सुभाष बावनी भाग १५ | अध्यक्षपदी पुनर्निवड

सुभाष बावनी भाग १५ | अध्यक्षपदी पुनर्निवड

सुभाष बावनी भाग १५ | अध्यक्षपदी पुनर्निवड –

“आचार्य नरेंद्र देवांसारखा सारखा जहाल गटाचा एखादा माणूस जर अध्यक्ष होणार असेल, तर मी या क्षणी माघार घ्यायला तयार आहे मेजदा!” सुभाषबाबूंच्या काँग्रेस अध्यक्षपदासाठी पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यावरून बोस बंधूंमध्ये जोरदार चर्चा सुरु होती.

“अरे पण जहाल गटाचाच का?” शरदबाबूंनी विचारलं.

“कारण म्युनिक करारानंतर हिटलर ज्याप्रमाणे बेफाम वागतोय, त्यावरून फार तर आणखी सहा महिन्यात युरोपात युद्ध पेट घेईल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. इंग्लंड त्या युद्धात अपरिहार्यपणे ओढला जाईल , अशा परिस्थितीत स्वातंत्र्याचे आंदोलन तीव्र करू शकेल असाच माणूस काँग्रेसच्या अध्यक्षपदी हवा.”

“एक माणुस सलग दोनदा अध्यक्ष होण्याचा प्रघात नाही, असं सर्वांचं म्हणणं आहे.”

“अस्सं? मग दोनच वर्षांपूर्वी जवाहर सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?”

“अरे पण महात्माजी रागवतील त्यामुळे”

“महात्माजींपेक्षाही देश महत्त्वाचा आहे मेजदा!”

ठरले! अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार- सुभाषचंद्र बोस विरुद्ध पट्टाभि सीतारामय्या!

सुभाषचंद्रांच्या विरोधात सगळे द्रोणाचार्य – कृपाचार्य एकत्र आले होते. चहुबाजूंनी वातावरण निर्माण केले जात होते. काँग्रेसची अवघी प्रचार यंत्रणा पट्टाभिंच्या मागे उभी राहिल्याचे दिसत होते. निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे, हे निवडणुकीच्या आधीच स्पष्ट होत होते.

याच काळात शरदबाबूंचा मुलगा अशोकनाथचा विवाह सोहळा कलकत्त्यात पार पडला. एकीकडे लग्नातील पाहुण्यांचे स्वागत तर दुसरीकडे एकामागोमाग एक येणारे मतमोजणीचे आकडे. सुभाषबाबू सोडून संपूर्ण बोस कुटुंब बातमी घेऊन येणाऱ्याकडे धास्तावून पाहत होते. मतमोजणीतल्या उतार-चढावांनी बेचैन होत होते.

रात्री उशिरा केव्हातरी मतमोजणी आटोपली. लग्नसोहळा आटोपून लोक आपापल्या घरी गेले होते. सगळीकडे निजानीजही झाली होती. बोस कुटुंब मात्र जागे होते. शरदबाबू व्हरांड्यात सचिंतपणे फेऱ्या मारत होते, तो त्यांना दुरून अमियनाथ धावत येत असलेला दिसला. अमियनाथ धापा टाकत सांगू लागला-

“रंगाकाकाबाबु दोनशे पाच मतांनी निवडून आले.” झालं! झोपी जात असलेल्या कलकत्ता शहराला पुन्हा जाग आली. पुन्हा दिवे, पुन्हा रोषणाई, पुन्हा फटाके या सगळ्यांनी आसमंत दणाणून गेला. बोस कुटुंबात जल्लोष साजरा होऊ लागला. रसगुल्ल्याची चव आता जास्तच गोड लागत होती. रात्री उशिरापर्यंत फटाक्यांचे आवाज येतच होते.

विभावती शरदचंद्रांपाशी येत म्हणाल्या,

“झालं ना मनासारखं? आता तरी मिटली का चिंता? चला आता झोपायला.”

शरदबाबू गंभीरपणे म्हणाले,

“चिंता वाढलीये विभा! सुभाषनं या निवडणुकीत विजयी होऊन खूप मोठा अपराध केला आहे.”

विभावतींना आश्चर्य वाटलं, पण त्या काही बोलल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी जेव्हा गांधीजींचं पत्रक आलं तेव्हा साऱ्यांनाच शरदबाबूंच्या वाक्याचा खुलासा झाला. गांधीजींचे शब्द होते-

“पट्टाभींनी उमेदवारी मागे न घेणं हा माझ्याच आग्रह होता, त्यामुळे पट्टाभींपेक्षा हा माझाच पराभव अधिक ठरतो. ज्यांना कुणाला सुभाषबाबूंचा कार्यक्रम आवडत नसेल त्यांनी खुशाल काँग्रेसमधून बाहेर पडावं. जे अशाप्रकारे बाहेर पडतील, तेच काँग्रेसचे खरेखुरे प्रतिनिधी होत; हेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो. शेवटी काहीही झाले तरी सुभाष काही या देशाचा शत्रू नाही. त्याला माझ्या शुभेच्छाच आहेत!”

योग्य तो संदेश योग्य त्या लोकांपर्यंत गेला होता. ज्यांच्यासाठी होता त्यांना तो समजलाही होता. तात्काळ या सुचनेवर कार्यवाही सुरू झाली. सुभाषबाबूंच्या राहत्या घरी सरदार पटेल, राजेंद्रप्रसाद, आचार्य कृपलानी आदी बारा मातब्बर सदस्यांनी आपले राजीनामे पोस्टाने पाठवून दिले. सुभाषबाबूंच्या कार्यकारणीत आता खऱ्या अर्थाने सुभाष आणि शरद हे दोघे बोस बंधूच उरले.

सुभाषबाबू किंचितही अस्वस्थ न होता गांधीजींच्या मोठेपणाचा मान ठेवून वर्ध्याला आले आणि म्हणाले,

“बापू! निवडणुकीत पत्रकांचा, शेलक्या टिप्पण्यांचा धुरळा उडतच असतो. तो निवळल्यानंतर हे सगळं आपोआप शांत होतं. आपण सगळे एक आहोत. सध्याच्या काळात जर काँग्रेससारख्या पक्षात फूट पडली, तर त्याचे देशाच्या भवितव्यावर अनिष्ट परिणाम होतील.

“इथे- वर्ध्याला, तुमच्या साक्षीनं सर्वांना बोलावून शांतपणे चर्चा करू आणि पुढची दिशा ठरवू”

“बघ तुला जमेल तसं!” महात्म्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. त्यांच्या अंतर्मनातली खदखद काही अजून शांत झालेली नव्हती.

वर्ध्याहुन परत येताना पुढच्या आठवड्यातील बैठकीत कोणते मुद्दे घ्यायचे याचा विचार करत करत सुभाषबाबू कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांचा काळवंडलेला चेहरा पाहून सहप्रवासी म्हणाला, “तुम्हाला इन्फ्लुएन्झा झालेला असावा”

गलितगात्रपणे सुभाषबाबू बर्थवर पडून राहिले आणि कसेतरी घरी पोहोचले.

“डॉक्टर काहीही करा; मला पुढच्या आठवड्यातील वर्ध्याच्या बैठकीस हजर राहता येईल असं पहा.” अंगात एकशे पाच ताप घेऊन सुभाषबाबू डॉक्टरांना विनवत होते.

“वर्ध्याची बैठक विसरा. तुम्हाला त्रिपुरीच्या अधिवेशनापर्यंत कसे ठीक करता येईल याची काळजी आहे आम्हाला” डॉक्टर म्हणाले.

आजाराचे निदान काही केल्या होईना. वर्ध्याला जमलेल्या सर्वांना हा आजार म्हणजे ढोंग, पळवाट वाटत असला तरी जनतेला मात्र काळजी वाटत होती. बोसांच्या निवासस्थानी ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक औषधांचे ढीग देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून येऊन पडले. लवकरच त्यात पूजेतील निर्माल्य व मजारीवरील फुले याची भर पडली. कुणी म्हणे

सुभाषबाबूंवर विषप्रयोग झाला आहे, तर कलकत्ता विद्यापीठातील एक प्राध्यापक म्हणाले,

“तंत्रमार्गातील मारण क्रियेचा तुमच्यावर प्रयोग करण्यात आला आहे.” आता येणाऱ्या साहित्यात गंडे व ताईत यांचीही भर पडली.

“सुभाष जीवापेक्षा काही अधिवेशन मोठं नाही. तुला त्रिपुरीला जाता येणार नाही” डॉक्टर बंधू सुनीलचंद्र म्हणाले.

“नाही दादा, ‘सुभाष घाबरला’ असं कुणालाही वाटता कामा नये. जे काय व्हायचं असेल ते तिथे जाऊन होऊ दे. पण त्रिपुरीला गेलेच पाहिजे”

प्रवासाची तयारी सुरू झाली. त्रिपुरीत रणांगण आखलं गेलं होतं. त्यावर उतरायला आधीच रथचक्र

भूमीने गिळलेला सेनापती स्ट्रेचरवर आरुढ होऊन निघाला. ब्रिटिशांशी लढण्यासाठी स्थापन झालेल्या पक्षातील या सर्व योद्ध्यांना क्षुद्र अहंकारासाठी एकमेकांविरुद्ध उभे राहिलेले पाहून, प्लासीच्या लढाईत ‘आपल्यांच्या’च गद्दारीने पराभूत

झालेल्या सिराज उद्दौलाचा आत्मा हळहळत होता.

क्रमशः

ग्रंथ सूची:
१) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी
२) नेताजी- वि. स. वाळिंबे
३) महानायक- विश्वास पाटील

(प्रस्तुत लेख हे लेखकाच्या आगामी पुस्तकातील निवडक अंश आहेत. विस्तृत लेख २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या “सुभाष बावनी” या पुस्तकात वाचावेत. शेअर करताना लेखकाच्या नावसाहितच शेअर करावेत.)

लेखक- अंबरीश पुंडलिक, ९८९०५३१२२०

Leave a comment