श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७२

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७२

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७२ –

अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग – श्लोक क्र. ७.०१ ते ७.०४ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७२.

श्री परमात्मने नमः
॥ अथ सऱ्तमोडध्यायः ॥

मागील सर्व अध्यायांमध्ये गीतेमधील मुख्य प्रश्नांबद्दलची चर्चा पूर्ण झाली आहे. निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, कर्म आणि यज्ञाचे स्वरूप व त्याचे क्रियाविधी, योगाचे वास्तव स्वरूप आणि त्याचा होणारा परिणाम, तसेच अवतार, वर्णसंकर, सनातन, आत्मस्थित महापुरुषाने लोकहितासाठी कर्म करावे यावर भर, युद्ध इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा केली गेली आहे. पुढील अध्यायांमध्ये योगेश्वर श्रीकृष्णांनी या विषयांच्या संदर्भात अनेक पूरक असे प्रश्न चर्चेला घेतले आहेत. त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आराधनेला सहाय्यक होतील.

सहाव्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, जो योगी ‘ मद्गतेनान्तरात्मना’ माझ्या ठिकाणी अंतःकरण ठेवून श्रद्धेने मला निरंतर भजतो तो योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो.

श्रीकृष्णांनी या श्लोकात स्वतःच एका प्रश्नाचे बीजारोपण केले आहे की, परमेश्वराच्या ठिकाणी उत्तम प्रकारे अंतःकरण ठेवणे म्हणजे काय? अनेक योगी परमात्म्याला प्राप्त तर करुन घेतात; पण तरीही त्यांना काही तरी खटकत राहते, कशाची तरी उणीव भासत राहते. यत्किंचितही उणीव राहणार नाही अशी उत्तम अवस्था कधी प्राप्त होईल? परमेश्वराची संपूर्ण ओळख केव्हा होईल? म्हणजेच त्यांचे संपूर्ण ज्ञान कधी प्राप्त होईल? ते कधी प्राप्त होते? यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात –

मूळ सातव्या अध्यायाचा प्रारंभ

मूळ श्लोक –

श्रीभगवानुवाच
मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः ।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥ ७-१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), मयि आसक्तमनाः = अनन्य प्रेमाने माझ्या ठिकाणी चित्त आसक्त करून, मदाश्रयः = तसेच अनन्य भावाने मत्परायण होऊन, योगम्‌ = योगामध्ये, युञ्जन्‌ = लागलेला (असा तू), यथा = ज्याप्रमाणे, समग्रम्‌ = सर्व विभूती, बल, ऐश्वर्य इत्यादी गुणांनी युक्त व सर्वांचे आत्मरूप अशा, माम्‌ = मला, असंशयम्‌ = निःसंदेहपणे, ज्ञास्यसि = जाणशील, तत्‌ = ती गोष्ट, शृणु = तू ऐक ॥ ७-१ ॥

अर्थ –

हे पार्था, माझ्या ठिकाणी ज्याचे मन आसक्त झाले आहे असा तू’मदाश्रय:’ माझा आश्रय करून योगाभ्यास करीत कोणत्या प्रकाराने मला पूर्णत्वाने आणि शंका न राहता जाणशील ते ऐक. ते जाणल्यानंतर तुला यत्किंचितही संशय राहणार नाही. यानंतर श्रीकृष्णांनी त्या महान परमात्म्याची-महातत्त्वाची संपूर्ण ओळख-ज्ञान करून दिले आहे.

मूळ श्लोक –

ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः ।
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ॥ ७-२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

ते = तुझ्यासाठी, इदम्‌ = हे, सविज्ञानम्‌ ज्ञानम्‌ = विज्ञानासहित तत्त्वज्ञान, अशेषतः = संपूर्णपणे, अहम्‌ = मी, वक्ष्यामि = सांगेन, यत्‌ = जे, ज्ञात्वा = जाणल्यावर, इह = या संसारात, भूयः = पुन्हा, अन्यत्‌ = दुसरे काहीसुद्धा, ज्ञातव्यम्‌ = जाणून घेण्यास योग्य असे, न अवशिष्यते = उरतच नाही ॥ ७-२ ॥

अर्थ –

मी हे ज्ञान तुला विज्ञानासहित पूर्णत्वाने सांगेन. स्वरूपज्ञानाच्या प्राप्तिकाळात यज्ञ ज्याची सृष्टी करतो, त्या अमृततत्त्वाबरोबर जे प्राप्त होते, त्याचे नाव ज्ञान आहे. परमतत्त्व परमात्म्याला जाणण्याचे नाव ज्ञान आहे. या महापुरुषाला अफाट विश्वात सर्व ठिकाणी कार्य करण्याचे जे सामर्थ्य प्राप्त झालेले असते, त्याला विज्ञान म्हणतात. तो महाप्रभू एकाच वेळेस सर्वाच्या हृदयात कशा प्रकारे कार्य करीत असेल? तो कशा प्रकारे उठतो? कशा प्रकारे बसतो? प्रकृतीच्या दवंद्रातून बाहेर काढून स्वरूपप्राप्ती पर्यतचे अंतर कशा प्रकारे कापून तेथपर्यंत पोहचवतो? या त्याच्या सर्व कार्य प्रणालीचे नाव विज्ञान आहे. हे विज्ञानासहित संपूर्ण ज्ञान मी तुला सांगेन की जे जाणल्यावर ( किंवा ऐकल्या नंतर ) या लोकी आणखी काही जाणण्यासारखे उरत नाही. परंतु हे ज्ञान प्राप्त करून घेणाऱ्यांची संख्या फार कमी आहे.

मूळ श्लोक –

मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः ॥ ७-३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

मनुष्याणाम्‌ सहस्रेषु = हजारो माणसांमध्ये, कश्चित्‌ = कोणीतरी एखादा, सिद्धये = माझ्या प्राप्तीसाठी, यतति = प्रयत्‍न करतो, (च) = आणि, (तेषाम्‌) = त्या, यतताम्‌ = प्रयत्‍न करणाऱ्या, सिद्धानाम्‌ = योग्यांमध्ये, अपि = सुद्धा, कश्चित्‌ = कोणीतरी एखादा (मत्परायण होऊन), माम्‌ = मला, तत्त्वतः = तत्त्वतः म्हणजे यथार्थ रूपाने, वेत्ति = जाणतो ॥ ७-३ ॥

अर्थ –

सहस्त्रावधी मनुष्यांमध्ये एखादाच मनुष्य माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखादाच योगी तत्त्वासहित माझ्या स्वरूपाला जाणतो. परंतु हे तत्त्व कोठे आहे ? एका ठिकाणी ते पिंडरूपाने आहे की सर्वत्र व्यापून राहिलेले आहे ? यावर श्रीकृष्ण म्हणतात –

मूळ श्लोक –

भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ।
अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥ ७-४ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

भूमिः = पृथ्वी, आपः = जल, अनलः = अग्नी, वायुः = वायू, खम्‌ = आकाश, मनः = मन, बुद्धिः = बुद्धी, च = आणि, अहंकार = अहंकार, एव = सुद्धा, इति = याप्रकारे, अष्टधा = आठ प्रकारांनी, भिन्ना = विभाजित असणारी, इयम्‌ = ही, मे = माझी, प्रकृतिः = प्रकृती आहे ॥ ७-४ ॥

अर्थ –

हे अर्जुना, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारांनी माझी प्रकृती विभागलेली आहे. हीच अष्टधा मूळ प्रकृती आहे.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७२.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment