श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ९०

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ९०

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ९० –

अध्याय ९ – राजविद्याराजगुह्ययोग – श्लोक क्र. ९.१३ ते ९.१६ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ९०.

मूळ श्लोक

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः ।

भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्‌ ॥ ९-१३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तु = परंतु, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), दैवीम्‌ = दैवी, प्रकृतिम्‌ = प्रकृतीचा, आश्रिताः = आश्रय घेणारे, महात्मानः = महात्मा जन, भूतादिम्‌ = सर्व भूतांचे सनातन कारण, (च) = आणि, अव्ययम्‌ = नाशरहित अक्षरस्वरूप अशा, माम्‌ = मला, ज्ञात्वा = जाणून, अनन्यमनसः = अनन्य मनाने युक्त होऊन, भजन्ति = निरंतर भजतात ॥ ९-१३ ॥

अर्थ

हे पार्था, पण दैवी प्रकृतीचा म्हणजेच देवी संपदेचा आश्रय करणारे महात्मे, मी सर्व भूतांचे आदिस्थान, अव्यय व अक्षर आहे असे जाणून अनन्य भावाने म्हणजेच माझ्याशिवाय आपल्या अंतरंगात दुसऱ्या कोणालाही स्थान न देता माझी भक्ती श्रद्धेने करतात. ते माझी भक्ती कशा प्रकारे करतात? यावर योगेश्वर म्हणतात

मूळ श्लोक

सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः ।

नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ ९-१४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

सततम्‌ = निरंतर, कीर्तयन्तः = माझे नाम व गुण यांचे कीर्तन करणारे, च = तसेच, यतन्तः = माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्‍न करणारे, च = आणि, माम्‌ = मला (वारंवार), नमस्यन्तः = प्रणाम करणारे असे, दृढव्रताः = दृढ निश्चय असणारे भक्तजन, नित्ययुक्ताः = नेहमी माझ्या ध्यानात युक्त होऊन, भक्त्या = अनन्य प्रेमाने, माम्‌ = माझी, उपासते = उपासना करतात ॥ ९-१४ ॥

अर्थ

जे निरंतर चिंतनाबाबत दूढ आहेत, जे सतत माझ्या गुणांचे व नामाचे चिंतन करतात, माझ्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयत्न करतात आणि जे मला भक्तिपूर्वक नमस्कार करतात ते माझ्या ठायी नित्य चित्त ठेवून अनन्य श्रद्धेने माझी उपासना करतात. ते कोणत्या प्रकारची उपासना करतात? ते कीर्तनज्ञान कशा प्रकारचे असते? अर्थात योगेश्वरांनी कोणती दुसरी उपासना येथे सांगितली नाही; परंतु ज्याला त्यांनी ‘ यज्ञ ‘ म्हटले आहे व ज्याबद्दल त्यांनी विस्ताराने सांगितले आहे, तीच उपासना आराधना येथे पुन्हा थोडक्यात सांगितली आहे. पुढे तीच पुन्हा सांगताना म्हणतात

मूळ श्लोक

ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते ।

एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम्‌ ॥ ९-१५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अन्ये = दुसरे ज्ञानयोगी, ज्ञानयज्ञेन = ज्ञानयज्ञाच्या द्वारा, माम्‌ = मज निर्गुण-निराकार ब्रह्माचे, एकत्वेन = अभिन्न भावाने, यजन्तः अपि = पूजन करीत असले तरी सुद्धा (ते माझीच उपासना करतात), च = आणि (दुसरे पुरुष), बहुधा = पुष्कळ प्रकाराने स्थित असणाऱ्या, विश्वतोमुखम्‌ = मज विराट-स्वरूप परमेश्वराची, पृथक्त्वेन = पृथक्‌ भावाने, उपासते = उपासना करतात ॥ ९-१५ ॥

अर्थ

त्यांच्यापैकी काही तर सर्वन्यास विराट परमात्मा असा जो मी त्याची जझ्ञानयज्ञाने भजन करून उपासना करतात म्हणजेच आपली लाभ, हानी आणि शक्ती ओळखून आपले नियत कर्म, जे यज्ञ, त्यात प्रवृत्त होतात. कोणी एकत्वाने म्हणजेच अभेदभावाने माझी उपासना करतात. याप्रकारे अनेक तर्‍हेने माझी उपासना केली जाते. कारण एकाच यज्ञाचे हे सर्व उच्च-नीच स्तर आहेत. यज्ञाचा आरंभ सेवा हाच असतो; परंतु त्याचे अनुष्ठान कसे होते? योगेश्वर म्हणतात-यज्ञ मी करत असतो. जर महापुरुष सारथी बनला

नाही तर यज्ञ कधी पार पडणार नाही. त्या भगवंताच्या निर्देशनामुळेच साधक आपली योग्यता काय आहे, आपण अद्याप कोणत्या स्तरावर आहोत हे जाणून माझ्यापर्यंत पोहचतात. वास्तविक यज्ञकर्ता कोण असतो? यावर श्रीकृष्ण म्हणतात

मूळ श्लोक

अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम्‌ ।

मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम्‌ ॥ ९-१६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अहम्‌ = मी, क्रतुः = क्रतू आहे, अहम्‌ = मी, यज्ञः = यज्ञ आहे, अहम्‌ = मी, स्वधा = स्वधा आहे, अहम्‌ = मी, औषधम्‌ = औषधी आहे, अहम्‌ = मी, मन्त्रः = मंत्र आहे, अहम्‌ = मी, आज्यम्‌ = घृत आहे, अहम्‌ = मी, अग्निः = अग्नी आहे, (च) = तसेच, हुतम्‌ = हवनरूप क्रियासुद्धा, अहम्‌ एव = मीच आहे ॥ ९-१६ ॥

अर्थ

कर्ता मीच आहे. खरे पाहता कर्त्याच्यामागे प्रेरकरूपाने सदेव संचालित करणारा ‘इृष्ट’ देवच आहे. कर्त्याद्वारा जो पैलपार पोहचतो तो माझ्यामुळेच! यज्ञ मीच आहे. आराधनेचा विधी-विशेष म्हणजे यज्ञ होय. प्राप्तिकालात

यज्ञ ज्याची सृष्टी बनवतो, त्या अमृताचे पान करणारा पुरुष सनातन ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवतो. स्वधा मीच आहे. म्हणजे भूतकाळातील अनंत संस्कारांचा विलय करून त्यांना तृप्त करणारा मीच आहे. भवरोग नष्ट करणारी औषधी वनस्पती मीच आहे. मला प्राप्त करून लोक या भवरोगाच्या व्याधीपासून मुक्त होतात. मंत्र मीच आहे. मनाचा श्वासाच्या पोकळीत निरोध करणारा मीच आहे. अग्नी मीच आहे. माझ्याच प्रकाशात मनाच्या सर्व प्रवृत्ती विलय होत असतात. तसेच हवन म्हणजेच समर्पण मीच आहे.

येथे योगेश्वर पुनःपुनः हे मीच आहे, ते मीच आहे असे म्हणत आहेत. परंतु त्याचा अर्थ एवढाच की मीच प्रेरकाच्या रूपामध्ये आत्म्याशी अभिन्न होऊन उभा असतो, तसेच सतत मीच निर्णय देत योगक्रिया पूर्ण करवतो. यालाच ‘ विज्ञान ‘ असे म्हणतात. पूज्य महाराजश्री म्हणत की, जोपर्यंत इष्टदेव रथी होऊन श्वास-प्रश्नास यांचे नियंत्रण करत नाही, तोपर्यंत भजनाला आरंभच होत नाही. कोणी कितीही डोळे बंद करो, भजन करो, तपश्चर्येने शरीराला तापवो; परंतु जोपर्यंत ज्या परमात्म्याविषयी आम्हाला प्रेम आहे व आम्ही ज्या पायरीवर उभे आहोत त्या स्तरावर उतरून तो आत्म्याशी अभिन्न राहून जागृत होत नाही, तोपर्यंत भजनाचे खरे स्वरूप समजत नाही. म्हणूनच महाराजश्री म्हणत, माझ्या स्वरूपाला पकडून ठेवा, मी तुम्हाला सर्व काही देईन. येथे श्रीकृष्ण तेच म्हणत आहेत – सर्व माझ्यामुळे होत आहे.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ९०.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment