श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८७

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८७

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८७ –

अध्याय नववा

राजविद्याराजगुह्ययोग

अध्याय ९ – राजविद्याराजगुह्ययोग – श्लोक क्र. ९.०१ ते ९.०४

श्री परमात्मने नमः

॥ अथ नबमोडध्यायः ॥

सहाव्या अध्यायापर्यंत श्रीकृष्णांनी योगाचे क्रमवार विवेचन केले आहे. त्या विवरणाचा शुद्ध अर्थ म्हणजे यज्ञविषयक कर्म-विधी किंवा प्रक्रिया! परमदेवाची प्राप्ती करून देणाऱया आराधनेचा विधीविशेष म्हणजे यज्ञ, त्यामध्ये हे चराचर जगत हवन स्वरूपात असते. मनाचा निरोध करून, निरुध्द झालेले मन जेव्हा परमेश्वराच्या ठिकाणी लय पावते तेव्हा अमृततत्त्वाचे ज्ञान प्राप्त होते. पूर्तिकालात यज्ञ ज्याची सृष्टी करतो, त्याचे ग्रहण करणारा ज्ञानी असतो आणि तो सनातन ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवतो. त्या मीलनाचे नाव योग आहे. या यज्ञाला कार्यरूप देणे, याला कर्म म्हणतात. सातव्या अध्यायात त्यांनी सांगितले की, हे कर्म करणारे व्याप्त ब्रह्म, संपूर्ण कर्म, संपूर्ण अध्यात्म, संपूर्ण अधिदेव, आधिभूत आणि आधियज्ञासह मला जाणतात. आठव्या अध्यायात त्यांनी सांगितले की हीच परमगती आहे, हेच परमधाम आहे.

प्रस्तुत अध्यायामध्ये योगेश्वर श्रीकृष्णांनी योगयुक्त पुरुषाचे ऐश्वर्य कसे असते याची स्वत: चर्चा केली आहे. सर्वत्र व्यापून राहिलेला असूनही तो कसा निर्लेप आहे? सर्व काही करत असूनही तो कसा अकर्ता आहे? याप्रमाणे त्या पुरुषाच्या स्वभावावर आणि त्याच्या प्रभावावर येथे प्रकाश टाकला आहे. योगाचे आचरण सुरु केल्यानंतर येणाऱ्या देवतारूपी विध्नांबाबत त्यांनी जागृत केले आणि त्या परमपुरुषाला शरण जाण्याबाबत भर दिला आहे.

मूळ नवव्या अध्यायाचा प्रारंभ:

मूळ श्लोक

श्रीभगवानुवाच

इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।

ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥ ९-१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, इदम्‌ = हे, गुह्यतमम्‌ = परम गोपनीय, विज्ञानसहितम्‌ = विज्ञानासहित असे, ज्ञानम्‌ = ज्ञान, तु = की, यत्‌ = जे, ज्ञात्वा = जाणल्यावर, (त्वम्‌) = तू, अशुभात्‌ = दुःखरूप संसारातून, मोक्ष्यसे = मुक्त होऊन जाशील, (तत्‌ ज्ञानम्‌) = ते ज्ञान, ते अनसूयवे = तुज दोष-दृष्टीरहित भक्ताला, (पुनः) प्रवक्ष्यामि = मी चांगल्याप्रकारे (पुन्हा) सांगेन ॥ ९-१ ॥

अर्थ

योगेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तू असूयारहित असा असल्याने अत्यंत गुह्य असे हे ज्ञान विज्ञानासहित मी तुला सांगतो. म्हणजे परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर तो महापुरुष कसा राहतो, सर्वत्र एकाच वेळी कसे काम करतो, तो सर्वाना कसा जागृत करतो, रथी बनून आत्म्याबरोबर कसा सदेव राहतो हे स्पष्ट करून तुला सांगेन. म्हणजे यत ज्ञात्वां त्याचे ज्ञान झाल्यानंतर तू या दुःखरुपी संसारातून मुक्‍त होशील. ते ज्ञान कसे आहे? हे सांगताना हे म्हणतात-

मूळ श्लोक

राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम्‌ ।

प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्‌ ॥ ९-२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

इदम्‌ = विज्ञानासहित ज्ञान हे, राजविद्या = सर्व विद्यांचा राजा, राजगुह्यम्‌ = सर्व गोपनीय गोष्टींचा राजा, पवित्रम्‌ = अतिपवित्र, उत्तमम्‌ = अतिउत्तम, प्रत्यक्षावगमम्‌ = प्रत्यक्ष फळ असणारे, धर्म्यम्‌ = धर्मयुक्त, (च) = आणि, कर्तुम्‌ सुसुखम्‌ = साधना करताना अतिशय सुगम, (तथा) = तसेच, अव्ययम्‌ = अविनाशी असे आहे ॥ ९-२ ॥

अर्थ

हे विज्ञानयुक्‍्त असे हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा आहे. विद्या म्हणजे भाषा; ज्ञान किंवा शिक्षण नाही. ‘विद्या हि का ब्रह्मगतिप्रदाया’ “सा विद्या या विमुक्तये । ‘ विद्या म्हणजे तिच्या आश्रयाला येणाऱ्याला ब्रह्मपथावर नेते आणि त्याला मग मोक्ष प्रदान करते ते ज्ञान ! जर ब्रह्मपथावर चालत असताना क्रव्धी-सिद्धींमुळे किंवा प्रकृतीमुळे साधक मोहीत झाला, तर तेथे अविद्या सफल झाली असे समजावे. विद्या साधकाला चुकीच्या मार्गाला नेत नाही. ही विद्या म्हणजे राजविद्या आहे. ती साधकाचे कल्याणच करते. हे ज्ञान

म्हणजे सर्व गुह्यांचा राजा आहे. अविद्या व विद्या यांचे अवगुंठण दूर झाल्यानंतर साधक योगयुक्त बनतो व मगच हे ज्ञान प्राप्त होते. हे ज्ञान अत्यंत पवित्र, उत्तम आणि प्रत्यक्ष फळ देणारे आहे. म्हणजे श्रद्धेने योगाचरण करा व त्याचे

रोकडे फळ प्राप्त करा. या जन्मी साधना करा म्हणजे पुढच्या जन्मात त्याचे ‘फळ मिळेल, असे म्हणणे म्हणजे अंधविश्वास होय. योगसाधनेने प्राप्त झालेल्या ज्ञानाचे फळ रोकडे असते. ते परमधर्म परमात्म्याशी जोडलेले असते.

विज्ञानसहित असणारे हे ज्ञान आचरण्यास सरळ असते व ते अविनाशी असते.

दुसर्‍या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितले होते की अर्जुना, या योगामध्ये बीज नष्ट पावत नाही. या योगाची अल्प साधना केली तरी जरामरणाच्या महान भयापासून मनुष्याचा उद्धार होतो. सहाव्या अध्यायामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले होते की, भगवन्‌, ज्या साधकाची योगसाधना शिथिल आहे किंवा ज्याने अर्धवट साधना केली असेल, अगर काही कारणास्तव ती त्याची अपूर्ण राहिली असेल तर तो साधक भ्रष्ट तर होत नाही ना? तो नष्ट तर पावत नाही ना ? यावर श्रीकृष्णांनी सांगितले होते की, अर्जुना, प्रथम कर्माला समजून घेणे आवश्यक आहे आणि समजून घेतल्यानंतर साधकाने थोडी जरी साधना केली असली, तरी कोणत्याही जन्मात ती कधी नष्ट होत नाही. उलट त्या साधनेच्या प्रभावामुळे साधक प्रत्येक जन्मात साधना करीत असतो. अशा अनेक जन्मातील साधनेच्या अभ्यासामुळे तो शेवटी परमात्म्याला प्राप्त करतो – तो परमगतीला जातो. त्याच योगसाधनेबाबत श्रीकृष्ण येथे

म्हणतात की, ही साधना अत्यंत सुगम व अविनाशी आहे, परंतु ती नितान्त श्रद्धेने करणे आवश्यक आहे.

मूळ श्लोक

अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप ।

अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ ९-३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

परन्तप = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) अर्जुना, अस्य = या (उपर्युक्त), धर्मस्य = धर्मामध्ये, अश्रद्दधानाः = श्रद्धारहित, पुरुषाः = पुरुष हे, माम्‌ = मला, अप्राप्य = प्राप्त करून न घेता, मृत्युसंसारवर्त्मनि = मृत्युरूप अशा संसारचक्रात, निवर्तन्ते = भ्रमण करीत राहतात ॥ ९-३ ॥

अर्थ

हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) अर्जुना, या आत्मज्ञानरूपी धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष माझी प्राप्ती न होता या मृत्युरूप संसार-मार्गावर भ्रमण करीत राहतात. तेव्हा श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण या मृत्युरूप संसाराच्या पलीकडे गेलेले आहात का? यावर श्रीकृष्ण उत्तर देतात

मूळ श्लोक

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।

मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः ॥ ९-४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अव्यक्तमूर्तिना मया = निराकार अशा मज परमात्म्याकडून, इदम्‌ = हे, सर्वम्‌ = सर्व, जगत्‌ = जग (पाण्याने व्याप्त असलेल्या बर्फाप्रमाणे), ततम्‌ = परिपूर्ण आहे, च = आणि, सर्वभूतानि = सर्व भूते, मत्स्थानि = माझ्यातील संकल्पाच्या आधारावर स्थित आहेत (परंतु, वास्तविक), तेषु = त्यांच्यामध्ये, अहम्‌ = मी, न अवस्थितः = स्थित नाही ॥ ९-४ ॥

अर्थ

माझ्या अव्यक्त रूपाने हे सर्व जग व्यापलेले आहे. म्हणजेच मी ज्या स्वरूपात स्थित आहे ते माझे अव्यक्त रूप सर्वत्र विस्तारलेले आहे. सर्व प्राणी माझे ठायी आहेत; परंतु मी त्यांच्यामध्ये स्थित नाही कारण मी अव्यक्त रूपात स्थित आहे. महापुरुष ज्या अव्यक्त स्वरूपात स्थित असतात

( देहत्यागानंतर त्याच अव्यक्त स्तरावरून ) तेथूनच बोलत असतात. हीच गोष्ट स्पष्ट करताना श्रीकृष्ण म्हणतात

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८७.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment