सुभाष बावनी भाग २४ | बसुबाडीतील नाटक

सुभाष बावनी भाग २४ | बसुबाडीतील नाटक

सुभाष बावनी भाग २४ | बसुबाडीतील नाटक –

“कुठे जातील रे रंगाकाकाबाबू?” कालका मेलची गोमोह स्टेशन सोडण्याचा इशारा देणारी कर्कश्श शिट्टी ऐकून समाधानाने परत फिरलेल्या अशोक-मीरा-शिशीरच्या गप्पा सुरू झाल्या.

“मला वाटतं ते रशियाला जातील”- अशोक म्हणाला.

“रशिया त्यांना आसरा देईल असं वाटत नाही. बहुदा ते जर्मनीला जातील”- शिशीर

“इथपर्यंत तर सगळं ठरल्याप्रमाणे पार पडलं, आता काबुलपर्यंत लवकरात लवकर पोहोचले म्हणजे मिळवली.”

तिघेही रमत-गमत, गप्पा मारत बराडीला पोहोचले. बराच उशीर झाला होता. मीरा लवकर झोपी गेली. अशोक- शिशीर या भावंडांना काही झोप येईना! त्यांना राहून राहून रंगाकाकांच्या जुन्या जुन्या गोष्टी आठवत होत्या. त्यांच्या या विलक्षण साहसात आपण खारीचा वाटा उचलू शकलो, याबद्दल दोघांनाही धन्य धन्य वाटत होतं.

सकाळी शिशिर लवकर उठला. लगोलग परतीच्या प्रवासाला निघाला. वाटेत कालचीच बरद्वान, आसनसोल, चंद्रनगर ही गावे लागली. कालच्या आणि आजच्या मनःस्थितीत जमीन अस्मानाचा फरक होता. चिनसुऱ्यापाशी काही पोलिस दिसले. आता थांबवलं तरी फिकीर नव्हती. पण ती वेळच आली नाही. कुणीही न हटकता गाडी पुढे निघाली. संध्याकाळ होता होता वॉन्डरर कार कलकत्त्याला पोहोचली.

वूडबर्न पार्कच्या घरात पाय ठेवताच शरदबाबू त्याला सामोरे आले आणि काळजीनं म्हणाले,

“तुझ्या वहिनीची तब्येत कशी आहे आता?”

“बरी आहे बाबा!” शिशीरने प्रश्नाचा रोख समजून उत्तर दिलं.

“छान!” शरदबाबूंच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं.

बसूबाडीतील दिनक्रम व्यवस्थित सुरु होता. भल्यापहाटे सुभाषबाबूंच्या खोलीतून “क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः…” असे गंभीर ध्वनि ऐकून पहाऱ्यावरचे पोलीस निश्चिंतपणे कूस बदलत होते. खोलीच्या खिडकीतून वेळी अवेळी उदबत्तीचा धूर बाहेरच्या आसमंतात झेपावत होता. अंघोळीच्या वेळी धूतवस्त्र दारासमोर ठेवलं जात होतं. अन्नाच्या भरलेल्या आणि रिकाम्या थाळीची दाराखालून ये-जा होत होती. शार्दुलसिंग कवीश्वर, एच. व्हि. कामत यांना उद्देशून लिहिलेली सुभाषबाबूंच्या हस्ताक्षरातली पत्रे पोस्टाच्या पेटीत पडत होती. पत्रांची नोंद सरकारदरबारी घेतली जात होती. पोलीस कमिश्नर जार्वीन आपल्या चोख बंदोबस्तावर खूश होता.

“इथपर्यंत तर सगळं ठीक झालं; आता पुढे काय?” शरदबाबू समोर बसलेल्या शिशीर, द्विजेंद्र, अरविंदो आणि इलाकडे आलटून-पालटून पाहात म्हणाले.

“पुढे काय म्हणजे?” अरविंदोने विचारले.

“अरे सत्तावीसला कोर्टाची तारीख नाही का? सुभाषला न्यायला पोलीस येतील; नाही सापडला तर आपल्यालाच पकडतील; तुम्हीच पळून जायला मदत केली म्हणून!”

“मी तर हे धरूनच चाललो होतो” अरविंदो निरागसपणे म्हणाला

“आपल्याला सुभाष नाहीसा झाल्याचं पोलिसांइतकंच आश्चर्य वाटलं आहे, अशी बतावणी करता आली पाहिजे” शरदबाबूंनी स्पष्ट केलं.

“पण हे कसं शक्य आहे?” द्विजेंद्रने शंका काढली.

“सांगतो” असं म्हणून शरदबाबूंनी इकडे तिकडे पाहत कोणी ऐकत नाही ना याची खात्री करून घेतली आणि आपल्या मनातली योजना चौघांसमोर मांडली. कुणी काय करायचं हे ठरलं. सगळे समाधानाने आपापल्या कामाला रवाना झाले. ‘सुभाषबाबू खोलीत नाहीत, ही बातमी बाहेरच्या कुणाकडून तरी उघड व्हायला हवी’ अशी योजना तयार झाली.

पंचवीस जानेवारीच्या रात्री दारासमोर थाळी ठेवून नोकर निघून गेला. ते ताट रात्रभर तसंच पडून राहिलं. कुणीही आत ओढून घेतलं नाही. रिकामं ताट बाहेर सरकवलं नाही. सकाळपर्यंत त्या खोलीकडे घरातलं कुणीही फिरकलं नाही. सकाळी नोकर येऊन पाहतो, तो ताट तसंच!

त्याने ही गोष्ट द्विजेंद्रच्या कानावर घातली. द्विजेंद्रने काळजीने खोलीत जाऊन पाहिलं आणि शरदबाबूंना निरोप पाठवला. शरदबाबू आणि शिशीर लगबगीने आले.

द्विजेंद्र-शिशीर-अरविंद-इला “रंगाकाकाबाबू अदृश्य झाले!” म्हणून ओरडू लागले. घरात एकच कोलाहल माजला. ठाकूरघरातून प्रभावतीदेवी घाबऱ्याघुबऱ्या होऊन बाहेर आल्या आणि सुभाषबाबूंच्या खोलीत शिरल्या. तिथल्या उशा, तक्के, तस्वीरी, जपमाळ यांना हात लावून ‘सुभाष!’, ‘सुभाष!’ अशा हाका मारू लागल्या. शरदबाबूंकडे पहात विचारू लागल्या,

“शरद कुठे गेला रे आपला सुभाष?”

“आई तू शांत हो बघू आधी! शिशीर तू केऊरतला स्मशानभूमीत जाऊन ये! तिथे अंगाला राख-बिख फासून बसला असेल. तिथे नसेल तर कालीघाटावर एक बैरागी बुवा राहतात, त्यांना जाऊन विचार! अरविंदो तू पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवून ये!” शरदबाबूंनी भराभर आदेश सोडले.

थोड्याच वेळात शिशिर हात हलवत परत आला.

“काय रे? काही पत्ता लागला का?”- शरदबाबूंच्या प्रश्नाच्या उत्तरात त्याने नकारार्थी मान हलवली.

सुभाषबाबूंच्या खोलीसमोर सगळे बोस कुटुंबीय जमले होते. तेवढ्यात अरविंदोच्या मागोमाग जार्वीनसाहेब दात-ओठ खात बसूबाडीत येऊन पोहोचले.

“अदृश्य झाला म्हणजे काय? सांगा कुठे लपवून ठेवलंय त्यांना? नाहीतर सगळ्यांना कोठडीत टाकून हंटर लागवतो.”

शरदबाबू, शिशीर, अरविंदो, द्विजेंद्र, इला सगळे हात बांधून खाली पाहत उभे होते. सगळ्यांचं एकच उत्तर- “कालपर्यंत होते; आज नाहीत. हे आम्हाला नोकराकडूनच माहीत पडतंय!”

शेवटी जार्वीन साहेब प्रभावतीदेवींकडे वळला,

“आजी बोला! कुठंय तुमचा मुलगा?”

“अरे माझा मुलगा हरवला आहे रे! तुमच्याच लोकांचा पहारा असतांना हरवला आहे. कुठे गेलाय हे तुम्ही पोलिसांनीच ना रे शोधून काढायचं?” जार्वीन चरफडला. त्यानं चारही दिशा पिंजून काढायला माणसं पाठवली.

पाहता पाहता देशभर बातमी पसरली, वर्तमान पत्रांचे मथळे रंगू लागले,

“श्री सुभाषचंद्र बोस यांचे काय झाले? घरातून अनपेक्षित प्रयाण!”

गांधीजी, गुरुदेव टागोर यांच्या सहानुभूतीच्या, आश्चर्याच्या, कुतूहलाच्या तारा येऊ लागल्या.

ज्याच्या त्याच्या तोंडी ‘सुभाषबाबू गेले कुठे?’, ‘सुभाषबाबू गेले कुठे?’ हाच प्रश्न होता.

समाजमन हे विलक्षण साहस पाहून रोमांचित झालं.

बंगालमध्ये शिवचरित्र पोहोचवणाऱ्या टिळकांचा आत्मा गदगदला. शिवछत्रपतींचा गनिमी कावा अजूनही भारताच्या मातीत जिवंत असल्याची प्रचिती घेऊन सह्याद्रीचा ऊर भरून आला.

काही दिवसांनी सुभाषबाबू पकडले गेल्याच्या बातम्या आल्या, पण त्या खोट्या निघाल्या. अशा कुठल्याही बातमीवर शरदबाबू विश्वास ठेवणार नव्हते.

सुभाषने सांगितल्याप्रमाणे त्याच्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या बंगाली भाषेतील पत्राची ते आतुरतेने वाट पाहू लागले.

क्रमशः सुभाष बावनी भाग २४ | बसुबाडीतील नाटक.

लेखक – © अंबरीश पुंडलिक

ग्रंथ सूची:
१) नेताजी- वि. स. वाळिंबे
२) कहाणी सुभाषचंद्रांची- य. दि. फडके
३) महानायक- विश्वास पाटील

Leave a comment