श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७४

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७४

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७४ –

अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग – श्लोक क्र. ७.०९ ते ७.१२ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७४ –

मूळ श्लोक

पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेचश्चास्मि विभावसौ ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥ ७-९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

पृथिव्याम्‌ = पृथ्वीमध्ये, पुण्यः = पवित्र, गन्धः = गंध, च = आणि, विभावसौ = अग्नीमध्ये, तेजः = तेज, अस्मि = मी आहे, च = तसेच, सर्वभूतेषु = सर्व सजीवांमध्ये, जीवनम्‌ = त्यांचे जीवन (मी आहे), च = आणि, तपस्विषु = तपस्व्यांमध्ये, तपः = तप, अस्मि = (मी) आहे. ॥ ७-९ ॥

अर्थ

पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीमधील तेज मी आहे. सर्व प्राणिमात्रांचे जीवन आणि तपस्व्यांचे तप मी आहे.

मूळ श्लोक

बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम्‌ ।
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्‌ ॥ ७-१० ॥

संदर्भित अन्वयार्थ

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), सर्वभूतानाम्‌ = सर्व सजीवांचे, सनातनम्‌ = सनातन, बीजम्‌ = बीज, माम्‌ = मीच आहे असे, विद्धि = तू जाण, बुद्धिमताम्‌ = बुद्धिमानांची, बुद्धिः = बुद्धी, (च) = आणि, तेजस्विनाम्‌ = तेजस्व्यांचे, तेजः = तेज, अहम्‌ = मी, अस्मि = आहे ॥ ७-१० ॥

अर्थ

हे पार्था, सर्व प्राणिमात्रांचे शाश्वत व अनादि बीज-कारण मीच आहे, असे जाण. बुध्दिमंतांची बुद्धी मी आहे व तेजस्वी लोकांचे तेजही मीच आहे. याच क्रमात ते पुढे सांगत आहेत.

मूळ श्लोक

बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम्‌ ।
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥ ७-११ ॥

संदर्भित अन्वयार्थ

भरतर्षभ = हे भरतश्रेष्ठा (अर्जुना), बलवताम्‌ = बलवानांचे, कामरागविवर्जितम्‌ = आसक्ती व कामना यांनी रहित असे, बलम्‌ = बल म्हणजे सामर्थ्य, च = आणि, भूतेषु = सर्व सजीवांमध्ये, धर्माविरुद्धः = धर्माला अनुकूल म्हणजे शास्त्राला अनुकूल, कामः = कामना, अहम्‌ = मी, अस्मि = आहे ॥ ७-११ ॥

अर्थ

काम आणि राग ( आसक्ती ) या दोहोंनी विरहित असे बलवंताचे बल मी आहे. या जगात अनेक जण बलवान बनत असतात. कोणी दंड-बैठका काढतात, कोणी परमाणू जमवतात परंतु श्रीकृष्ण म्हणतात, काम आणि राग यांनी विरहित असलेले, त्यांच्या पलीकडे असणारे बल मी आहे आणि तेच वास्तव बल आहे. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी धर्माला अनुसरून असणारा काम मी आहे. परब्रह्म परमात्माच एकमेव धर्म आहे. त्याने अखिल विश्व धारण केलेले आहे. तोच शाश्वत आत्मा आहे, तोच धर्म आहे. त्या धर्माच्या विरुद्ध न जाणारी जी इच्छा ती मी आहे. तोच धर्म आहे. पुढे श्रीकृष्ण अजुर्नाला म्हणाले की, हे अर्जुना, माझ्या प्राप्तीची तू इच्छा कर. एरव्ही साधकाला सर्व कामना वर्ज्य आहेत; परंतु परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची इच्छा अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही कर्मयोगामध्ये प्रवृत्तव होणार नाही. ही इच्छादेखील माझीच देणगी आहे.

मूळ श्लोक

ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये ।
मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥ ७-१२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

च एव = आणखी, ये = जे, सात्त्विकाः = सत्त्वगुणापासून उत्पन्न होणारे, भावाः = भाव आहेत, ये = जे, राजसाः = रजोगुणापासून उत्पन्न होणारे, च = आणि, तामसाः = तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव आहेत, तान्‌ = ते सर्व, मत्तः एव = माझ्यापासूनच होणारे आहेत, इति = असे, विद्धि = तू जाण, तु = परंतु (वास्तविक पाहाता), तेषु = त्यांमध्ये, अहम्‌ = मी, ते = (आणि) ते, मयि = माझ्यामध्ये, (न) = नाहीत ॥ ७-१२ ॥

अर्थ

तसाच तो सत्त्वगुणापासून उत्पन्न झालेला भाव आहे, तसेच रजोगुण व तमोगुणापासून उत्पन्न झालेला भाव आहे ते सर्व भाव माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत, असे तू जाण. परंतु मी त्यांच्यात किंवा ते माझ्यात नाहीत, कारण नामी त्यांच्यामध्ये गुंतलो गेलो आहे, ना ते भाव माझ्या ठिकाणी! ते माझ्या ठिकाणी प्रवेश करु शकत नाहीत, कारण मला कर्माची स्पृहा-इच्छा कधीच नसते व ते भावही माझ्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाहीत. मी निर्लेप आहे. मला त्यांच्याकडून काहीही प्राप्त करावयाचे नाही व म्हणून ते माझ्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाहीत. ज्याप्रमाणे शरीरात आत्मा असेल तरच शरीराला तहान-भूक लागत असते; परंतु आत्म्याला अन्न अथवा जलाचे काहीच प्रयोजन नसते. त्याच प्रकारे प्रकृती परमात्म्याच्या उपस्थितीतच आपले कार्य करु शकते; परंतु परमात्मा तिच्या गुणांपासून, कार्यापासून अलिप्त असतो.

क्रमशःश्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७४.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment