सुभाष बावनी भाग १२ | सुभाष-विठ्ठलभाई प्रकटन

सुभाष बावनी भाग १२ | सुभाष-विठ्ठलभाई प्रकटन

सुभाष बावनी भाग १२ | सुभाष-विठ्ठलभाई प्रकटन –

“सुभाष तुला या व्हिएन्नाच्या स्थानकावर पाहून मला एकाच वेळी आनंदही होत आहे आणि दुःखही!”

विठ्ठलभाई पटेलांनी रेल्वेतून उतरताच त्यांना घ्यायला आलेल्या सुभाषला पाहून म्हटलं. व्हिएन्नातील उपचारांना सुभाषबाबूंची प्रकृती हळूहळू प्रतिसाद देत होती. अजून अशक्तपणा पुरता गेला नव्हता, पण तरीही अमेरिकेचा दौरा करून उपचारासाठीच व्हिएन्ना येथे येणाऱ्या विठ्ठलभाई पटेलांना घ्यायला ते आनंदाने स्टेशनवर आले होते. दगदगीने दोघांनाही श्वास लागला होता, पण तरीही सुभाषला पाहून वृद्धत्वाकडे झुकलेल्या विठ्ठलभाईंच्या चेहऱ्यावरचा आनंद काही लपत नव्हता.

“आनंद कशासाठी?” सुभाषबाबूंनी मिश्किलपणाचा आव आणत विचारले.

“आनंद यासाठी की युरोपातल्या परक्या, भावनाशून्य चेहऱ्यांमध्ये मला सुखदुःखाच्या गोष्टी करण्यासाठी ओळखीचं-आपल्या मातीतलं कुणीतरी गवसलं”

“आणि दुःख?”

“दुःख यासाठी की भारतातल्या ऐन अटीतटीच्या प्रसंगात आमचा एक योद्धा जायबंदी असल्यामुळे रणांगणात उतरू शकत नाही.” दोघेही खळाळून हसले.

सुभाषबाबू स्वतः ज्या ‘दी फ्रान्स’ हॉटेलमध्ये उतरले होते, तिथेच त्यांनी विठ्ठलभाईंना आणलं.

“इथे तर तुला पोलिसांचा काही त्रास नाही ना सुभाष?”

“नाही कसा? मुंबईच्या किनाऱ्यापासून तर या ‘दी फ्रान्स’ हॉटेलपर्यंत गुप्तचरांचा पाठलाग सुरू आहे. एक जण तर या हॉटेलात उतरला आहे. बोला!” सुभाषबाबू हसत हसत म्हणाले. त्यांना या पाठलागाची जणू सवयच झाली होती.

“मला त्याचं काही नाही विठ्ठलभाई; पण परक्यांच्या सांगण्यावरून मला माझ्याच देशातून बाहेर पडावं लागलं, याचं जास्त वाईट वाटतं.”

“युद्धात कधी दोन पावलं पुढे तर कधी दोन पावले मागे करावंच लागतं, नाही का?”

“युद्ध? मग ते युद्धासारखंच लढले पाहिजे नं विठ्ठलभाई? इथे आमचा सेनापतीच आम्हाला शस्त्र उचलू देत नाही.”

“तू कोणाविषयी बोलतो आहेस हे समजतंय मला सुभाष; पण गांधीजींचा अनुभव दांडगा आहे, हे विसरू नकोस.”

“गांधीजींच्या अनुभवाबद्दल आणि त्यांची भारतीय मनावरची पकड याबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे. परवा किट्टी कुर्टी मला भारताबद्दल विचारत होती, तेव्हा मीच तिला म्हटलं ‘जर तुला भारत समजून घ्यायचा असेल तर सर्वात आधी गांधीजी वाचावे लागतील’ पण याचा अर्थ इतर कुणाला काहीच कळत नाही असा नाही ना?

“बरं मग तुझं काय म्हणणं आहे? अजून काय केलं पाहिजे स्वातंत्र्यासाठी?” विठ्ठलभाईंनी कौतुकाने सुभाषकडे पाहत विचारलं.

“परतंत्र देशाला स्वातंत्र्य हेच ध्येय, आणि मिळेल तो मार्ग! त्यात हा चांगला तो वाईट; हा पवित्र तो त्याज्य अशी वर्गवारी करून काय हशील? नेतृत्वाने या सगळ्या मार्गांचा अवलंब करण्यात कचरता कामा नये.”

“तुझी तगमग समजते मला सुभाष! आणि शेवटी ज्यांना उद्या आंदोलनाची सूत्रे पेलायची आहेत त्यांच्याच गतीने आम्हालाही धावलं पाहिजे. मी तुझ्या पाठीशी आहे”

विठ्ठलभाईंचे शब्द ऐकून सुभाषबाबूंची चर्या खुलली. ते विठ्ठलभाईंचा हात हाती घेऊन म्हणाले,

“आपण दोघं मिळून एक पत्र काढूयात? कराल तुम्ही स्वाक्षरी?”

“का नाही करणार? तू पत्रक तयार कर. मी ते ‘संडे इविनिंग पोस्ट’ मध्ये प्रकाशित करण्याची व्यवस्था करतो. आल्फ्रेड टिर्नाएट संध्याकाळीही आपला पत्रक घ्यायला येईल.”

संयुक्त पत्रकातली भाषा पाहून आल्फ्रेड उडालाच,

“गांधीजी म्हणजे घरातलं अडगळीत पडलेले फर्निचर? नेतृत्व बदलाची गरज? माफ करा पण विठ्ठलभाई हे जरा जास्तच नाही होत का?”

“अरे बाबा ते मी दुरुस्त करून जरा मऊ करून घेतलं आहे. या आधीची भाषा तू वाचायला हवी होतीस. विठ्ठलभाई हसत हसत म्हणाले. सुभाषच्या मुखाने प्रत्यक्ष हिंदुस्थानातल्या तरूणांचं मनच बोलत आहे. हे मन कदाचित शहाणं असेल किंवा पराकोटीचे मूर्ख असेल. कदाचित ते काहीतरी भव्यदिव्य करून दाखवील वा कदाचित आत्मघातकही करून घेईल; पण आज मला या तरुणाईच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.”

सुभाष- विठ्ठलभाई दोघांनीही पत्रकावर सह्या केल्या व ते प्रसिद्धीसाठी आल्फ्रेडच्या हाती सोपवलं.

विठ्ठलभाईंची प्रकृती बिघडत चालली होती. सुभाषबाबू स्वतःची तब्येत सांभाळून त्यांची काळजी घेत होते. विठ्ठलभाईंना आता जिनिव्हाजवळील ग्लांड येथील रुग्णालयात हलवले. काही निश्चित सांगता येत नव्हते.

“आता आपलं काही खरं नाही” हे विठ्ठलभाईंनी ताडलं. त्यांनी लगोलग मृत्यूपत्र लिहायला घेतलं.

“माझ्या पार्थिव देहावर लोकमान्य टिळकांना जिथे अग्नी दिला, तिथे अंतिम संस्कार केले जावेत; आणि माझ्या संपत्तीतले एक लक्ष रुपये देशाच्या स्वातंत्र्यासाठी परदेशात प्रचार करता यावा, यासाठी श्री सुभाषचंद्र बोस यांना देण्यात यावे.”

ग्लांड येथे त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होतेय, असं वाटत असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन २२ ऑक्टोबर १९३३ ला विठ्ठलभाईंचा मृत्यू झाला.

विठ्ठलभाईंचा मृतदेह सुभाषबाबूंनी मार्सेलिस येथून ‘नरकुंडा’ बोटीने मुंबईला पाठवला.

दुर्दैवाने विठ्ठलभाईंच्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत. पहिली इंग्रज सरकारने गिरगाव चौपाटीवर अग्नीदाह करण्यास परवानगी नाकारल्यामुळे आणि दुसरी त्यांचे बंधू वल्लभभाई पटेल यांनी सुभाषबाबूंना एक लक्ष रुपये देण्यावर आक्षेप घेतल्यामुळे.

विठ्ठलभाईंच्या मृत्यूमुळे सुभाषचंद्रांना त्या परक्या मुलखात एकाएकी पोरकं झाल्यासारखं वाटू लागलं. आपल्या विचाराला पाठिंबा देणारा एक वडीलकीचा हात त्यांच्या डोक्यावरून नाहीसा झाला होता. राजकीय अनाथपण पुरेसं नाही म्हणून की काय, कलकत्त्यात जानकीनाथ बोसांची प्रकृती बिघडली. ही बातमी सुभाषबाबूंना माहीत होताच ते निर्बंधांचा, पोलिसांचा, सरकारचा कुणाचाही विचार न करता भारतात येतील, हे ताडून ब्रिटिश शासनव्यवस्थेनं अगोदरच कलकत्त्यात मोर्चेबांधणी सुरू केली होती. पोलिसांच्या गाड्या सायरनचा कर्कश्श आवाज करत डमडम विमानतळाकडे केव्हाच रवाना झाल्या होत्या.

क्रमशः सुभाष बावनी भाग १२ | सुभाष-विठ्ठलभाई प्रकटन.

ग्रंथ सूची:
१) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी.
२) नेताजी- वि. स. वाळिंबे.
३) महानायक- विश्वास पाटील.

(प्रस्तुत लेख हे लेखकाच्या आगामी पुस्तकातील निवडक अंश आहेत. विस्तृत लेख २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या “सुभाष बावनी” या पुस्तकात वाचावेत.)

लेखक- अंबरीश पुंडलिक

Leave a comment