श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८२

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८२

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८२ –

अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग – श्लोक क्र. ८.०९ ते ८.१२ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८२.

मूळ श्लोक –

कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्यः ।
सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसः परस्तात्‌ ॥८-९ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

कविम्‌ = सर्वज्ञ, पुराणम्‌ = अनादी, अनुशासितारम्‌ = सर्वांचा नियंता, अणोः अणीयांसम्‌ = सूक्ष्मापेक्षा अतिसूक्ष्म, सर्वस्य धातारम्‌ = सर्वांचे धारण-पोषण करणारा, अचिन्त्यरूपम्‌ = अचिंत्य स्वरूप, आदित्यवर्णम्‌ = सूर्याप्रमाणे नित्य चेतन प्रकाशस्वरूप, (च) = आणि, तमसः = अविद्येच्या, परस्तात्‌ = फार पलीकडे असणाऱ्या शुद्ध सच्चिदानंदघन परमेश्वराचे, यः = जो, अनुस्मरेत्‌ = निरंतर स्मरण करतो ॥ ८-९ ॥

अर्थ –

त्या युद्धाबरोबरच जो पुरुष सर्वज्ञ, अनादि, सर्व विश्वाचा नियंता, परमाणूपेक्षाही सूक्ष्म, सर्वाचे म्हणजे स्थूलसूक्ष्म जगाचे भरणपोषण करणाऱ्या, परंतु जो अचिंत्य-अगोचर आहे ( जोपर्यंत चित्त व चित्तातील लेशमात्र विचारतरंग शिल्लक असेल तोपर्यंत तो अगोचर असतो. जेव्हा चित्ताचा निरोध व चित्ताचा त्याच्यामध्ये विलय होतो तेव्हाच तो प्रकट होतो. तेव्हाच त्याचे स्वरूप विदित होते ), नित्य प्रकाशस्वरूप आणि अज्ञानरूपी अंधकाराच्या पलीकडे असणाऱ्या त्या परमात्म्याचे स्मरण करतो- मागे सांगितले की तो माझे चिंतन करतो, येथे सांगतात परमात्म्याचे चिंतन करतो. येथे परमात्म्याचे चिंतन ( ध्यान ) म्हणजे तत्त्व स्थित महापुरुषाचे ध्यान असे समजावे याच क्रमात –

मूळ श्लोक –

प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक्‌ स तं परं पुरुषमुपैति दिव्यम्‌ ॥ ८-१० ॥

संदर्भित अन्वयार्थ –

सः = तो, भक्त्या युक्तः = भक्तीने युक्त असा पुरुष, प्रयाणकाले = अंतकाळी (सुद्धा), योगबलेन = योगाच्या सामर्थ्याने, भ्रुवोः = भुवयांच्या, मध्ये = मध्यात, प्राणम्‌ = प्राणाला, सम्यक्‌ = योग्य प्रकारे, आवेश्य = स्थापन करून, च = नंतर, अचलेन = निश्चल, मनसा = मनाने, (स्मरन्‌) = स्मरण करीत, तम्‌ = त्या, दिव्यम्‌ = दिव्यरूप, परम्‌ = परम, पुरुषम्‌ एव = पुरुष परमात्म्यालाच, उपैति = प्राप्त करून घेतो ॥ ८-१० ॥

अर्थ –

जो निरंतर त्या परमात्म्याचे स्मरण करीत असतो तो भक्तियुक्‍त पुरुष “प्रयाणकाले’ मनाच्या तद्रूप अवस्थेत योगबलाने म्हणजेच नियत कर्माच्या आचरणाने युक्‍त होऊन दोन भुवयांच्यामध्ये प्राणवायूची योग्य प्रकारे स्थापना करून ( प्राण-अपान वायूची गती सम करून, अंतर्यामी कसलाही उद्वेग निर्माण न होऊ देता, बाह्य संस्कार ग्रहण न करता, सत-रज-तम यांना योग्य प्रकारे ज्ञात करून, योग्य भावपूर्ण अवस्थेत ), तो अचल मनाचा म्हणजेच स्थिर बुद्धीचा पुरुष त्या दिव्य पुरुषपरमात्म्याप्रत जातो. या परमात्म्याची प्राप्ती म्हणजेच योग होय. त्यासाठी नियत कर्माचे आचरण म्हणजे योग- क्रिया आहे, ज्याचे सविस्तर वर्णन योगेश्वर श्रीकृष्णांनी चौथ्या व सहाव्या अध्यायात केले आहे. त्यांनी सांगितले, योग-धारणेमध्ये स्थिर राहून माझेच निरंतर स्मरण कर. असे माझे निरंतर स्मरण करणारा त्या दिव्य अशा परम पुरुषापर्यंत जातो, ज्याचा कधी विसर पडत नाही. या प्रकारे अंतकाळी परमात्म्याला कशा प्रकारे जाणले जाते या अर्जुनाच्या प्रश्नाचे येथे समाधान केले आहे. आता जे पद प्राप्त करावयाचे व गीतेमध्ये जे प्रत्येक ठिकाणी आले आहे त्याचे वर्णन पाहा.

मूळ श्लोक –

यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं सङ्ग्रहेण प्रवक्ष्ये ॥ ८-११ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

वेदविदः = वेद जाणणारे विद्वान, यत्‌ = ज्या सच्चिदानंदघनरूप परमपदाला, अक्षरम्‌ = अविनाशी, वदन्ति = म्हणतात, वीतरागाः = आसक्तिरहित, यतयः = प्रयत्‍नशील संन्यासी महात्मे लोक, यत्‌ = ज्यात, विशन्ति = प्रवेश करतात, (च) = आणि, यत्‌ = ज्या परमपदाची, इच्छन्तः = इच्छा करणारे (ब्रह्मचारी लोक), ब्रह्मचर्यम्‌ = ब्रह्मचर्याचे, चरन्ति = आचरण करतात, तत्‌ = ते, पदम्‌ = परम पद (कसे मिळते), ते = तुझ्यासाठी, सङ्ग्रहेण = संक्षेपाने, प्रवक्ष्ये = मी सांगेन ॥ ८-११ ॥

अर्थ –

बेदविद’ म्हणजे अविदित तत्त्वाला प्रत्यक्ष जाणणारे वेदवेत्ते ज्या परमपदाला ‘ अक्षरम्‌’ अक्षय-अविनाशी आहे असे सांगतात, विरक्त झालेले लोक ज्यामध्ये प्रवेश करतात, ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचर्यत्रताचे ‘पालन करतात ( येथे ब्रह्मचर्य म्हणजे केवळ जननेन्द्रियाचा निरोध नव्हे, तर ‘हृहा आचरति स ब्ृह्मचारी’ सर्व प्रकारच्या बाह्य स्पर्शाचा मनाने त्याग करून ब्रह्माचे निरंतर चिंतन करणे, स्मरणे करणे म्हणजे ब्रह्मचर्य होय. जो ब्रह्माचे दर्शन करून, त्याचे ठायी स्थिर होतो. या प्रकारच्या आचरणाने केवळ इंद्रिय-संयमच नाही तर सर्व इंद्रियांचा संयम आपोआप होतो. अशा प्रकारच्या ब्रह्मचर्यव्रताचे जो आचरण करतो ), जे हृदयामध्ये साठवण्यासाठी योग्य आहे, जे धारण करण्यास अत्यंत उचित आहे, ते पद मी तुला सांगतो. ते पद कसे आहे? कशा प्रकारे प्राप्त केले जाते? यावर योगेश्वर

श्रीकृष्ण म्हणतात –

मूळ श्लोक –

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च । मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम्‌ ॥ ८-१२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

सर्वद्वाराणि = सर्व इंद्रियांच्या द्वारांना, संयम्य = रोखून, च = तसेच, हृदि = हृद्देशामध्ये, मनः = मनाला, निरुध्य = स्थिर करून (नंतर जिंकलेल्या त्या मनाच्या द्वारा), प्राणम्‌ = प्राणाला, मूर्ध्नि = मस्तकात, आधाय = स्थापन करून, आत्मनः = परमात्म्याच्या संबंधी, योगधारणाम्‌ = योगधारणेमध्ये, आस्थितः = स्थित होऊन, यः = जो पुरुष ॥ ८-१२ ॥

अर्थ –

सर्व इंद्रियांचे दरवाजे बंद करून म्हणजेच इंद्रियांच्या वासनांपासून दूर राहून, हृदयाच्या ठिकाणी मनाचा निरोध करून ( ध्यान हृदयातच होत असते, बाहेर होत नसते, पूजा कधी बाहेर होत नाही ), प्राण म्हणजेच अंत:करणातील सर्व व्यवहारांचा मस्तकामध्ये निरोध करून, योग धारणेमध्ये स्थित होऊन योगाला धारण करावयाचे असते. दुसरी पद्धत नाही.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८२.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment