सुभाष बावनी भाग २२ | काबूलच्या वाटेवर

सुभाष बावनी भाग २२ | काबूलच्या वाटेवर

सुभाष बावनी भाग २२ | काबूलच्या वाटेवर –

“तू आयर्लंडच्या डी व्हॅलेराच्या साहसी पलायनाची गोष्ट ऐकली आहेस का शिशीर?” सुभाषबाबूंनी गाडी कलकत्ता शहराबाहेर निघालेली पाहून विचारले.

“नाही बुवा!”

“मग ऐक आता.” मागच्या सीटवर बसलेले सुभाषबाबू शिशीरसाठी ओतलेल्या कॉफीचा कप हाती घेऊन, त्याला झोप येऊ नये म्हणून डी व्हॅलेराची गोष्ट सांगू लागले.

गाडीने आता वेग घेतला. लिलुआ, उत्तरपाडा, कोननगर, सेरामपूर अशी गावे रात्रीच्या अंधारात मागे पडू लागली. चंद्रनगरजवळ फ्रेंच पोलिसांची चौकी होती. हटकलं तर काय सांगायचं हे ठरलं होतं, पण ती वेळच आली नाही.

“गाडी आगे निकालो! यहा मत रुको!” पोलिसांची ऑर्डर ऐकू आली. शिशीरने आज्ञाधारकपणे गाडी पुढे काढली. पोलीस चौकी निर्धोक पार पडली.

गोविंदपूरपासून धनबादकडे गाडी वळली. धनबाद सोडून बराडी आलं, तेव्हा सकाळचे साडेआठ वाजले होते.

अशोकनाथच्या घरापासून थोड्या अंतरावर शिशीरने सुभाषबाबूंना सोडले आणि तो सरळ घरी पोहोचला. घरात जाऊन अशोक दादा आणि मीरा वहिनीशी गप्पा मारत असताना नोकराने कुणीतरी ‘मोहम्मद झियाउद्दिन’ भेटायला आल्याची वर्दी दिली.

अशोक घाईघाईने बाहेर येत झियाउद्दिनसाहेबांना म्हणाला,

“आज मुझे समय नही है. आप रुकिये आउट हाऊस में. शाम को बात करेंगे!”

“जी ठीक है” झियाउद्दीनची रवानगी आउट हाऊस मध्ये झाली. आता दिवसभर आराम!

“कायस्थाचं घर आहे हे. त्या झियाउद्दिनला कशाला ठेऊन घेतलं घरात? वर जेवणसुद्धा?” मीराची घरात तणतण सुरु झाली. तिला त्या अनोळखी पठाणाला घरात ठेऊन घेतलेलं अजिबात आवडलं नव्हतं.

“अगं संध्याकाळी निघून जाईल तो! तू नोकराच्या हातून पाठव जेवण.” अशोकने समजावले.

संध्याकाळी अशोक आणि झियाउद्दिनसाहेब व्हरांड्यात घटकाभर बोलत बसले. बहुदा काम झालं असावं, कारण थोड्याच वेळात निरोपा निरोपीची भाषा ऐकू आली,

“तो फिर मै चलू साहब? पेशावर की ट्रेन है रात को.”

अशोक- मीरा- शिशीरलाही कुठेतरी बाहेर जायचे होते. त्यांनी गाडी काढली. ड्रायव्हिंग सीटवर शिशीर आणि मागे अशोक- मीरा असे घरातून बाहेर पडले. तोच त्यांना हातात होल्डऑल घेऊन चालत असलेले झियाउद्दीन दिसले. त्यांना पाहताच अशोकने म्हटले,

“आइये हम आपको स्टेशनतक छोड देते है!”

“जी बहोत बहोत शुक्रिया!” असं म्हणत झियाउद्दीन ड्रायव्हरशेजारील सीटवर बसले. गाडी सुरू झाली. मीरा अशोकवर डोळे वटारू लागली, तोच अशोक म्हणाला,

“रंगाकाका मघाशी नमस्कार नाही करता आला. प्रणाम!”

“रंगाकाकाबाबू?” मीरा आलटून पालटून अशोक, शिशिर आणि झियाउद्दिन साहेबांकडे पाहू लागली. अशोकनं तिला थोडक्यात सारा प्रकार समजावून सांगितला. मीराने ओशाळून डोक्यावरून पदर घेत प्रणाम केला. बाराच्या सुमारास मोटार गोमोह स्टेशनच्या आवारात पोहोचली.  शिशीरने हमालाला आवाज दिला. स्टेशनबाहेर रांगेने झोपलेल्या हमालांच्या कुठल्यातरी गोधडीतून हालचाल झाली आणि एक म्हातारा डोळे चोळत पुढे आला. सामान डोक्यावर घेऊन चालू लागला. हमालापाठोपाठ स्टेशनमध्ये शिरणारे सुभाषबाबू एकदम थबकून मागे वळले आणि गाडीकडे पाहून म्हणाले,

“मी चाललो! तुम्हीही जा!” आपल्या लाडक्या काकाचं ते रूप डोळ्यात साठवून तिघेही परत निघाले.

साडेबारा वाजता आरडाओरडा करत कालका मेल आली. सुभाषबाबू त्यात चढले आणि झोपी गेले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गाडी दिल्लीला पोहोचली. सुभाषबाबू अलीकडच्या स्टेशनवर उतरून टांगा करून दिल्ली स्टेशनवर गेले आणि पेशावरकडे जाणाऱ्या फ्रंटियर मेलमध्ये चढले. गाडी सुटली. रात्रभराच्या प्रवासानंतर सकाळी पेशावरची चिन्हे दिसू लागताच उतरणाऱ्यांची धावपळ सुरू झाली. धावत्या गाडीतच सुभाषबाबूंच्या डब्यात चढलेले अकबरशहा “हटो! हटो! हॉटेल ताजमहल जाना है! ताजमहल हॉटेल!” असं ओरडत उतरून गेले. निरोप मिळाला!

“कसा झाला इथपर्यंतचा प्रवास?”- अकबरशहा

“पेशावरपर्यंत तर सुखरूप पोहोचलो. पुढे कसं?” सुभाषबाबू

“भगतराम तलवार म्हणून नवजवान भारत सभेचा कार्यकर्ता आहे. त्याचा भाऊ हरिकिशन हा पंजाबच्या गव्हर्नरवर गोळी झाडली म्हणून फासावर चढला. स्वतः भगतरामही दीड वर्ष तुरुंगात राहून आलाय. तो तुम्हाला काबूल पर्यंत घेऊन जाईल.” अकबरशहा

“माणूस विश्वासाचा आहे ना?”

“हो! हा बघा आलाच.” अकबरशहा- सुभाषबाबूंचे संभाषण सुरु असतानाच भगतरामने प्रवेश केला.

“काय भगतराम? नीट पोहोचवशील ना मला काबुल पर्यंत?” सुभाषबाबूंनी मिष्कीलपणाने विचारलं.

“हो तर! दगड अन् दगड माहित आहे मला त्या रस्त्यावरचा. फक्त एकच अडचण आहे सुभाषबाबू…”

“काय?”

“आपण ज्या भागातून जातोय, त्या भागात पुश्तू भाषा बोलली जाते. तुम्हाला ती येत नाही त्यामुळे तुम्हाला माझे मुके बहिरे चाचा व्हावं लागेल. आपण अड्डा शरीफच्‍या दर्ग्यावर चाललो आहोत, असं नाटक वठवायचं आहे.”

“आता जे काही सांगायचंय ते तुलाच. मी तर बुवा मुका बहिरा आहे. तेव्हा काय सांगायचं ते तूच ठरव!” हास्याचा कल्लोळ वातावरण हलकं करून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाला निघायचं ठरलं.

ठरलेल्या वेळी गाडी आली. अकबरशहांनी झियाउद्दीनसाहेबांच्या पेहरावात चुणीदार फेट्याची भर घातली. भगतरामनेही पठाणाचा वेष केला होता. त्याचं नाव आता रहमतखान ठेवलं गेलं. चाचा-भतीजांना घेऊन गाडी जामरोदच्या दिशेने रवाना झाली. जामरोद मागे जाऊन खजुरी मैदान लागले. ब्रिटीशांची छावणी दिसू लागली तशी गाडी थांबली. भगतराम म्हणाला,

“इथून गाडी परत जाणार! छावणी संपली की भारताची हद्द संपते. त्यानंतर तो आपला रस्ता!” भगतरामने बोट दाखवले.

दोघांनीही चालत चालत छावणी पार केली. सुभाषबाबू थांबले. खाली वाकून त्यांनी चिमूटभर माती उचलली आणि कपाळावर लावली. हात जोडले गेले आणि शब्द बाहेर पडले-

“आई तुझा भंडारा मस्तकी लावून जगभर गोंधळ मांडायला निघालो आहे. तुझ्यापासून दूर जावं लागतंय पण लवकरच तुझ्या कुशीत परत येईन! वंदे मातरम्!”

भगतरामने बोट केलेल्या दिशेने सुभाषबाबूंनी मान उंचावून पाहिलं. कुठंय रस्ता? रस्ता नव्हताच. होती फक्त दिशा! सोबतीला ओबडधोबड पत्थर आणि भयाण खिंडी!

ज्या खैबरखिंडीतून सिकंदरादी आक्रमक भारताला लुटायला आले होते, त्याच भागातून भारतमातेचा पुत्र तिला परत वैभवाचे दिवस दाखवण्यासाठी निघाला होता.

क्रमशः सुभाष बावनी भाग २२ | काबूलच्या वाटेवर.

ग्रंथ सूची:
१) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी
२) नेताजी- वि. स. वाळिंबे
३) कहाणी सुभाषचंद्रांची- य. दि. फडके
४) महानायक- विश्वास पाटील

लेखक- अंबरीश पुंडलिक.

Leave a comment