श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७०

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७०

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७० –

अध्याय ६ – आत्मसंयमयोग – श्लोक क्र. ६.४१ ते ६.४४ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७०.

मूळ श्लोक –

प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ६-४१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

योगभ्रष्टः = योगभ्रष्ट पुरुष हा, पुण्यकृताम्‌ = पुण्यवान माणसांचे, लोकान्‌ = लोक म्हणजे स्वर्गादी उत्तम लोक, प्राप्य = प्राप्त करून घेऊन, (तत्र) = तेथे, शाश्वतीः = पुष्कळ, समाः = वर्षांपर्यंत, उषित्वा = निवास करून (नंतर), शुचीनाम्‌ = शुद्ध आचरण असणाऱ्या, श्रीमताम्‌ = श्रीमान्‌ पुरुषांच्या, गेहे = घरामध्ये, अभिजायते = जन्म घेतो ॥ ६-४१ ॥

अर्थ –

मन विचलित झाल्याने योगभ्रष्ट झालेला पुरुष पुण्यकर्म करणाऱ्यांच्या लोकाला जाऊन तेथे पुष्कळ वर्षे वास करून इच्छित सुखे प्राप्त करून ( ज्या कामनासक्तीमुळे तो योगभ्रष्ट झाला होता त्या त्याच्या इच्छा परमेश्वर थोडयाच दिवसात तेथे पूर्ण करतो. ) ‘ सुचीनां श्रीमतां’ शुद्धाचरणी व वैभवशाली अशा कुलामध्ये तो जन्म घेतो ( जे शुद्धाचरणी असतात तेच वैभवशाली असतात ).

मूळ श्लोक –

अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम्‌ ।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्‌ ॥ ६-४२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अथवा = किंवा (वैराग्यवान पुरुष त्या स्वर्गादी लोकांत न जाता), धीमताम्‌ = ज्ञानवान, योगिनाम्‌ = योग्यांच्या, कुले एव = कुळामध्येच, भवति = जन्म घेतो, (किंतु) = परंतु, ईदृशम्‌ = अशा प्रकारचा, यत्‌ एतत्‌ = जो हा, जन्म = जन्म आहे, (तद्‌) = तो, लोके = या संसारात, हि = निःसंशयपणे, दुर्लभतरम्‌ = अत्यंत दुर्लभ आहे ॥ ६-४२ ॥

अर्थ –

किंवा शुद्धाचरणी श्रीमतांच्या घरी त्याला जन्म नाही मिळाला; तर स्थिर बुद्धीच्या योगी लोकांच्या कुळात त्याला प्रवेश मिळतो. शुद्धाचरणी श्रीमंतांच्या घरात पवित्र संस्कार लहानपणापासूनच प्राप्त होतात. परंतु तशा घरात जन्म झाल्याने त्याला योग्याच्या कुळात ( घरात नव्हे ) म्हणजेच शिष्य परंपरेत प्रवेश मिळतो. कबीर, तुलसीदास, रेदास, वाल्मीकी इत्यादींना शुद्धाचरणी श्रीमंतांच्या घरात जन्म नाही मिळाला; परंतु योग्यांच्या कुळात प्रवेश मिळाला. सद्गुरूंच्या कुलामध्ये संस्काराचे परिवर्तन हाही एक जन्म आहे. अशा प्रकारचा जन्म या लोकी मिळणे अत्यंत दुर्लभ आहे.

योग्यांच्या या जन्माचा अर्थ त्यांच्या पोटी जन्म घेणे असा नव्हे. त्याच्या पोटी जन्म घेतलेली मुलं ( गृहत्यागापूर्वी ) महापुरुषाला भले आपले वडील मानत असले, तरी त्या महापुरुषाला घराविषयी व आप्तजनां विषयी काहीही आसक्ती-प्रेम वाटत नाही. जो शिष्य महापुरुषाच्या आज्ञांचे पालन करतो, त्यांची सेवा करतो तो शिष्य स्वत:च्या पुत्रांपेक्षा त्यांना अधिक प्रिय असतो. तोच त्यांचा खरा पुत्र बनतो.

जे योगाच्या संस्कारांनी युक्त नसतात, अशा शिष्यांना महापुरुष शिष्य म्हणून स्वीकारीत नाहीत. ‘ पूज्य महाराजश्री ‘ नी अशा सर्वांना शिष्य केले असते तर हजारो विरक्त त्यांचे शिष्य बनले असते. परंतु कोणाला गाडी भाडे देऊन, कोणाच्या दारी निरोप पाठवून, कोणाच्या घरी पत्र पाठवून, कोणाला समजावून असे अनेकांना ( योगयुक्त संस्कार नसलेल्यांना ) त्यांनी घरी पाठवून दिले. अनेक हट्ट करू लागले की त्यांना आतून सूचना मिळे की, याच्यामध्ये साधू बनण्याचे एकही लक्षण नाही, याला ठेवून घेण्यात काही फायदा नाही. हा योगमार्ग पार करू शकणार नाही. तेव्हा महाराजश्रींनी त्यांना स्वीकारले नाही. तर एक-दोघांनी निराश होऊन पर्वतावरून खाली उडी टाकून जीवही दिला; परंतु महाराजश्रींनी त्यांना आपल्याजवळ ठेवून घेतले नाही. त्यांना मागाहून ही गोष्ट समजल्यावर ते म्हणत “हा मार्ग आचरण्यास तो पूर्णपणे असमर्थ आहे हे मी जाणल्याने त्याला ठेवून घेतले नाही; परंतु हा असा आत्मघात करेल हे समजले असते; तर ठेवला असता जवळ; शेवटपर्यंत पतीतच राहिला असता.

दुसरे काय ! जीवाने तर वाचला असता.”” महाराजश्रींचेजवळ असे ममत्वही खूप होते, परंतु तरीही त्यांनी संस्कारहीन शिष्यांचा स्वीकार केला नाही. सहा-सात जणांच्या बाबतीत त्यांना आदेश मिळाला होता ” आज एक योगभ्रष्ट पुरुष तुमच्याकडे येत आहे. अनेक जन्म भटकत आहे. त्याचे अमुक नाव आहे व असे रूप आहे तेव्हा त्याचा स्वीकार करावा. व त्याला ब्रह्मविद्येचा उपदेश करून त्याला पुढे न्यावे.” केवळ अशा शिष्यांचाच महाराजश्रींनी स्वीकार केला. आजही त्यातील एक महापुरुष धारकुण्डीमध्ये बसले आहेत. एक अनुसुयामध्ये आहेत व दोन-तीन अन्यत्र आहे. त्यांना सदगुरुच्या कुळात प्रवेश मिळाला. अशा महापुरुषांची प्राप्ती होणे अत्यंत दुर्लभ असते.

मूळ श्लोक –

तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम्‌ ।
यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥ ६-४३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

(सः) = तो, तत्र = तेथे, पौर्वदेहिकम्‌ = पूर्वीच्या शरीरात संपादन केलेला, तम्‌ = तो, बुद्धिसंयोगम्‌ = बुद्धीचा संयोग म्हणजे समबुद्धीरूप योगाचा संस्कार, लभते = अनायासे मिळवितो, च = आणि, कुरुनन्दन = हे कुरुवंशीय अर्जुना, ततः = त्याच्या प्रभावामुळे, (सः) = तो, संसिद्धौ = परमात्म्याच्या प्राप्तीरूप सिद्धीच्यासाठी, भूयः = पूर्वीपेक्षाही अधिक, यतते = प्रयत्‍न करतो ॥ ६-४३ ॥

अर्थ –

हे अर्जुना, पूर्वजन्माच्या देहातील बुद्धिसंस्काराचा नव्या देहामध्ये त्याला लाभ होतो. त्याच्याठिकाणी ते बुल्धिसंस्कार उपजतच असतात. त्यामुळे हे कुरूनन्दना, त्यांच्या प्रभावामुळे तो पुन्हा “संसिद्धौ’ भगवत्प्राप्तीसाठी योगसिद्धीसाठी प्रयत्न करतो.

मूळ श्लोक –

पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः ।
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥ ६-४४ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

सः = श्रीमंताच्या घरात जन्मलेला तो योगभ्रष्ट योगी, तेन पूर्वाभ्यासेन एव = त्या पूर्वीच्या अभ्यासामुळेच, अवशः = पराधीन होऊन, हि = निःसंशयपणे, ह्रियते = भगवंतांकडून आकर्षित केला जातो, (तथा) = तसेच, योगस्य = समबुद्धिरूप योगाचा, जिज्ञासुः अपि = जिज्ञासूसुद्धा, शब्दब्रह्म = वेदात सांगितलेल्या सकाम कर्मांचे फळ, अतिवर्तते = उल्लंघन करून जातो ॥ ६-४४ ॥

अर्थ –

श्रीमंताच्या घरी तो विषयांच्या आधीन झाला तरी पूर्वजन्मीच्या अभ्यासाने तो भगवतूमार्गाकडे-कर्मयोगाकडे आकर्षिला जातो आणि मग या मार्गात त्याचे प्रयत्न शिथिल असले तरी, योगमार्गाचा तो जिज्ञासू शब्दब्रह्माला पार करून निर्वाण पदाची प्राप्ती करून घेतो त्याच्या प्राप्तीचा हाच मार्ग आहे. एका जन्मात कोणालाही निर्वाणपद प्राप्त होत नाही.

क्रमशः

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment