सुभाष बावनी भाग १६ |  त्रिपुरीतील रण

सुभाष बावनी भाग १६

सुभाष बावनी भाग १६ |  त्रिपुरीतील रण –

“काय हो? खरंच आजारी आहेत का सुभाषबाबू?” त्रिपुरी येथील राहुट्या-राहुट्यांमध्ये एकच प्रश्न विचारला जात होता.

“कसलं काय हो? आधी मारे वय-वर्तमान न पाहता गांधीजींना विरोध केला आणि आता तोंड लपवत फिरताहेत.”

अध्यक्षांच्या राहुटीत मात्र कलकत्त्यावरुन आलेल्या तसेच स्थानिक डॉक्टरांची गडबड उडालेली होती. ब्रॉंकोन्यूमोनियावर आता सर्वांचंच एकमत होत आलं होतं. काँग्रेसचं बावन्नावं अधिवेशन असल्यामुळे बावन्न हत्ती शोभायात्रेसाठी सज्ज होते. एक्कावन्न हत्तींच्या अंबारीत याआधीच्या एक्कावन्न अध्यक्षांच्या प्रतिमा आणि बावन्नाव्या विशेष शृंगारलेल्या हत्तीवर विद्यमान अध्यक्ष विराजमान होणार; वाजत-गाजत अधिवेशन स्थानी पोहोचणार अशी योजना होती. प्रत्यक्षात मात्र स्ट्रेचरवर गलितगात्र अवस्थेत पडलेल्या अध्यक्षांचा देह घेऊन स्वयंसेवक अधिवेशन स्थानी धावत होते. पण हे दृश्य पाहायला ‘श्रेष्ठी’ होते कुठे? ते तर राहुटीत बसून अध्यक्षांच्या बनावट आजाराच्या कंड्या पिकवण्यात मशगुल होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीचा देखावा मात्र चित्र पुरेसं स्पष्ट करून गेला.

मंचावर अध्यक्षांच्या खुर्चीच्या जागी रुग्ण शय्या! त्यावर उशाशी थोडा उंचवटा करून छातीपर्यंत ब्लॅंकेट ओढलेले सुभाषबाबू! अध्यक्षांचं भाषणही शरदबाबूंनी वाचून दाखवलं. ते संपताच डौलदार पावले टाकीत गोविंद वल्लभ पंत मंचाच्या दिशेने निघाले. सुभाषबाबूंच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह! डोक्यावरची पांढरी स्वच्छ टोपी ठीकठाक करत, आपल्या भरदार मिशांवरून हात फिरवत पंतांनी बोलायला सुरुवात केली,

“दैवयोगाने रशियाला लेनिन, जर्मनीला हिटलर आणि इटलीला मुसोलिनी लाभले; तसेच भारताला गांधीजी लाभले आहेत. अशा या दैवी देणगीचा आपण उपयोग करून घेतला नाही, तर आपल्यासारखे करंटे आपणच ठरू. यामुळे या सर्व एकशेसाठ अनुभवी सदस्यांना मनापासून असे वाटते की, विद्यमान अध्यक्षांनी महात्मा गांधींची इच्छा लक्षात घेऊनच आपली नवी कार्यकारिणी जाहीर करावी”

“हे विद्यमान अध्यक्षांचे हात बांधण्यासाठी रचलेलं चक्रव्यूह आहे. सुभाषबाबू ठराव फेटाळा!” नरिमन, शार्दुलसिंग ओरडले.

“ठराव दाखल करून घ्यावाच लागेल” उजव्या गटाचे लोक गलका करू लागले. तेवढ्यात सुभाषबाबूंनी हात वर केला, तशी शांतता पसरली. आता हा अभिमन्यु चक्रव्यूहात शिरतो की चक्रव्यूहाचा पटच उधळून लावतो, याकडे सर्वांचे डोळे लागले.

“सर्वांना आपलं मत मांडण्याची संधी मिळायला हवी असं लोकशाही सांगते” सुभाषबाबूंनी सुरुवात केली,

“या लोकशाहीच्या रक्षणासाठी मला हा माझ्याविरुद्ध वाटणारा ठरावही दाखल करून घ्यावा लागेल” डाव्या गटातल्या तरुणांनी कपाळावर हात मारून घेतला. उजव्यांना अर्धी बाजी मारण्याचा आनंद झाला. पण अजून मतदान व्हायचे बाकी होते. त्याला तब्बल चोवीस तास वेळ होता. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकणारे सुभाषबाबू हे मतदान गमावतील? छट! काहीतरीच!

दुसऱ्या दिवशी मतदान झालं. ज्या समाजवाद्यांसाठी सुभाषबाबूंनी प्रस्थापितांशी वाईटपणा घेतला, त्याच समाजवाद्यांनी सुभाषबाबूंच्या विरोधात मतदान केले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले सुभाषबाबू पंत ठरावाच्या मतदानात पराभूत झाले होते. कार्यकारणीची निवड आता अध्यक्षांच्या नाही तर गांधीजींच्या इच्छेने होणार होती.

अधिवेशन संपायच्या आधी कार्यकारिणी घोषित व्हायला हवी होती. पण ज्यांच्याशी चर्चा करून ती निश्चित करण्याचा खोडा अध्यक्षांच्या माथी पंत ठरावाने मारला होता, ते दस्तुरखुद्द गांधीजींच अधिवेशनात नसल्याने कार्यकारिणीतील सदस्यांच्या नावांच्या अनिश्चितेतच अधिवेशनाचे सूप वाजले. डेरे, कनाती गुंडाळल्या जाऊ लागल्या. देशभरातून आलेले प्रतिनिधी आपापल्या गावी परतू लागले. सुभाषबाबू मात्र विश्रांतीसाठी भाऊ सुधीरचंद्र यांच्याकडे जमदोबा येथे राहिले.

गांधीजी राजकोट वरून दिल्लीला आले. आता त्यांचा सुभाषबाबूंशी पत्रसंवाद सुरू झाला. गांधीजींनी लिहिले,

“पंत यांचा ठराव मी अहमदाबादला आल्यानंतरच प्रथम पाहिला. ठराव पुरता स्पष्ट आहे. तुम्हालाच काय तो निर्णय घ्यायचा आहे. अध्यक्षपद सांभाळण्याच्या दृष्टीने आपली प्रकृती कितपत सुधारली आहे, हे मला माहीत नाही. तुम्ही जर अजूनही आजारी असाल, तर तुम्हाला एकच मार्ग मोकळा आहे.”

सुभाषबाबूंनी चिवटपणे लिहिले,

“नव्या कार्यकारणीच्या रचनेसंदर्भात मला पंत ठरावानुसार आपले मत विचारात घेणे बंधनकारक आहे. माझ्या विचारानुसार सात सभासद मी निवडावेत आणि उरलेल्या सात जणांची नावे सरदार पटेल यांनी सुचवायला माझी हरकत नाही. आता राहिला माझ्या आजाराचा प्रश्न; तर अध्यक्षपदाला चिकटून राहण्याची माझी किंचितही इच्छा नाही, पण केवळ आजारी आहे म्हणून राजीनामा द्यावा हे मला पटत नाही. एखादा अध्यक्ष तुरुंगात गेला म्हणून त्यांनी राजीनामा दिला असे कधीही घडलेले नाही. माझ्यावर राजीनामा द्यावा यासाठी दडपण आणण्यात येत आहे, पण मी त्या दडपणाला बळी पडणार नाही. मी कार्यकारणीत कुणाकुणाला घ्यावं हे सांगा.”

गांधीजी म्हणाले, “ते तुम्ही जुन्या सदस्यांना विचारावं!”

त्यानुसार सुभाषबाबूंनी जुन्या सदस्यांना तारा पाठवल्या.

जुने सदस्य म्हणाले, “गांधीजी ठरवतील ते आम्हाला मान्य आहे”

आता कुठेही सुभाषबाबूंना चक्रव्यूहाची संपूर्ण रचना लक्षात यायला लागली होती. पण त्याला उशीर झाला होता. सुभाषबाबूंनी ३० एप्रिल १९३९ रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. तो लागलीच मंजूर होऊन राजेंद्रप्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. काँग्रेस कार्यकारिणीने सुभाषबाबूंवर पक्षविरोधी वर्तन केल्याचा आरोप ठेवून त्यांची पक्षातून तीन वर्षांसाठी हकालपट्टी केली. गांधीजींचा अहिंसक वार चांगलाच परिणाम करून गेला होता. डॉक्टर खरे यांची भविष्यवाणी एका वर्षाच्या आत खरी ठरली होती. सत्याच्या प्रयोगांचं हिडीस दर्शन समाजाला झालं होतं.

अनेक कडू-गोड अनुभव देऊन त्रिपुरीचा वन्ही शमला. जाताजाता आपले वाटणारेच कसे परके ठरू शकतात, याचं दर्शन सुभाषचंद्रांना घडलं. एका क्षुद्र अध्यक्षपदासाठी नातेसंबंध, वर्षानुवर्षाची मैत्री कशी पणाला लागू शकते, याचं सुभाषबाबूंना राहून राहून आश्चर्य वाटत होते. पण ही फक्त झलक होती. याचा पूर्ण साक्षात्कार पुढे आणखी एकदा होणार होता.

क्रमशः सुभाष बावनी भाग १६.

ग्रंथ सूची:
१) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी
२) नेताजी- वि. स. वाळिंबे
३) महानायक- विश्वास पाटील

(प्रस्तुत लेख हे लेखकाच्या आगामी पुस्तकातील निवडक अंश आहेत. विस्तृत लेख २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या “सुभाष बावनी” या पुस्तकात वाचावेत. शेअर करताना लेखकाच्या नावसाहितच शेअर करावेत.)

© अंबरीश पुंडलिक

Leave a comment