सुभाष बावनी भाग २० | The Shivajian way

सुभाष बावनी भाग २० | The Shivajian way

सुभाष बावनी भाग २० | The Shivajian way –

“शिवाजीर पालाबार काही निटा पडे तो तोमार?” सुभाषबाबूंच्या प्रश्नावर त्यांच्या सोबतीने प्रेसिडेन्सी तुरुंगात शिक्षा भोगणारे नरेंद्र नारायण चमकून पाहू लागले.

“अरे पाहतोस काय? सांग ना शिवाजी महाराजांच्या आगऱ्याहून सुटकेची कथा माहित आहे का?” सुभाषबाबूंनी हसत हसत पुन्हा विचारलं.

“अं हो! म्हणजे जदुनाथ सरकारांच्या पुस्तकात वाचली आहे”

“मला ते पुस्तक पुन्हा एकदा वाचायचं आहे” सुभाषबाबू म्हणाले.

प्रेसिडेन्सी तुरुंगाच्या त्या गजाआड शिवचरित्र पोहोचले. आग्र्याहून सुटकेच्या कथेची पारायणं होऊ लागली.

औरंगजेबाच्या नजरकैदेची मगरमिठी… फौलाद खानाचा वेढा…. महाराजांचं आजारपण… संन्यास घेऊन काशीला जाऊ देण्यासाठी केलेल्या अर्ज-विनंत्या…. मीर मोहम्मद बक्षी अमीन खानाकडून मिळवलेली खोटी ओळखपत्रे….वेषांतर…. आणि शेवटी पेटार्‍यातून सुटका!

महाराजांनी वापरलेल्या युक्त्यांची क्रमवार संगती सुभाषबाबू लावू लागले. वाचता वाचता टिपणं काढू लागले. काहीतरी मनाशी ठरवू लागले.

वाचन पूर्ण होताच सुभाषबाबूंनी जामीनासाठी अर्ज केला. तो फेटाळला गेला. त्या विरोधात सुभाषबाबूंचे आमरण उपोषण सुरू झाले. पोलीस आयुक्तांपासून ते बंगालच्या गव्हर्नरांपर्यंत आणि बोस कुटुंबापासून ते मुख्यमंत्री फजलूल हक साहेबांपर्यंत सगळे दचकले. ब्रिटिशांना शांतता व सुव्यवस्थेची काळजी होती, तर भारतीयांना सुभाषबाबूंची!

“वेडेपणा करु नका म्हणावं सुभाषबाबूंना; जतीन दाससारखे मरून जाल पण सरकारला दया येणार नाही!” गृहमंत्री नसीमुद्दीन म्हणाले.

“तसा मृत्यू हा मी माझा गौरव समजेन!” सुभाषबाबूंचा निर्धार कायम होता. उपोषण सुरु झालं. याचा सुभाषबाबूंच्या तब्येतीवर अपेक्षित परिणाम झाला. प्रकृती झपाट्याने खालावू लागली. बेशुद्धावस्थेत सुभाषबाबू जमिनीवर पडून राहू लागले. तशी गव्हर्नरांची झोप उडाली. ‘काय करायचं?’

“त्यांना त्यांच्या राहत्या घरी नजरकैद करूयात. जरा तब्येत सुधारली की परत कोठडीत घेऊ, काय?” हा विचार सर्वांनाच पटला.

सुभाषबाबूंना स्ट्रेचरवरून बसूबाडी येथील घरी आणण्यात आलं. अवघा बोस परिवार एल्गिन रस्त्यावरच्या घरात एकत्र होऊन सचिंत चेहऱ्याने सुभाषबाबूंकडे पाहत होता. सुभाषचा तो पांढराफटक पडलेला देह पाहून प्रभावती देवी कळवळल्या-

“काय करून घेतलंयेस हे सुभाष? हा कसला जीवावर उठणारा हट्ट?”

“व्यक्ती मरेल तरच राष्ट्र जगेल! देशभक्तांच्या बलिदानावरच राष्ट्र देवतेचं मंदिर उभं राहत असतं” अस्पष्ट शब्द व्याधीजर्जर सुभाषबाबूंच्या मुखातून बाहेर पडले. सुभाषबाबूंची रवानगी वरच्या मजल्यावरील त्यांच्या नेहमीच्या खोलीत झाली. बाजूलाच माँची खोली. डोळ्यात तेल घालून माँ सुभाषची काळजी घेत होत्या. वूडबर्न पार्कच्या घरी राहत असेलेले शरद-विभा रोज सकाळ संध्याकाळ येऊन खाण्यापिण्याची-औषधपाण्याची चौकशी करून जात. अवघं बोस कुटुंब आपल्या लाडक्या रंगाकाकाची-सुबीची-छोटे दादाची काळजी घेण्यात मश्गुल होऊन गेलं.

बाहेर पहार्‍यावरच्या पोलिसांच्या चर्चा झडत होत्या-

“विनाकारण बसवलं आहे या बोसबाबूंच्या पाळतीवर आपल्याला. काही जर्मन एजंटांचे गुप्त संवाद ऐकू येतील म्हटलं, तर त्यांच्या खोलीतून ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे..’ कानावर पडतंय”

“हो ना! मला साहेब बोलले होते ‘बसूबाडीतून बाहेर पडणारं प्रत्येक पत्र डब्यातून काढून घ्यायचं, काही गुप्तकट वगैरे असेल तर सांगायचं’ परवा असंच एक नेहरूंना लिहिलेलं पत्र फोडलं, तर बोस त्यात ‘राजकारणात आता रस वाटत नाही. संन्यास घेऊन हिमालयात जावसं वाटतंय’ असं लिहितात. अशा माणसावर पाळत ठेवून काय करायचं?” दुसऱ्या एकाने दुजोरा दिला. ते ऐकून तिसऱ्याला हुरूप आला,

“मला साहेब म्हणाले होते सुभाषबाबूंना कोण कोण भेटायला येतं त्यावर लक्ष ठेव! पण सुभाषबाबू तर कुणालाच भेटत नाहीत? परवा तर महापौर आले होते भेटायला, पण त्यांनाही परत पाठवलं म्हणे.”

“आणि अशा माणसासाठी आपण रात्री कुडकुडत तंबूत बसून राहतोय. ते काही नाही. आता तर आपण झोपत जाणार बुवा पांघरूण घेऊन.”

“मी पण!”

“मी पण!”

पण ‘कुणालाच भेटत नव्हते’ हे देखील तितकसं खरं नव्हतं. परवा शरदबाबूंचे पेशावरकडचे पक्षकार आले होते- मिया अकबरशहा! शरदबाबूंच्या ऑफिसमधून ते ‘कुणाचं लक्ष नाही’ हे पाहून घरात घुसले आणि आतल्या जिन्यानं सुभाषबाबूंच्या खोलीत शिरले. मागोमाग दार लावलं गेलं. नोकरानं दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला तर त्याला ‘सुभाषबाबू तुम्ही फक्त तारीख सांगा आमची सगळी तयारी झाली आहे’ एवढेच शब्द ऐकू आले. त्याला दाराशी वाकलेला पाहून इलाने हटकलं. घाबरलेला नोकर तिथून पळून गेला. नंतर सुभाषबाबूंनी अकबरशहांना शिशीरसोबत बाजारात खरेदीसाठी पाठवलं. अकबरशहांना काही पठाणी कपडे घ्यायचे होते म्हणे. त्यांना घेऊन शिशीर धरमतला स्ट्रीटवरील बाचेल मोल्ला या दुकानात गेला. चांगले दोन अडीच तास खरेदी चालली. मनासारखी खरेदी झाल्यामुळे मिया साहेब खूश दिसत होते. पण घोटाळा झाला. खरेदीत घड्याळाकडे लक्षच गेलं नाही. पेशावरला निघायच्या गाडीची वेळ झाली. गडबडीने शिशिर त्यांना घेऊन स्टेशनवर आला; आणि ट्रेन पकडायच्या गडबडीत कपड्यांच्या पिशव्या शिशिरच्या गाडीतच राहून गेल्या. ठरल्याप्रमाणे!

रात्री सुभाषबाबू हातातल्या कागदावरील यादीकडे गंभीर नजरेने पहात बसले होते.

“काबुली कपडे आले. कुराणाची प्रत आली. मोहम्मद जियाउद्दीन नावाचं आय कार्ड आलं. १७ जानेवारी, २० जानेवारी २४ जानेवारीला टाकायची पत्रं ईलाजवळ दिली गेली. आता काय राहिलं बरं? झालं! सगळं झालं! आता फक्त पेटारे पाठवायला सुरूवात करायची आहे. त्यांनी घाईघाईने शिशीरला आवाज दिला.

“काय काका?”

“आमार एकता काज कोरते परबे?”

“सांगा नं काका!”

“तुला रात्रभर न थांबता गाडी चालवता येईल का?”

कुठल्यातरी अनामिक साहसाच्या कल्पनेने विशीतल्या शिशिरच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ‘आपण एका ऐतिहासिक घटनेचा भाग होणार आहोत, जोपर्यंत भारतवर्षाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या बेहोष वीरांच्या कथा या मातीत श्रद्धेनं सांगितल्या-ऐकल्या जातील, तोपर्यंत आपलं नावही या अपूर्व साहसाच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा उच्चारलं जाईल’ याची त्याला त्यावेळी कल्पनाही नव्हती.

क्रमशः सुभाष बावनी भाग २० | The Shivajian way.

ग्रंथ सूची:
१) आग्र्याहून सुटका- डॉ. अजित जोशी
२) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी
३) नेताजी- वि. स. वाळिंबे
४) महानायक- विश्वास पाटील

लेखक- अंबरीश पुंडलिक

Leave a comment