श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७५

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७५

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७५ –

अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग – श्लोक क्र. ७.१३ ते ७.१६ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७५.

मूळ श्लोक

त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत्‌ ।
मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्‌ ॥ ७-१३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

गुणमयैः = गुणांचे कार्यरूप अशा सात्त्विक, राजस व तामस अशा, एभिः = या, त्रिभिः = तीन प्रकारच्या, भावैः = भावांनी, इदम्‌ = हा, सर्वम्‌ = संपूर्ण, जगत्‌ = संसारातील सजीवसमुदाय, मोहितम्‌ = मोहित होत आहे, (अतः) = म्हणून, एभ्यः = या तीन गुणांच्या, परम्‌ = पलीकडे असणाऱ्या, अव्ययम्‌ = अविनाशी अशा, माम्‌ = मला (तो सजीवसमुदाय), न अभिजानाति = जाणत नाही ॥ ७-१३ ॥

अर्थ

सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणात्मक भावांनी, मायेने, या जगाला भुरळ पाडली आहे. त्यामुळे या तीन गुणांच्या पलीकडे असणारा निर्गुण व अविनाशी असो जो मी, त्याला लोक जाणत नाहीत. मी या तीन गुणांच्या पलीकडे असणारा आहे. त्यामुळे या गुणांपैकी अंशमात्रही गुण शिल्लक असेल, वसत असेल तर तो साधक मला जाणत नाही. त्याला माझ्याप्रत येण्यासाठी अजून मार्ग आक्रमावा लागणार आहे. तो अजून परमात्ममार्गावरील पथिक आहे.

मूळ श्लोक

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥ ७-१४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

हि = कारण, दैवी = अलौकिक म्हणजे अतिशय अद्भुत, गुणमयी = त्रिगुणमयी अशी, एषा = ही, मम = माझी, माया = माया, दुरत्यया = तरून जाण्यास फार कठीण आहे, (तथापि) = तथापि, ये = जे पुरुष, माम्‌ एव = केवळ मलाच, प्रपद्यन्ते = भजतात म्हणजे शरण येतात, ते = ते, एताम्‌ = या, मायाम्‌ = मायेचे, तरन्ति = उल्लंघन करून जातात अर्थात संसारातून तरून जातात ॥ ७-१४ ॥

अर्थ

ही माझी त्रिगुणातीत अदभुत अशी माया पार करणे अत्यंत दुस्तर आहे, अत्यंत कठीण आहे. परंतु जे साधक मला निरंतर भजतात, मला शरण येतात, तेच ह्या मायेला पार करू शकतात, तेच ह्या मायेला तरून जातात. ही माया दैवी असली तरी अगरबत्ती लावून तिची पूजा करत बसू नका. तिला पार करण्याचा प्रयत्न करा.

मूळ श्लोक

न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः ।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥ ७-१५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

मायया = मायेच्या द्वारे, अपहृतज्ञानाः = ज्यांचे ज्ञान हरण केले गेले आहे, आसुरम्‌ भावम्‌ = आसुर भाव, आश्रिताः = धारण करणारे, नराधमाः = पुरुषांमध्ये नीच, दुष्कृतिनः = दूषित कर्म करणारे, मूढाः = असे मूढ लोक, माम्‌ = माझे, न प्रपद्यन्ते = भजन करीत नाहीत ॥ ७-१५ ॥

अर्थ

जे मला निरंतर भजतात, तेच मला जाणत असतात. परंतु तरीही लोक मला शरण येत नाहीत. मायेमुळे ज्यांचे ज्ञान नष्ट झाले आहे, त्यामुळे ज्यांनी आसुरी मार्गाचा अवलंब केला आहे असे अधम, कामक्रोधांनी युक्त असणारे मूढ लोक मला भजत नाहीत. मग मला कोण भजते ?

मूळ श्लोक

चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन ।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥ ७-१६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

भरतर्षभ अर्जुन = हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, सुकृतिनः = उत्तम कर्म करणारे, अर्थार्थी = अर्थार्थी, आर्तः = आर्त, जिज्ञासुः = जिज्ञासू, च = आणि, ज्ञानी = ज्ञानी (असे), चतुर्विधाः = चार प्रकारचे, जनाः = भक्तजन, माम्‌ = मला, भजन्ते = भजतात ॥ ७-१६ ॥

अर्थ

हे भरत श्रेष्ठ अर्जुना, ‘सुकृतिनः ‘ नियत कर्म करणारे ( ज्यामुळे श्रेयाची प्राप्ती होते ), अर्थार्थी म्हणजे द्रव्याची इच्छा करणारे, आर्त: म्हणजे दुःखापासून मुक्त होण्याची इच्छा करणारे ‘ जिज्ञासू’ म्हणजे परमेश्वराला जाणण्याची इच्छा करणारे आणि ज्ञानी’ म्हणजे ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले आहे असे चार प्रकारचे भक्तजन मला भजतात.

‘ अर्थ ‘ म्हणजे द्रव्य ही अशी वस्तू आहे की ज्यामुळे आमच्या शरीराच्या किंवा तत्संबंधी गोष्टींची-गरजांची पूर्ती होत असते. त्यामुळे द्रव्याची इच्छा प्रथम ईश्वराकडूनच पूर्ण होत असते. श्रीकृष्ण म्हणतात की मीच ही इच्छा पूर्ण करतो. परंतु एवढाच त्याचा वास्तविक ‘ अर्थ ‘ नाही. आत्मिक संपत्ती ही स्थिर संपत्ती आहे- हा त्याचा अर्थ आहे.

सांसारिक ‘ अर्था ‘ ची पूर्ती करीत करीत भगवंत भक्ताला आत्मिक संपत्तीकडे आकर्षित करतात. कारण त्यांना माहित आहे की केवळ ह्या बाह्य संपत्तीने माझा भक्त सुखी होणार नाही व म्हणून ते त्याचे मन आत्मिक संपत्तीकडे लावून देतात. आपल्या भक्ताच्या सुखासाठी अशा प्रकारे भगवंत त्याला आत्मिक संपत्तीही देतात. लोक लाहु परलोक निबाहू’ या लोकी लाभ आणि परलोकात निर्वाह या दोन्ही गोष्टी भगवंताच्या आहेत. भगवंत आपल्या भक्ताला कधीही रिक्त ठेवीत नाहीत.

‘ आर्त ‘ म्हणजे जे दुःखी आहेत ते. ते दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवंताला भजतातच. तिसरा ‘ जिज्ञासू ‘! माझे स्वरूप समग्रपणे जाणण्याची इच्छा करणारा तो जिज्ञासू मला भजतो; आणि ज्यांची साधना परिपक्व झालेली आहे, ज्यांनी भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन आत्मज्ञान प्राप्त केले ते ज्ञानीही मला भजतात. अशा प्रकारे चार प्रकारचे लोक मला भजत असतात. त्यामध्ये ज्ञानी श्रेष्ठ आहे. अर्थात ज्ञानी पण माझा भक्तच असतो.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७५.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment