सुभाष बावनी भाग २१ | सुटका

सुभाष बावनी भाग २१ | सुटका

सुभाष बावनी भाग २१ | सुटका –

“काका हे सर्व तुम्हाला केलंच पाहिजे का? आत्ताच केलं पाहिजे का? तुम्हीच केलं पाहिजे का?” सुभाषबाबूंनी आपली पूर्ण योजना सांगितल्यावर शिशिरनं काकुळतीनं विचारलं.

“केलंच पाहिजे; आत्ताच केलं पाहिजे; मीच केलं पाहिजे!” एका एका शब्दावर जोर देत सुभाषबाबू म्हणाले.

“आई-बाबांना माहित आहे का?”

“हो! मेजदांना विचारल्याशिवाय मी आयुष्यात कुठलंही काम केलं नाही. फक्त आईला हे कळता कामा नये शिशीर…”

यानंतर शिशिर वेळी-अवेळी वूडबर्न पार्क येथील घरातून आपली वॉन्डरर कार घेऊन एल्गिन रस्त्यावरील सुभाषबाबूंचा निवास असलेल्या घरी येऊ लागला. अपरात्री परत जाऊ लागला. कलकत्त्यातील विविध रस्त्यांवर स्वैरपणे गाडी फिरवू लागला. मध्येच बरद्वान- बराडीपर्यंत न थांबता गाडी चालवून पाहू लागला. रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या कडेला थांबून गाडीचे चाक बदलण्याचा सराव करु लागला. बराडीपर्यंतच्या रस्त्यावर कुठे कुठे तपासणी होते, याच्या नोंदी ठेवू लागला.

पहिल्याच दिवशी बसूबाडीतून वॉन्डरर कार बाहेर काढताच ढीगभर पोलीस गाडीच्या भोवती गोळा झाले. प्रश्नांचा भडिमार सुरू झाला-

“कोण आहात?”

“मी शिशीर! शरदबाबूंचा मुलगा! सुभाषचंद्र बोस यांचा पुतण्या!”

“इतक्या अपरात्री कुठे निघालात?”

“ड्रायव्हिंगचा सराव करतोय. दिवसभर कामामुळे वेळ नाही मिळत.” कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, याचा अंदाज असल्यामुळे काही उत्तरं घोकून ठेवलेली होती.

“गाडीत कोण कोण आहे?”

“मी एकटाच आहे. आपण तपासून घ्या” शिशीरने खाली उतरून गाडीचे सर्व दरवाजे उघडून दाखवले.

“जाऊदे गाडी.”

यानंतर वॉन्डरर दररोज अशीच रात्री येऊन अपरात्री बसूबाडीतून बाहेर पडू लागली. पहिल्या दिवशी पोलिसांनी तपासलं. दुसऱ्या दिवशी थांबवलं. तिसऱ्या दिवशी हटकलं. चौथ्या दिवसापासून गाडी कुणीही न हटकता, न थांबवता बाहेर पडू लागली. रात्रीच्या वेळी बसूबाडीतून वॉन्डरर कार बाहेर पडणं ही नित्याची गोष्ट झाली. पेटारे तपासणं बंद झालं.

“सुभाष तुझ्या तब्येतीचं कारण सांगून खटल्याची तारीख २७ जानेवारीपर्यंत वाढवून घेतली आहे. यापुढे वाढवून देतील असं वाटत नाही. जे काही करायचं आहे ते त्याआधीच करावं लागेल!” शरदबाबू घाईघाईने खोलीचं दार बंद करत म्हणाले.

नुकतंच सुभाषबाबूंचं गीता पठण झालं होतं. टेबलावरील कालीमातेच्या फोटोसमोर धूप जळत होता. खोलीत सर्वत्र धूर झाला होता. उग्र वास अजून दरवळत होता. एखाद्या संन्याशाच्या मठीचं रूप त्या खोलीला आलं होतं. फिक्कट रंगाचं रेशमी धोतर आणि त्यावर तसंच उपरणं; कपाळावर चंदनाचा टिळा आणि वाढलेली काळीभोर दाढी!

सुभाषबाबू गंभीरपणे आसनावर बसून होते.

“म्हणजे २७ तारखेला रहस्य जगासमोर येईल. त्या आधी मला भारताच्या सीमेच्या बाहेर गेलं पाहिजे, म्हणजे नंतर शोधाशोध सुरू झाली तरी मी ब्रिटीशांच्या हातात सापडण्याचा धोका राहणार नाही.” सुभाषबाबू मनाशीच काहीतरी हिशोब करत होते.

“मग?… केव्हा?…” शरदबाबूंना प्रश्न पूर्ण करता आला नाही.

“परवा! गुरूवारी! १६ जानेवारीच्या मध्यरात्री! अच्छरसिंग चीना यांचा निरोप आलाय. तयारी पूर्ण झाली आहे.”

गुरुवारी रात्री आठ- साडेआठच्या सुमारास शिशीरने वूडबर्न पार्क येथील घरी घाईघाईने जेवण उरकले. आपल्या नेहमीच्या गतीने बसुबडीत शिरलेल्या शिशिरने गाडी मागच्या वापरात नसलेल्या जिन्यापाशी आणून उभी केली आणि

नेहमीच्या जिन्याने तो वर-सुभाषबाबूंच्या खोलीत आला. तयारी चालली होती. रेशमी सोवळं बदलून सुभाषबाबू आता सलवार-कमीज, जॅकेट असा जामानिमा अंगावर चढवत होते. द्विजेन्‍द्र वर, गच्चीवर उभा राहून आसपासच्या घरातील दिवे मालवले जाण्याची वाट पाहत होता.

शेजारच्या जागत्या घरांतील दिवे क्रमाक्रमाने मालवले जाऊन लोक निद्रादेवीची आराधना करू लागले. थोड्याच वेळात सर्वत्र अंधार झाला. तसे द्विजेन्‍द्रने गच्चीवरूनच खाकरून इशारा केला- ‘मैदान साफ आहे! चला!’

“माझी बाबांनी दिलेली घड्याळ आणा. मला या प्रवासात ती आशीर्वाद म्हणून सोबत हवी आहे.” सुभाषबाबूंनी वेळेवर मागणी केली. अरविंदोने ती घड्याळ हुडकून आणली. घड्याळ घातली गेली, आता चष्मा! सुभाषबाबूंनी आपला नेहमीचा गोल भिंगाचा चष्मा घातला मात्र! आत्तापर्यंत केलेल्या वेषांतराला मागे सारून चष्मा सुभाषबाबूंची ओळख लख्खपणे जगाला सांगत होता.

“चष्मा बदला!”, “चष्मा बदला!” सगळ्यांनी गलका केला. मग सुभाषबाबूंनी ते काही वर्षांमागे वापरत असलेला ओव्हल आकाराचा चष्मा घातला. झाले! मोहम्मद झियाउद्दिन तयार झाले! घड्याळात बाराचे ठोके पडले! निघाले पाहिजे! टेबलावरील बाबांच्या, महाकालीच्या तस्वीरीला सुभाषबाबूंनी नमस्कार केला. वरून पुन्हा खाकरण्याचा आवाज आला. घाईने सुभाषबाबू निघाले; तोच ईला नमस्काराला वाकली.

“देव तुझं कल्याण करो!” एवढेच शब्द सुभाषबाबूंच्या मुखातून बाहेर पडले. खोलीतून बाहेर पडल्याबरोबर ठाकूरघराच्या दिशेने नजर गेली. ‘आई झोपली असेल’ नकळत हात जोडले गेले.

“आई तुला दिलेला शब्द मोडून, तुला यातनांच्या आणि प्रतीक्षेच्या न संपणार्‍या खाईत लोटून जात आहे. मला माफ कर!”

पुन्हा खाकरण्याचा आवाज! ‘चला उशीर होतोय!’

पुढे अरविंदो; मध्ये सुभाषबाबू; मागे शिशिर असे व्हरांड्यातून निघाले. चंद्रप्रकाशात भिंतीवर सावली पडू नये, यासाठी तिघेही भिंतीला लगटून चालत होते. चपला हाती घेतलेल्या!

अरविंदोने हातातला होल्डऑल ड्रायव्हरच्या बाजूला ठेवला आणि तो गेल्यापावली अंधारात परत फिरला. यानंतर पुढे आलेले सुभाषबाबू गाडीचा दरवाजा उघडून मागच्या सीटवर बसले. त्यांनी दार तसेच धरून ठेवले- दोन दारांचा आवाज होता कामा नये. शिशिर नेहमीच्या गतीने ड्रायव्हिंग सीटवर बसला. त्याने कर्कश्श आवाजात स्टार्टर लावला. पहाऱ्यावरच्या पोलिसाने फक्त कूस बदलली. गाडी फाटकाबाहेर पडली.

शरदबाबू विभावती गॅलरीत उभे होते. मघाशी धुरळा उडवत गेलेली वॉन्डरर त्यांनी पाहिली होती. ज्याच्या पाठीशी उभे राहण्यासाठी वकिलीची यशस्वी कारकीर्द काळ्या कोटासकट कोपऱ्यात टांगून ठेवली, तोच आता चालला. जणू कृष्णच गोकुळातून चालला- परत न येण्यासाठी? आम्ही आता काय करायचं रे सुभाष? शरदबाबू हुंदके देऊन रडत होते. त्यांना सावरण्याची ताकद आज विभावतींमध्येही नव्हती. ठाकूरघरात प्रभावतीदेवी मात्र शांतपणे झोपी गेल्या होत्या. पहाऱ्यावरचा पोलीस कसाबसा जागा होत ‘जागते रहो’ ची आरोळी ठोकून पुन्हा निर्धास्तपणे झोपी गेला होता.

क्रमशः सुभाष बावनी भाग २१ | सुटका.

ग्रंथ सूची:
१) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी
२) नेताजी- वि. स. वाळिंबे
३) महानायक- विश्वास पाटील

लेखक- अंबरीश पुंडलिक.

Leave a comment