श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८६

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८६

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८६ –

अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग – श्लोक क्र. ८.२५ ते ८.२८ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८६.

मूळ श्लोक

धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम्‌ ।

तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ॥ ८-२५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

धूमः = (ज्या मार्गात) धूम अभिमानी देवता आहे, रात्रिः = रात्रीची अभिमानी देवता आहे, तथा = तसेच, कृष्णः = कृष्णपक्षाची अभिमानी देवता आहे, दक्षिणायनम्‌ = दक्षिणायनाच्या, षण्मासाः = सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे, तत्र = त्या मार्गावर (मेल्यावर गेलेला), योगी = सकाम कर्मे करणारा योगी हा (उपर्युक्त देवतांच्या द्वारा क्रमाने नेला जात असता), चान्द्रमसम्‌ = चंद्राच्या, ज्योतिः = ज्योतीप्रत, प्राप्य = प्राप्त होऊन (स्वर्गामध्ये असणाऱ्या शुभ कर्मांचे फळ भोगून झाल्यावर), निवर्तते = परत येतो ॥ ८-२५ ॥

अर्थ

ज्या योग्याच्या अंतकाळी सर्वत्र धूर पसरलेला असतो, धुमसणारा अग्नी, अविद्योची रात्र, अंधार, कृष्ण पक्षातील क्षीण चंद्र, घोर काळोख, षड्विकांरानी ( काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर ) युक्त दक्षिणायन अशा प्रकारची

स्थिती असते, तेव्हा तो योगी बहिर्मुखी असतो. ( जो परमपदाच्या बाहेर आहे ) अशा योग्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग त्या योग्याच्या शरीराबरोबर त्याची साधनाही नष्ट होते का? यावर श्रीकृष्ण म्हणतात

मूळ श्लोक

शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते ।

एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुनः ॥ ८-२६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

हि = कारण, शुक्लकृष्णे = शुक्ल व कृष्ण म्हणजे देवयान व पितृयान असे, जगतः = जगताचे, एते = हे दोन प्रकारचे, गती = मार्ग, शाश्वते = सनातन, मते = मानले गेले आहेत (त्यांपैकी), एकया = एकाच्या द्वारा गेलेला, अनावृत्तिम्‌ = जिच्यातून परती नाही अशा परम गतीला, याति = प्राप्त करून घेतो, (च) = आणि, अन्यया = दुसऱ्याचे द्वारा गेलेला, पुनः = पुन्हा, आवर्तते = परत येतो म्हणजे जन्ममृत्यूमध्ये सापडतो ॥ ८-२६ ॥

अर्थ

वरील शुक्ल ( प्रकाशरूप ) व कृष्ण ( अंधाररूप ) हे दोन प्रकारचे मार्ग नित्य आहेत. म्हणजेच साधना कधी नष्ट होत नाही. शुक्ल अवस्थेमध्ये देहत्याग करणारा योगी पुनर्जन्म न देणारी परमगति प्राप्त करतो, तर कृष्ण अवस्थेमध्ये म्हणजेच क्षीण प्रकाश व सर्वत्र व्यापून राहिलेला अंधार अशा वेळी देहत्याग केलेला योगी पुन्हा परत येतो व जन्म घेतो. जोपर्यंत त्याला पूर्ण प्रकाश प्राप्त होत नाही; तोपर्यंत त्याने भगवंताचे भजन करावे, अनन्य भावाने आराधना करावी. म्हणजे पुनर्जन्माचा फेरा संपेपर्यंत साधना करायला पाहिजे. म्हणून पुन्हा साधनेवर भर देताना श्रीकृष्ण म्हणतात

मूळ श्लोक

नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन ।

तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ॥ ८-२७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), (एवम्‌) = अशाप्रकारे, एते = हे दोन, सृती = मार्ग, जानन्‌ = तत्त्वतः जाणून, कश्चन = कोणताही, योगी = योगी, न मुह्यति = मोहित होत नाही, तस्मात्‌ = या कारणाने, अर्जुन = हे अर्जुना, सर्वेषु = सर्व, कालेषु = काळांमध्ये, योगयुक्तः भव = समबुद्धिरूप योगाने तू युक्त हो म्हणजे माझ्या प्राप्तीसाठी निरंतर साधने कर ॥ ८-२७ ॥

अर्थ

हे पार्था, या दोन मार्गांना जाणणारा कोणताही योगी मोह पावत नाही. देहत्यागाचे वेळी पूर्ण प्रकाश प्राप्त झाल्यावरच ब्रह्मपद प्राप्त होते आणि देहत्यागाचे वेळी जर प्रकाश क्षीण असेल तर पुनर्जन्म घ्यावा लागतो. पण त्या पुनर्जन्मामध्ये साधना नष्ट होत नाही, ही गोष्ट तो चांगल्या प्रकारे जाणत असतो. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी योगयुक्त हो म्हणजेच सर्वकाळी साधना कर.

मूळ श्लोक

वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम्‌ ।

अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्‌ ॥ ८-२८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

इदम्‌ = हे रहस्य, विदित्वा = तत्त्वतः जाणून, योगी = योगी पुरुष हा, वेदेषु = वेदांच्या पठणांमध्ये, च = आणि, यज्ञेषु तपःसु दानेषु = यज्ञ, तप आणि दानादी करण्यामध्ये, यत्‌ = जे, पुण्यफलम्‌ = पुण्यफळ, प्रदिष्टम्‌ = सांगितले आहे, तत्‌ सर्वम्‌ = ते सर्व, एव = निःसंदेहपणे, अत्येति = उल्लंघन करून जातो, च = आणि, आद्यम्‌ = सनातन, परम्‌ स्थानम्‌ = परम पद, उपैति = प्राप्त करून घेतो ॥ ८-२८ ॥

अर्थ

जेव्हा योगी त्या परमात्म्याला साक्षात्कारामध्ये जाणतो तेव्हा तो वेदाध्ययन, यज्ञ, तपश्चर्या व दान यांच्यामध्ये जे जे पुण्यकारक फल सांगितले आहे, त्या सर्वांच्या पलीकडे जातो आणि श्रेष्ठ अशा परमपदाला जाऊन पोहचतो.

अविदित, अज्ञात परमात्म्याचे साक्षात ज्ञान म्हणजेच वेद होय. जेव्हा हे अज्ञात तत्त्व ज्ञात होते तेव्हा आता कोणाला जाणायचे? म्हणजे अज्ञात तत्त्व ज्ञात झाल्यानंतर वेदाचे देखिल प्रयोजन उरत नाही, कारण ज्याला जाणायचे

तो आता भिन्न राहिलेला नसतो. परमपदाचे ज्ञान होईपर्यंत भजन, आराधना हे नियत कर्म आवश्यक होते. तत्त्व विदित झाल्यानंतर मग आता कोणाचे भजन करावयाचे? लक्ष्य प्राप्त होईपर्यंत मनासहित सर्व इंद्रियांचा निरोध करून साधना करणे आवश्यक होते. लक्ष्य प्राप्त झाल्यानंतर आता कशासाठी साधना करायची? काया ( कर्म ), वाचा, मन संपूर्णपणे समर्पण करणे म्हणजे दान होय. त्या सर्वाचे पुण्यफल म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होय. आता तर हे

फलही वेगळे राहिलेले नाही. त्यामुळे आता या बाह्य गोष्टींची आवश्यकता नाही. तो योगी यज्ञ, तपःश्वर्या, दान यांच्या पलीकडे गेलेला असतो. त्या योग्याला अव्यक्त अशा परमपदाची प्राप्ती होते.

संपूर्ण अध्यायाचा निष्कर्ष

निष्कर्ष

या अध्यायामध्ये पाच प्रमुख मुद्यांचा विचार केला आहे. सातव्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्णांनी निर्माण केलेले प्रश्न स्पष्ट समजावून घेण्याच्या जिज्ञासेने या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाने सात प्रश्न विचारले – भगवन, आपण ज्याला ब्रह्म म्हणता ते ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय?

संपूर्ण कर्म म्हणजे काय? अधिदेव, अधिभूत आणि अधियज्ञ म्हणजे काय? आणि अंतकाळी आपल्याला कसे जाणता येईल की, ज्यामुळे एकदा जाणल्यानंतर आपले पुन्हा विस्मरण होणार नाही? यावर उत्तर देताना श्रीकृष्ण

म्हणाले की ज्याचा विनाश होत नाही, ते अक्षर असते तेच परब्रह्म होय. स्वत:मध्ये निर्माण झालेला परमभाव म्हणजे अध्यात्म होय. जेव्हा जीव मायेच्या मोहातून सुटून आत्म्याच्या ठायी स्थिर होतो, त्यालाच अध्यात्म

असे म्हणतात. शुभ आणि अशुभ संस्कारांच्यामुळे प्राणिमात्रांचे ठिकाणी जे विचार-भावना किंवा विकार निर्माण होतात ते निर्माण होण्याचे थांबणे-बंद होणे, यालाच संपूर्ण कर्म असे म्हणतात. यानंतर कर्म करण्याची आवश्यकता राहत नाही. कर्म म्हणजे अशी वस्तू आहे की जी संस्काराचे उद्गम स्थानच भगवंतामध्ये विलीन करून टाकते.

नश्वर प्राणिमात्रांना निर्माण करणारा क्षरभाव म्हणजेच अधिभूत होय. तोच प्राणिमात्रांचा अधिष्ठाता आहे. परमपुरुष हेच अधिदेव आहेत. दैवी संपदा त्यामध्येच लय पावत असते. या शरीरात अधियज्ञ मीच आहे, म्हणजे

ज्यामध्ये यज्ञ लय पावतो, तो मीच आहे. यज्ञाचा अधिष्ठाता मीच आहे. तो माझे स्वरूप प्राप्त करून घेतो. अधियज्ञ म्हणजे असा पुरुष की, जो शरीरामध्ये वास करीत असतो. तो शरीराच्या बाहेर असत नाही. अर्जुनाचा शेवटचा प्रश्न

असा होता की, अंतकाळी आपल्याला कशा प्रकारे जाणता येते? यावर योगेश्वरांनी उत्तर दिले की, जो माझे निरंतर स्मरण करतो, माझ्याशिवाय दुसरे कशाचेही स्मरण करत नाही व अशा स्मरणात लीन असताना जो देहत्याग

करतो, त्याला साक्षात स्वरूपाची प्राप्ती होते. अर्थात देहत्यागानंतरच स्वरूपप्राप्ती होते असा याचा अर्थ नाही. मनाचा संपूर्णपणे निरोध करणे व त्या विरुद्ध मनाचे परमात्म्यामध्ये लय पावणे, म्हणजे अंतकाळ होय. यानंतर

त्याला पुन्हा शरीर धारण करावे लागत नाही. कारण तो त्या परमपदाच्या ठायी स्थिर झालेला असतो. त्याचा मग पुनर्जन्म होत नाही.

श्रीकृष्णांनी अर्जुनाला निरंतर स्मरण करीत युद्ध करायला सांगितले; पण स्मरण आणि युद्ध या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा करता येतील? म्हणजे “हर हर महादेव ‘ म्हणायचे आणि लाठी चालवायची असा त्याचा अर्थ आहे

का? तेव्हा स्मरणाचे स्वरूप स्पष्ट करताना श्रीकृष्ण म्हणतात की, योगयुक्त होऊन माझ्याशिवाय अन्य कोणाचेही स्मरण न करता, निरंतर माझेच स्मरण

कर. जर स्मरण इतके सूक्ष्म आहे तर मग युद्ध कोण करेल? समजा हे पुस्तक म्हणजे भगवान आहे. तर त्याच्या आसपास असणाऱ्या वस्तू, समोर बसलेले लोक, किंवा अन्य कोणत्याही गोष्टी न पाहणे, त्यांचा विचार मनात न आणणे. आणि समजा त्यांचा विचार मनात आला किंवा त्यांना पाहिले तर ते स्मरण नव्हे, अशा स्मरणात युद्ध कसले ? वास्तविक जर तुम्ही निरंतर स्मरणात मग्न

व्हाल तर त्याच क्षणी तेथे युद्धाचे खरे स्वरूप प्रकट होते. मायेने निर्माण होणाऱया प्रवृत्ती विघ्नरुप बनून तेथे उभ्या राहतात. काम, क्रोध, राग, द्वेष हे शत्रू उभे ठाकतात आणि ते स्मरण करुन देत नाहीत. त्यांच्यावर विजय मिळवणे म्हणजे युद्ध करणे होय. या शत्रुंचा नाश झाल्यानंतर व्यक्‍ती परमपद प्राप्त करु शकते.

ही परमगती प्राप्त करण्यासाठी हे अर्जुना, तू ओम्‌’ चा जप कर आणि ध्यान माझे कर. नाम आणि रूप ही आराधनेची किल्ली आहे.

यानंतर योगेश्वरांनी पुनर्जन्म म्हणजे काय ते समजावले. त्यांनी सांगितले की ब्रह्मदेवापासून यावन्मात्र जगत्‌ पुनरावर्ती आहे. ते नष्ट झाले तरी माझे अव्यक्त स्वरूप नष्ट होत नाही.

योगाचे आचरण करणाऱ्या पुरुषांचे दोन मार्ग असतात. ज्याच्या अंतकाळी आत बाहेर संपूर्ण प्रकाश असतो, शुक्लपक्ष व उत्तपयणाचा काळ असेल व अशा स्थितीत जो निरंतर भगवंताचे स्मरण करतो तो परमगतीला पोहचतो.

आणि जो योगी भगवंताचे स्मरण करताना विचलित होतो. कृष्णपक्ष, दक्षिणायन, घोर अंधार अशा काळात जो देहत्याग करतो, तो सर्वसामान्य जिवात्म्याप्रमाणे

जन्म-मरणाच्या फेऱ्यात फिरत राहतो. अर्थात, पुनर्जन्म घेऊन मागील जन्मात अपूर्ण राहिलेली साधना तो पूर्ण करू शकतो.

अशा प्रकारे आधीच्या जन्मातील साधना नंतरच्या जन्मात पूर्ण करुनही योगी परमधामापर्यंत पोहोचू शकतो. यापूर्वीही श्रीकृष्णांनी सांगितले आहे की परमेश्वराच्या साधनेमुळे-आराधनेमुळे व्यक्‍ती जन्म-मरणाच्या भयापासून मुक्‍त

होते. “दोन्ही मार्ग शाश्वत आहेत’ ही गोष्ट जाणून घेतल्यानंतर कोणीही पुरुष योगसाधनेपासून विचलित होत नाही. म्हणून हे अर्जुना, तू योगी बन. योगी वेदाध्ययन, तपश्चर्या, यज्ञ आणि दान यामध्ये जे पुण्यफल आहे त्याच्या

पलीकडे जाऊन परमपदाची प्राप्ती करून घेतो.

या अध्यायामध्ये ठिकठिकाणी परमगतीचे चित्रण केले आहे. हे परमतत्त्व अव्यक्त, अक्षय आणि अक्षर आहे. त्याचा कधी क्षय अथवा विनाश होत नाही असे श्रीकृष्णांनी सांगितले आहे.

मूळ आठव्या अध्यायाची समाप्ती

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे

अक्षरब्रह्मयोगो नामाष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥

अर्थ

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील अक्षरब्रह्मयोग नावाचा हा आठवा अध्याय समाप्त झाला. ॥ ८ ॥

।। हरिः ��� तत्सत्‌ ।।

क्रमश श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८६.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment