श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७१

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७१

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७१ –

अध्याय ६ – आत्मसंयमयोग – श्लोक क्र. ६.४५ ते ६.४७ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७१.

मूळ श्लोक –

प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम्‌ ॥ ६-४५ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

तु = परंतु, प्रयत्नात्‌ = प्रयत्नपूर्वक, यतमानः = अभ्यास करणारा, योगी = योगी (हा तर), अनेकजन्मसंसिद्धः = मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या सामर्थ्यामुळे याच जन्मात संसिद्ध होऊन, संशुद्धकिल्बिषः = संपूर्ण पापांनी रहित होऊन, ततः = नंतर तत्काळ, पराम्‌ गतिम्‌ = परम गती, याति = प्राप्त करून घेतो ॥ ६-४५ ॥

अर्थ –

अनेक जन्मे प्रयत्न करणारा योगी परमसिद्धी प्राप्त करतो. प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी सर्व पापांपासून चांगल्याप्रकारे शुद्ध होऊन मोक्षाप्रत जातो. मोक्षप्राप्तीचा हाच क्रम आहे. प्रथम शिथिल प्रयत्नाने योगाचा आरंभ होतो. मन योगापासून चलित होते. त्यामुळे जन्म घ्यावा लागतो. त्या जन्मात सद्गुरूच्या कुलात त्याचा प्रवेश होतो आणि मग प्रत्येक जन्मात अभ्यास करत करत तो परमगतीला पावतो.

श्रीकृष्णांनी सांगितले होते की या योगामध्ये बीजाचा नाश होत नाही. आपण या मार्गात दोन पावले चाललात तरी त्या साधनेचा कधी नाश होत नाही. प्रत्येक परिस्थितीत मनुष्य थोडी फार साधना करू शकतो. कारण मनुष्याला वेळ थोडा असतो, त्यामुळे त्याच्याकडून थोडी फार साधना होत असते. आपण काळे आहात की गोरे आहात, किंवा आपण कुठचेही असलात तरी गीता सर्वांसाठी आहे. आपल्यासाठीही ती आहे. उत्कट प्रयत्न करणारा कोणीही असू शकतो परंतु शिथिल प्रयत्न करणारा गृहस्थच असतो. गीता गृहस्थ-विरक्त, शिक्षित-अशिक्षित थोडक्यात सर्वसाधारण मनुष्य मात्रांसाठी आहे. कोणा ‘ साधू नावाच्या विचित्र प्राण्यासाठी नाही. शेवटी योगेशश्वर श्रीकृष्ण निर्णय देताना म्हणतात-

मूळ श्लोक –

तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥ ६-४६ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

योगी = योगी, तपस्विभ्यः = तपस्वी लोकांपेक्षा, अधिकः = श्रेष्ठ आहे, ज्ञानिभ्यः अपि = शास्त्रज्ञानी पुरुषांपेक्षा सुद्धा (तो), अधिकः = श्रेष्ठ, मतः = मानला गेला आहे, च = आणि, कर्मिभ्यः = सकाम कर्मे करणाऱ्या माणसांपेक्षा सुद्धा, योगी = योगी, अधिकः = श्रेष्ठ आहे, तस्मात्‌ = म्हणून, अर्जुन = हे अर्जुना, योगी भव = योगी हो ॥ ६-४६ ॥

अर्थ –

तपस्व्यांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. ज्ञानी लोकांपेक्षाही योग्याला श्रेष्ठ समजले जाते. सकाम कर्मे करणार्‍या कर्मनिष्ठांपेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना तू योगी हो. तपस्वी-स्वरूपप्राप्तीसाठी तपस्वी लोक मनासहित इंद्रियांना योगामध्ये उतरवून तापवीत असतात. योग त्यांच्यात अद्याप संपूर्ण उतरलेला नसतो.

वर्मी- कर्मनिष्ठ लोक नियत कर्म म्हणून त्यात प्रवृत्त होतात. परंतु ते आपली क्षमता ओळखून त्यात प्रवृत्त होत नाहीत किंवा समर्पण भावाने ते कर्म करत नाहीत. फक्त कर्म करायचे म्हणून करीत असतात.

ज्ञानी- ज्ञानमार्गी तेच नियत कर्म, यज्ञाच्या प्रकियेला चांगल्या प्रकारे जाणून आपल्या शक्तीचा अंदाज घेऊन कर्म करण्यास प्रवृत्त होतात. त्याच्या लाभहानीचे उत्तरदायित्व त्यांच्यावरच असते. लाभहानीवर नजर ठेवून ते कर्म करतात.

योगी- निष्काम कर्मयोगी मात्र ईश्वरावर श्रद्धा ठेवून, समर्पण भावाने त्या नियत कर्मामध्ये – ‘ योग साधने ‘ मध्ये प्रवृत्त होतो. अशा योग्याच्या योगक्षेमाची जबाबदारी परमेश्वर घेत असतो. पतन होण्याची स्थिती निर्माण झाली तरी त्याला पतनाचे भय नसते. कारण ज्या परमतत्त्वाची तो अभिलाषा धरतो, ध्यास घेतो तो परमात्माच त्याला सांभाळण्याची जबाबदारी घेत असतो.

म्हणजे तपस्वी योग प्राप्त करण्यासाठी अद्याप प्रयत्नशील आहे. कर्मनिष्ठ केवळ कर्म करणेच जाणतो. त्यांचे पतनही होऊ शकते कारण त्या दोन्हींमध्ये ना समर्पणाची भावना असते ना आपली लाभहानी पाहण्याची क्षमता; परंतु ज्ञानी योग्याच्या अवस्थेला जाणत असतो, त्याला आपल्या शक्तीचा अंदाज असतो व त्याची सर्व जबाबदारी त्याच्यावरच असते; आणि निष्काम कर्मयोगी तर स्वतःला परमेश्वराच्या आधीन करतो. त्यामुळे त्याला ईश्वर सांभाळतो. ‘परमकल्याणाच्या मार्गावर हे दोन साधक योग्य प्रकारे चालत असतात. परंतु ज्याची जबाबदारी ईश्वर घेतो तो साधक सर्वात श्रेष्ठ होय, कारण ईश्वराने त्याला स्वीकारलेले असते. त्याच्या लाभहानीचा विचार ईश्वरच करीत असतो. म्हणून कर्मयोगी श्रेष्ठ आहे. यासाठी हे अर्जुना, तू कर्मयोगी बन आणि समर्पणासहित योगाचे आचरण कर.

कर्मयोगी श्रेष्ठ खरा; पण त्यामध्येही जो अन्तरात्म्यामध्ये लीन असतो तो योगी श्रेष्ठ होय.

मूळ श्लोक –

योगिनामपि सर्वेषां मद्‍गतेनान्तरात्मना ।
श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥ ६-४७ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

सर्वेषाम्‌ योगीनाम्‌ अपि = सर्व योग्यांच्यामध्ये सुद्धा, यः = जो, श्रद्धावान्‌ = श्रद्धावान योगी, मद्‍गतेन = माझ्या ठिकाणी लावलेल्या, अन्तरात्मना = अंतरात्म्याने, माम्‌ = मला, भजते = निरंतर भजतो, सः = तो योगी, मे = मला, युक्ततमः मतः = परमश्रेष्ठ म्हणून मान्य आहे ॥ ६-४७ ॥

अर्थ –

सर्व निष्काम कर्मयोग्यामध्ये जो श्रद्धाशीलतेने, अंत:करणापासून अन्तर्चिन्तनातून निरंतर मलाच भजतो तो योगी मला श्रेष्ठ वाटतो. भजन ही काही देखावा करण्याची गोष्ट नाही. अशा भजनाला समाजाने भले माना डोलावल्या तरी ईश्वराचा अशा भजनाला विरोध असतो. भजन हे अत्यंत गोपनीय असते, आणि ते अंत:करणापासून गायले जात असते. त्याचे कमीजास्त होणे हे अंतःकरणावर अवलंबून असते.

निष्कर्ष-

या अध्यायाच्या आरंभी योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितले की कर्मफलाचा आश्रय न घेता “कार्यम्‌ कर्म’ म्हणजे जो कर्तव्य कर्म करतो तोच खरा संन्यासी होय आणि ते कर्म करणारा योगी आहे. केवळ कर्माचा व अग्निहोत्राचा त्याग केल्याने कोणीही योगी किंवा संन्यासी होत नाही. संकल्पांचा त्याग केल्याशिवाय कोणीही पुरुष संन्यासी अथवा योगी होत नाही. आम्ही इच्छा-अपेक्षा-संकल्प करत नाही असे केवळ म्हणण्याने संकल्प पिण्ड सोडत नाहीत. योगामध्ये आरूढ होऊ इच्छिणाऱ्या पुरुषाने “कार्यम्‌ कर्म’ कर्तव्य कर्म करता करता योगारूढ होण्याने सर्व संकल्प नष्ट होतात. त्यापूर्वी नष्ट होत नाहीत. सर्व संकल्प नाहीसे होणे यालाच संन्यास म्हणतात.

योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितले की, आत्मा अधोगतीला जाऊ शकतो आणि पुन्हा त्याचा उद्धारही होऊ शकतो. जो पुरुष मनासहित इंद्रियांना जिंकतो त्याचा आत्मा त्याचा मित्र बनून त्याचे परमकल्याण करतो. जो इंद्रियांना जिंकू शकत नाही, त्याचा आत्मा त्याचा शत्रू बनून शत्रुसारखा त्याच्याशी वागतो व अनेक यातनांचे तो कारण बनतो. म्हणून मनुष्याने आपल्या आत्म्याला अधोगतीला जाऊ देता कामा नये. मनासहित इंद्रियदमन करून आपणच आपल्या आत्म्याचा उद्धार करावा.

त्यानंतर त्यांनी योग प्राप्त करणाऱ्या योग्याची राहाणी सांगितली आहे – ‘यज्ञस्थळी ‘ बसण्याचे आसन व बसण्याची पद्धत सांगताना सांगितले की, यज्ञस्थल शांत व स्वच्छ असावे. रेशमी वस्त्र, मृगाजिन, किंवा दर्भाची चटई यापैकी कोणतेही एक आसन, पसंत करावे. कर्माला अनुरूप असा आहार, विहार, निद्रा या बाबतीत संयम असावा. योग्याच्या निग्रही चित्ताला त्यांनी निवाऱ्याच्या ठिकाणी स्थिर रहाणाऱ्या दीपकाची उपमा दिली आहे;

आणि मग जेव्हा निग्रह केलेल्या मनाचाही परमतत्त्वात विलय होतो त्यासमयी योगी पराकाष्ठेचा परमानंद सुखाचा अनुभव घेतो. संसारातील संयोग व वियोग यांनी रहित असे जे सुख, त्यालाच मोक्ष असे म्हणतात. योग म्हणजे परमार्थाशी मिलन. जो योगी परमार्थाची प्राप्ती करून घेतो तो सर्व भूतमात्रांकडे समदृष्टीने पाहतो. जसा आपला आत्मा तशाच प्रकारे सर्वांच्या आत्म्याकडे तो पाहतो त्याला मग परमोच्च शांती प्राप्त होते व म्हणून योग साधणे आवश्यक आहे. मन जेथे भरकटत जाईल तेथून त्याला निग्रहाने आणून त्याचे नियमन केले पाहिजे.

मन हे मोठे चंचल असून त्याला ताब्यात ठेवणे कठीण आहे असे श्रीकृष्णांनी कबूल केले आहे. परंतु अभ्यास आणि देराग्याने त्याला स्वाधीन करता येते. ज्याचे प्रयत्न शिथिल आहेत असा मनुष्यही अनेक जन्मातील अभ्यासाने परमगती प्राप्त करू शकतो. तपस्वी, ज्ञानमा्गी व कर्मनिष्ठांपेक्षा योगी श्रेष्ठ असतो व म्हणून हे अर्जुना, तू योगी बन. समर्पणाच्या बरोबर अंतर्मनाने योगाचे आचरण कर. प्रस्तुत अध्यायात श्रीकृष्णांनी योगाच्या प्राप्तीसाठी अभ्यासाची नितान्त आवश्यकता आहे. या गोष्टीवर अधिक भर दिला आहे.

मूळ सहाव्या अध्यायाची समाप्ती

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥

अर्थ –

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील आत्मसंयमयोग नावाचा हा सहावा अध्याय समाप्त झाला. ॥ ६ ॥

इति श्रीमत्परमहंसपरमानन्दस्य शिष्य स्वामीअडुगड़ानन्दकृते श्रीमद्धगवद्रीतायाः’ यथार्थगीता’ भाष्ये ‘ अभ्यासयोगो’ नाम चष्ठो5ध्याय:।।६॥।

अशा प्रकारे श्रीमत्परमहंस परमानंदजींचे शिष्य स्वामी अडगडानंदकृत श्रीमद्भगवद्‌ गीतेवरील भाष्य यथार्थ गीता यामधील ‘ अभ्यास योग’ या नावाचा सहावा अध्याय समाप्त झाला.

।। हरिः 🕉 तत्सत्‌ ।।

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७१.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment