश्चित्‌ = कोणीही पुरुष, दुर्गतिम्‌ = दुर्गती, न गच्छति = प्राप्त करून घेत नाही ॥ ६-४० ॥

अर्थ –

पार्थिव शरीराला रथ बनवून लक्ष्याकडे घोडदौड करणाऱ्या हे अर्जुना, अशा पुरुषाला इहलोकी किंवा परलोकीही विनाश असत नाही; कारण परमकल्याणकारी कर्म करणारा, सत्कर्म करणारा कोणीही अधोगतीला जात नाही. मग त्याचे काय होते?

क्रमशः

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment