श्रीमद् भगवद् गीता भाग ७७ –
अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग – श्लोक क्र. ७.२१ ते ७.२४
मूळ श्लोक
यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥ ७-२१ ॥
संदर्भित अन्वयार्थ
यः यः = जो जो, भक्तः = सकाम भक्त, याम् याम् = ज्या ज्या, तनुम् = देवतांच्या स्वरूपांची, श्रद्धया = श्रद्धेने, अर्चितुम् = पूजन करण्याची, इच्छति = इच्छा करतो, तस्य तस्य = त्या त्या भक्तांच्या, श्रद्धाम् = श्रद्धेला, ताम् एव = त्या देवतेच्या बाबतीतच, अहम् = मी, अचलाम् = स्थिर, विदधामि = करतो ॥ ७-२१ ॥
अर्थ
सकाम हेतूने उपासना करणारा जो जो भक्त ज्या ज्या देवतेची श्रद्धापूर्वक उपासना करू इच्छितो, त्या त्या भक्ताची त्या त्या देवतेवरील श्रद्धा मी स्थिर करतो. मीच स्थिर करतो कारण देवता नावाची दुसरी कोणती वस्तू असती तर तिनेच भक्ताची श्रद्धा स्थिर केली असती. परंतु त्या देवतांविषयी भक्तांची भिन्न भिन्न समजूत असते. सर्व देवदेवतांमध्ये मीच भरलेला असतो, ही गोष्ट त्या भक्तांनी जाणलेली नसते.
मूळ श्लोक
स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।
लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ॥ ७-२२ ॥
संदर्भित अन्वयार्थ
सः = तो पुरुष, तया = त्या, श्रद्धया = श्रद्धेने, युक्तः = युक्त होऊन, तस्य = त्या देवतेचे, आराधनम् = पूजन, ईहते = करतो, च = आणि, ततः = त्या देवतेपासून, मया एव = माझ्याद्वारेच, विहितान् = विधान केले गेलेले, तान् = ते, कामान् = इष्ट भोग, हि = निःसंदेहपणे, (सः) = तो, लभते = प्राप्त करून घेतो ॥ ७-२२ ॥
अर्थ
तो पुरुष श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेची उपासना करतो आणि त्या देवतेच्या माध्यमातून मग मीच निर्माण केलेली फळ त्याला प्राप्त होतात. ते इच्छित फळ त्यांना कोण देते? मीच देत असतो. आणि ते त्यांच्या श्रध्देचे फळ असते. ते कोणत्याही देवतेने दिलेली भेट किंवा फळ नसते. अर्थात तो कोणत्याही देवतेला भजून इच्छिलेले फळ तर प्राप्त करुन घेतो. मग त्यात वाईट काय आहे? यावर श्रीकृष्ण म्हणतात
मूळ श्लोक
अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् ।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥ ७-२३ ॥
संदर्भित अन्वयार्थ
तु = परंतु, तेषाम् = त्या, अल्पमेधसाम् = अल्पबुद्धी असणाऱ्या माणसांचे, तत् = ते, फलम् = फळ, अन्तवत् = नाशवंत, भवति = असते तसेच, देवयजः = ते देवांचे पूजक, देवान् = देवतांना, यान्ति = प्राप्त करून घेतात, (च) = परंतु, मद्भक्ताः = माझे भक्त (ते कसेही भजोत, अंती ते), माम् अपि = मलाच, यान्ति = प्राप्त करून घेतात ॥ ७-२३ ॥
अर्थ –
परंतु त्या अल्पबुध्दी असणार्या लोकांना मिळणारे फळ हे अल्प काळ टिकणारे, म्हणजे नाशवंत असते. आज ते फळ आहे; पण ते भोगता भोगता नष्ट होते म्हणून ते नाशवंत आहे. जे लोक देवतांची उपासना करतात ते त्या देवतांप्रत पोहचतात; तथापि या देवतांही नाशवंत असतात. अर्जुना, या देवतांसह यावन्मात्र जग परिवर्तनशील व मर्त्य आहे. तथापि परमतत्त्व मात्र शाश्वत तत्त्व आहे. जे भक्त मला भजतात, ते मजप्रत येतात म्हणजेच परमतत्त्व प्राप्त करतात जे अव्यक्त आहे, ‘नैष्ठिकीम परमशान्ति’ ते प्राप्त करतात.
तिसऱ्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितले की, या यज्ञाद्वारा तुम्ही देवतांची म्हणजेच दैवी संपदेची उन्नती करा. जसजशी दैवी संपदेची उन्नती होईल, तसतशी तुमचीही उन्नती होईल, क्रमश: उन्नती करत करत परम श्रेयाची प्राप्ती करून घ्या. इथे देवता त्या देवी सम्पदेचा समूह आहे की, जिच्यापासून परमदेव परमात्म्याचे देवत्त्व प्राप्त केले जाते. दैवी संपदा मोक्षासाठी असते. या संपदेच्या चोवीस लक्षणांचे निरूपण गीतेतील सोळाव्या अध्यायात केलेले आहे.
हृदयाच्या अंतरंगातील परमदेव परमात्म्याचे देवत्त्व प्राप्त करुन देणाऱ्या सद्गुणाचे नाव ‘ देवता ‘ असे आहे. म्हणजे ‘ देवता ‘ या अंतरंगात वास करणाऱ्या असतात, परंतु कालांतराने लोकांनी आतील वस्तूचे बाहेर प्रदर्शन करण्यास सुरुवात केली. देवतांच्या मूर्ती बनवल्या, कर्मकांड रचले आणि वास्तवतेपासून दूर उभे राहिले. श्रीकृष्णांनी वरील चार लोकांमध्ये या भ्रांतीचे निराकरण केले आहे. भ्रमनिरास केला आहे. गीतेमध्ये पहिल्यांदा ‘ अन्य देवतांचा’ उल्लेख करुन त्यांनी सांगितले की, देवतांचे बाह्य अस्तित्व असतच नाही.
लोकांची श्रध्दा जिकडे झुकते तिथे मी उभा राहतो आणि त्यांची श्रध्दा दूढ करुन मीच त्यांच्या श्रध्देचे फळ त्यांना देतो. ते फलही अल्पकाळ टिकणारेच असते. त्यामुळे अल्पकाळात फळ नष्ट होते, देवता नष्ट होतात आणि त्या देवतांची उपासना करणारा ही नष्ट होतो. ज्यांचा विवेक भ्रष्ट झाला आहे, ते मूढबुद्धीचे लोकच अन्य देवतांची पूजा करतात. श्रीकृष्ण नवव्या अध्यायात तर म्हणतात की, अन्य देवतांचे पूजन करणे हेच अयोग्य आहे. ( ९/२३ )
मूळ श्लोक –
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ ७-२४ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
मम = माझा, अनुत्तमम् = सर्वश्रेष्ठ, अव्ययम् = अविनाशी, परम् भावम् = परम भाव, अजानन्तः = न जाणणारे, अबुद्धयः = बुद्धिविहीन पुरुष, अव्यक्तम् = मन व इंद्रियांच्या अतीत असा, माम् = मी सच्चिदानंदघन परमात्मा, व्यक्तिम् = माणसाप्रमाणे जन्म घेऊन व्यक्तिभावाप्रत, आपन्नम् = प्राप्त झालो आहे, (इति) = असे, मन्यन्ते = मानतात ॥ ७-२४ ॥
अर्थ –
देवतांचे बाह्य जगतात कोठे अस्तित्व नसताना देवतांच्या नावावर जे ‘फळ मिळते ते नाशवंत असते. तरीही सर्व लोक माझी उपासना करीत नाहीत. कारण बुद्धिहीन पुरुष ( वासनांच्या अभिलाषेमुळे ज्यांचे ज्ञान भ्रष्ट झाले आहे असे लोक ) सर्वोत्तम, अविनाशी आणि परमप्रभावी अशा मला चांगल्या प्रकारे जाणत नाहीत. त्यामुळे अव्यक्त दशेतून व्यक्त अशा स्वरुपात मी प्रकट झालो आहे असे ते समजतात. अर्थात श्रीकृष्णही मनुष्य म्हणजे शरीरधारी योगी होते. योगेश्वर होते. जे स्वतः योगी आहेत आणि दुसऱ्यांना योगप्रदान करण्याची क्षमता ज्यांच्यात आहे, त्यांना योगेश्वर म्हणतात.
योग्य प्रकारे साधना करीत स्वतःचा क्रमश: विकास करीत करीत, महापुरुषही त्या ‘परमभावामध्ये स्थिर होतात. तरी देखील वासनांनी विवश झालेले मंद बुद्धीचे लोक त्याला सामान्य समजतात. त्यांना असे वाटते की, माझ्याप्रमाणे तर तो जन्माला आला आहे, मग तो भगवान कसा असू शकेल? अर्थात, त्या बिचार्यांचा काय दोष? डोळे उघडताच शरीर तर दिसते. परंतु ते महापुरुषांचे बाह्य स्वरूप पाहतात. ते त्याचे वास्तविक स्वरूप का पाहू शकत नाहीत? यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात.
क्रमशः
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.