श्रीमद् भगवद् गीता भाग ८९ –
अध्याय ९ – राजविद्याराजगुह्ययोग – श्लोक क्र. ९.०९ ते ९.१२ | श्रीमद् भगवद् गीता भाग ८९
मूळ श्लोक
न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ।
उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥ ९-९ ॥
संदर्भित अन्वयार्थ
धनञ्जय = हे धनंजया (अर्थात अर्जुना), तेषु = त्या, कर्मसु = कर्मांमध्ये, असक्तम् = आसक्तिरहित, च = आणि, उदासीनवत् = उदासीनाप्रमाणे, आसीनम् = स्थित असणाऱ्या, माम् = मज परमात्म्याला, तानि = ती, कर्माणि = कर्मे, न निबध्नन्ति = बंधनात पाडीत नाहीत ॥ ९-९ ॥
अर्थ
हे धनंजया (अर्थात अर्जुना), चौथ्या अध्यायातील नवव्या श्लोकात श्रीकृष्णांनी सांगितले आहे को, महापुरुषाची कार्यप्रणाली अलौकिक आहे, दिव्य आहे. येथे ते हेच सांगत आहेत की धनंजया, जी कर्मे अव्यक्तरुपाने मी करीत असतो, त्यामध्ये मी आसक्त नसतो. अनासक्त व उदासीनप्रमाणे असलेल्या मला परमात्म स्वरूपाला ही कर्मे बद्ध करु शकत नाहीत. कारण कर्माच्या परिणामी जे लक्ष्य प्राप्त होत असते, त्यामध्ये मी स्थित असतो. त्यामुळे कर्मे करण्यासाठी मी बांधलेलो नाही. हा तर स्वभावाशी जोडलेल्या प्रकृतीच्या कार्याचा प्रश्न होता, महापुरुषाची राहणी होती, त्याची रचना होती. आता माझ्या आभासामुळे ज्या मायेची रचना होते ती काय आहे? तो पण एक कल्प आहे.९ ॥
मूळ श्लोक
मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् ।
हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥ ९-१० ॥
सदर्भित अन्वयार्थ
कौन्तेय = हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), मया = मज, अध्यक्षेण = अधिष्ठात्याच्या सान्निध्यामुळे, प्रकृतिः = प्रकृती, सचराचरम् = चराचरासहित सर्व जग, सूयते = उत्पन्न करते, (च) = आणि, अनेन = या, हेतुना = कारणानेच, जगत् = हे संसारचक्र, विपरिवर्तते = फिरत राहाते ॥ ९-१० ॥
अर्थ
हे अर्जुना, माझ्या उपस्थितीत, सर्वत्रव्याप्त असणाऱ्या माझ्या तीव्र इच्छेमुळे ही माया ( त्रिगुणमयी प्रकृती, अष्टधा मूल प्रकृती आणि चेतन ) चराचरासह जगाची रचना करते. तोच क्षुद्र कल्प आहे आणि त्याच्यामुळेच हा संसार आवागमनाच्या चक्रात भ्रमत असतो. ज्याच्यामध्ये कालपरिवर्तन आहे अशा या क्षुद्र कल्पाची रचना माझ्या तीव्र इच्छाशक््तीमुळे प्रकृती करीत असते. मी करीत नाही. परंतु सातव्या श्लोकाप्रमाणे आराधनेचा संचार व प्राप्तिपर्यत मार्गदर्शन करणारा कल्प यांची रचना महापुरुष स्वत: करतात. एका स्थानावर ते स्वत: कर्ता आहेत, जेथे ते निश्चित रूपाने निर्मिती करतात. येथे प्रकृती कर्ता आहे, जी केवळ आभासाने क्षणिक परिवर्तन करते. त्यातच शरीर
परिवर्तन, युग परिवर्तन व काल परिवर्तन इत्यादींचा समावेश होतो. असा व्यापक प्रभाव असूनही मूर्ख लोक मला जाणत नाहीत.
मूळ श्लोक
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ ९-११ ॥
संदर्भित अन्वयार्थ
मम = माझा, परम् = परम, भावम् = भाव, अजानन्तः = न जाणणारे, मूढाः = मूढ लोक हे, मानुषीम् = मनुष्याचे, तनुम् = शरीर, आश्रितम् = धारण करणाऱ्या, माम् = मज, भूतमहेश्वरम् = संपूर्ण भूतांचा महान ईश्वर असणाऱ्याला, अवजानन्ति = तुच्छ समजतात (म्हणजे आपल्या योगमायेने संसाराच्या उद्धारासाठी मनुष्यरूपात संचार करणाऱ्या मज परमेश्वराला साधारण मनुष्य समजतात) ॥ ९-११ ॥
अर्थ
संपूर्ण भूतांचा ईश्वर असलेल्या माझे उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूर्ख लोक मला मनुष्यशरीरधारी समजून मला तुच्छ समजतात, ते माझी अवहेलना करतात. सर्व प्राणिमात्रांच्या ईश्वरांच्या ईश्वराचे उत्कृष्ट स्वरूप-परमतत्त्व
म्हणजे मी आहे; परंतु मूर्ख लोक माझे हे श्रेष्ठ स्वरूप न जाणता मला मनुष्यधारी समजतात व मला मनुष्यच मानतात. परंतु त्यांचा दोष पण काय आहे? कारण जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांना महापुरुषाचे शरीरच दृष्टीस पडते. त्या महापुरुषाच्या शरीरात असणारा परमभाव-ईश्वरस्वरूप त्यांना दिसत नाही. ते त्या स्वरूपाला का पाहू शकत नाहीत? यावर योगेश्वर म्हणतात
मूळ श्लोक
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः ।
राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ॥ ९-१२ ॥
संदर्भित अन्वयार्थ
मोघाशाः = व्यर्थ आशा करणारे, मोघकर्माणः = व्यर्थ कर्म करणारे, मोघज्ञानाः = व्यर्थ ज्ञान असणारे, विचेतसः = चंचल चित्त असणारे अज्ञानी लोक, राक्षसीम् = राक्षसी, आसुरीम् = आसुरी, च = आणि, मोहिनीम् = मोहात पाडणाऱ्या, प्रकृतिम् एव = प्रकृतीचाच, श्रिताः = आश्रय घेऊन राहातात ॥ ९-१२ ॥
अर्थ
ते भ्रष्टचित्त व विवेकशून्य पुरुष राक्षसी व आसुरी अशा मोहमय प्रकृतीवर अवलंबून असणारे म्हणजेच त्या आसुरी स्वभावाचे असतात. त्यामुळे त्यांच्या आशा व्यर्थ होतात, त्यांची कर्म निरर्थक होतात आणि त्यांचे ज्ञानही निष्फळ
ठरते. त्यामुळे ते मला मनुष्य समजतात. आसुर व राक्षस ही काही जाती किंवा योनी नव्हे. तो एक मनाचा स्वभावच आहे. आसुरी स्वभाव असणारे लोक मला जाणू शकत नाहीत; परंतु महात्माजन मात्र मला जाणतात व मला भजत असतात.
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग ८९ .
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.