श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८१

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८१

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८१ –

अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग – श्लोक क्र. ८.०५ ते ८.०८ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८१.

मूळ श्लोक –

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्‌ ।
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ ८-५ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अन्तकाले च = अंतकाळी सुद्धा, यः = जो पुरुष, माम्‌ एव = माझेच, स्मरन्‌ = स्मरण करीत, कलेवरम्‌ = शरीराचा, मुक्त्वा = त्याग करून , प्रयाति = जातो, सः = तो, मद्भावम्‌ = साक्षात माझे स्वरूप, याति = प्राप्त करून घेतो, अत्र = या बाबतीत, संशयः = कोणताही संशय, न अस्ति = नाही ॥ ८-५ ॥

अर्थ –

योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात की, जो पुरुष मरणसमयी म्हणजे मनोनिग्रहाच्या , मनोविलयाच्या वेळी माझे स्मरण करीत हा देह सोडतो तो ‘मद्धाव’ माझ्या स्वरूपास प्राप्त होतो, ह्यात संशय नाही. शरीरत्याग म्हणजे शुद्ध अंतकाळ नसतो. मरणानंतरही शरीराची साथ म्हणजे शरीराचा क्रम सुटत नाही. संचित संस्काराचे स्तर नष्ट झाल्यानंतरच मनाचा निरोध होतो व मन माझ्यामध्ये विलीन होते, ते तद्रूप होते, तो खरा अंतकाळ होय, कारण त्यानंतर जीवाला पुन्हा शरीर धारण करावे लागत नाही. अर्थात केवळ सांगण्याने ते समजणार नाही. ही आचरण करण्याची गोष्ट आहे. जोपर्यंत वस्त्रांप्रमाणे जीव शरीर बदलत राहतो, तोपर्यंत शरीराचा अंत कोठून होणार?

मनोनिग्रह व परमात्म्याशी जेव्हा मनोविलय होतो, तेव्हा जिवंतपणीच त्या जीवाचा शरीराशी संबंध तुटत असतो. ही स्थिती केवळ मरणानंतरच प्राप्त होणारी असती तर स्वयं श्रीकृष्णसुद्धा कधी पूर्णपुरूष बनले नसते. त्यांनी मागे सांगितले आहे की, अनेक जन्मांच्या अभ्यासानंतर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणारा ज्ञानी म्हणजे साक्षात माझेच स्वरूप समजावे. मी त्याच्यामध्ये असतो व तो माझ्यामध्ये असतो. त्याच्यामाझ्यामध्ये लेशमात्रही ‘फरक नसतो. याला जिवंतपणी झालेली प्राप्ती असे म्हणतात व ही ज्यालाप्राप्त होते त्या तद्रूप झालेल्या जीवाला पुन्हा शरीर कधीही धारण करावे लागत नाही. अशा जीवांचा देहत्याग हा खरा शरीराचा त्याग असतो – शरीराचा अंत असतो.

अर्थात ज्या शरीरत्यागानंतर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही त्या देहांताचे हे वर्णन झाले. परंतु दुसरा लोक प्रचलित असा देहत्यागामुळे आलेला मृत्यू असतो. यामध्ये देहत्यागानंतर जीवाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो.

मूळ श्लोक –

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्‌ ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ ८-६ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, अन्ते = अंतकाळी, यम्‌ यम्‌ = ज्या ज्या, वा अपि = ही, भावम्‌ = भावाचे, स्मरन्‌ = स्मरण करीत, कलेवरम्‌ = शरीराचा, त्यजति = त्याग करतो, तम्‌ तम्‌ एव = तो तो भावच, (सः पुरुषः) = तो पुरुष, एति = प्राप्त करून घेतो (कारण तो), सदा = नेहमी, तद्भावभावितः = त्या भावाने भावित झालेला असतो ॥ ८-६ ॥

अर्थ –

हे कोन्तेया, अंतकाळी मनुष्य ज्या वस्तूचे, स्वरूपाचे किंवा भावाचे स्मरण करीत देह सोडतो, त्या स्वरूपात तो जाऊन मिळतो. मग तर हा व्यवहार स्वस्तातला आहे. आयुष्यभर मौजमजा करायची व मरताना भगवंताचे स्मरण केले की झाले. तुम्ही भगवंताप्रत जाऊन पोहचाल. परंतु श्रीकृष्ण म्हणतात हे असे होत नाही. सदा तदभाव भावितः: मनुष्य आयुष्यभर ज्याप्रमाणे आचरण करतो, ज्याचे सतत चिंतन करतो, जी गोष्ट आवडीने अंतःकरणात राहते, तीच गोष्ट मरणाच्या वेळी वारंवार मनात येते. आयुष्यभर मौजमजा करून मरताना परमेश्वराचे नाव सुखासुखी ओठावर येणार नाही.

मूळ श्लोक –

तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्‌ ॥ ८-७ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

तस्मात्‌ = म्हणून, (अर्जुन) = हे अर्जुना, सर्वेषु = सर्व, कालेषु = काळी, (त्वम्‌) = तू, माम्‌ अनुस्मर = (निरंतर) माझे स्मरण कर, च = आणि, युध्य = युद्धसुद्धा कर, (एवम्‌) = अशाप्रकारे, मयि = माझ्या ठिकाणी, अर्पितमनोबुद्धिः = अर्पण केलेल्या अशा मन व बुद्धी यांनी युक्त होऊन, असंशयम्‌ = निःसंदेहपणे, माम्‌ एव = मलाच, एष्यसि = तू प्राप्त करून घेशील ॥ ८-७ ॥

अर्थ –

म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी माझेच स्मरण कायम ठेव व युद्ध कर. मन आणि बुद्धी माझ्याच ठायी तू अर्पण करून राहिलास, म्हणजे निश्चितपणे तू मजप्रतच येशील. भगवंताचे निरंतर चिंतन व युद्ध या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा शक्य आहेत? कदाचित ‘जय कन्हैयालाल की’ किंवा ‘ हर हर महादेव ‘ असे म्हणत जायचे व बाण सोडत राहायचे असे असेल. परंतु याला भगवंताचे निरंतर स्मरण म्हणत नाही. स्मरण म्हणजे काय, त्याचे स्वरूप सांगताना योगेश्वर म्हणतात

मूळ श्लोक –

अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्‌ ॥ ८-८ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना) (असा नियम आहे की), अभ्यासयोगयुक्तेन = परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त, नान्यगामिना = दुसरीकडे न जाणणाऱ्या (अशा), चेतसा = चित्ताने, अनुचिन्तयन्‌ = निरंतर चिंतन करणारा मनुष्य, परमम्‌ = परम, दिव्यम्‌ = प्रकाशस्वरूप दिव्य, पुरुषम्‌ = पुरुषाला म्हणजे परमेश्वरालाच, याति = प्राप्त करून घेतो ॥ ८-८ ॥

अर्थ –

हे पार्था, अभ्यासयोगाने युक्त होऊन, मन स्थिर करून ( माझ्या स्मरणासाठी माझे निरंतर चिंतन व योगाभ्यास अत्यंत आवश्यक आहे. ) माझ्याशिवाय अन्यत्र न जाणार्‍या चित्ताने निरतर चिंतन करणारा, परमप्रकाशस्वरूप दिव्य पुरुषाप्रत म्हणजे परमात्म्याप्रत जातो. समजा ही पेन्सिल म्हणजे भगवान आहे अशी तुमची श्रव्धा असेल; तर मग तिच्याशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीचे विचार तुमच्या मनात येता कामा नये. जर तिच्या आजूबाजूला तुम्हांला पुस्तक दिसले किंवा अन्य काही वस्तू दिसली तरी तुमचे स्मरण खंडित होता कामा नये. मग स्मरण जर इतके सूक्ष्म असले की, आराध्य ईश्वराशिवाय दुसर्‍या कोणत्याही गोष्टीचा विचार मनात येता कामा नये, मनात अन्य कसला तरंगही निर्माण होता कामा नये, तर मग युद्ध व स्मरण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा शक्‍य आहेत?

वास्तविक जेव्हा तुम्ही चित्ताचा सर्व बाजूंनी निग्रह करून आपल्या आराध्यदेवाच्या ठिकाणी त्याला केंद्रित करण्याचा प्रयत्न करता तेव्हा मायिक ( ऐंद्रजालिक ) प्रवृत्ती-काम- क्रोध, राग-द्वेष इ. विघ्नरूप बनून समोर उभ्या ठाकतात. तुम्ही स्मरण करताना तुमचे मन विचलित करण्यासाठी त्या तुमच्या मनात उद्देग निर्माण करतील. या बाधारूपाने प्रकट होणाऱ्या बाह्या प्रवृत्तीचे दमन करणे, त्यांच्यावर विजय

मिळवणे हेच युद्ध होय. निरंतर चिंतन असेल तरच या मायिक प्रवृत्ती नष्ट॒ करणे शक्‍य होते. म्हणून निरंतर चिंतनाबरोबर युद्ध असणे स्वाभाविकच आहे. गीतेमधील कोणताही श्लोक बाह्य हाणा-मारीचे समर्थन करीत नाही.

आता चिंतन कोणाचे करावे? याबाबत श्रीकृष्ण म्हणतात –

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८१.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment