सुभाष बावनी भाग २ | गुरूच्या शोधात

सुभाष बावनी भाग २ | गुरूच्या शोधात

सुभाष बावनी भाग २ | गुरूच्या शोधात –

सुभाष बावनी भाग २ –

कलकत्ता शहराबाहेरच्या ओसाड, निर्मनुष्य जागेत राहुट्या ठोकून सुभाष व त्याचे प्रेसिडेन्सी कॉलेजमधील मित्र अध्यात्मावर चिंतन करत होते. विवेकानंदांच्या राजयोग पुस्तकाचं वाचन चाललं होतं-

“माणसाला दीर्घायुषी बनवणे हेच हठयोगाचे कार्य होय. हठयोगी कधीही आजारी पडत नाही. तो खूप जगतो…”

एकदम थांबून हेमंता म्हणाला, “सुभाष आपण आधी हठयोगाचा अभ्यास केला पाहिजे गड्या!”

हेमंताला थांबवत किटीश म्हणाला, ”त्याआधी आपण प्राणायामाचा अभ्यास करायला हवा. श्वासोच्छ्वासावर नियंत्रण मिळवल्याशिवाय आपल्याला ध्यानात लक्ष केंद्रित करता येणार नाही”

“या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला गुरु शोधावा लागेल. छातीला हात लावल्याबरोबर समाधीत घेऊन जाणारा; नरेंद्राचा विवेकानंद करणारा रामकृष्णांसारखा गुरु!” सुभाष म्हणाला.

“पण असा गुरु सापडणार कुठे?” कुणीतरी बोललं.

“हरिद्वार! मी हरिद्वारला जाणाऱ. बोला! कोण कोण येणार माझ्यासोबत?”- सुभाष

“मी येणार!”- हेमंता

“मी पण!”

“मी पण!”

हरिपाद बसुकडून सुभाषने पैसे घेतले आणि एक दिवस कॉलेजला जातो असं सांगून बाहेर पडलेलं हे नवविवेकानंदमेळ्याचं टोळकं गुपचुप जाऊन हरिद्वारला जाणाऱ्या रेल्वेत चढलं आणि हरिद्वारला पोहोचलं.

उतरल्याबरोबर सगळे जण धावतच घाटाकडे निघाले. तिथे जाऊन पाहतो तो भस्म लावलेल्या, जटा वाढवलेल्या, भगव्या कपड्यातल्या साधूंचे थवेच्या थवे गंगेत स्नानासाठी उतरत होते. तेवढेच पाण्यातून बाहेर येऊन घाईघाईने दिसेनासे होत होते. त्यांच्याशी जाऊन सुभाषने बोलायचा प्रयत्न केला. एकाच्या श्रीमुखातून “बम बम” एवढेच शब्द सुभाषकडे न पाहता बाहेर पडले. एकाकडून “क्या चाहीये?”, “क्यो खडे हो?”, “चलो भागो यहाँ से” अशी दटावणी मिळाली. निराशा!

“हरिद्वार नाही तर ऋषिकेशला जाऊ!” हेमंताने प्रस्ताव मांडला. सगळ्यांना हा विचार पटला. “जाऊयात ऋषिकेशला!”

ऋषिकेश! मनाला संमोहून टाकणारी वृक्षराजी! उंच उंच कडे! कड्यावरून कोसळणारे शुभ्र प्रपात! सगळी नगरीच जणू ध्यानस्थ बसल्यासारखी. सोबतीला गंगेच्या प्रवाहाचा ओंकार. कड्याकपारींमध्ये दिसणारे हटयोगी.

एका कौपीनधारीला ‘ब्रम्ह, माया, ज्ञान’ यावर प्रश्न विचारले तर म्हणतो कसा “आसन लगाओ, सब पता चल जायेगा” निराशा!

लक्ष्मणझुला! जवळचे पैसे संपत आले.

“काय करायचं सुभाष?”

“काय करायचं म्हणजे?”

“इतके दिवस आपण फिरतो आहे; आसन-प्राणायाम-प्रत्याहार तर जाऊदे, आपल्याशी धड बोलायलाही कुणी तयार नाही इथे!”

“बर मग?”

“जायचं का परत घरी? घरचे काळजी करत असतील रे!”

“गुरु सापडल्याशिवाय मी घरी येणार नाही.” सुभाष हाताची घडी घालत शांतपणे म्हणाला.

पण घरचे काळजी करत असतील हे काही खोटं नव्हतं. घरी हाहा:कार माजला होता. ‘मोठ्या विश्वासानं आपल्यापाशी शिकायला ठेवलं होतं त्यांनी सुभाषला! आता कटकला काय सांगायचं?’ याचा  वडील बंधू शरदबाबू सचिंतपणे विचार करत होते. शरदबाबूंनी घरी तार केली- “सुभाष घरातून नाहीसा झाला आहे!” ती तार जानकीनाथांच्या हाती पडली मात्र! त्यांच्या पायातले त्राण कोणीतरी काढून घेत आहे असे वाटले. माँ भोवळ येऊन खाली कोसळल्या.

“त्रास द्यायलाच जन्माला आला आहे हा पोरगा!” कलकत्त्याला जाताना गाडीत सारखेच विचार दोघांच्याही मनात येत होते.

“पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्यापाशी फोटो दिला आहे”- शरदबाबू जानकीनाथांना सांगत होते.

“सुभाषची पत्रिका आणली आहे. तुझे ते कुणी चट्टोपाध्याय आहेत ना, त्यांना दाखवून पहा” माँ बोलल्या.

“व’ अक्षरावरून सुरू होणाऱ्या गावी आहे एवढंच सांगतो. स्वतःहून चालत घरी येईल” चट्टोपाध्याय मोशाय चष्म्यातून पत्रिका पाहत म्हणाले.

सुभाष वाराणशीला होता. गावाबाहेर एका झोपडीत एक योगी राहतात असं कुणाच्यातरी बोलण्यातून समजलं. सुभाष त्यांना भेटायला गेला.

“स्वामीजींचे पुस्तक वाचतोस नं रे?” योगींनी विचारलं

“हो”

“मग स्वामीजींचं ते वाक्य माहित नाही?”

“?”

“जोपर्यंत माझ्या देशातला कुत्रासुद्धा उपाशी आहे; तोपर्यंत मला मोक्ष नको.

“तुझ्यासारख्या मेधावी, तेजस्वी, बलवान तरुणांना जर असा वैयक्तिक मोक्षाचा मोह पडू लागला, तर राष्ट्रीय मुक्तीसाठी कोण झटणार?

“ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारतमातेची सुटका करण्यासाठी आयुष्याचा क्षण न क्षण आणि ऊर्जेचा कण न कण वेच! परत जा! तुझी आई तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे.”

विचारांचं नवीन वादळ डोक्यात घेऊन सुभाष परत निघाला.

शरद जानकीनाथांशी सचिंतपणे बोलत बसला असताना सुभाषने चोरट्या पावलांनी घरात प्रवेश केला.

रागाने थरथरत जानकीनाथ सुभाषसमोर उभे राहिले. क्षणात संतापाची जागा अश्रूंनी घेतली. सुभाषला मिठी मारून बाबा रडू लागले. बाबांना शांत करून सुभाष जवळच उभ्या असलेल्या मेजदा-विभाभाभींकडे वळला. विभाभाभींनी त्याला “माँ ठाकूरघरात आहेत” एवढेच सांगितले.

“माँ” ठाकूरघराच्या उंबरठ्यातून सुभाषने हाक मारली. माँनी वळून पहिले. सुभाष दारात उभा! धावत जाऊन सुभाषने माँना मिठी मारली. कितीतरी वेळ त्या ठाकूरघरात अश्रू वाहत राहिले.

एकाएकी झटकन डोळे पुसून माँ सुभाषकडे पाहत म्हणाल्या, “वचन दे सुभाष! असं पुन्हा करणार नाहीस. आपल्या आईला न सांगता कुठेही जाणार नाहीस!”

“दिलं! आई मी तुला न सांगता कुठेही जाणार नाही”

भविष्यात सुभाषला ही शपथ मोडावी लागणार होती. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून एका मातेची मुक्तता करण्यासाठी दुसऱ्या मातेला दिलेला शब्द मोडावा लागणार होता. एखाद्या अपराध्यासारखी नियती ठाकूरघराच्या कोपऱ्यातून या मायलेकरांकडे पहात होती.

क्रमशः सुभाष बावनी भाग २ | गुरूच्या शोधात.

ग्रंथ सूची-
१. महानायक- विश्वास पाटील.
२. नेताजी- वि. स. वाळिंबे.

(प्रस्तुत लेख हे लेखकाच्या आगामी पुस्तकातील निवडक अंश आहेत. विस्तृत लेख २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या “सुभाष बावनी” या पुस्तकात वाचावेत. शेअर करताना लेखकाच्या नावसाहितच शेअर करावेत)

लेखक- अंबरीश पुंडलिक, ९८९०५३१२२०

Leave a comment