श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७९

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७९

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७९ –

अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग – श्लोक क्र. ७.२९ ते ७.३० | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७९.

मूळ श्लोक –

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।
ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम्‌ ॥ ७-२९ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

माम्‌ = मला, आश्रित्य = शरण येऊन, ये = जे पुरुष, जरामरणमोक्षाय = जरा आणि मरण यांतून सुटण्यासाठी, यतन्ति = प्रयत्‍न करतात, ते = ते (पुरुष), तत्‌ = ते, ब्रह्म = ब्रह्म, कृत्स्नम्‌ अध्यात्मम्‌ = संपूर्ण अध्यात्म, च = तसेच, अखिलम्‌ = संपूर्ण, कर्म = कर्म, विदुः = जाणतात ॥ ७-२९ ॥

अर्थ –

जे माझा आश्रय करुन जरा व मरण यांच्यापासून मुक्‍त होण्याकरता प्रयत्न करतात, ते त्या परब्रह्माला, संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात.

मूळ श्लोक –

साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः ।
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॥ ७-३० ॥

संदर्भित अन्वयार्थ

साधिभूताधिदैवम्‌ = अधिभूत आणि अधिदैव यांसह, च = तसेच, साधियज्ञम्‌ = अधियज्ञासहित, माम्‌ = सर्वांचे आत्मरूप अशा मला, ये = जे पुरुष, प्रयाणकाले अपि = अंतकाळी सुद्धा, विदुः = जाणतात, ते = ते, युक्तचेतसः = युक्तचित्त असणारे पुरुष, माम्‌ च = मलाच, विदुः = जाणतात (म्हणजे मलाच प्राप्त करून घेतात) ॥ ७-३० ॥

अर्थ

जे अधिभूतासह, अधिदेैवतासह आणि अधियज्ञासह सर्व मीच आहे अशा प्रकारे मला जाणतात, ते माझ्या ठिकाणी युक्‍तचित असणारे पुरुष अंतकाळीदेखील मला जाणतात. माझ्या ठिकाणी स्थित असतात व ते सदैव माझ्या स्वरूपाशी एकरूप झालेले असतात. सव्विसाव्या व सत्ताविसाव्या श्लोकात त्यांनी सांगितले की, मोहग्रस्त असल्यामुळे कोणी मला जाणत नाही. परंतु त्या मोहातून मुक्‍त होण्यासाठी प्रयत्न करतात ते ९ ) संपूर्ण ब्रह्म,

२ ) संपूर्ण अध्यात्म, ३ ) संपूर्ण कर्म, ४ ) संपूर्ण अधिभूत, ५ ) संपूर्ण अधिदेव व ६ ) संपूर्ण अधियज्ञासह मला जाणतात. अर्थात या सर्वाचा परिणाम मी ( सदगुरू ) आहे. तेव्हा असा योगारूढ झालेला योगीच माझे स्वरूप जाणतो.

कोणीच जाणत नाही असे नाही.

निष्कर्ष-

या सातव्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितले की, जो अनन्य भावाने माझ्या ठिकाणी स्वतःला समर्पित करुन, माझा आश्रय घेऊन जो योगसाधना करतो, तो समग्रपणे माझे स्वरूप जाणतो. हजारोंमध्ये कोणी ‘एखादाच मला जाणण्याचा प्रयत्न करतो व प्रयत्न करणाऱ्यांमध्ये कोणी एखादाच मला जाणतो. तो मला पिण्डरुपाने एकाच ठिकाणी नाही, परंतु सर्वत्र व्यापून राहिलेला असा पाहतो. माझी ही जड प्रकृती आठ प्रकारांत विभागली गेलेली

आहे आणि तिच्या अंतरंगात माझी जीवनरुप चेतना प्रकृती आहे. या दोहोंच्या संयोगाने सर्व सृष्टी-जगत निर्माण झालेले आहे. तेज आणि पराक्रम माझ्यामुळेच आहे. वासना व आसक्क्‍तिरहित बल व धर्माला अनुसरुन असणारा काम मीच आहे. साधकाला सर्व कामना वर्ज्य असल्या तरी माझ्या प्राप्तीची तू कामना कर. मनात अशा प्रकारची इच्छा निर्माण होणे हा माझाच प्रसाद आहे असे समज. परमेश्वराला प्राप्त करून घेण्याची कामना ही’ धर्मानुकूल कामना’ आहे, असे समज.

श्रीकृष्णांनी येथे सांगितले की, मी तीन गुणांच्या अतीत आहे. परमतत्त्वाला स्पर्श करून परमभावामध्ये मी स्थित आहे. परंतु भोगासक्त मूढ पुरुष सरळ माझी भक्‍ती न करता अन्य देवतांची उपासना करतात. वास्तविक ह्या देवता अस्तित्वात नाहीत. कोणी दगड, पाणी, वृक्ष किंवा इतर कोणत्याही गोष्टीची जर श्रध्दापूर्वक पूजा करू इच्छित असतील तर त्यांची श्रध्दा मीच दृढ करतो आणि मग मीच त्यांच्या ( देवतांच्या ) रूपाने फल देत असतो. कारण देवता अस्तित्वातच नाहीत. तसेच त्यांच्याजवळ कसले फळही द्यायला नाही. मी मायेच्या आवरणाने झाकलेला असल्याने लोक माझे मूळ स्वरूप पाहू शकत नाहीत. त्यांच्या दृष्टीने मी एक सामान्य मनुष्य आहे व म्हणून ते माझी आराधना करीत नाहीत. सातत्याने अनुष्ठान करणारेच योगमायेचे आवरण दूर करून शरीरधारी अशा माझे अव्यक्त स्वरुप जाणतात.

माझे भक्‍त चार प्रकारचे असतात – अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी! अनेक जन्मांपासून सातत्याने चिंतन करत करत शेवटच्या जन्मात ईश्वराची प्राप्ती करून घेणारा ज्ञानी म्हणजे माझेच स्वरुप आहे, असे तू जाण. म्हणजेच अनेक जन्मांपासून भगवंताचे सातत्याने श्रध्दापूर्वक चिंतन करणारे परमेश्वराप्रत जातात. राग, द्वेष व मोहयुक्‍्त मनुष्य मला कधीही जाणू शकत नाही. परंतु राग, द्वेष व मोहरहित होऊन जो नियतकर्माचे ( ज्याला थोडक्यात आराधना म्हणता येईल ) चिंतन करीत जरा मरणापासून मुक्‍त होण्याचा प्रयत्न करतात, ते लोक माझे समग्र स्वरूप जाणतात. ते संपूर्ण ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म, संपूर्ण अधिदैव, संपूर्ण कर्म आणि संपूर्ण यज्ञासहित मला जाणतात. असे ते

मला समग्रपण जाणणारे योगी माझ्यामध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्या अंतकाळीही ते मलाच जाणतात. त्यानंतर त्यांना माझे विस्मरण कधीच होत नाही.

या प्रकारे या अध्यायामध्ये परमात्म्याच्या समग्र स्वरुपाचे स्पष्टीकरण केले आहे. समग्र स्वरूपाची येथे ओळख करुन देण्यात आली आहे.

मूळ सातवा अध्यायाची समाप्ती.

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे

ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥

अर्थ –

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ज्ञानविज्ञानयोग नावाचा हा सातवा अध्याय समाप्त झाला. ॥ ७ ॥

इति श्रीमत्परमहंस परमानन्दस्य शिष्य स्वामी अडगड़्ानन्दकृते श्रीमद भगवद्गीताया: ‘यथार्थगीता’ भाष्ये ‘ समग्रबोध:’ नाम सप्तमोःध्याय: ।।७॥।

अशा प्रकारे श्रीमत्परमहंस परमानन्दजीचे शिष्य स्वामी अड॒गडानन्दकृत श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य ‘ यथार्थ गीता’ यामधील ‘ समग्र स्वरुपबोध’ नावाचा सातवा अध्याय समाप्त झाला.

।। हरिः 🕉 तत्सत्‌ ।।

क्रमशः

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment