सुभाष बावनी भाग २५ | उत्तमचंदांच्या घरी

सुभाष बावनी भाग २५ | उत्तमचंदांच्या घरी

सुभाष बावनी भाग २५ | उत्तमचंदांच्या घरी –

“सुभाषबाबू कुठे गेले असतील? हरिद्वारला कोण्या साधूच्या वेषात पकडले गेले म्हणे; मग तो तोतया निघाल्यामुळे सोडून द्यावं लागलं! चांगली भंबेरी उडवून दिली सुभाषबाबूंनी ह्या ब्रिटीशांची. पण मग ते कुठे गेले असावेत? बहुतेक जपानला. नक्कीच!” काबूलच्या लबे दर्यामधील आपल्या दुकानात बसून सिव्हिल अँड मिलिटरी गॅजेटचे अंक वाचत असताना उत्तमचंदांचं विचारचक्र सुरू होतं. राहून राहून त्यांना सुभाषबाबूंच्या भारतातून अदृश्य होण्याचं कुतूहल, कौतुक आणि अभिमान वाटत होता. तेवढ्यात-

“उत्तमचंद मल्होत्रांचं दुकान हेच आहे का?” भगतरामने अस्खलित उर्दूतून प्रश्न विचारला. अफगाणिस्तानात उर्दू ऐकून उत्तमचंद चपापले.

“हो! पण तुम्ही कोण?”

“मी भगतराम तलवार! हरिकिशनचा भाऊ! हरिकिशन तुमच्या सोबत…”

“अरे हरिकिशनला कोण विसरणार बाबा? ये! ये! आत ये असा! काय दिवस होते यार नौजवान भारत सभेचे. जीवावर उदार होऊन बेहोष जगण्याचे. तुझा भाऊ खरा साहसी! हसत हसत फासावर चढला! बोल! इकडे कसा? काय काम काढलंस?”

“भारतातून एका मोठ्या नेत्याला घेऊन मी इथपर्यंत आलो आहे” दबक्या आवाजात भगतराम म्हणाला.

भगतरामचा आवेश पाहून उत्तमचंदांना हसू आवरेना. येणारं हसू दाबत ते म्हणाले,

“अरे आव तर असा आणतो आहेस, जणू काही सुभाषबाबूंना घेऊन आला आहेस काबूलमध्ये!”

काऊंटरवर दोन्ही हात टेकवून समोर सरकत, डोळे बारीक करून पुटपुटल्यासारखा भगतराम म्हणाला,

“होय! सुभाषबाबूच! लाहोरी गेट जवळच्या एका सराईत उतरलो आहोत आम्ही. पण तिथे एक हवालदार रोज येऊन आम्हाला कोतवालीवर घेऊन जायची धमकी देतो आणि जाताना पैसे मागतो.

“सुभाषबाबूंची जर्मनी किंवा रशियाकडे जाण्याची व्यवस्था होईपर्यंत त्यांच्यासाठी सुरक्षित असा आसरा हवा आहे, त्यासाठीच मी तुमच्याकडे आलो आहे.”

आता मात्र उत्तमचंद गंभीर झाले. ‘जर आपल्या घरी असताना सुभाषबाबू पकडले गेले तर?? आपलं घरदार, व्यवसाय, बायका-पोरांचं काय होईल?’ याची कल्पनाही त्यांना करवत नव्हती.

१९३० सालच्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात ते दोन वर्षांसाठी तुरुंगात जाऊन आले होते; पण तो सडाफटिंग काळ होता. आता ते परवडणारं नव्हतं. सगळं घरदार उद्ध्वस्त होऊन जाईल. बायकापोरांना माणसं सोडा; कुत्रंही विचारणार नाही.

‘काय करावं? सरळ नाही म्हणावं का? पण सुभाषबाबू तरी ही जोखीम कुणासाठी उचलत आहेत, स्वतःसाठी? आपल्यासारख्यांसाठीच ना! मग त्यांच्या या साहसात खारीचा वाटा उचलण्याची संधी नियती देत असताना त्यांना काय वार्‍यावर सोडून द्यायचं? नाही! नाही! हे पाप आपल्याच्यानं होणार नाही. बरबाद झालो तरी बेहत्तर; पण आपल्या सुभाषबाबूंना बेवरशासारखं त्या अफगाणी कुत्र्यांच्या तावडीत सापडू देणार नाही!’

“उत्तमचंदजी? मग करणार ना सुभाषबाबूंना मदत? तुम्हीच आमची पहिली आणि शेवटची आशा आहात!” भगतरामनं उत्तमचंदांना भानावर आणलं.

“हो! हो! अलबत! उद्या दुपारी चार वाजता तू सुभाषबाबूंना घेऊन दुकानात ये!”

“शुक्रिया!”

दुसर्‍या दिवशी ठरल्याप्रमाणे भगतराम दुकानात आला, दुकान बंद करून उत्तमचंद घाईघाईने घराकडे निघाले. मागोमाग भगतराम. त्यामागं बरच अंतर राखून झियाउद्दीन साहेब आस्ते आस्ते पावलं टाकू लागले. बर्फवृष्टीमुळे सर्वांचीच खिडक्या दारे बंद होती. उत्तमचंद वेगाने आपल्या घराच्या जिन्यावर चढले आणि पायऱ्या चढून घरात शिरले. भगतराम आणि सुभाषबाबूंनी त्यांचं अनुकरण केलं. दारातच उभ्या असलेल्या रामोदेवींच्या चेहऱ्यावरची नाराजीची रेषा उत्तमचंदांनी पाहिली.

खोलीत शिरल्याशिरल्या सुभाषबाबूंनी बर्फाने ओले चिंब झालेले पायमोजे काढून टाकले. पाय गारठून गेले होते. उत्तमचंदांनी शेगडी आणून ठेवली. खोलीत ऊब निर्माण झाली. चहाचे दोन दोन घोट घशाखाली गेल्यावर जरा बरं वाटलं. रात्री जेवणं झाल्यावर सुभाषबाबूंची आणि भगतरामची झोपायची व्यवस्था करून उत्तमचंद आपल्या खोलीत आले.

“पाहुणे कोण आहेत ते सांगाल का?”

“तू जागीच अजून?”

“ती माणसं घरात असताना मला झोप येईल असं वाटतं का?”

“ऐक मग! ते चष्म्यावाले आहेत ना, ते सुभाषबाबू आहेत. भारतातून निसटून आलेले!”

“सुभाषबाबू म्हणजे सुभाषचंद्र बोस? आपल्या घरी?”

“हो! त्यांची जर्मनीत जायची सोय होईपर्यंत इथे राहतील. चालेल ना?” बायकोची प्रतिक्रिया काय येते याकडे उत्तमचंदांचे लक्ष लागले.

“आनंदाने!”

“पण याचा परिणाम?”

“काहीही झाला तरी!” रामोदेवी निर्धाराने म्हणाल्या. उत्तमचंदांच्या मनावरचे ओझे उतरले. ते समाधानाने झोपेच्या अधीन झाले. सकाळी उठून सुभाषबाबूंसोबत चहा प्यावा; तयारी करून खोलीला बाहेरुन कुलूप लावून दुकानात जावं; आणि रात्री सुभाषबाबूंसोबत गप्पा मारत जेवण करावं; असा मल्होत्रा कुटुंबाचा दिनक्रम झाला.

एक दिवस असेच सकाळी उत्तमचंद सुभाषबाबूंसमवेत चहा घेत बसले असताना खालच्या मजल्यावर राहणारा रामलाल अचानक वर आला. घराचे दार उघडेच राहीले होते. रामलालने समोर चष्मा लावलेली व्यक्ती पाहिली मात्र! तो भीतीने थरथर कापू लागला. लगोलग खाली जाऊन त्याने सामानाची बांधाबांध केली व बायकापोरांसहित घर सोडून निघून गेला.

‘आता इथे राहण्यात काही अर्थ नाही’ असा विचार करून सुभाषबाबूंनीही आपली वळकटी आवरली आणि ते एका सराईत येऊन राहू लागले. ‘जर्मनीचा काही प्रतिसाद नाही, आता केव्हाही पोलीस येणार, आपल्याला तुरूंगात टाकणार आणि ब्रिटिशांच्या हवाली करणार; संपलं सगळं! आता काय करावं?’

उत्तमचंद स्वतःशी चडफडले- ‘आपल्या घरी आल्यामुळे सुभाषबाबूंवर हे संकट आलं आहे. आता काय करावं?’

भगतराम स्वतःला दूषणे देऊ लागला- ‘एवढा विश्वास सुभाषबाबूंनी आपल्यावर टाकला आणि आपण त्यांना सुखरूप रशिया किंवा जर्मनीकडे रवाना करू शकलो नाही. ही सगळी आपली चूक आहे. आता काय करावं?’

‘आता काय करावं?’ हा प्रश्न सुभाषबाबू, उत्तमचंद आणि भगतराम या तिघांसमोर समोर आ वासून उभा राहिला होता. छोट्याशा गाफीलपणामुळे आत्तापर्यंतच्या सगळ्या चातुर्यावर पाणी फिरायची वेळ आली होती. आता सर्वात आधी अफगाणी पोलिसांची वक्रदृष्टी कुणाकडे वळते, याचा आपापल्या जागी विषण्णपणे बसून तिघेही कानोसा घेऊ लागले.

क्रमशः सुभाष बावनी भाग २५ | उत्तमचंदांच्या घरी.

(फोटोतील व्यक्ती-उत्तमचंद मल्होत्रा)

ग्रंथ सूची:
१) When Bose was Ziauddin- उत्तमचंद मल्होत्रा
२) नेताजी- वि. स. वाळिंबे
३) महानायक- विश्वास पाटील.

लेखक- अंबरीश पुंडलिक.

Leave a comment