श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८०

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८०

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८० –

सातव्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितले की, पुण्यकर्म ( नियतकर्म, आराधना ) करणारा योगी सर्व पापांपासून मुक्त होऊन अखिल जगतात व्यापून असणाऱया ब्रह्माला जाणतो. म्हणजे पुण्यकर्म हे व्यापक ब्रह्माचा साक्षात्कार करून देणारे अमोघ साधन आहे. ते पुण्यकर्म करणारा योगी जगात व्यापून राहिलेल्या ब्रह्माला, संपूर्ण कर्माला, संपूर्ण अध्यात्माला, संपूर्ण अधिदेवाला, तसेच अधिभूत आणि अधियज्ञासहित मला जाणत असतो.

तेव्हा कर्म म्हणजे या सर्वाचा परिचय करून देणारी एक उपयुक्त वस्तू आहे. असे पुण्यकर्म करणारे त्यांच्या अंतकाळीही मलाच जाणतात. माझे त्यांना कधी विस्मरण होत नाही. या अध्यायामध्ये प्रारंभीच अर्जुनाने तेच शब्द घेऊन भगवंताला प्रश्न केला.

मूळ आठवा अध्यायाचा प्रारंभ:

अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग – श्लोक क्र. ८.०१ ते ८.०४ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८०.

मूळ श्लोक –

अर्जुन उवाच
किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।
अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥ ८-१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, पुरुषोत्तम = हे पुरुषोत्तम श्रीकृष्णा, तत्‌ = ते, ब्रह्म = ब्रह्म, किम्‌ = काय आहे, अध्यात्मम्‌ = अध्यात्म, किम्‌ = काय आहे, कर्म = कर्म, किम्‌ = काय आहे, अधिभूतम्‌ = अधिभूत (या नावाचे), किम्‌ = काय, प्रोक्तम्‌ = म्हटले गेले आहे, च = तसेच, अधिदैवम्‌ = अधिदैव, किम्‌ = कशाला, उच्यते = म्हटले जाते ॥ ८-१ ॥

अर्थ –

अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म कशाला म्हणतात? कर्म म्हणजे काय? अधिभूत आणि अधिदेैव कशाला म्हंटले जाते?

मूळ श्लोक –

अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन ।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥ ८-२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

मधुसूदन = हे मधुसूदना (श्रीकृष्णा), अत्र = येथे, अधियज्ञः = अधियज्ञ, कः = कोण आहे (व तो), अस्मिन्‌ = या, देहे = शरीरामध्ये, कथम्‌ = कसा आहे, च = तसेच, नियतात्मभिः = ज्यांचे चित्त तुमच्यामध्ये युक्त आहे अशा पुरुषांच्या द्वारे, प्रयाणकाले = अंतसमयी, (त्वम्‌) = तुम्ही, कथम्‌ = कोणत्या प्रकाराने, ज्ञेयः असि = जाणले जाता ॥ ८-२ ॥

अर्थ –

हे मधुसूदना, अधियज्ञ तो कोणता आणि तो या देहात कसा आहे? अधियज्ञ म्हणजे यज्ञाचा अधिष्ठाता असा कोणी पुरुष आहे, जो मनुष्य शरीरधारी महापुरुष आहे. अर्जुन पुढे म्हणतो की, समाहित चित्त असणारे म्हणजे मनोनिग्रही पुरुष अंतकाळी तुला कशा प्रकारे जाणतात? या सातही प्रश्नांचे क्रमाने उत्तर देण्यासाठी योगेश्वर श्रीकृष्ण म्हणाले

मूळ श्लोक –

श्रीभगवानुवाच
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।
भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसञ्ज्ञितः ॥ ८-३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, परमम्‌ = परम, अक्षरम्‌ = अक्षर, ब्रह्म = ब्रह्म आहे, स्वभावः = आपले स्वरूप म्हणजे जीवात्मा हा, अध्यात्मम्‌ = अध्यात्म (नावाने), उच्यते = सांगितला जातो, (च) = तसेच, भूतभावोद्भवकरः = भूतांच्या भावांना उत्पन्न आणि अभ्युदय व वृद्धी करणारा, (यः) = जो, विसर्गः = सृष्टिरचनारूपी विसर्ग अर्थात त्याग आहे, (सः) = तो, कर्मसञ्ज्ञितः = कर्म या नावाने सांगितला जातो ॥ ८-३ ॥

अर्थ –

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अक्षरं ब्रह्म परंम’ – जे अक्षय आहे, ज्याचा क्षय होत नाही असे अविनाशी आदितत्त्व म्हणजे परब्रह्म होय. ‘स्वभाव: अध्यात्मम्‌ उच्यते ‘- स्वत:मध्ये स्थिर भाव असतो म्हणजे जेथे आत्म्याचे अधिपत्य असते त्याला अध्यात्म असे म्हंटले जाते. या आधी सर्व मायेच्या अधिपत्याखाली असतात, परंतु जेव्हा ‘ स्व’-भाव म्हणजेच सहज स्वरूपस्थिती ( स्वत:मध्ये स्थिरभाव निर्माण होणे ) प्राप्त होते, म्हणजे आत्म्याचे अधिपत्य त्यात प्रवाहित होते, त्याला अध्यात्म असे म्हटले जाते. हीच अध्यात्माची परमोच्च अवस्था आहे. ‘ भूतभावोदभवकर: ‘ निराकार शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी भूतभेदाने काही ना काही निर्माण होते. अर्थात प्राणिमात्रांचे चांगले अथवा वाईट संस्कार निर्माण होतात, त्यांचे विसर्जन होते म्हणजे ते नष्ट होतात.

हीच कर्माची परमोच्च अवस्था आहे. हेच संपूर्ण कर्म होय. ज्याविषयी योगेश्वर म्हणाले होते-‘ तो योगी संपूर्ण कर्माला जाणत असतो” – तेथे कर्म पूर्ण झालेले आहे. पुढे कर्म करण्याची काही आवश्यकताच नाही. या अवस्थेमध्ये प्राणिमात्रांचे निर्माण झालेले भाव, चांगल्या वाईट संस्कारांचे संग्रह ते सर्व संपून जाते. हेच संपूर्ण कर्म होय. यानंतर काही कर्म करण्याची आवश्यकता नाही म्हणून कर्म ही अशी वस्तू आहे, जी प्राणिमात्रांचे संकल्प, त्यांचे संस्कार, यांचे शमन करते, कर्म म्हणजे ( आराधना ) चिंतन जे यज्ञामध्ये आहे.

मूळ श्लोक –

अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम्‌ ।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥ ८-४ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

क्षरः भावः = उत्पत्ती-विनाश शील असणारे सर्व पदार्थ, अधिभूतम्‌ = अधिभूत आहेत, पुरुषः = हिरण्यमय पुरुष अर्थात ब्रह्मदेव, अधिदैवतम्‌ = अधिदैवत आहे, च = आणि, देहभृताम्‌ वर = देहधारी माणसात श्रेष्ठ असणाऱ्या हे अर्जुना, अत्र देहे = या शरीरामध्ये, अहम्‌ एव = मी वासुदेवच, अधियज्ञः = अंतर्यामीरूपाने अधियज्ञ आहे ॥ ८-४ ॥

अर्थ –

जोपर्यंत अक्षरत्व-प्राप्त होत नाही तोपर्यंत नाशवंत कार्यरूप पदार्थाला ‘अधिभूत’ म्हंटले जाते. ते सर्व भूतांचे अधिष्ठान आहे. प्राणिमात्रांच्या उत्पत्तीचे तेच कारण आहे. पुरुषः च अधिदैवतम्‌ आणि प्रकृतीच्या पलीकडे असणारा परम पुरुष तेच अधिदेवत आहे. हे अधिदेवत संपूर्ण देवी संपदेचा अधिष्ठाता आहे. देवी संपदा त्या परमदेवात विलीन होते. हे नरश्रेष्ठ अर्जुना, या मनुष्य शरीरात अधियज्ञ मीच आहे म्हणजे यज्ञांचा अधिष्ठाता मीच आहे म्हणून या शरीरात अव्यक्त स्वरूपात स्थित असणारा महापुरुष म्हणजे अधियज्ञही मीच आहे. श्रीकृष्ण एक योगी होते, जे संपूर्ण यज्ञाचा भोक्ता आहेत. शेवटी यज्ञ त्यांच्यातच तद्रूप होतात आणि तेथेच मग परमस्वरूप प्राप्त होते. या प्रकारे अर्जुनाने विचारलेल्या सहा प्रश्नांचे समाधान झाले. आता त्याचा शेवटी एक प्रश्न राहिला. त्याने विचारले होते की, मनोनिग्रही पुरुष अंतकाळी तुला कसे जाणतात? यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात

क्रमशः

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment