श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७८

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७८

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७८ –

अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग – श्लोक क्र. ७.२५ ते ७.२८ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७८.

मूळ श्लोक –

नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः ।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्‌ ॥ ७-२५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

योगमायासमावृतः = आपल्या योगमायेने झाकलेला, अहम्‌ = मी, सर्वस्य = सर्वांना, प्रकाशः न = प्रत्यक्ष होत नाही, (अतः) = म्हणून, मूढः = अज्ञानी, लोकः = जनसमुदाय, अयम्‌ = हा, अजम्‌ = जन्मरहित, अव्ययम्‌ = अविनाशी परमेश्वर असे, माम्‌ = मला, न अभिजानाति = जाणत नाही (म्हणजे मी जन्मणारा व मरणारा आहे, असे समजतो) ॥ ७-२५ ॥

अर्थ –

ज्या मायेमुळे परमात्मा झाकला गेला आहे, ती माया सामान्य मनुष्याला पडद्याप्रमाणे असते. सामान्य मनुष्य तिलाच योग-साधना समजून तीमध्ये प्रवृत्त होतो. यानंतर योगमायेचे म्हणजे योगक्रियेचेही एक आवरण असते.

योगाचे अनुष्ठान करत करत साधकाला जेव्हा योगरूढता प्राप्त होते, तेव्हा मायेने झाकला गेलेल्या त्या परमात्म्याला तो जाणतो. योगेश्वर म्हणतात की मी आपल्या योगमायेने झाकलेलो आहे. ज्यांनी योगरुढता प्राप्त केली आहे असे योगीच मला यथार्थपणे पाहू शकतात. मी सर्वाना दिसू शकत नाही व म्हणूनच अज्ञानी मनुष्य जन्मरहित ( ज्याला जन्म घ्यायचा नसतो ), अविनाशी ( ज्याचा नाश होत नाही ), अव्यक्त ( ज्याला पुन्हा व्यक्‍त व्हायचे नसते )

असे मला जाणत नाही. अर्जुन सुध्दा श्रीकृष्णाला आपल्याप्रमाणेच मनुष्य समजत होता; परंतु जेव्हा श्रीकृष्णांनी त्याला दिव्य दृष्टी दिली तेव्हा तो प्रार्थना करू लागला, क्षमेची याचना करू लागला, करुणा भाकू लागला; खरोखर आमच्या डोळयावर मायेचे झापड असल्याने, मायेमुळे आम्ही आंधळे बनल्यामुळे अव्यक्त अशा महापुरुषाला आम्ही ओळखू शकत नाही. श्रीकृष्ण

पुढे म्हणतात

मूळ श्लोक –

वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ ७-२६ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अर्जुन = हे अर्जुना, समतीतानि = पूर्वी होऊन गेलेले, च = आणि, वर्तमानानि = वर्तमानकाळी असणारे, च = तसेच, भविष्याणि = भविष्यकाळी होणारे, भूतानि = सर्व सजीव, अहम्‌ = मी, वेद = जाणतो, तु = परंतु, कश्चन = कोणीही (श्रद्धा व भक्ती यांनी रहित असा पुरुष), माम्‌ = मला, न वेद = जाणत नाही ॥ ७-२६ ॥

अर्थ –

हे अर्जुना, मागे होऊन गेलेल्या, सध्या असलेल्या व पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो; पण मला कोणी जाणत नाही. मला का जाणू शकत नाही?

मूळ श्लोक –

इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत ।
सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप ॥ ७-२७ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

भारत परन्तप = हे भारता (अर्थात भरतवंशी) परंतपा (अर्थात शत्रुतापना अर्जुना), सर्गे = संसारात, इच्छाद्वेषसमुत्थेन = इच्छा व द्वेष यांपासून उत्पन्न होणाऱ्या, द्वन्द्वमोहेन = सुखदुःखादी द्वंद्वरूप मोहाने, सर्वभूतानि = संपूर्ण सजीव, सम्मोहम्‌ = अत्यंत अज्ञतेप्रत, यान्ति = प्राप्त होतात ॥ ७-२७ ॥

अर्थ –

हे भरतवंशी अर्जुना, इच्छा आणि द्वेषामुळे म्हणजेच रागद्वेषादि द्वन्दृरूपी मोहामुळे या जगातील सर्व प्राणी मोहवश होतात; त्यामुळे ते मला जाणत नाहीत. तर मग मला कोणीच जाणू शकणार नाही का ? यावर योगेश्वर

श्रीकृष्ण म्हणतात.

मूळ श्लोक –

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम्‌ ।
ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥ ७-२८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तु = परंतु, पुण्यकर्मणाम्‌ = निष्काम भावाने श्रेष्ठ कर्मांचे आचरण करणाऱ्या, येषाम्‌ = ज्या, जनानाम्‌ = पुरुषांचे, पापम्‌ = पाप, अन्तगतम्‌ = नष्ट होऊन गेले आहे, ते = ते, द्वन्द्वमोहनिर्मुक्ताः = राग-द्वेष यांपासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहातून मुक्त झालेले, दृढव्रताः = दृढनिश्चयी भक्त, माम्‌ = मला, भजन्ते = सर्व प्रकारांनी भजतात ॥ ७-२८ ॥

अर्थ –

परंतु पुण्यकर्म ( जो संस्कारांचा अंत करणारा आहे, ज्याचे नाव कार्यम्‌ कर्म, नियत कर्म, यज्ञप्रक्रिया असे आहे असे कर्म ) करणाऱ्या ज्या भक्तांचे पाप नष्ट झालेले असते, असे ते रागद्वेषादि द्वन्दररूपी मोहातून मुक्त होऊन, दूढव्रत होऊन माझी उपासना करतात. ते माझी उपासना कशासाठी व का करतात?

क्रमशः

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment