श्रीमद् भगवद् गीता भाग ८५ –
अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग – श्लोक क्र. ८.२१ ते ८.२४ | श्रीमद् भगवद् गीता भाग ८५.
मूळ श्लोक
अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ ८-२१ ॥
➡संदर्भित अन्वयार्थ
अव्यक्तः = अव्यक्त हा, अक्षरः = अक्षर, इति = या नावाने, उक्तः = सांगितला गेला आहे, तम् = त्याच अक्षर नावाच्या अव्यक्त भावाला, परमाम् गतिम् = परम गती (असे), आहुः = म्हणतात, (च) = आणि, यम् = ज्या सनातन अव्यक्त भावाला, प्राप्य = प्राप्त करून घेतल्यावर, (मानवाः) = माणसे, न निवर्तन्ते = परत येत नाहीत, तत् = ते, मम = माझे, परमम् = परम, धाम = धाम आहे ॥ ८-२१ ॥
➡अर्थ
त्या सनातन अव्यक्त तत्त्वाला-परब्रह्माला अक्षर म्हणजे अविनाशी असेही म्हणतात. तेच माझे परमधाम आहे. ते प्राप्त झाल्यानंतर मनुष्य पुन्हा परत येत नाही. त्याचा पुर्नजन्म होत नाही. या सनातन अव्यक्त तत्त्वाची प्राप्ती
कशी होते हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात
मूळ श्लोक
पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ।
यस्यान्तः स्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ॥ ८-२२ ॥
➡संदर्भित अन्वयार्थ
पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), यस्य = ज्या परमात्म्याच्या, अन्तः स्थानि = अंतर्गत, भूतानि = सर्व भूते आहेत, (च) = आणि, येन = ज्या सच्चिदानंदघन परमात्म्याने, इदम् = हे, सर्वम् = समस्त जग, ततम् = परिपूर्ण आहे, सः = तो सनातन अव्यक्त, परः = परम, पुरुषः तु = पुरुष तर, अनन्यया = अनन्य, भक्त्या = भक्तीनेच, लभ्यः = मिळतो ॥ ८-२२ ॥
➡अर्थ
हे पार्था, सर्व प्राणीमात्र ज्याच्या पोटात आहेत व ज्याने हे संपूर्ण विश्व व्यापलेले आहे, तो सनातन, अव्यक्त असणारा परमपुरुष अनन्य भक्तीने प्राप्त होत असतो. अनन्य भक्ती म्हणजे परमात्म्याशिवाय दुसऱ्या कोणाचेही स्मरण न करता त्याच्याशी एकनिष्ठ राहणे. पण अनन्य भक्तीने परमात्म्याशी एकनिष्ठ राहिलेल्या लोकांना कधीपर्यंत पुनर्जन्माच्या सीमेमध्ये राहावे लागते आणि ते पुनर्जन्माची सीमा केव्हा पार करतात? यावर योगेश्वर म्हणतात
मूळ श्लोक
यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः ।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥ ८-२३ ॥
➡संदर्भित अन्वयार्थ
भरतर्षभ = हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, यत्र = ज्या, काले = काळी अर्थात मार्गातील, प्रयाताः = शरीराचा त्याग करून गेलेले, योगिनः तु = योगी लोक तर, अनावृत्तिम् = परत न येणारी गती, च = आणि (ज्या मार्गात गेलेले), आवृत्तिम् एव = परत येणारी गतीच, यान्ति = प्राप्त करून घेतात, तम् = त्या, कालम् = काळाचे म्हणजेच दोन मार्गांच्या बाबतीत, वक्ष्यामि = मी सांगतो ॥ ८-२३ ॥
➡अर्थ
हे अर्जुना, कोणत्या काळी देहत्याग केला असता योगीजन पुन्हा जन्मास येत नाहीत आणि कोणत्या काळात देहत्याग केल्याने पुनर्जन्म प्राप्त होतो, तो काळ मी आता तुला सांगतो.
मूळ श्लोक
अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥ ८-२४ ॥
➡संदर्भित अन्वयार्थ
ज्योतिः = (ज्या मार्गात) ज्योतिर्मय, अग्निः = अग्नी अभिमानी देवता आहे, अहः = दिवसाचा अभिमानी देव आहे, शुक्लः = शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे, उत्तरायणम् = उत्तरायणाच्या, षण्मासाः = सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे, तत्र = त्या मार्गावर, प्रयाताः = मेल्यावर गेलेले असे, ब्रह्मविदः = ब्रह्मवेत्ते, जनाः = योगी (वरील देवतांच्याकडून क्रमाने घेतले जाऊन), ब्रह्म = ब्रह्म, गच्छन्ति = प्राप्त करून घेतात ॥ ८-२४ ॥
➡अर्थ
देहत्याग करताना ज्यांना ज्योतिर्मयअग्नी दिसतो, जेव्हा दिवसाचा प्रकाश सर्वत्र पसरलेला असतो, आकाशात सूर्य तळपत असतो, शुक्ल पक्षातील चंद्र वाढत असतो, उत्तरयणातील आकाश जेव्हा निरभ्र व सुंदर असते अशा
काळामध्ये जे प्रयाण करतात, म्हणजेच जे मृत्यू पावतात, ते ब्रह्मवेत्ते योगीजन ब्रह्मपदाला प्राप्त होतात. अग्नी ब्रह्मतेजाचे प्रतीक आहे, दिवस विद्येचा प्रकाश आहे, शुक्ल पक्ष निर्मलतेचे द्योतक आहे. विवेक, वैराग्य, शम, दम, तेज आणि प्रज्ञा हे षडेश्वर्य म्हणजेच षण्मास होय. उर्ध्वरेता स्थिती म्हणजेच उत्तरायण आहे. प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या या अवस्थेमध्ये जाणारे ब्रह्मवेत्ते योगीजन ब्रह्मपदाला प्राप्त होतात. त्यानंतर त्यांचा पुनर्जन्म होत नाही. परंतु परमेश्वराची अनन्य भावाने भक्ती करणारे योगीजन जर प्रकाशरूप अवस्था प्राप्त करू शकले
नाहीत, त्यांची साधना अजून अपूर्ण असेल त्यांचे काय होते? यावर श्रीकृष्ण म्हणतात
क्रमशःश्रीमद् भगवद् गीता भाग ८५.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.