श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७६

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७६

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७६ –

अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग – श्लोक क्र. ७.१७ ते ७.२०

मूळ श्लोक –

तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥ ७-१७ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

तेषाम्‌ = त्यांपैकी, नित्ययुक्तः = नेहमी माझ्या ठिकाणी एकीभावाने राहाणारा, एकभक्तिः = अनन्य प्रेम असणारा, ज्ञानी = ज्ञानी भक्त, विशिष्यते = अतिशय उत्तम आहे, हि = कारण, ज्ञानिनः = (तत्त्वतः मला जाणणाऱ्या) ज्ञानीला, अहम्‌ = मी, अत्यर्थम्‌ = अत्यंत, प्रियः = प्रिय आहे, च = आणि, सः = तो ज्ञानी, मम = मला, प्रियः = अत्यंत प्रिय आहे ॥ ७-१७ ॥

अर्थ –

हे अर्जुना, त्या चार भक्तांमध्ये जो नित्य माझ्यामध्ये स्थित असतो, जो मद्रूप होऊन माझी अनन्य भक्ती करतो तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण साक्षात्कारामुळे माझे स्वरूप तो जाणत असल्याने त्या ज्ञानी भक्ताला मी अत्यंत प्रिय असतो आणि मलाही तो अत्यंत प्रिय असतो. तो ज्ञानी म्हणजे माझेच स्वरूप आहे.

मूळ श्लोक –

उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम्‌ ।
आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्‌ ॥ ७-१८ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

एते = हे, सर्वे एव = सर्वच, उदाराः = उदार आहेत, तु = परंतु, ज्ञानी = ज्ञानी (हा तर साक्षात्‌), आत्मा एव = माझे स्वरूपच आहे असे, मे मतम्‌ = माझे मत आहे, हि = कारण, सः = तो, युक्तात्मा = माझ्या ठिकाणी मन व बुद्धी असणारा असा (ज्ञानी भक्त), अनुत्तमाम्‌ = अतिशय उत्तम, गतिम्‌ = गति-स्वरूप अशा, माम्‌ एव = माझ्या ठिकाणीच, आस्थितः = चांगल्याप्रकारे स्थित असतो ॥ ७-१८ ॥

अर्थ –

वास्तविक चारी प्रकारचे भक्त उत्कृष्ट आहेत. ते उदार आहेत ( त्यांनी कोणती उदारता दाखवली? भगवंताची भक्ती केल्याने भगवंताला काही प्राप्त होते का? की भगवंतामध्ये काही उणीव आहे, जी या भक्तांनी पूर्ण केली ? नाही. उदारचा असा अर्थ नाही. तर आपल्या आत्म्याला अधोगतीला जाऊन देता त्याचा विकास करण्यात, त्याचा उद्धार करण्यात जे अग्रेसर असतात, ते.

या अर्थाने इथे त्या चार भक्तांना उदार म्हंटले आहे ). परंतु ज्ञानी तर केवळ माझेच स्वरूप आहे, तो माझा आत्माच आहे, असे मला वाटते. कारण स्थिरबुद्धी असणारा तो सर्वोत्तम, गतिस्वरूप अशा माझ्यामध्ये स्थिर झालेला आहे. अर्थात तो ज्ञानी म्हणजे मीच आहे व तो माझ्यामध्ये आहे. माझ्यात व त्याच्यात काहीही अंतर नाही. यावरच भर देत ते पुढे म्हणतात –

मूळ श्लोक –

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥ ७-१९ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

बहूनाम्‌ = पुष्कळ, जन्मनाम्‌ = जन्मांच्या, अन्ते = शेवटच्या जन्मात, ज्ञानवान्‌ = तत्त्वज्ञान प्राप्त करून घेतलेला पुरुष, सर्वम्‌ = सर्व काही, वासुदेवः = वासुदेवच आहे, इति = या प्रकारे, माम्‌ = मला, प्रपद्यते = भजतो, सः = तो, महात्मा = महात्मा, सुदुर्लभः = अत्यंत दुर्लभ आहे ॥ ७-१९ ॥

अर्थ –

अभ्यास करता करता अनेक जन्मांच्या शेवटच्या जन्मामध्ये म्हणजे ज्या जीवनात ईश्वराची प्राप्ती होणार असते त्या जन्मात ईश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतर’ हे सर्व विश्व वासुदेव होय ‘ असे ज्ञान प्राप्त होऊन तो ज्ञानी माझी उपासना करतो, तो मला येऊन मिळतो. तथापि असे जाणणारा महात्मा दुर्लभ आहे. हा ज्ञानी वासुदेवाचा फोटो करून किंवा मूर्ती बनवून तिची उपासना करीत नाही तर तो वासुदेवाला स्वतःच्या हृदयात पाहत असतो व त्याला भजत असतो. अशा या ज्ञानी महात्म्याला श्रीकृष्ण तत्त्वदर्शी असेही म्हणतात. अशा महापुरूषांमुळेच समाजाचे कल्याण होते. अशा प्रकारचे तत्त्वदर्शी महापुरूष अत्यंत दुर्लभ असतात, असे श्रीकृष्ण म्हणतात.

जेव्हा श्रेय व प्रेय म्हणजे मुक्ती आणि भोग दोन्ही परमेश्वराला मिळतात, तेव्हा सर्वानी खरोखर भगवंताचे भजन केले पाहिजे. त्याची उपासना केली पाहिजे. परंतु लोक तसे करीत नाहीत. असे का? श्रीकृष्ण म्हणतात –

मूळ श्लोक –

कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः ।
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥ ७-२० ॥

संदर्भित अन्वयार्थ –

तैः तैः = त्या त्या, कामैः = भोगांच्या इच्छेद्वारे, हृतज्ञानाः = ज्यांचे ज्ञान हरण केले गेले आहे (ते लोक), स्वया = आपल्या, प्रकृत्या = स्वभावाने, नियताः = प्रेरित होऊन, तम्‌ तम्‌ = त्या त्या, नियमम्‌ = नियमांचा, आस्थाय = अंगीकार करून, अन्यदेवताः = अन्य देवतांना, प्रपद्यन्ते = भजतात म्हणजे पुजतात ॥ ७-२० ॥

अर्थ –

तो तत्त्वद्शी महात्मा अथवा परमात्माच सर्व काही आहे ही गोष्ट लोक समजू शकत नाहीत. कारण वासनांच्या अभिलाषेमुळे त्यांची विवेकबुद्धी नष्ट झालेली आहे. त्यामुळे आपल्या जन्मजात प्रकृतीप्रमाणे म्हणजेच जन्म-जन्मांतरीच्या संस्कारांमुळे प्राप्त झालेल्या स्वभावाप्रमाणे माझ्याहून अन्य अशा देवतांचा आणि त्यांच्यासाठी प्रचलित असणाऱ्या नियमांचा -त्रतांचा ते आश्रय घेतात. या श्लोकात अन्य देवतांबद्दल प्रथमच उल्लेख आलेला आहे.

क्रमशः

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment