श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ९२

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ९२

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ९२ –

अध्याय ९ – राजविद्याराजगुह्ययोग – श्लोक क्र. ९.२१ ते ९.२४ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ९२.

मूळ श्लोक

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।

एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥ ९-२१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तम्‌ = त्या, विशालम्‌ = विशाल अशा, स्वर्गलोकम्‌ = स्वर्गलोकीचे, भुक्त्वा = भोग घेऊन, पुण्ये = पुण्य, क्षीणे = क्षीण झाल्यावर, ते = ते, मर्त्यलोकम्‌ = मृत्युलोकात, विशन्ति = प्राप्त होतात, एवम्‌ = अशाप्रकारे (स्वर्गाचे साधनरूप असणाऱ्या), त्रयीधर्मम्‌ = तीन वेदांत सांगितलेल्या सकाम कर्मांचा, अनुप्रपन्नाः = आश्रय घेणारे, कामकामाः = भोगांची कामना असणारे पुरुष, गतागतम्‌ = पुन्हा पुन्हा गमन-आगमन, लभन्ते = प्राप्त करून घेतात (म्हणजे पुण्याच्या प्रभावाने स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्युलोकात येतात) ॥ ९-२१ ॥

अर्थ

तो विशाल स्वर्गलोक भोगल्यावर पुण्याची पुंजी संपली को ते पुन्हा मृत्युलोकात प्रवेश करतात. म्हणजे जन्म-मृत्यूचा फेऱ्यात पुन्हा अडकतात. अशा प्रकारे ‘त्रयीधर्मम ‘ प्रार्थना, समत्व आणि यजन तीन विधीनी एकाच यज्ञाचे अनुष्ठान करणारे माझ्या आश्रयाला आलेले असूनही स्वर्गाची कामना

करणारे पुरुष स्वर्गमृत्यूच्या येरझारा करतात. म्हणजेच ते पुनर्जन्म पावतात. परंतु या लोकांचे पुण्याचे बीज नष्ट होत नाही. तेव्हा साधकांनी स्वर्गभोगाची कामना करता कामा नये. जे कोणत्याही प्रकारची कामना ठेवत नाहीत त्यांना

काय प्राप्त होते?

मूळ श्लोक

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥ ९-२२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

माम्‌ = मज परमेश्वराचे, चिन्तयन्तः = निरंतर चिंतन करीत, ये = जे, अनन्याः = अनन्य प्रेमी असे, जनाः = भक्तजन, माम्‌ = मज परमेश्वराला, पर्युपासते = निष्काम भावाने भजतात, नित्याभियुक्तानाम्‌ = नित्य निरंतर माझे चिंतन करणाऱ्या, तेषाम्‌ = त्या पुरुषांचा, योगक्षेमम्‌ = योगक्षेम, अहम्‌ = मी स्वतः, वहामि = (त्यांना) प्राप्त करून देतो ॥ ९-२२ ॥

अर्थ

जे ‘ अनन्य भावाने’ माझ्या ठिकाणी स्थित असणारे भक्तजन माझ्या परमात्म स्वरूपाचे निरंतर चिंतन करतात, ‘ पर्युपासते ‘ अत्यंत एकनिष्ठेने अनन्य भावाने माझी उपासना करतात, त्या सतत माझ्या ठायी अनन्य भावाने युक्त असणाऱ्या पुरुषांचा योगक्षेम मी स्वतः चालवितो. म्हणजेच त्यांनी प्राप्त केलेल्या योगाचे रक्षण करण्याची जबाबदारी मी स्वत: उचलतो. तरीही लोक अन्य देवतांची उपासना करतात.

मूळ श्लोक

येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ।

तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्‌ ॥ ९-२३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कौन्तेय = हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), अपि = जरी, श्रद्धया = श्रद्धेने, अन्विताः = युक्त असे, ये भक्ताः = जे सकाम भक्त, अन्यदेवताः = दुसऱ्या देवतांचे, यजन्ते = पूजन करतात, ते = ते, अपि = सुद्धा, माम्‌ एव = माझीच, यजन्ति = पूजा करतात (परंतु त्यांचे ते पूजन), अविधिपूर्वकम्‌ = अविधिपूर्वक म्हणजे अज्ञानपूर्वक असते ॥ ९-२३ ॥

अर्थ

हे कोन्तेया, जे श्रद्धेने युक्त असलेले भक्त माझ्याहून अन्य देवतांची पूजा करतात; ते देखील माझीच पूजा करतात. कारण अन्य देवता अस्तित्वातच नाहीत. परंतु त्यांचे पूजन हे अविधीपूर्वक असते. माझ्या प्राप्तीसाठी लागणारा

विधी त्या स्थानी नसतो.

या ठिकाणी योगेश्वर श्रीकृष्णांनी दुसऱ्यांदा देवतांचा मुद्दा विचारात घेतला आहे. सर्वप्रथम सातव्या अध्यायातील विसाव्या श्लोकात त्यांनी सांगितले होते की, अर्जुना, उपभोगांची इच्छा करणाऱ्या लोकांचे ज्ञान भ्रष्ट झाल्याने ते

मूढबुद्धी पुरुष ज्या देवतांचे अस्तित्वच नाही अशा अन्य देवतांची अज्ञानाने पूजा करतात. पिंपळ, दगड, भूत, भवानी किंवा जेथे त्यांची श्रद्धा दृढ होते त्याची ते पूजा करतात. वास्तविक त्या ठिकाणी मीच उभा राहतो आणि त्या देवतांबरील त्यांच्या श्रद्धेला दृढ करतो. मीच तेथे फलाची योजना करतो, मीच त्यांना फळ देतो. त्यांना त्यांच्या भक्तीचे फळ निश्चितपणे मिळत असते; परंतु ते फळ नाशवंत असते. ते आज आहे, तर उद्या त्याचा उपभोग घेतला जाईल, परवा ते नष्ट होईल. परंतु माझा भक्त नष्ट पावत नाही. परंतु मूढबुद्धीचे तसेच ज्यांचे ज्ञान भ्रष्ट झाले आहे असे अज्ञानी अन्य देवतांची पूजा करतात.

प्रस्तुत अध्यायात तेविसाव्या इलोकापासून पंचविसाव्या ह्लोकापर्यंत योगेश्वर श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा सांगितले आहे की, जे लोक श्रद्धापूर्वक अन्य देवतांना पूजतात ते वास्तविक मलाच पूजत असतात. परंतु त्यांचे पूजन अविधीपूर्वक असते. आता प्रश्‍न असा की जर अन्य देवतांच्या स्वरूपात आपल्यालाच पूजतात व त्याचे फळही आपण देता. मग त्यात काय दोष आहे?

मूळ श्लोक

अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।

न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ॥ ९-२४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

हि = कारण, सर्वयज्ञानाम्‌ = संपूर्ण यज्ञांचा, भोक्ता = भोक्ता, च = आणि, प्रभुः च = स्वामीसुद्धा, अहम्‌ एव = मीच आहे, तु = परंतु, माम्‌ = मज परमेश्वराला, ते = ते, तत्त्वेन = तत्त्वतः, न अभिजानन्ति = जाणत नाहीत, अतः = म्हणून, च्यवन्ति = च्युत होतात म्हणजे पुनर्जन्म प्राप्त करून घेतात ॥ ९-२४ ॥

अर्थ

न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातशश्‍च्यवन्ति ते॥।२४॥।

सर्व यज्ञांचा मी भोक्ता आहे. म्हणजे यज्ञ ज्यामध्ये विलय पावतो व यज्ञापासून जे फल प्राप्त होते ते मीच आहे. सर्व यज्ञांचा स्वामी मीच आहे परंतु ते माझे परमतत्त्व यथार्थ रूपाने जाणत नसल्याने ‘ च्यवन्ति’ घसरतात. म्हणजेच ते कधी अन्य देवतांमध्ये घसरतात आणि माझे परमतत्त्व जोपर्यंत जाणत नाहीत, तोपर्यंत उपभोगांच्या कामनेमुळे घसरतात. मग अशांची गती काय असते?

क्रमशःश्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ९२.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment