श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७३

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७३

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७३ –

अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग – श्लोक क्र. ७.०५ ते ७.०८ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७३.

मूळ श्लोक –

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम्‌ ।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्‌ ॥ ७-५ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

इयम्‌ = (आठ प्रकारचे भेद असणारी) ही, तु = तर, अपरा = अपरा म्हणजे माझी जड प्रकृती आहे, (च) = आणि, महाबाहो = हे महाबाहो अर्जुना, इतः = हिच्यापेक्षा, अन्याम्‌ = दुसरी की, यया = जिच्यामुळे, इदम्‌ = हे, जगत्‌ = संपूर्ण जग, धार्यते = धारण केले आहे, (सा) = ती, मे = माझी, जीवभूताम्‌ = जीवरूप, पराम्‌ = परा म्हणजे चेतन, प्रकृतिम्‌ = प्रकृती आहे (असे), विद्धि = तू जाण ॥ ७-५ ॥

अर्थ –

हे अर्जुना, ‘ इयम्‌’ म्हणजे आठ प्रकारची माझी ‘ अपरा ‘ म्हणजे जड प्रकृती आहे. महाबाहो अर्जुना, जिच्या योगाने हे सर्व जग धारण केले गेले आहे अशी माझी हिच्याहून दुसरी जीवभूता ‘ परा ‘ प्रकृती म्हणजेच चेतना प्रकृती आहे, असे समज. तोच जीवात्मा आहे. हे आठ प्रकार त्याच्या ठिकाणी असतात व म्हणून तोही प्रकृतीच आहे.

मूळ श्लोक –

एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।
अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥ ७-६ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

सर्वाणि = सर्व, भूतानि = सजीव, एतद्योनीनि = या दोन प्रकारच्या प्रकृतीपासून उत्पन्न होतात, अहम्‌ = मी, कृत्स्नस्य = संपूर्ण, जगतः = जगाची, प्रभवः = उत्पत्ती, तथा = आणि, प्रलयः = प्रलय (म्हणजे सर्व जगाचे मुळ कारण), इति = असे, उपधारय = तू जाण ॥ ७-६ ॥

अर्थ –

अर्जुना, सर्व प्राणिमात्र एतद्योनीनि या महा प्रकृतींपासून म्हणजेच माझ्या परा व अपरा या दोन प्रकृतींपासून उत्पन्न झालेले आहेत, हे तू जाण. या दोन प्रकृती म्हणजे एकमात्र योनी आहेत. म्हणून अखिल जगाचे उत्पत्तिस्थान तसेच विलयस्थान मीच आहे. या सर्व जगाचा आदि व अंत मीच आहे. मीच जगाच्या आदिअंताचे मूळ कारण आहे. जोपर्यंत ही सर्व सृष्टी विद्यमान आहे, तोपर्यंत मीच उत्पत्तिस्थान आहे व जेव्हा एखादा महापुरुष या प्रकृतीच्या पलीकडे जातो तेव्हा महाप्रलय मीच आहे. सृष्टीच्या उत्पत्ती व विलयाच्या प्रश्नाबाबत मनुष्याचे नेहमीच कुतूहल असते. जगातील अनेक शास्त्रांमध्ये याबद्दल विविध गोष्टी प्रचलित आहेत.

कोणाच्या मते प्रलयाच्या वेळी सर्व जग त्यात बुडून जाते; तर कोणाच्या मते सूर्य इतका खाली येतो की त्याच्या उष्णतेने अवघी पृथ्वी जळून जाते. कोणी यालाच कल्पांत असे म्हणतात; त्यांच्या मते या दिवशी सर्वाचा निवाडा केला जातो; तर काही जण नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय असे प्रलयाचे प्रकार मोजण्यात व्यस्त आहेत. परंतु योगेश्वर श्रीकृष्णाच्या अनुसार प्रकृती अनादि आहे. प्रकृतीमध्ये परिवर्तन होत असते; परंतु ती कधी नष्ट झालेली नाही.

भारतीय धर्मग्रंथांच्या मते मनूने प्रलय पाहिला होता. त्याच्यासह अकरा क्रषीनी एका मोठ्या माशाच्या शिंगाला नाव बांधून त्यातून ते हिमालयाच्या एका उत्तुंग शिखरावर गेले होते व तेथे प्रलय ओसरेपर्यंत ते राहिले होते; असे त्या धर्मग्रंथात म्हंटले आहे. श्रीकृष्णांचे उपदेश व त्यांच्या जीवनसंबंधी ज्यामध्ये वर्णन आहे त्या भागवतामध्ये मृकण्डु मुनींचे पुत्र मारकण्डेय यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या प्रलयाचे वर्णन दिलेले आहे. ते हिमालयाच्या उत्तरेस पुष्पभद्रा नदीच्या किनारी राहत होते.

भागवताच्या बाराव्या स्कंधातील आठव्या व नवव्या अध्यायात शोनकादि क्रषीनी सूतजीना विचारले आहे की, मार्कण्डेय मुनींनी महाप्रलयामध्ये वडाच्या एका पानावर बाल मुकुंदाचे दर्शन घेतले होते असे म्हटले जाते; पण ते तर आमच्याच वंशातील होते व आमच्यापेक्षा काही वर्षच ते आधी होऊन गेलेले आहेत. त्यांच्या जन्मानंतर ना प्रलय झाला आहे ना सृष्टी डुबली आहे. सर्व काही यथास्थित आहे. मग त्यांनी कोणता प्रलय पाहिला?

यावर सूतजींनी सांगितले की मार्कण्डेय मुनींच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन नरनारायणाने त्यांना दर्शन दिले. तेव्हा मार्कण्डेय मुनींनी भगवंताला प्रार्थना केली की आपली ती माया मी पाहू इच्छित आहे की जिच्यामुळे प्रेरित होऊन हा आत्मा अनंत: योनीमध्ये भ्रमण करीत राहतो. भगवंताने ते कबूल केले व एक दिवस जेव्हा मार्कण्डेय आपल्या आश्रमात भगवतचिंतनात तन्मय झाले होते तेव्हा त्यांना दिसले की, चारी बाजूंनी समुद्र उफाळत होता. त्यात मोठ मोठ्या ‘ मगरी ‘ दिसत होत्या. स्वत: मार्कण्डेय त्या क्रोधित मगरीच्या कचाट्यात सापडले होते व आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत होते. आकाश, सूर्य, पृथ्वी, चंद्र, स्वर्ग, ज्योतिष-मंडल हे सर्व त्या समुद्रात बुडून गेले. इतक्यात मार्कण्डेय मुनींना एक वडाचे झाड आणि त्याच्या पानावर बाल मुकुंदाचे दर्शन झाले. नंतर त्याच्या श्वासाबरोबर मार्कण्डेय मुनी त्याच्या पोटात गेले आणि आपला आश्रम, सूर्यमंडलासहित सृष्टी सजीव झालेली तेथे दिसली.

त्यानंतर त्याच्या श्वासाबरोबर ते त्या शिशुच्या उदरातून बाहेर आले. त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मार्कण्डेय मुनींनी स्वत:ला आश्रमात आसनावर बसलेल्या अवस्थेत पाहिले. याचा अर्थ अनेक वर्षाच्या तपस्येनंतर मार्कण्डेय मुनींनी ते ईश्वरीय दूश्य आपल्या हृदयात पाहिले, त्याचा अनुभव घेतला. त्यावेळी बाह्य जग मात्र तसेच्यातसे – यथास्थित होते. तेव्हा प्रलय म्हणजे योग्याच्या हृदयात ईश्वराशी मीलन घडवून आणणारी एक दिव्य अनुभूती आहे. आराधनेच्या पूर्तीकाळात योग्याच्या हृदयात संसाराचा प्रवाह नाहिसा होतो व अव्यक्त परमात्मा तेथे प्रकट होतो. हाच प्रलय होय. म्हणजे प्रलय हा बाहेर असत नाही. तर शरीराच्या आत वसत असणाऱ्या हृदयात तो असतो. हा प्रलय म्हणजे अद्वैताची अनिर्वचनीय स्थिती आहे. ही एक क्रियाशील अनुभूती आहे. केवळ बुद्धीने निर्णय घेणारे भ्रम निर्माण करतात. मग तेथे आम्ही असो की तुम्ही! तेथे भ्रमच निर्माण होतो. हीच गोष्ट पुढे स्पष्ट करताना श्रीकृष्ण म्हणतात –

मूळ श्लोक –

मत्तः परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनञ्जय ।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥ ७-७ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

धनञ्जय = हे धनंजया (अर्जुना), मत्तः = माझ्यापेक्षा, अन्यत्‌ = दुसरे, किञ्चित्‌ = कोणतेही, परतरम्‌ = परम कारण, न अस्ति = नाही, सूत्रे = सुतातील, मणिगणाः इव = (सुताच्या) मण्यांप्रमाणे, इदम्‌ = हे, सर्वम्‌ = संपूर्ण (जग), मयि = माझ्यामध्ये, प्रोतम्‌ = गुंफलेले आहे ॥ ७-७ ॥

अर्थ –

हे धनंजया, माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही. हे सर्व जग दोऱ्यात ओविलेल्या मण्यांप्रमाणे माझ्या ठायी ओविलेले आहे. हे खरे असले तरी त्याला जाणायचे कधी? या अध्यायाच्या पहिल्या श्लोकानुसार जेव्हा साधक

अनन्य भक्तीने युक्त होऊन माझ्या, भगवंताच्या ठिकाणी परायण होतो, आसक्त होतो तेव्हाच ईश्वराचे दर्शन घडते. योगामध्ये आसक्त झाले पाहिजे, त्याशिवाय ईश्वराचे दर्शन अप्राप्य आहे.

मूळ श्लोक –

रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः ।
प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥ ७-८ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, अहम्‌ = मी, अप्सु = पाण्यामध्ये, रसः = रस (आहे), शशिसूर्ययोः = चंद्र व सूर्य यांमध्ये, प्रभा = प्रकाश, अस्मि = आहे, सर्ववेदेषु = सर्व वेदांमध्ये, प्रणवः = ओंकार, खे = आकाशात, शब्दः = शब्द, (च) = (आणि), नृषु = पुरुषांमध्ये, पौरुषम्‌ = पुरुषत्व (मी आहे) ॥ ७-८ ॥

अर्थ –

हे कुंतीपुत्र अर्जुना, उदकातील रस मी आहे. चंद्र-सूर्यामधील प्रभा मी आहे, सर्व वेदांमधील ओंकार मी आहे, ( ओ  अहं  कार ) स्वतःचा आकार मी आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषामधील पौरुष-पराक्रम मीच आहे.

क्रमशः

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment