सुभाष बावनी भाग १९ | सुभाष-सावरकर भेट

सुभाष बावनी भाग १९ | सुभाष-सावरकर भेट –

२२ जून १९४०! सकाळी सकाळीच मुंबई येथील सावरकर सदनातील टेलीफोन खणखणला. ‘सुभाषचंद्र बोस येणार आहेत!’ अशी वर्दी देऊन बंद झाला. थोड्याच वेळात खादीचा पेहराव केलेले, गळ्यात शालीची भाळ घेतलेले सुभाषबाबू सावरकर सदनासमोर उभे होते. चहापान व औपचारिक विचारपूस झाल्यावर सुभाषबाबूंनी विषय काढला,

“बापूजी काही ऐकायला तयार नाहीत. इंग्लंड युद्धात गुंतलेला असताना आंदोलन करणं त्यांना म्हणे अनैतिक वाटतं”

“बरं मग तुमचा काय विचार आहे आता?” सावरकरांनी विचारलं.

“कलकत्त्यात ब्रिटिशांनी उभारलेले एक जुनं स्मारक आहे. हॉलवेल स्मारक म्हणतात त्याला. ते तिथून हलवावं यासाठी आंदोलन सुरू करायचा विचार आहे आमचा”

“त्याने काय होईल?” सुस्पष्ट विचार आणि आगामी काळात घडू शकणाऱ्या घटनांचं अचूक आकलन करू शकणारे सावरकर आपले भेदक डोळे रोखून सुभाषबाबूंकडे पाहू लागले.

“समाजमन आंदोलित ठेवण्यासाठी काही ना काही करावंच लागेल ना?” सुभाषबाबू गडबडून म्हणाले.

“सरकार तर तुम्हाला तुरुंगात टाकायची संधीच शोधत असणार. ती संधी तुम्ही हॉलवेल का काय त्या स्मारकाच्या आंदोलनाच्या निमित्ताने सरकारला उपलब्ध करून देत आहात. एकदा का तुम्हाला पकडलं की युद्धाची धामधूम संपेपर्यंत काही तुमची सुटका नाही. मग आपल्या सर्वांनाच हात चोळत बसावं लागेल!”

“मग तुमच्या मनात या युद्धासंबंधी काय योजना आहेत?” सुभाषबाबू

“असं पहा; पहिल्या महायुद्धाच्या वेळी आम्हा सर्वच क्रांतिकारकांना शस्त्र लपवून भारतात आणावे लागत. काही भारतात पोहोचत, काही बाहेरच पकडली जात. गदर संघटनेने केलेला प्रयत्न तुम्हाला माहितच आहे”

“हो”

“आता अनायसे युद्धाच्या निमित्ताने सरकार सैन्यभरती करतेय; तेव्हा शस्त्रं विनासायास देशी हातात पडायची व्यवस्था सरकारने केली आहे, ती आधी हस्तगत करूयात, आणि योग्य वेळ आली की त्या बंदुकीचा नेम कुणावर धरायचा हे ठरवायचं स्वातंत्र्य आपल्या तरुणांना आहेच की!” मंद स्मित करत सावरकर थोडे थांबले.

सुभाषबाबूंच्या सर्वांगातून जणू वीज चमकून गेली. त्यांना फोर्ट विलियम मधून घेतलेल्या बंदुका दिमाखानं मिरवत केलेली कलकत्त्यातली संचलनं आठवली.

सावरकरांनी पुढे बोलायला सुरुवात केली,

“यावेळी देशात अडवणूकीने मिळेल ते हस्तगत करणारा एक देशभक्तांचा पक्ष पाहिजे. दुसरा सैन्यात योग्य संधीची वाट पाहत असलेला एक गट पाहिजे; आणि तिसरी देशाबाहेरून ब्रिटिश यंत्रणेवर सशस्त्र प्रहार करण्याच्या खटपटीत असणारी संघटना!

“याकरता ब्रिटिशांच्या विद्यमान शत्रूंची मदत घ्यावी लागली तर तीही बिनदिक्कत घ्यावी. विनाकारण नैतिक-अनैतिकतेच्या भोंगळ चर्चेत पडू नये. सध्या देशाला स्वतंत्र करणं हाच आपला धर्म आणि हीच आपली नीतिमत्ता आहे. अशा प्रकारचं साहस करू शकणारे दोन-तीनच लोक माझ्या नजरेसमोर आहेत; त्यात तुम्ही एक आहात. त्यामुळे भारताच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करा. स्मारक हलवण्याची आंदोलनं बाकीचे लोक करतील”

सुभाषबाबूंना जणू आपलंच मन सावरकरांच्या रूपात बोलतेय कि काय, असं वाटू लागलं. ते घाईघाईने सावरकर सदनातून बाहेर पडले आणि कलकत्त्याला जाणाऱ्या गाडीत बसले.

भारतातल्या मॅझिनी- गॅरीबाल्डीचीच जणू ही भेट!

सुभाषबाबूंच्या मनातलं सगळं द्वंद्व संपवून टाकणारी भेट!

भारताच्या ललाटी ब्रिटिशांनी ओढलेली पारतंत्र्याची-दीडशे वर्षं लांबीची दुर्भाग्यरेषा पुसून टाकण्यासाठी नियतीने घडवून आणलेली ही भेट!

सावरकरांचे सुस्पष्ट विचार आणि त्यांचं सुभाषबाबूंच्या रूपात कार्यान्वयन असा समरचमत्कार ज्यामुळे जगाला पाहायला मिळणार होता ती भेट!

“आत्ताच काहीतरी करायला पाहिजे!” असं घोकत सुभाषबाबू घरी आले.

“पण आम्ही आंदोलनाची सगळी तयारी केली आहे सुभाषबाबू! आता ऐनवेळी आंदोलन रद्द करायचे म्हणजे…”

हॉलवेल स्मारकाचे आंदोलन तूर्त थोडं पुढे ढकलण्याचा प्रस्ताव ठेवणाऱ्या सुभाषबाबूंना कार्यकर्ते विनवू लागले.

“अरे यानं नाराज व्हायची काही गरज नाही, युद्धकाळात अशा संधी पुन्हा मिळतील” सुभाषबाबू समजावणीच्या स्वरात म्हणाले. मनातली योजना सगळ्यांना सांगणं धोकादायक होतं.

“आम्ही सगळी तयारी करतो, तुम्ही फक्त तिथे उपस्थित राहा. आपल्या असण्यानेही कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल.”

“बरं ठीक आहे- तीन जुलैला करू आंदोलन!” नाईलाजानं सुभाषबाबू तयार झाले.

आंदोलनाच्या घोषणेचा अपेक्षित तोच परिणाम झाला. सरकारने हॉलीवेल स्मारक उचलून कलकत्त्यातल्याच एका चर्चच्या बाजूच्या जागेत नेऊन ठेवले; पण त्याआधी सुभाषबाबूंना कैद झाली. ज्याची भीती होती तेच झाले.

आपला अकरावा तुरुंगवास भोगीत सुभाषबाबू प्रेसिडेन्सी तुरुंगातील एका कोठडीत भिंतीला टेकून बसले. आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला होता. ‘आता काय करायचं? नाही! नाही! मी युद्धकाळात असा तुरुंगात खितपत पडणार नाही. मला इथून बाहेर पडलं पाहिजे. कसं पडावं तुरुंगाबाहेर?’

अचानक त्यांना त्या बंगाली इतिहासकार- विजयरत्न मुजुमदार यांच्याशी झालेला संवाद आठवला,

“आपल्या बंगाली भाषेत शिवाजी महाराजांवर किती पुस्तकं आहेत?” सुभाषबाबू मुजुमदारांना विचारत होते.

“फार नाहीत” मुजुमदार म्हणाले,

“अत्युत्तम घोष यांचे नाटक ‘छत्रपती शिवाजी’ आपल्याला माहित असेल.   सुद्धा सरकारने जप्त केल्या आहेत”

“जप्त?” संतापाने डोळे गरागरा फिरवत सुभाषबाबू म्हणाले,

“आणि त्यावर आपण काहीच प्रतिक्रिया दिली नाही?” मुजुमदारांनी मान खाली घातली.

“नीट ऐका! एक दिवस असा निश्चित येणार आहे, की आपणा हिंदी लोकांना आपल्या स्वातंत्र्यलढ्यात शिवाजी महाराजांचाच कित्ता गिरवावा लागणार! आणि तो दिवस फार लांब नाही!”

हे आठवल्याबरोबर त्यांना एकाएकी शिवचरित्र वाचण्याची इच्छा होऊ लागली. प्रेसिडेन्सी तुरुंगात शिवचरित्र आणण्याच्या खटपटीस ते लागले.

सुभाषबाबूंना झालेली अटक पाहून सावरकरांचा प्राण पुन्हा एकदा तळमळला. काबुल कंदाहारच्या चोरवाटा हिरमुसल्या. दूर जपान-सिंगापूरमध्ये राहून आराकानच्या भयाण जंगलातल्या रानवाटांवर आणि चिंदवीन- इरावतीच्या काठांवर भारतीय स्वातंत्र्ययज्ञाच्या पुर्णाहुतीसाठी शाकल्य-समिधा एकत्र करत फिरणाऱ्या त्या रासबिहारी नावाच्या पुरोहिताच्या पाठीचं पोक आणखीनच ठळक जाणवू लागलं. हतबलतेच्या अंधःकारातून स्फूर्तीच्या उजेडाची तिरीप येण्यासाठी प्रेसिडेन्सी तुरुंगात सुभाषबाबू शिवसूर्याचं आवाहन करू लागले.

क्रमशः सुभाष बावनी भाग १९ | सुभाष-सावरकर भेट.

ग्रंथ सूची:
१) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी
२) वादळातील दीपस्तंभ- गो. नि. दांडेकर
चित्र सौजन्य- देवानंद जोशी

लेखक- अंबरीश पुंडलिक

Leave a comment