सुभाष बावनी भाग १८ | महात्माजींशी शेवटची भेट –
वर्ध्याच्या रस्त्यावर मोटार पुढे पुढे धावत होती, पण सुभाषबाबूंचं मन मात्र मागे मागे भूतकाळात चाललं होतं. त्यांना आठवली गांधीजींसोबतची पहिली भेट! आयसीएसचा राजीनामा देऊन परततांना बोटीवर भेटलेले रवींद्रनाथ टागोर; म्हणाले, “कलकत्त्याला जायच्या आधी मुंबईत गांधीजींची भेट घे सुभाष!”
“माझाही तोच विचार आहे गुरुदेव!” सुभाष उद्गारले.
मणीभवन येथील गांधीजींचे वास्तव्य असलेले ठिकाण म्हणजे स्वदेशी वस्तूंचा, दिनचर्येचा, व्यवहाराचा नमुनाच होता. इंग्रजांनी भारत सोडल्यानंतर जे काही भारतात उरेल ते अस्सल भारतीयच असलं पाहिजे; स्वदेशीच असलं पाहिजे; असंच जणू ती वास्तू मूकपणे सांगत होती. महादेवभाईंच्या माध्यमातून गांधीजींना सूचना दिली गेली. थोड्याच वेळात बोलावणं आलं. जुनाट वळणाचा तो जिना चढत सुभाषने वरच्या दालनात प्रवेश केला. सुभाषला आपल्या विलायती वेशभूषेमुळे ओशाळल्यासारखे झाले.
“या..!” गांधीजींच्या सहास्य स्वागताने सुभाषचा ताण थोडा कमी झाला.
“गांधीजी मी सुभाषचंद्रबोस. मी…” सुभाषबाबूंनी चाचपडत सुरुवात केली.
“तुम्हाला कोण ओळखत नाही सुभाष? आयसीएस सारखी अवघड परीक्षा गुणवत्तेने उत्तीर्ण करणारे मेधावी तरुण तुम्ही!” गांधीजी दिलखुलासपणे म्हणाले.
“बापू त्या पदवीचा केव्हाच राजीनामा दिला आहे मी!”
“ते सुद्धा मला माहित आहे. तुमच्यासारख्या बलदंड हातांची भारताला खूप गरज आहे”
“ते ठीक आहे गांधीजी, पण एका वर्षात स्वातंत्र्य कसे शक्य आहे? त्यासाठी काँग्रेसने असा कोणता कार्यक्रम हाती घेतला आहे? ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्यासाठी तुमच्या मनात कोणकोणत्या योजना आहेत?”
“अरे हो हो हो!! जरा दम तर घेशील? एकदम आम्हा म्हाताऱ्यांच्या विवेकबुद्धीवर शंका घेणं बरोबर नाही सुभाष!” गांधीजी मिश्कीलपणे हसत होते. आपल्या असहकार तंत्रावरचा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
पहिल्याच भेटीत अधीर सुभाषला दमाने घ्यायला सांगणारे गांधीजी यापुढे प्रत्येक वेळी त्यांना दमानंच घ्यायला सांगणार आहेत, हे सुभाषला माहीत नव्हतं; आणि पहिल्याच भेटीत गांधीजींच्या कार्यक्रमावर शंका घेणारा सुभाष यापुढे प्रत्येक वेळी त्यांच्या निर्णयावर शंकाच घेणार आहे, हे गांधीजींना माहित नव्हतं. महात्म्याबद्दल सुभाषच्या मनात आदर निर्माण झाला होता; पण शंका फिटल्या नव्हत्या. ब्रिटिशांनी इथून गेले पाहिजे हे विचार जुळले, अंतर्मनाच्या तारा मात्र जुळल्या नव्हत्या.
यानंतर सुरू झालेलं असहकार आंदोलन, निदर्शने, मोर्चे, हरताळ, त्यानंतरची धरपकड! ‘गांधीजींचं म्हणणं खरं ठरतंय’ असं वाटत असतानाच चौरीचौराच्या निमित्ताने केलेला अवसानघात! थंड सगळं! मग सविनय कायदेभंगाची वावटळ; मीठासारखी क्षुल्लक वाटणारी गोष्ट पण त्यावरून किती मोठं आवर्त उभं केलं गांधीजींनी!
“१९२० ते १९३० या दहा वर्षांचे नायक गांधीजीच! पण मग पुन्हा आयर्विन कराराने निराशा केली. खूप निर्णायक परिणाम देऊ शकणाऱ्या या आंदोलनाने भारतीयांच्या पदरात काहीच टाकलं नाही. किती हळहळलो होतो आपण तेव्हा. त्यामुळेच व्हिएन्नाला असताना आपण चिडून गांधीजींना घरातली अडगळ म्हणालो होतो. तो प्रसंग सुभाषला आठवला तसे ते जरा ओशाळले.
शेवटी त्रिपुरीचा तमाशा! आपला अध्यक्षपदाचा राजीनामा आणि त्यानन्तर काँग्रेसमधून निष्कसन! गांधीजींचा वारही कसा अहिंसात्मक असतो याचा आलेला प्रत्यय. पण त्यानंतर लगेच महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीचे आलेले निमंत्रण. ‘आपली विचार करण्याची दिशा भिन्न असली म्हणून काय झाले? शेवटी ध्येय तर एकच आहे ना? केव्हा तरी निकराच्या प्रसंगी या वाटा एकरूप होणे अशक्य नाही.’
विचार करत करत आश्रमात केव्हा येऊन पोहोचलो, हे सुभाषबाबूंनाही कळलं नाही.
अंधार पडला होता. गांधीजी नेहमीप्रमाणे सूत कातत बसले होते. एकटेच!.
“प्रणाम बापू!”
गांधीजींनी चमकून वर पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचं दिलखुलास हसू उमटलं,
“अरे ये ये सुभाष! तुझी तब्येत कशी आहे आता?”
“बरी आहे!”
“चहा घेतलास ना? तू एकटाच असा आहेस ज्याच्यासाठी या आश्रमाचे नियम शिथील केले जातात.”
“हो”
“तुझ्या नव्या पक्षाचं काम करताना समाधानी आहेस ना?”
“यापेक्षा काहीतरी भव्यदिव्य करायचं मनात आहे बापू!”
“म्हणजे नाहीस. अरे आता तर तिथे आडकाठी करायला मी सुद्धा नाही? हे बघ स्वातंत्र्यापेक्षाही अंतर्मनाचं समाधान महत्त्वाचं!”
“तुमच्या-माझ्यासहीत या देशाच्या पस्तीस कोटी जनतेच्या मनातील तगमग घालवेल असा प्रस्ताव घेऊन आलो आहे आज!”
“अस्सं!” गांधीजी खळखळून हसले, “सांग पाहू”
“बापू युद्ध सुरू झाले आहे. ब्रिटिशांची सगळी ताकद हिटलरला थोपवून धरण्यात गुंतली आहे. तुम्ही जर आंदोलनाची हाक दिली, तर सगळा देश पेटून उठेल. झालं गेलं सगळं विसरून जाऊ. तुमचा शिपाई म्हणून या आंदोलनात उभा राहिल मी.”
सुभाषबाबूंच्या शब्दागणिक गांधीजींच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. हास्याची जागा नापसंतीने घेतली. सुभाषबाबू थांबून अपेक्षेने गांधीजींकडे पाहू लागले. थोडावेळ थांबून, एका एका शब्दावर जोर देत गांधीजी म्हणाले,
“शत्रू अडचणीत असताना त्याच्याविरुद्ध आंदोलन करून त्याला पेचात पकडणं मला अनैतिक वाटतं!”
सुभाषबाबू उसळून बोलले,
“हाऊस ऑफ कॉमन्समध्ये लोकशाहीच्या फुशारक्या मारून भारताला वर्षानुवर्ष गुलाम करून ठेवणाऱ्यांबद्दल कसली आली आहे नैतिकता बापू?”
“साध्याइतकीच साधनशुचिताही मला आवश्यक वाटते!”
“मग निदान मला तरी आशीर्वाद द्या!”
“तुला माझ्या आशीर्वादाची गरज केव्हापासून पडायला लागली सुभाष?”
सुभाषबाबू उठले आणि बाहेर पडले. गांधीजींनी उच्चारलेले ‘देव तुझं कल्याण करो’ हे शब्द ऐकायलाही ते थांबले नाहीत.
धुरळा उडवत सुभाषबाबूंची मोटार आश्रमातून बाहेर पडली. सुभाषबाबूंच्या मनातील महात्माजींबद्दलच्या कडू-गोड आठवणींमध्ये आणखी एका कडवट संवादाचीच भर पडली होती. ध्येय एक असलं तरी आपले मार्ग मात्र भिन्न आहेत, हे सुभाषबाबूंना उमगलं. कधीही एकरूप न होणारे मार्ग!
क्रमशः सुभाष बावनी भाग १८.
ग्रंथ सूची:
१) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी
२) नेताजी- वि. स. वाळिंबे
३) महानायक- विश्वास पाटील
लेखक- अंबरीश पुंडलिक