सुभाष बावनी भाग २३ | काबूलच्या सराईत –
“किती सुंदर प्रदेश आहे हा!” आनंदाने उड्या मारत समोर चाललेले सुभाषबाबू उद्गारले.
“सुभाषबाबू यात सुंदर काय आहे? भयाण खिंडी, वर्षानुवर्षे फतकल मारून बसलेले मोठ्ठाले धोंडे आणि ओसाड जमिनीवरची खुरटी झुडपे!” भगतराम सुभाषबाबूंकडे पाहत म्हणाला.
“स्वातंत्र्य! या प्रदेशाचा स्वातंत्र्य हा गुणविशेष याला सौंदर्याचा अधिकारी करतो! स्वातंत्र्यापेक्षा जगात सुंदर असे काहीच नाही!” सुभाषबाबू म्हणाले.
“तेही खरंच आहे म्हणा.” भगतरामने हार पत्करली.
मधूनच धावत, दमले की चालत जाणारे सुभाषबाबू एका धोंड्यापाशी थांबले आणि त्या धोंड्यावर बसत म्हणाले,
“भगतराम; थकलो बुवा आपण आता. यापुढे एक पाऊलही टाकवणार नाही बस्स!” आजाराचा अशक्तपणा पुरता गेला नव्हता.
“नाही नाही सुभाषबाबू! चालावंच लागेल. अंधार पडत चालला आहे. इथे कुठे थांबणार? पुढे काही मिनिटांच्या आत पिश्कन मैना नावाचे गाव लागेल. तिथल्या मशिदीत मुक्काम करायचा आहे आपल्याला.
“ठीक आहे. तू म्हणशील तसं!”
रात्र होता होता पिश्कन मैनाचे दिवे दिसू लागले. मशीदही सापडली. तिथल्या एका माणसाने खायला कणसाचे रोडगे आणि वाडग्यातून गरम-गरम चहा आणून दिला. दिवसभराच्या पायपिटीच्या पार्श्वभूमीवर त्या सगळ्या पदार्थांना अमृताचीच चव आली होती. मशिदीला लागून असलेल्या मोठ्या खोलीत गवत अंथरून उतारूंच्या झोपण्याची सोय केली होती. पोटभर जेवण करून सुभाषबाबू त्या गवतावर हात पाय पोटाशी घेऊन झोपी गेले.
सकाळी एक खेचर भाड्याने घेऊन पुढचा प्रवास सुरु झाला. खेचरावर सुभाषबाबू, सोबत भगतराम आणि खेचरवाला असे अफगाणिस्थानच्या सीमेत शिरले. डोंगराळ भागातली छाती दडपून टाकणारी चढण, भोवळ आणणारी उतरण, चिंचोळ्या खिंडी यामुळे चालणं मुश्कील होत होतं. त्यातच बर्फ पडू लागलं. खेचराचे पाय घसरू लागले. एका उतरंडीवरून खेचराचा तोल गेला. पुढचे दोन पाय दुमडले गेले आणि पाठीवर बसलेले सुभाषबाबू समोर फेकले गेले. समोर उतार असल्याने सुभाषबाबू बर्फावर घासत, कोलांट्या खात पुढे जाऊ लागले. शेवटी एका झुडपाला अडखळले. भगतराम आणि खेचरवाल्याने हात देऊन त्यांना उठवले. अंगात मुक्या माराची ठणक घेऊन पुढचा प्रवास पायीच सुरू झाला. रात्री बऱ्याच उशिरापर्यंत पायपीट केल्यावर गाव आले. अफगाण सीमेतलं पहिलं गाव! पापण्यांपासून जोड्यापर्यंत बर्फात न्हालेले तिघेही एका अनोळखी घरासमोर उभे राहिले. दोन-तीनदा दार ठोठावल्यावर घराच्या मालकाने दरवाजा उघडला. भगतराम पुढे झाला,
“मी आणि माझे चाचा अड्डा शरीफच्या दर्ग्याकडे निघालो आहोत. उद्या सकाळी जलालाबाद गाठायचे आहे. या गावात आमच्या ओळखीचे कुणीही नाही. रात्रीपुरता आपल्याकडे आश्रय मिळाला तर मेहरबानी होईल.”
हो-नाही म्हणता म्हणता घरमालक तयार झाला. पहाटे लवकर उठून घरमालकाचे खेचर भाड्याने घेऊन गरहद्दीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. सकाळच्या कोवळ्या उन्हातच गरहद्दी आलं. इथून खेचरवाला परत गेला. पुढे जलालाबादकडे पायी प्रवास सुरू झाला.
थोडसं चालल्यावर एक मालवाहू ट्रक सापडला. त्या ट्रकच्या लॉरीत, चहाच्या खोक्यांवर बसून आजूबाजूने घासून जाणाऱ्या- जखमा करणाऱ्या फांद्या चुकवत झियाउद्दीन- रहमतखान जोडी भारीकोटला पोहोचली. त्यानंतर दिवस मावळता मावळता एकदाचे जलालाबाद आले. काबुल नंतरचे महत्त्वाचे शहर! मुक्काम!
दुसऱ्या दिवशी अड्डा शरीफ! यानंतर बुतखाक आणि मग काबूल!
लॉरी ड्रायव्हरच्या मिनतवाऱ्या करून बुतखाक गाठले. यानंतर मोटारीतून प्रवास करणे धोक्याचे म्हणून बुतखाक वरून टांगा करून काबुलचा रस्ता धरला.
२७ जानेवारी १९४१! सकाळी अकरा वाजता टांगा काबूलच्या लाहोरी गेट परिसरातील एका गलिच्छ सराई समोर उभा राहिला.
उतारू आपल्या उंट, घोडे, खेचर या वाहनांसह सराईत मुक्कामाला येत. जनावरांच्या मलमुत्राचा उग्र दर्प नागपुड्या जाळत होता. “माणसाच्या वैयक्तिक पापांचे क्षालन आणि कुंडलीतल्या अनिष्ट योगांचे निवारण जरी तीर्थक्षेत्रातील वास्तव्यानं आणि उत्तरनिर्माल्याच्या अवघ्राणानं होत असलं, तरी राष्ट्रीय प्रमादांचं क्षालन आणि पारतंत्र्यादि रोगांचे निवारण मात्र या घाणेरड्या सराईतील वास्तव्याने आणि मलमूत्राच्या उग्र दर्पानेच होणार आहे!” असा विचार येऊन सुभाषबाबू
स्वतःशी हसले.
काबूलमध्ये फिरताना एक दिवस अचानक भगतरामला बर्फाच्या चिखलात फसलेली, रशियाचा झेंडा मिरववणारी मोटार दिसली. त्यांच्याशी धावत जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला मात्र; दूर उभ्या असलेल्या सुभाषबाबूंकडे एक कटाक्ष टाकून ती मोटार निघून गेली. ओम फस्स!
रशियन नाहीतर जर्मन वकिलात! दाराशी उभ्या पहारेकऱ्याला भगतरामने बोलण्यात गुंतवले असताना सुभाषबाबू फाटकातून आत पसार झाले. अधिकाऱ्यांच्या खोलीत घुसून जर्मन भाषेत म्हणाले,
“मी सुभाषचंद्र बोस! तुमचा विश्वास नसेल तर मी ….”
तो अधिकारी सुभाषबाबूंना थांबवत कौतुकाने म्हणाला,
“मी भेटलोय तुम्हाला. बर्लिनमधील आमचे परराष्ट्रमंत्री रिब्रेनट्रॉप यांच्या आणि आपल्या भेटीच्या वेळी मी तिथेच होतो. बोला! काय हवंय आमच्याकडून?”
“मला तुमच्या देशात यायचंय. स्वातंत्र्याचा लढा सुरू करायला तुमच्या देशाची मदत हवी आहे.”
“मी आपल्याला शक्य ती सगळी मदत करेन, पण मला बर्लिनशी बोलावं लागेल. काही दिवस लागतील.”
एके दिवशी सुभाषबाबू आणि भगतराम सराईत बसले असतानाच अचानक एक अफगाण पोलिस आला आणि चौकशी करू लागला,
“कोण तुम्ही? इथे कशाला राहत आहात?”
“माझे चाचा आहेत. त्यांना अड्डाशरीफकडे घेऊन चाललोय. वाटेत बर्फ पडल्याने थांबलोय.”
“बरं, पण लवकर जा आणि पाच रुपये काढा!”
पाच रूपये घेऊन पोलीस निघून गेला. दुसऱ्या दिवशी दहा रुपये घेतले. तिसऱ्या दिवशी सुभाषबाबूंचे घड्याळ!
“भगतराम! हे सराईत राहणं काही खरं नाही. तुझ्या ओळखीचं कोणी नाही का इथे?”
“एक व्यापारी आहेत. इथे काबुलमध्येच दुकान आहे त्यांचं. पाहतो जाऊन काही जमतंय का ते!”
असं म्हणून भगतराम उत्तमचंद मल्होत्रा यांच्या दुकानाकडे निघाला.
स्वातंत्र्यदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आत्मार्पणाचा यज्ञ धडाडून पेटला होता. यज्ञदेवतेला आता उत्तमचंदांच्या घरादाराची आहुती हवी होती. सुभाषबाबू त्यासाठी फक्त निमित्त ठरणार होते.
क्रमशः सुभाष बावनी भाग २३.
ग्रंथ सूची:
१) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी
२) नेताजी- वि. स. वाळिंबे
३) कहाणी सुभाषचंद्रांची- य. दि. फडके
४) महानायक- विश्वास पाटील.
लेखक- अंबरीश पुंडलिक